प्रेमाची शिकवणूक मिळालेले लोक
प्रेम म्हणजे आवड, परोपकारबुद्धी, किंवा समान अभिरुचींवर आधारलेला स्नेहभाव. प्रेम म्हणजे उबदार जिव्हाळा. ते निःस्वार्थ, निष्ठावान आणि जनहितेच्छु असते. प्रेम हे द्वेषाच्या अगदी विपरीत आहे. द्वेषबुद्धीने प्रवृत्त झालेला स्वतःच्याच भावनावेगात गुरफटलेला असतो; प्रेमाने प्रवृत्त झालेला इतरांविषयी विचारशील असतो.
प्रेम किंवा द्वेष—तुमच्या जीवनात यांपैकी काय अधिक प्रबळ आहे? हा केवळ विचारायचा म्हणून विचारलेला प्रश्न नाही कारण तुमच्या उत्तरावर तुमचे सार्वकालिक भवितव्य अवलंबून आहे. द्वेषाचे धडे देणाऱ्या जगात राहात असताना देखील लक्षावधी लोक प्रेमाची शिकवणूक आत्मसात करीत आहेत. एक नवीन व्यक्तिमत्त्व धारण करण्याद्वारे ते असे करीत आहेत. ते निव्वळ प्रेमाची भाषा करीत नाहीत; तर जीवनात त्याचे अवलंबन करण्याचा ते कसोशीने प्रयत्न करीत आहेत.
तुम्ही कधी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला उपस्थित राहिला असल्यास, तेथील एकंदरीत वातावरणाने तुम्ही प्रभावित झाला असाल. कोणत्याही राष्ट्राचे असले तरी यहोवाच्या साक्षीदारांत उपासनेच्या बाबतीत ऐक्य आहे. त्यांचा खऱ्या अर्थाने एक आंतरराष्ट्रीय बंधुसमाज आहे. त्यांच्या मंडळ्यांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये तर हे पाहायला मिळतेच, पण याचा सर्वात चांगला प्रत्यय येतो तो त्यांच्या बेथेल कुटुंबांमध्ये. या कुटुंबांमध्ये, कौटुंबिक सदस्यांसारखे एकत्र राहून बायबल आधारित साहित्य उत्पादित आणि वितरीत करण्याकरता कार्य करणारे स्वयंसेवक असतात. प्रत्येक देशात, यहोवाच्या साक्षीदारांद्वारे केल्या जात असणाऱ्या कार्यावर त्या त्या देशातील काहीजण देखरेख करतात. हे काही साधेसुधे काम नाही, कारण त्यात—१९९७ सालाच्या आकडेवारीनुसार—२३३ देशांमधल्या ८२,००० पेक्षा अधिक मंडळ्यांचा समावेश आहे. हे कार्य पार पाडण्यासाठी जगभरात १६,००० पेक्षा अधिक सदस्य बेथेल कुटुंबांमध्ये कार्यरत आहेत; यांत जागतिक मुख्यालय आणि १०३ देशांतील लहान शाखा दफ्तरांचा समावेश आहे.
अधिकांश बेथेल कुटुंबांत प्रामुख्याने, ते विशिष्ट शाखा दफ्तर ज्या देशात आहे त्या देशाचे नागरिक असतात. पण फक्त त्याच देशाचे नाही. काही बेथेल कुटुंबांत वेगवेगळ्या राष्ट्रांचे, जातींचे किंवा वंशांचे तसेच पूर्वीच्या वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमींचे साक्षीदार असतात. उदाहरणार्थ, जर्मनीतील सेल्टर्स येथे असलेल्या बेथेल कुटुंबातील जवळजवळ १,२०० लोक ३० वेगवेगळ्या राष्ट्रांचे आहेत. द्वेषरहित वातावरणात, शांती आणि ऐक्याने राहणे, काम करणे आणि उपासनेत सहभागी होणे त्यांना कसे काय शक्य होते? ते कलस्सैकर ३:१४ येथील बायबलचा सल्ला अनुसरत आहेत, जेथे म्हटले आहे:
‘प्रीती धारण करा’
कुणीही वस्त्र धारण करून जन्माला येत नसतो, तसेच वस्त्रांविषयी केवळ बोलल्याने ती आपोआप धारण केली जातात, असे नाही. वस्त्र धारण करण्यासाठी एखाद्याला विशिष्ट गोष्टी ठरवाव्या लागतात आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःहून काहीतरी प्रयत्न करावा लागतो. तशाच प्रकारे, कुणीही प्रीती धारण करून जन्माला येत नाही. शिवाय, त्याविषयी केवळ बोलल्यानेही चालत नाही. प्रयत्न करावे लागतात.
वस्त्रांचे वेगवेगळे उद्देश असतात. ती शरीराचे संरक्षण करतात, पाहण्याजोगी नसलेली शरीराची अंगे किंवा विरूपता त्यांमुळे झाकल्या जातात, आणि काही अंशी वस्त्रे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सांगून जातात. प्रेम वस्त्रांसारखेच असते. त्याला संरक्षक म्हणता येईल, कारण नीतिमान तत्त्वे आणि योग्य संगती यांविषयी असलेल्या प्रेमामुळे, माणूस धोकेदायक ठरू शकेल अशी संगती आणि अशी ठिकाणे टाळण्यास प्रवृत्त होतो. ते वैयक्तिक नातेसंबंधानाही संरक्षक ठरते; असे संबंध आपल्याला हवेहवेसे वाटले पाहिजेत. जो इतरांना प्रेम देतो त्यालाही त्यांच्याकडून प्रेम मिळते आणि जो इतरांना अपाय करीत नाही त्याला स्वतःलाही सहसा अपाय होणार नाही.
आपल्या व्यक्तिमत्त्वातील, पाहण्याजोगी नसणारी आणि इतरांना अस्वस्थ करू शकतील अशी अंगे प्रेमाकरवी झाकून टाकली जातात. गर्विष्ठ, कठोर, आत्मकेंद्रित आणि प्रेम न दाखवणाऱ्या लोकांपेक्षा, प्रेमळ व्यक्तींच्या लहानमोठ्या गुणदोषांकडे दुर्लक्ष करणे आपल्याला जास्त सोपे जाते हे खरे नाही का?
प्रीती धारण करणारे लोक ख्रिस्तासमान व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य प्रकट करतात. शारीरिक सौंदर्य वरवरचे असते, पण आध्यात्मिक सौंदर्य एखाद्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात भिनलेले असते. तुम्ही कदाचित अशा लोकांना ओळखत असाल जे त्यांच्या शारीरिक स्वरूपामुळे नव्हे तर त्यांच्या प्रांजळ, सस्नेह व्यक्तिमत्त्वामुळे तुमच्या लेखी सुंदर आहेत. दुसरीकडे पाहता, आपल्यापैकी बरेच जण अशा सौंदर्यवतींच्या किंवा रूपवान पुरुषांच्या संपर्कात आले आहेत ज्यांचे खरे व्यक्तिमत्त्व प्रकाशात आल्याबरोबर त्यांची सारी मोहकता आपल्या नजरेत अक्षरशः शून्यवत होते. प्रीती धारण केलेल्यांचा सहवास किती सुखावह असतो!
द्वेषाऐवजी प्रीती
जर्मनीत, १९९४ साली १,४५,९५८ यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की प्रेम हे द्वेषाची जागा घेऊ शकते.
दारूडेपणा, मादक पदार्थांचे व्यसन, गुन्हेगारी, जुगार आणि समाजकंटक किंवा हिंसात्मक वर्तन यांतून कोणत्या न कोणत्या प्रकारे स्वार्थीपणा व्यक्त होतो जो सहज द्वेषाला बढावा देऊ शकतो. पण मुलाखती दिलेल्यांपैकी ३८.७ टक्के लोकांनी सांगितले की साक्षीदारांकरवी उंचावून धरल्या जाणाऱ्या उदात्त बायबल तत्त्वांनुरूप आपले जीवन आणण्याकरता त्यांना वरती उल्लेखलेल्यांपैकी एक किंवा अधिक समस्यांवर मात करावी लागली. असे करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली कारण देवावर आणि आचरणासंबंधी त्याच्या नीतिमान आदर्शांविषयी त्यांना प्रेम होते. अशा लोकांना, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रेमपूर्वक, अनेकदा वैयक्तिक पातळीवर साहाय्य दिले. मागील पाच वर्षांदरम्यान (१९९२-९६), २३३ देशांतील १६,१६,८९४ लोकांना अशाचप्रकारचे बदल घडवून आणण्यासाठी, अजिंक्य प्रेमाच्या सामर्थ्याने द्वेषावर मात करण्यासाठी साहाय्य करण्यात आले.
यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या वैवाहिक संबंधांत निर्व्याज प्रेम अवलंबल्यामुळे परस्पर संबंध मजबूत करणे त्यांना शक्य झाले आहे. काही देशांमध्ये दर दोन किंवा तीन विवाहांपैकी एक विवाह घटस्फोटाने संपुष्टात येतो. पण वरती उल्लेखलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले की साक्षीदारांपैकी केवळ ४.९ टक्के लोक आपल्या विवाह जोडीदारापासून घटस्फोटित किंवा विलग झालेले आहेत. तथापि, लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे यांपैकी कित्येक जणांचा ते यहोवाचे साक्षीदार बनले त्यापूर्वीच घटस्फोट झालेला होता.
प्रेमाचा परमेश्वर त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना आपले मार्ग शिकवणारा एक महान शिक्षक असल्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांचे प्रेम सर्वप्रथम त्याच्यासाठी आहे. ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणाऱ्या’ लोकांसारखे ते नाहीत; ते प्रथम स्थान यहोवा देवाला देतात. (२ तीमथ्य ३:४) या तत्त्वहीन जगाच्या आचारविचारांच्या अगदी उलट, प्रत्येक साक्षीदार दर आठवडी सरासरी १७.५ तास धार्मिक कार्यांत घालवतो. साक्षीदार नक्कीच आध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक आहेत. यामुळेच ते आनंदी देखील आहेत. येशूने म्हटले: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.”—मत्तय ५:३, NW.
स्तोत्र ११८ लिहिणाऱ्याने म्हटल्याप्रमाणे, देवाच्या खऱ्या सेवकाला माणसांना भिण्याची काहीही गरज नाही. “परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे; मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” (६ वे वचन) देवावर संपूर्ण भरवसा ठेवल्याने इतर मनुष्यांविषयी वाटणाऱ्या द्वेषाचे आणि भीतीचे एक कारण नाहीसे होते.
देव “मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न” आहे हे माहीत असल्यामुळे एक ख्रिस्ती व्यक्ती आपल्या जीवनातून क्रोध काढून टाकण्याचा प्रयत्न करील, कारण क्रोध हा देखील द्वेषाला कारणीभूत ठरू शकतो. आणि हे साध्य करण्यासाठी सौम्यता व इंद्रियदमन यांसारखी देवाच्या आत्म्याची फळे विकसित करणे सहायक ठरू शकते.—स्तोत्र ८६:१५; गलतीकर ५:२२, २३.
खरा ख्रिस्ती नम्र असतो आणि तो अवाजवीपणे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत नाही. (रोमकर १२:३) तो इतरांसोबतचे आपले सर्व व्यवहार प्रेमाने पार पाडतो. द्वेषाच्या उलट प्रेम हे “चिडत नाही, अपकार स्मरत नाही.”—१ करिंथकर १३:५.
भीती, क्रोध किंवा अपमानाच्या भावना नक्कीच लोकांना द्वेष करण्यास प्रवृत्त करू शकतात. पण प्रेम, द्वेषाची मूळ कारणे नाहीशी करून त्यावर विजयी होते. खरोखर, प्रेम ही विश्वातील सर्वात प्रबळ शक्ती आहे कारण “देव प्रीति आहे.”—१ योहान ४:८.
लवकरच द्वेषाचे कायमचे उच्चाटन
स्वार्थीपणा आणि द्वेष यहोवा देवाच्या व्यक्तिमत्त्वात समाविष्ट नसल्यामुळे, ते कायम अस्तित्वात राहणार नाहीत. त्यांचे उच्चाटन होऊन, अंनतकाळ टिकणाऱ्या प्रेमाने त्यांची जागा घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हीदेखील द्वेष नसलेल्या, प्रेमाने भरलेल्या जगाची आस धरत असल्यास, ते पाहू शकण्यासाठी तुम्हाला कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील हे यहोवाच्या साक्षीदारांकडून समजून घ्या.
हो, आपण सर्वांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, ‘माझ्या जीवनात कोणता गुण प्रबळ आहे, प्रेम की द्वेष?’ हा केवळ विचारायचा म्हणून विचारलेला प्रश्न नव्हे. देवाचा शत्रू, अर्थात द्वेषाच्या ईश्वरासाठी जीवन जगल्यास ते जीवन फार काळ टिकणार नाही. पण प्रेमाचा देव यहोवा याच्यासाठी घालवलेले जीवन, कायम टिकेल!—१ योहान २:१५-१७.
[१० पानांवरील चित्र]
आज देखील लोक स्वतःच्या जीवनात प्रीती धारण करू शकतात