वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ११/८ पृ. २०-२४
  • चरबीच्या बरणीपासून एक धडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चरबीच्या बरणीपासून एक धडा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहुदी वारसा
  • नात्सी कब्जा
  • भयात केलेलं सामुहिक पलायन
  • निर्वासिताचं जीवन
  • आमच्या कुटुंबानं निवडलेला धर्म
  • एका नवीन देशातील सेवा
  • मी यहोवाची कशी उतराई होऊ?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • “विश्‍वास आमुचा, ना डगमगणारा”!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • तुमची पालकीय भूमिका
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
सावध राहा!—१९९७
g97 ११/८ पृ. २०-२४

चरबीच्या बरणीपासून एक धडा

युद्धाचे भयकंप, आणि विशेषकरून दुसऱ्‍या महायुद्धाच्या शेवटी मी अवघ्या चार वर्षांचा होतो तेव्हा, जीव मुठीत घेऊन पळत असतानाचे भयकंप, हे सर्व माझ्या सुरवातीच्या स्मृतींपैकीच काही आहेत. सात जणांचं आमचं कुटुंब, त्यावेळी जर्मनीचा भाग असलेल्या पूर्व प्रशयात वास्तव्यास होतं.

जवळ येणाऱ्‍या रशियन बाँबफेकी विमान दलाचा कानोसा घेत, त्या भयप्रद अंधाराकडे मी टक लावून पाहत होतो. एकाएकी, डोळ्यांवर अंधारी आणणारे व कानठळ्या बसविणारे विस्फोट यांमुळं, काही शेकडो मीटरच्या अंतरावर असलेल्या इंधन टाक्यांनी पेट घेतला. आम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करत होतो ती रुळांवर हेलकावे खाऊ लागली आणि लोकांनी आरडाओरड सुरू केली. पण थोड्याच वेळानं बाँबफेकींनी तिथून काढता पाय घेतला आणि आमचा प्रवास जारी राहिला.

दुसऱ्‍या एके प्रसंगी, मला असाच डोळा लागला असताना मी एकाएकी खडबडून जागा झालो, पाहतो तर काय एक स्त्री, आम्ही प्रवास करत असलेल्या माल डब्यातून उडी टाकण्यासाठी जीवाच्या आकांतानं किंचाळत होती. बाबांनी तिला अडवलं आणि आत ओढून घेतलं. आपल्या बाळाला कुशीत घेऊन ती स्त्री दारापाशीच निजली होती. जाग आल्यानंतर तिला आढळलं, की बाळ थंडीनं गारठून मेलं होतं. लोकांनी मग ते शव बाहेर बर्फात फेकून दिलं आणि शोकाकुल झालेली ती आई आपल्या लेकरासह जीव देण्यासाठी दार उघडून बाहेर उडी टाकण्याचा प्रयत्न करत होती.

बोचऱ्‍या थंडीपासून आसरा मिळविण्याकरता आमच्या माल डब्याच्या मध्यभागी मडक्याच्या आकाराची एक शेगडी ठेवली होती. बटाटे शिजवण्याकरता, माल डब्याच्या एका कोपऱ्‍यात असलेला सरपणाचा साठा काटकसरीनं वापरला जात होता. बटाटे भरलेल्या गोण्या म्हणजे आमचं अंथरूणच होतं, कारण त्यांवर आडवं झाल्यानं माल डब्याच्या गारठलेल्या तळाच्या पृष्ठभागापासून निदान थोडंतरी संरक्षण व्हायचं.

आम्ही जीव मुठीत घेऊन का पळत होतो बरं? कित्येक महिने आश्रित म्हणून आमच्या कुटुंबाचा निभाव कसा लागला? याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो.

यहुदी वारसा

पाच मुलांत मी सर्वांत धाकटा असून डिसेंबर २२, १९४०, या दिवशी—लिक, पूर्व प्रशया (सध्या इल्क, पोलंड) या ठिकाणी माझा जन्म झाला. सन १७०० शतकाच्या उत्तरार्धात, धार्मिक छळामुळं माझ्या यहुदी पूर्वजांना जर्मनी सोडणं भाग पडलं. इतिहासातील एका मोठ्या सामुहिक देशांतरात त्यांनी रशियाला स्थलांतर केलं. पुढं, १९१७ साली, रशियातील तत्कालीन यहुदी विरोधी छळापासून पळ काढण्यासाठी माझ्या यहुदी आजोबांनी, वोल्गा नदीपाशी असलेल्या आपल्या गावातून पूर्व प्रशयात स्थलांतर केलं.

आजोबांना जर्मनीचं नागरिकत्व मिळालं आणि असं वाटत होतं जणू पूर्व प्रशया आता एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. ज्यांची पहिली नावं यहुदी होती त्यांनी आर्यन नावं पत्करली. यास्तव, फ्रीड्रिख झॉलोमोन असं नाव असलेले माझे बाबा, फ्रिट्‌स या नावानं ओळखले जाऊ लागले. दुसऱ्‍या बाजूला पाहताना, माझी आई प्रशयनच होती. माझे बाबा संगीतकार होते आणि सन १९२९ मध्ये बाबांचा व आईचा विवाह झाला होता.

माझ्या आईबाबांना, जीवन सर्वस्वी सुखाचं व उमेदीचं वाटत होतं. आजी फ्रेडरीक आणि पणजी विल्हेल्मीन यांचा एक भला मोठा शेतमळा असून आमच्या आईबाबांसाठी व आम्हा मुलांसाठी ते एखाद्या दुसऱ्‍या घरासारखंच होतं. आमच्या कुटुंबात संगीताला एक महत्त्वाचं स्थान होतं. आणि बाबांच्या डान्स बँडमध्ये आई ड्रम वाजवायची.

नात्सी कब्जा

सन १९३९ मध्ये, राजकीय क्षेत्रावर एक अभद्र सावट थैमान घालू लागलं. यहुदी यक्षप्रश्‍नावरील अडॉल्फ हिटलरचा तथाकथित तरणोपाय माझ्या आईबाबांना भेडसावू लागला. आम्हा मुलांना मात्र आमच्या यहुदी वारशाचा थांगपत्ताही नव्हता; अगदी बाबांच्या मृत्यूनंतर नऊ वर्षांनी, म्हणजे १९७८ साली आईचा मृत्यू झाला तोपर्यंत, आम्हाला त्याचा पत्ता नव्हता.

आपण यहुदी आहोत अशी शंका कोणाला येऊ नये म्हणून बाबा जर्मन सैन्यात भरती झाले. सुरवातीला त्यांनी संगीत दलात कार्य केलं. तथापि, त्यांच्या पार्श्‍वभूमीची माहिती असलेल्या कोणा एका व्यक्‍तीनं, ते यहुदी असल्याचं सांगितलं तेव्हा आमच्या सबंध कुटुंबाची कसून चौकशी करण्यात आली आणि आमचे फोटोही काढण्यात आले. आम्ही यहुद्यांसारखेच दिसतो की नाही हे पाहण्याचा नात्सी तज्ज्ञांनी प्रयत्न केला. आम्ही कदाचित आर्यन असल्याचं त्यांना वाटल्यामुळं, सुदैवानं आम्हाला अटक झाली नाही किंवा आम्हाला तुरुंगातही डांबण्यात आलं नाही.

सप्टेंबर १, १९३९ मध्ये जर्मनीनं पोलंडवर कब्जा मिळविला तेव्हा पुन्हा एकवार आमच्या एकेकाळच्या शांतिमय प्रदेशावर भयाचं सावट थैमान घालू लागलं. वेळ न दवडता एका सुरक्षित स्थानी आश्रय घेण्याची आईची इच्छा असतानाही, तसं करण्यास नात्सी अधिकाऱ्‍यांनी आमच्या कुटुंबाला जबरीनं अडवलं. मग, सन १९४४ च्या उन्हाळ्यात रशियन सैन्यानं पूर्व प्रशयाच्या दिशेनं आगेकूच केली तेव्हा जर्मनांनी, लिक आणि आसपासची क्षेत्रं खाली करण्याचा विचार केला. एके दिवशी जुलै महिन्यात, आमचं घर सोडून जाण्यासाठी फक्‍त सहा तासांचा अवधी आम्हाला दिला गेला.

भयात केलेलं सामुहिक पलायन

आई मोठ्या पेचात पडली होती. काय घ्यावं? कुठं जावं? कसं जावं? आपण पुन्हा कधीतरी घरी येऊ की नाही? प्रत्येक कुटुंबाला अगदीच मर्यादित सामान घेण्याची परवानगी होती. आईनं नीट विचार करून निवडक वस्तूच घेतल्या आणि सोबत एका बरणीत बीफची चरबी आणि बेकनचे तुकडेसुद्धा घेतले—आम्हाला आरामात घेऊन जाता येईल इतकेच सामान. इतर कुटुंबांना अधिक महत्त्वाच्या वाटल्या त्या वस्तू त्यांनी घेतल्या.

ऑक्टोबर २२, १९४४ मध्ये, रशियन सैन्य दलानं पूर्व प्रशयात शिरकाव केला. एका लेखकानं असं स्पष्टीकरण दिलं: “ज्या रशियन सैनिकांनी आपल्या कुटुंबांची कत्तल झाल्याचं आणि घरादारांची व पिकांची राखरांगोळी झाल्याचं स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं, ते सूडबुद्धीनं झपाटलेले असावेत, हे साहजिकच आहे.” या विध्वंसाचे जबरदस्त भयकंप पूर्व प्रशयातही उमटले आणि अत्यंत भयभीत झालेले लोक जीव मुठीत घेऊन पळाले.

या वेळेपर्यंत आम्ही निर्वासित असून पूर्व प्रशयाच्या पश्‍चिमी टोकापाशी राहत होतो. आता पळ काढण्याकरता उरलेला एकमेव मार्ग म्हणजे बाल्टिक समुद्र, त्यामुळं लोक, बंदर असलेल्या डान्तसीग शहराकडे (सध्याचे ग्दान्स्क, पोलंड) पलायन करू लागले. त्या ठिकाणी, तातडीच्या सुटकेसाठी जहाजांचा उपयोग करून घेतला गेला. जानेवारी ३०, १९४५ या दिवशी, डान्तसीग जवळील ग्डीनीया इथून निघालेल्या विल्हेल्म गूस्टलॉफ या जर्मन प्रवासी जहाजापर्यंत आम्हाला जी ट्रेन पोहंचवणार होती तीच चुकली. नंतर आम्हाला कळालं, की रशियन टॉर्पेडोमुळं ते जहाज बुडालं आणि सुमारे ८,००० प्रवासी, बर्फाळ पाण्याखाली समाधिस्थ झाले.

समुद्राकडील सुटकेचा मार्ग बंद झाल्यामुळं आम्ही पश्‍चिमेस पाय वळवले. सैन्यातून तात्पुरत्या रजेवर असताना, सुरवातीला वर्णन केल्याप्रमाणं, बाबांनीही काही अंतरापर्यंत आमच्यासोबत ट्रेननं प्रवास केला. लवकरच त्यांना पुन्हा लष्करी सेवेत रुजू व्हावं लागलं, त्यामुळं पुढचा लांबचा, खडतर प्रवास आम्ही स्वतःच केला. आईनं चरबीची बरणी जपून ठेवली आणि प्रत्येक वेळी त्यातून थोडंथोडं ती वाटून देत असे. आम्ही वाटेत गोळा केलेल्या उरल्यासुरल्या अन्‍नाला हे पूरक ठरायचं आणि त्या प्रदीर्घ हिवाळ्यात त्यावरच आमचा निभाव लागला. ती चरबीची बरणी सोन्या-चांदीपेक्षा कितीतरी मूल्यवान ठरली!

रेल्वे स्टेशनपाशी जर्मन सैनिकांनी आणि रेड क्रॉसनं उघडलेलं एक सूप किचन असलेल्या स्टॉरगॉर्ट नगरात शेवटी आम्ही पाय टेकवला. सपाटून भूक लागलेल्या एखाद्या लेकराला ते सूप जणू टवटवीत करणारं होतं. कालांतरानं, उपाशीतापाशी आणि शिणलेल्या अवस्थेत आम्ही जर्मनीतील, हॅम्बुर्घ इथं पोहंचलो; तरी आमचा निभाव लागल्याबद्दल आम्ही आनंदी होतो. रशियन आणि पोलिश युद्धकैदींसोबत, एल्ब नदीलगतच्या एका शेतमळ्यावर आमची राहण्याची सोय केली होती. मे ८, १९४५ रोजी युरोपमधील युद्ध संपुष्टात आलं तेव्हा आमची परिस्थिती अत्यंत अनिश्‍चित होती.

निर्वासिताचं जीवन

अमेरिकन लोकांनी बाबांना कैद करून नेले आणि विशेष म्हणजे, ते एक संगीतकार असल्याचं त्यांना समजलं तेव्हा त्यांनी बाबांना उत्तम वागणूक दिली. त्यांच्या स्वतंत्र दिनाच्या समारंभासाठी त्यांनी बाबांच्या संगीत कौशल्यांचा उपयोग करून घेतला. थोड्याच काळानंतर, बाबांनी कसाबसा तिथून पळ काढला आणि हॅम्बुर्घला परतले जिथं आमचं आनंदी पुनर्मिलन झालं. आम्ही एका लहानशा घरात स्थिरावलो, शिवाय लवकरच आमच्या दोन्ही आज्या देखील तिथं सुरक्षित पोहंचल्या आणि आमच्याबरोबर राहू लागल्या.

तथापि, काही काळानंतर, स्थानिक रहिवासी आणि आमचं स्वतःचं लुथेरन चर्च देखील अनेक निर्वासितांचा तिरस्कार करू लागलं. एकदा संध्याकाळच्या वेळी एक पाळक आमच्या घरी आला. निर्वासित असल्याच्या आमच्या स्थितीबद्दल आमचा पाणउतारा करून मुद्दामहूनच त्यानं आमच्या भावना दुखावल्या. बाबांचा तर पाराच चढला आणि ते चांगले धडधाकट असल्यामुळं त्यांनी त्या प्रचारकावर हात उचलला. आमच्या आईनं व आजींनी त्यांना रोखलं. पण तरी त्यांनी त्या पाळकाला उचलून दारापाशी नेलं आणि घराबाहेर ढकलून दिलं. त्या घटकेपासून आमच्या घरात धर्माविषयीची चर्चा करण्यास बाबांनी सक्‍त मनाई केली होती.

या घटनेनंतर लवकरच, बाबांनी जर्मन रेल्वेमध्ये नोकरी पत्करली आणि आम्ही हॅम्बुर्घच्या सरहद्दीवर स्थलांतर केलं जिथं एका न वापरल्या जाणाऱ्‍या रेल्वेच्या डब्यात आम्ही राहिलो. नंतर बाबांनी आमच्यासाठी एक सुबक घर बांधलं. परंतु, लोकांच्या मनांत अद्यापही निर्वासितांविषयी द्वेषभाव होताच आणि लहानगा असल्यामुळं, स्थानिक मुलांच्या शारीरिक आणि भावनिक दुर्व्यवहाराचा मी शिकार बनलो.

आमच्या कुटुंबानं निवडलेला धर्म

लहानगा असल्यामुळं मी माझ्या दोन आजींसोबतच निजायचो. बाबांनी सक्‍त ताकीद दिली असतानाही ते घरी नसले की ह्‍या दोन्ही आज्या मला देवाबद्दल सांगत असत, गीत गात असत आणि त्यांचं बायबल वाचत असत. माझी आध्यात्मिक रुची जागृत झाली होती. त्यामुळं, मी अवघ्या दहा वर्षांचा होतो तेव्हा रविवारच्या दिवशी चर्चला उपस्थित राहण्यासाठी मी येऊन-जाऊन बावीस किलोमीटरचं अंतर चालू लागलो. तथापि, मी उपस्थित केलेल्या माझ्या अनेकविध प्रश्‍नांची मला समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत तेव्हा मात्र मी निराश झालो होतो.

मग, १९५१ च्या उन्हाळ्यात, सभ्य पोशाख केलेल्या एका गृहस्थानं आमचं दार ठोठावलं आणि टेहळणी बुरूज नियतकालिकाची एक प्रत आईला दाखवली. त्यानं म्हटलं: “हे टेहळणी बुरूज नियतकालिक देवाच्या राज्याची गहन माहिती देतं.” मी अतिशय आनंदी झालो कारण मला नेमकं तेच तर हवं होतं. पण आईनं सभ्यतेनं नको म्हणून सांगितलं; हे साहजिकच आहे, कारण बाबा धर्माचा विरोध करायचे. तथापि, मी इतका अट्टाहास केला की शेवटी आईनं मान्य करून माझ्यासाठी एक प्रत घेतली. काही समयानंतर, अर्नस्ट हिबिंग पुन्हा परतले आणि “देव सत्य होवो” हे पुस्तक देऊन गेले.

या काळादरम्यानच बाबांचा अपघात झाला होता आणि त्यांचा पाय मोडला होता. याचा अर्थ, नाईलाजानं त्यांना घरातच बसावं लागत होतं. त्यांच्या पायाला प्लास्टर असतानाही ते लंगडत लंगडत चालू शकत होते. दिवसा ते घराबाहेर निघायचे आणि फक्‍त जेवणाच्या वेळी हजेरी लावायचे, त्यामुळं आम्ही पेचातच पडलो. आठवडाभर हे असंच चालू राहिलं. माझ्या लक्षात आलं, की बाबा बाहेर निघून जायचे नेमकं तेव्हाच माझं पुस्तकही गायब व्हायचं. मग एकदा जेवण करत असताना बाबांनी मला सांगितलं: “तो मनुष्य पुन्हा आला, की मला सांग, मला त्याला भेटायचंय.”

जेव्हा बंधू हिबिंग परतले तेव्हा आश्‍चर्य म्हणजे, बाबांनी टेबलावर ते पुस्तक जोरानं आपटलं आणि म्हणाले: “हेच सत्य आहे!” लगेचच बायबल अभ्यास सुरू झाला आणि काही काळानंतर कुटुंबातील इतरांनी देखील अभ्यास केला. बंधू हिबिंग माझ्यासाठी एक विश्‍वस्त उपदेशक आणि सच्चे स्नेही बनले. मला नव्यानेच गवसलेला विश्‍वास मी इतरांना सांगण्याचा प्रयत्न करू लागलो त्यामुळं लवकरच मला सन्डे स्कूलमधून काढून टाकण्यात आलं. म्हणून मग मी लूथरेन चर्चला देखील राजीनामा देऊन टाकला.

जुलै १९५२ साली मी माझ्या प्रिय स्नेह्‍याबरोबर, घरोघरी देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात सहभाग घेऊ लागलो. प्रत्येक रविवारी, बंधू हिबिंग घरमालकांना संदेश कसा सांगतात हे लक्षपूर्वक ऐकण्यास मला सांगत असत. काही आठवड्यांनंतर त्यांनी इमारतींच्या एका मोठ्या ब्लॉककडे बोट दाखवून म्हटलं: “आता तिथं तू एकट्यानंच कार्य करायचं.” काही वेळानंतर माझी भीती हरपली आणि लोकांशी बोलण्यात तसंच त्यांना बायबल साहित्य वाटण्यात मला चांगलंच यश मिळालं.

लवकरच, यहोवाला केलेल्या माझ्या समर्पणाचं द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेण्यास मी पात्र झालो. मार्च २९, १९५३ रोजी माझा आणि बाबांचा बाप्तिस्मा झाला आणि नंतर त्याच वर्षी आईचा देखील. सरतेशेवटी आमच्या कुटुंबातील सर्वांचाही, म्हणजे माझी बहीण एरीका; माझे भाऊ हाईन्ट्‌स, हर्बर्ट आणि वर्नर; तसेच आमच्या प्रिय आज्या ज्यांनी तोपर्यंत वयाची ८० गाठली होती, या सगळ्यांचा बाप्तिस्मा झाला. मग, जानेवारी १९५९ मध्ये मी एक पायनियर, म्हणजे एक पूर्ण वेळेचा सेवक बनलो.

एका नवीन देशातील सेवा

बाबा मला नेहमी जर्मनी सोडण्यास आर्जवत असत आणि मला असं वाटतं याचं मूळ कारण, त्यांच्या मनात पूर्वीच्या यहुदी विरोधाविषयी बसलेली अखंड भीती, हेच असावं. ऑस्ट्रेलियाला देशांतर करण्यासाठी मी अर्ज केला तोही या आशेनं की पापुआ-न्यू-गिनी इथं किंवा मग इतर कोणत्याही पॅसिफिक बेटावर जाऊन मिशनरी सेवा करण्यासाठी ही एक चढती पायरी ठरेल. मी आणि माझा भाऊ वर्नर आम्ही दोघंजण जुलै २१, १९५९ रोजी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया इथं पोहंचलो.

काही आठवड्यांतच, फूटस्क्रे मंडळीत पूर्ण-वेळेची सेवक म्हणून सेवा करणारी मेल्वा पीटर्झ, हिच्याशी माझी गाठ पडली आणि १९६० साली आम्ही विवाहबद्ध झालो. आम्हाला दोन मुली झाल्या आणि त्यांनी देखील यहोवा देवासाठी प्रेम विकसित करून त्याला आपलं जीवन समर्पित केलं. आम्ही आमचं जीवन साधंसुधंच राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, जेणेकरून कुटुंब या नात्यानं अधिक पूर्णपणे आम्ही आध्यात्मिक ध्येयांचा पाठपुरावा करू शकू. कित्येक वर्षांपर्यंत, म्हणजे मेल्वाच्या तब्येतीनं तिला साथ दिली त्या टोकापर्यंत तिनं एक पायनियर म्हणून सेवा केली. सध्या, कॅनबेरा शहरातील, बेलकॉनन मंडळीत मी एक वडील आणि पायनियर या नात्यानं कार्य करत आहे.

माझ्या बालपणाच्या अनुभवांतून, यहोवाच्या तरतुदींत आनंदी व तृप्त राहण्यास मी शिकलो आहे. आईनं घेतलेल्या चरबीच्या बरणीपासून मला समजलं आहे की बचाव, सोन्या-चांदीवर नव्हे तर आवश्‍यक तितक्याच भौतिक गरजांवर, आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे देवाचं वचन, बायबल याच्या अभ्यासावर आणि ते जे काही शिकवतं त्याचा अवलंब करण्यावर विसंबून असतो.—मत्तय ४:४.

येशूच्या आईचे अर्थपूर्ण शब्द खरोखरच सत्य आहेत: “‘त्याने [“यहोवाने,” NW] भुकेलेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे,’ व ‘धनवानास रिकामे लावून दिले आहे.’” (लूक १:५३) आनंदाची गोष्ट अशी, की सात नातवंडं मिळून माझ्या कुटुंबातील ४७ सदस्यं आज बायबल सत्याच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. (३ योहान ४) या सर्वांबरोबर तसंच आमची अनेकानेक आध्यात्मिक मुलं व नातवंडं यांच्यासहित मी आणि मेल्वा, यहोवाच्या प्रेमळ काळजीखालील अद्‌भुत सुरक्षित भवितव्याकडे आणि पुनरुत्थित होणाऱ्‍या आपल्या इतर प्रिय जणांसोबतच्या भव्य पुनर्मिलनाकडे दृष्टी लावून आहोत.—कूर्ट हॉन यांच्याद्वारे कथित.

[२१ पानांवरील चित्र]

सन १९४४ मध्ये पूर्व प्रशयात आगेकूच करणारे रशियन सैन्य

[चित्राचे श्रेय]

Sovfoto

[२३ पानांवरील चित्र]

माझा भाऊ हाईन्ट्‌स, बहीण एरीका, आई, भाऊ हर्बर्ट आणि वर्नर आणि समोर मी

[२५ पानांवरील चित्र]

माझी पत्नी, मेल्वा हिच्यासोबत

[२४ पानांवरील चित्र]

चरबीने भरलेल्या अशाप्रकारच्या बरणीमुळे आमचा निभाव लागला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा