वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. ५-८
  • द्वेषाचे धडे मिळालेले जग

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • द्वेषाचे धडे मिळालेले जग
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोवळ्या मुलांपासून सुरवात
  • धर्म कोणते धडे देतो?
  • भीती, क्रोध, किंवा अपमानाची भावना
  • द्वेषाचा कधी अंत होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • द्वेषाची आग शमवण्याचा एकमेव मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • लोक एकमेकांचा इतका द्वेष का करतात?​—बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. ५-८

द्वेषाचे धडे मिळालेले जग

माणसे मुळातच स्वार्थी असतात. आणि हा स्वार्थीपणा नियंत्रणात ठेवला नाही तर त्याचे पर्यवसान द्वेषात होऊ शकते. स्वाभाविक स्वार्थीपणाच्या भरीस भर म्हणून मानवी समाज लोकांना स्वार्थी होण्याचे अक्षरशः धडे देत असतो!

अर्थात, लोकांना एका व्यापक वर्गाखाली आणून त्यांच्याविषयी ठोकून दिलेली सामान्य विधाने नेहमीच खरी नसतात, पण काही विशिष्ट प्रवृत्त्या इतक्या व्यापक प्रमाणावर अस्तित्वात असतात की केवळ विकृती म्हणून त्यांकडे दुर्लक्ष करता येत नाही. राजकारणी पुढाऱ्‍यांना सहसा आपल्या मतदारांच्या कल्याणापेक्षा, निवडणूक जिंकण्याचीच जास्त काळजी नसते का? व्यापारी देखील, नुकसानकारक उत्पादने बाजारात विकली जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करण्याऐवजी, गैरमार्गाने का होईना पण आणखीन पैसा कसा मिळवता येईल याच्याच मागे लागलेले नसतात का? नैतिकता आणि प्रीतीच्या मार्गावर आपल्या कळपांचे नेतृत्व करण्याऐवजी पाळकांना सहसा प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याचीच जास्त फिकीर नसते का?

कोवळ्या मुलांपासून सुरवात

मुलांना मोकाट वातावरणात लहानाचे मोठे केले जाते, तेव्हा एका अर्थाने त्यांना जणू स्वार्थीपणाचेच धडे दिले जात असतात, कारण मुलांचे बालिश हट्ट पुरवण्यासाठी सुविचारीपणा आणि निःस्वार्थीपणाचा बळी दिला जात असतो. शाळाकॉलेजांत मुलांना नंबर वन होण्याचा प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन दिले जाते, केवळ अभ्यासाच्या बाबतीतच नव्हे तर खेळक्रिडेच्या क्षेत्रांतसुद्धा. “दुसऱ्‍या स्थानावर असणे काय आणि शेवटच्या स्थानावर असणे काय, सारखेच!,” असे त्यांचे धोरण असते.

हिंसाचारी प्रकारचे व्हिडिओ गेम्स, मुलांना स्वार्थी मार्गाने समस्यांचे निरसन करण्याचे शिकवतात—शत्रूला खतम केले की झाले! असल्या अभिवृत्तीतून प्रेमाची जोपासना कशी होऊ शकेल! एका दशकाहून अधिक काळापूर्वी, संयुक्‍त संस्थानांच्या सर्जन जनरलने व्हिडिओ गेम्समधून लहान मुलांना कोणकोणते धोके संभवू शकतील याविषयी इशारा दिला होता. ते म्हणाले: “शत्रूला उडविले की काम फत्ते. या खेळांत उभारणीकारक असं काहीच नसतं.” द न्यू यॉर्क टाइम्सला लिहिलेल्या एका पत्रात असे म्हटले होते, की बरेच व्हिडिओ गेम्स म्हणजे “माणसाच्या सर्वात हीन इच्छा तृप्त करण्याचे माध्यम आहेत;” या पत्रात पुढे असे म्हटले होते की “या खेळांमुळे निर्बुद्ध, भांडखोर किशोरवयीनांची पिढी वाढत चालली आहे.” जर्मनीच्या एका व्हिडिओ गेम्सच्या शौकीनाने या पत्रातील मजकूर खरा असल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले, तो म्हणाला: “हे खेळ खेळताना मला आपोआप एका अज्ञात काल्पनिक जगात गेल्यासारखं वाटायचं जेथे ‘मार, नाहीतर मर,’ हाच आदिम नियम अस्तित्वात होता.”

द्वेषाच्या जोडीला जातीयवादी भावनाही असतात, तेव्हा तर तो आणखीनच अनिष्टकारक बनतो. याच कारणामुळे परदेशी लोकांविरुद्ध, विशेषतः टर्किश लोकांविरुद्ध हिंसाचारी दृश्‍ये दाखवणाऱ्‍या उजव्या पक्षाच्या व्हिडिओपटांविषयी जर्मन लोकांना काळजी वाटते हे उघड आहे. आणि त्यांची काळजी निराधार नाही, कारण जानेवारी १, १९९४ पासून जर्मनीत वास्तव्यास असणाऱ्‍या ६८,७८,१०० परदेशी रहिवाश्‍यांपैकी २७.९ टक्के लोक टर्किश आहेत.

राष्ट्रीयवादातून बालवयापासूनच मुलांना जो धडा दिला जातो त्याला जातीयवादी भावनांकरवी खतपाणी दिले जाते; तो धडा असा, की तुमच्या देशाच्या शत्रूंविषयी द्वेष असण्यात काही गैर नाही. टाईम नियतकालिकाकरिता लिहिणाऱ्‍या जॉर्ज एम. टेबर यांच्या एका निबंधात असे म्हटले होते: “इतिहासातील सर्व वादांपैकी सर्वात प्रभावी कोणता असेल तर तो राष्ट्रीयवाद आहे.” पुढे त्यांनी खुलासा केला: “एक धर्माचा अपवाद सोडला, तर आणखी कोणत्याही कारणापेक्षा राष्ट्रीयवादामुळेच सर्वात जास्त रक्‍तपात घडला आहे. आपल्या सर्व समस्यांसाठी शेजारच्या एखाद्या जातीय समूहाला जबाबदार ठरवून धर्मांध लोकसमुदायांना त्यांच्याविरुद्ध चेतवणाऱ्‍या लोकनायकांची, गत शतकांत कितीतरी उदाहरणे आहेत.”

इतर जातीय समूहांविषयी, जातींविषयी किंवा राष्ट्रांविषयी असलेले पिढीजात वैर, आजच्या जगातील बऱ्‍याच समस्यांना कारणीभूत आहे. आणि झेनोफोबिया अर्थात, अनोळखी किंवा परदेशी लोकांविषयीचा भयगंड वाढत चालला आहे. तथापि, जर्मन समाजशास्त्रज्ञांना एक रंजक गोष्ट आढळली, ती अशी की झेनोफोबिया अशा ठिकाणी सर्वात अधिक पाहायला मिळाला जेथे वास्तविक पाहता, फार कमी परदेशी राहतात. यावरून दिसून येते की तो वैयक्‍तिक अनुभवापेक्षा सहसा पूर्वग्रहामुळेच अधिक उत्पन्‍न होतो. या समाजशास्त्रज्ञांना असे आढळले की, “तरुण लोकांच्या मनातील पूर्वग्रहांना प्रामुख्याने त्यांचे मित्र आणि कुटुंबीय खतपाणी घालतात.” मुलाखती दिलेल्यांपैकी ७७ टक्के लोकांनी परदेशियांविरुद्ध पूर्वग्रह बाळगण्याचे कबूल केले तरीसुद्धा, असे आढळले की त्यांचा प्रत्यक्ष स्वरूपात परदेशी लोकांसोबत फारच कमी संपर्क आला होता किंवा अजिबातच कधी संपर्क आलेला नव्हता.

स्वार्थीपणाचे धडे देणे फार कठीण नाही, कारण अपरिपूर्ण आईवडिलांकडून आपल्या सर्वांनाच काही प्रमाणावर स्वार्थीपणा आनुवंशिकतेनेच मिळाला आहे. पण प्रेम आणि द्वेष यांमधील संघर्षात धर्माची काय भूमिका आहे?

धर्म कोणते धडे देतो?

धर्म प्रेमाची जोपासना करतात असा लोकांचा सर्वसामान्य ग्रह आहे. पण तसे असल्यास उत्तर आयर्लंड, मध्य पूर्व आणि भारत ही केवळ तीन उदाहरणे जरी घेतली, तरी येथील तणावग्रस्त परिस्थितीच्या मागे धार्मिक मतभेद का आहेत? अर्थात, काही लोक असा दावा करतात की धार्मिक नव्हे, तर राजनैतिक मतभेदांमुळे हे संघर्ष होत असतात. हा मुद्दा विवादात्मक आहे. एक मात्र खरे की, संघटित धर्म लोकांच्या मनांत राजनैतिक आणि जातीय भेदभावांवर मात करण्याइतके प्रबळ प्रेम रुजवू शकलेले नाहीत. अनेक कॅथलिक, ऑर्थोडॉक्स, आणि इतर विश्‍वासांतील लोक एका अर्थाने पूर्वग्रहाकडे कानाडोळा करतात, जो पुढे हिंसाचारात परिणीत होऊ शकतो.

एखाद्या धार्मिक समूहाच्या शिकवणुकी आणि प्रथा अयोग्य आहेत असे एखाद्याचे मत असल्यास त्याने यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यात काही गैर नाही. पण त्याअर्थी त्याला या धार्मिक समूहाविरुद्ध किंवा त्याच्या सदस्यांविरुद्ध हिंसाचारी कृत्ये करण्याचा हक्क आहे का? दि एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजनमध्ये प्रामाणिकपणे कबूल केलेले आहे: “जवळच्या पौर्वात्य देशांच्या आणि युरोपच्या इतिहासात धार्मिक पुढाऱ्‍यांनी इतर धर्मांविरुद्ध वारंवार हिंसक हल्ले घडवून आणल्याची उदाहरणे आहेत.”

हिंसाचार हा धर्मांशी अविभाज्यपणे संबंधित आहे हे उघड करून या एन्सायक्लोपिडियात असे म्हटले आहे की: “सामाजिक तसेच मानसशास्त्रीय विकासासाठी देखील संघर्ष हा आवश्‍यक आहे असे मानणारे डार्विनिस्ट लोक एकटेच नाहीत. धर्माने, निरंतर संघर्ष, हिंसाचार आणि पर्यायाने विकास घडवून आणला आहे.”

विकासासाठी आवश्‍यक आहे असे म्हणून हिंसाचाराला न्यायसंगत ठरवता येणार नाही; कारण असे केल्यास, प्रेषित पेत्राने येशू ख्रिस्ताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याप्रसंगी येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या एका सुविख्यात तत्त्वाच्या हे विरोधात असेल. पेत्राने “हात लांब करून आपली तरवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करुन त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.”—मत्तय २६:५१, ५२; योहान १८:१०, ११.

कोणाहीविरुद्ध—मग ते लोक चांगले असो किंवा वाईट—त्यांच्याविरुद्ध हिंसाचारी कृत्ये करणे ही काही प्रेमाची रीत नव्हे. अशारितीने, जे हिंसाचाराचा मार्ग पत्करतात ते एका प्रेमळ देवाचे अनुकरण करून चालण्याच्या त्यांच्या दाव्याविरुद्ध वागत असतात. अलीकडेच लेखक एमस ऑझ यांनी लिहिले: “धर्मांधांची एक विशेषता आहे . . . त्यांना देवाकडून सहसा, खून कर असे सांगणारेच ‘हुकूम’ मिळत असतात. धर्मांधांचा देव सैतानच आहे की काय असे वाटू लागते.”

बायबल देखील याच धर्तीवर म्हणते: “ह्‍यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात: जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीति करीत नाही तोहि नाही. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांस माहीत आहे. मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीति करितो त्याने आपल्या बंधूवरहि प्रीति करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.”—१ योहान ३:१०, १५; ४:२०, २१.

खऱ्‍या धर्माने प्रेमाच्या रीतीने चालावे, आणि यात शत्रूंवरही प्रेम करणे समाविष्ट आहे. यहोवाच्या संबंधाने आपण वाचतो: “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४४, ४५; तसेच १ योहान ४:७-१० देखील पाहा.) द्वेषाचा देव, सैतान याच्या तुलनेत तो किती वेगळा आहे! सैतान लोकांना विषयासक्‍त, गुन्हेगार आणि स्वार्थीपणाच्या जीवनशैली स्वीकारण्याच्या मोहात पाडतो आणि अशारितीने त्यांच्या जीवनात विष कालवतो. अशाप्रकारची विकृत जीवनपद्धती शेवटी विनाशाकडे नेईल हे माहीत असूनही तो असे करतो. स्वतःच्या लोकांचेही जो संरक्षण करू शकत नाही—आणि कदाचित करू इच्छित नाही—असा देव सेवा मिळवण्याच्या लायक तरी आहे का?

भीती, क्रोध, किंवा अपमानाची भावना

या कारणांमुळे द्वेष उत्पन्‍न होतो हे सहज सिद्ध करता येते. टाईम नियतकालिकाच्या एका वृत्तानुसार: “युरोपमधील उजव्या पक्षाच्या निरनिराळ्या चळवळींसाठी १९३० दशकाच्या वादग्रस्त काळानंतर इतक्या फायदेकारक संधी पहिल्यांदाच चालून आल्या आहेत. . . . आपल्या नोकऱ्‍या हातून जातील या भीतीने लोक मवाळ सरकारांच्या अक्षमतेमुळे निरुत्साहित होऊन या सरकारांविरुद्ध आपला रोष व्यक्‍त करीत आहेत आणि त्यांच्यामध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी लोकांना बळीचा बकरा बनवीत आहेत.” रायनिशर मर्कुर/क्राइस्ट उन्ट वेल्ट नावाच्या वृत्तपत्रात, योर्ग शिंड्‌लर यांनी मागील दोन दशकांत जर्मनीत आलेल्या लाखो राजकीय निर्वासितांकडे लक्ष वेधले. द जर्मन ट्राइब्यूनने अशी ताकीद दिली: “सबंध युरोपात जातीयवादाला पेव फुटला आहे.” एवढ्या मोठ्या संख्येने स्थानांतर करणाऱ्‍यांना पाहून द्वेषाच्या भावना उफाळतात. ‘यांच्यामुळे आमचा पैसा जातो, आमच्या नोकऱ्‍या ते आमच्याकडून हिरावून घेतात, आमच्या मुलीबाळींना त्यांच्यापासून धोका आहे,’ अशा वेगवेगळ्या तक्रारी लोक करतात. सेंट अँटनीज कॉलेज, ऑक्सफर्ड येथील अधिछात्र थियडोर झेल्डन यांनी म्हटले, की लोकांना “भीती किंवा अपमान वाटत असल्यामुळे ते हिंसक पावित्रा घेतात. त्यांच्या रोषामागच्या या कारणांकडे खरं तर लक्ष देण्याची गरज आहे.”

ब्रिटिश टेलिव्हिजन बातमीदार जोन बेकवेल या अगदी उचित शब्दांत आपल्या या जगाचे, लोकांना द्वेषाचे धडे देणाऱ्‍या जगाचे वर्णन करतात. त्या लिहितात: “मी कर्मठ ख्रिश्‍चन नाही, पण येशूच्या शिकवणुकीतील एक गहन आणि निर्विवाद सत्य मला पटले आहे: दुष्टाई म्हणजे प्रेमाचा भयंकर अभाव. . . . आपण ज्या समाजात राहतो, तो प्रेमाच्या सिद्धान्ताला फारसे महत्त्व देत नाही याची मला कल्पना आहे. उलट हा उथळ समाज अशा या सिद्धान्ताला भोळसट, भावनाप्रधान, आदर्शवादी म्हणून हुसकावून देतो, आणि आत्मलाभ व आत्मकल्याण बाजुला ठेवून इतरांविषयीची कळकळ व्यक्‍त करण्याला आणि आत्मत्यागाला प्राधान्य देण्याच्या कल्पनेला हास्यास्पद समजतो. ‘व्यावहारिक असावं’ असे म्हणून हा समाज व्यापारातील नवनवीन वाटाघाटी हातावेगळ्या करतो, आपल्या कर्तव्यांचे उल्लंघन करतो आणि त्याचे दोष प्रकाशात आणतील अशा सर्व पुराव्यांकडे कानाडोळा करतो. अशा या जगात अपयशाने, एकाकीपणाने ग्रासलेली माणसे तयार होतात ज्यांना समाजात महत्त्वपूर्ण समजले जाणारे यश, आत्मप्रतिष्ठा आणि आनंदी कौटुंबिक जीवन कधीच लाभत नाही.”

स्पष्टपणे, या जगाचा ईश्‍वर सैतान मानवजातीला द्वेष करण्याचे धडे देत आहे. पण वैयक्‍तिकरित्या, आपण प्रेम करण्याचे शिकू शकतो. हे कशाप्रकारे शक्य आहे ते आमच्या पुढच्या लेखात स्पष्ट करण्यात येईल.

[७ पानांवरील चित्र]

व्हिडिओ गेम्समधून तुमच्या मुलांना द्वेषाचे धडे तर मिळत नसतील?

[८ पानांवरील चित्र]

युद्धांतील हिंसाचार अज्ञानाचे आणि द्वेषाचे लक्षण आहे

[चित्राचे श्रेय]

Pascal Beaudenon/Sipa Press

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा