प्राण्यांच्या निद्रावस्थेची रहस्ये
केन्यामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
निद्रा—आपण आपले एक तृतीयांश जीवन त्या विश्रांतीच्या अवस्थेत घालवतो. झोपणे हा वेळेचा अपव्यय नसून उलट त्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण शरीरक्रियात्मक आणि मानसशास्त्रीय गरजा भागवल्या जातात. म्हणून झोप देवाकडचे मौल्यवान दान मानले जाऊ शकते.—पडताळा स्तोत्र १२७:२.
प्राणी जगातही झोपेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे यात काही नवल नाही. अनेक जाती, आश्चर्यकारक, कधीकधी चित्तवेधक आणि बहुधा असामान्य पद्धतीने कशीबशी झोप काढतात. काही उदाहरणे पाहू या.
झोप काढण्यात वस्ताद
कोणी जर आफ्रिकेतल्या दुपारच्या उन्हात सिंहाला उताणे पडून झोपलेले पाहिले तर मार्जार जातीचा हा हिंस्र श्वापद घरातल्या मांजरीसारखाच दिसतो असे म्हणेल. पण दिसते तसे नसते बरे का. थॉमस कॅम्पीयन या १७ व्या शतकातल्या लेखकाने लिहिले: “झोपलेल्या सिंहाला चिडवायला कोण धजेल?” खरेच आहे, बलवान सिंहाला देखील भक्षक राहणीमानाकरता—दर दिवशी सुमारे २० तासांची—झोप लागते.
तसेच, टुआटाराचे उदाहरण घ्या; हा सरड्यासारखा सुस्त प्राणी न्यूझीलंडमध्ये आढळतो. वर्षातला निम्मा काळ तो एक प्रकारच्या हलक्या निद्रावस्थेत घालवतो. इतकेच काय तर, हा टुआटारा इतका सुस्त असतो की जेवताना सुद्धा त्याला झोप लागते! पण त्या झोपेमुळे त्याला फायदाच होतो कारण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, काही टुआटारा सुमारे १०० वर्षे जगू शकतात!
काल्पनिक कुंभकर्णाप्रमाणेच इतर प्राणीही दीर्घकाळापर्यंत निद्रावस्थेत राहतात. थंड हिवाळ्यात तग धरून राहण्याचा हा अनेकांचा मार्ग आहे. त्याआधी, हा प्राणी आपल्या शरीरात वसाचे जाड थर साठवतो ज्यामुळे त्याच्या या दीर्घ निद्रावस्थेत त्याच्या शरीराचे पोषण होते. पण हा झोपी गेलेला प्राणी थंडीने गारठून मरून कसा जात नाही? प्राणी जगाच्या आत (इंग्रजी) हे पुस्तक स्पष्टीकरण देते त्यानुसार, त्या प्राण्याचा मेंदू त्याच्या रक्तात रासायनिक बदलांचे संदेश पाठवतो ज्यामुळे एक प्रकारची नैसर्गिक गोठण प्रतिबंधक व्यवस्था निर्माण होते. त्या प्राण्याचे शरीर तापमान गोठण बिंदूच्या जरा वर येऊन थांबते तेव्हा नेहमीपेक्षा हृदयाच्या ठोक्यांची गती एक चतुर्थांशाने कमी पडते; त्याचे श्वसन धीमे होते. मग त्याला गाढ झोप लागते; ही झोप कित्येक आठवड्यांपर्यंत राहू शकते.
‘उड्डाणात’ झोपणे
काही प्राणी अगदी असामान्य पद्धतीने झोप काढतात. सुटी टर्न नावाच्या सागरी पक्ष्याचे उदाहरण घ्या. सुटी टर्नचे पिल्लू घरटे सोडते तेव्हा ते थेट समुद्राकडे वाटचाल करते आणि पुढच्या काही वर्षांपर्यंत सतत उड्डाणावस्थेत राहते! सुटी टर्नची पिसे जलनिरोधक नसल्यामुळे आणि इतर टर्न पक्ष्यांप्रमाणे पाण्यावर उतरण्यासाठी त्यांची बोटे पडद्यांनी जोडलेली नसल्यामुळे हा पक्षी समुद्रात डुबकी मारत नाही. तो पाण्याच्या वरच्या भागातल्या लहान माश्यांची शिकार करतो.
पण तो झोपतो तरी केव्हा? पाणी, भक्ष्य आणि उत्तर अमेरिकेतले भक्षक पक्षी (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “त्यांची पिसे भिजतील म्हणून ते सागरावर झोपू शकत नाहीत. काही शास्त्रज्ञांच्या मते हे पक्षी उड्डाणावस्थेतच झोप काढतात.”
पाण्याखालची वामकुक्षी
मासे झोपतात का? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडियानुसार, पृष्ठवंशी प्राण्यांपैकी “केवळ सरिसृप, पक्षी आणि सस्तन प्राण्यांनाच त्यांच्या मेंदूलहरींमध्ये काही बदल झाल्याने खरी झोप लागते.” तरीपण, मासेसुद्धा झोपेसारख्याच विश्रांतीचा आनंद घेतात—बहुतेकांना डोळे बंद करता येत नसले तरीही.
काही मासे एका बाजूवर झोपतात; इतर शेपटी वर, तोंड खाली अशा स्थितीत किंवा उभ्या स्थितीत झोपतात. फ्लाउंडर माशासारखे काही चपटे मासे जागे असताना समुद्रतळाशी असतात. पण, झोपी गेल्यावर मात्र ते तळापासून काही सेंटीमीटर वरती तरंगत्या स्थितीत राहतात.
रंगीबेरंगी पॅरट फिशचा झोपण्याआधी एक ठराविक विधी असतो; तो “नाइटगाऊन” चढवतो. त्याच्या विश्रांतीची वेळ झाल्यावर तो श्लेष्मा किंवा चिकट पदार्थाने संपूर्ण शरीर झाकून टाकतो. कशासाठी? “भक्षकांना ओळखू येऊ नये म्हणून तो असे करत असावा,” असे निसर्ग-लेखक डग स्टुवॉर्ट म्हणतात. जाग आल्यावर तो आपले चिकट वस्त्र उतरवतो.
सील प्राण्यांचाही झोपण्याआधी एक रोचक विधी असतो. ते आपला गळा फुग्यासारखा फुगवतात आणि एक प्रकारचे नैसर्गिक लाईफ जॅकेट तयार करतात. अशाप्रकारे उभ्या तरंगत्या अवस्थेतच ते पाण्यात झोप काढू शकतात; केवळ श्वास घेण्यासाठी त्यांचे नाक पाण्याच्या वर राहते.
एक डोळा उघडाच
अर्थात, प्राणी झोपी गेले म्हणजे ते सहजासहजी भक्ष्य ठरू शकतात. म्हणून काही प्राणी एक डोळा उघडा ठेवून झोपतात. झोपेत त्यांचा मेंदू काही प्रमाणात सतर्क राहतो आणि त्यामुळे धोक्याची चाहूल लागताच ते जागे होतात. इतर प्राणी अधूनमधून पहारा ठेवून आपला जीव वाचवतात. उदाहरणासाठी, एकत्र झुंडीने झोपणारे पक्षी अधूनमधून डोळा उघडून एक नजर टाकून धोक्याचा वेध घेतात.
आफ्रिकेतल्या हरणांचे किंवा झेब्र्यांचे कळप अशाचप्रकारे विश्रांती घेताना एकमेकांसाठी पहारा ठेवतात. काहीवेळा संपूर्ण कळप जमिनीवर डोकी वर ठेवून, सतर्क अवस्थेत सुस्त पडून राहतो. मध्येच, एखादा प्राणी आडवे निश्चल पडून गाढ झोपून जातो. काही मिनिटांनंतर, कळपातला दुसरा प्राणी झोप काढतो.
हत्तींचा संपूर्ण कळपसुद्धा झोप काढतो. परंतु, प्रौढ हत्ती बहुधा उभ्या उभ्याच डुलकी मारतात, वेळोवेळी डोळे उघडतात आणि आपले भले मोठाले कान टवकारून धोक्याच्या चाहुलीचा वेध घ्यायचा प्रयत्न करतात. या प्रशस्त पहारेकऱ्यांच्या छायेत लहानगी पिल्ले खाली जमिनीवर एका बाजूवर पडून मस्तपैकी गाढ झोप काढतात. सिन्थिया मॉस या लेखिकेने हत्तींच्या आठवणी (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात अख्खाच्या अख्खा कळप झोपी गेलेल्या दृश्याबद्दल लिहिले आहे: “पहिल्यांदा, पिल्ले झोपली मग त्याहून मोठी पिल्ले आणि शेवटी सगळ्या प्रौढ माद्यासुद्धा जमिनीवर पडून झोपी गेल्या. चंद्रप्रकाशात ते मोठाल्या राखी खडकांसारखेच दिसत होते पण त्यांच्या गाढ, डाराडूर झोपेतले घोरणे ऐकून ग्रह दूर झाला.”
प्राण्यांच्या झोपेच्या सवयींबद्दल आपल्याला अद्याप पुष्कळसे जाणून घ्यायचे आहे. पण आपल्याला जे आता थोडेफार माहीत आहे त्याचा विचार केल्यावर, ‘सर्व काही ज्याने निर्माण केले’ त्या परमात्म्याच्या अगाध बुद्धीचा विचार करावासा तुम्हाला वाटत नाही का?—प्रकटीकरण ४:११.