द्वेषाचा कधी अंत होईल का?
द्वेष काय आहे हे तुम्हाला दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहिल्यावर समजले असेल. द्वेष, कत्तलींच्या मूळाशी असलेली समान गोष्ट आहे जी बहुतेक दररोज या जगामध्ये कत्तलींचे रक्तरंजित निशाण मागे सोडून जाते. बेल्फास्ट ते बॉस्नियापर्यंत, जेरुसलेम ते जोहान्सबर्गपर्यंत दुर्दैवी लोकांची कत्तल केली जाते.
बळी पडलेले लोक, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना बहुधा ओळखत नसतात. ते कदाचित “विरोधी पक्षाचे” असतात इतकाच केवळ त्यांचा “गुन्हा” असतो. एका भयंकर अदलाबदलीत झालेले मृत्यू, पूर्वी घडलेल्या अत्याचाराचा बदला किंवा जातीय शुद्धीकरणाचा प्रकार असू शकतील. हिंसेची प्रत्येक घटना, शत्रुत्व असलेल्या गटांमधील द्वेषाच्या ज्वालेला आणखीनच भडकावते.
द्वेषाचे हे भीषण चक्र वाढत असल्याचे दिसून येते. जमाती, वंश व जाती किंवा धार्मिक गटांमध्ये कुलवैराचा उद्रेक होत आहे. द्वेषाचा कधी समूळ नाश करता येईल का? याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला द्वेषाची कारणे समजून घेतली पाहिजेत, कारण द्वेषाची भावना आपल्यामध्ये जन्मताच नसते.
द्वेषाचे बीज पेरणे
बॉस्निया सारायेवो येथील झ्लॉटॉ फिलीपोवीक नावाची एक तरुण मुलगी द्वेष करण्यास अजून शिकली नाही. तिने तिच्या दैनंदिनीत जातीय हिंसेबद्दल जोरदार शब्दात असे लिहिले: “मी सारखी विचारत राहते की असे का? कशासाठी? याला कोण जबाबदार आहे? मी विचारते पण मला त्याचे उत्तर मिळत नाही. . . . माझ्या मैत्रिणींमध्ये, आमच्या दोस्तांमध्ये, आमच्या कुटुंबात, सर्ब्स, क्रोआट्स आणि मुस्लिम लोक आहेत. . . . आम्ही चांगल्या लोकांमध्ये मिळूनमिसळून राहतो, वाईट लोकांमध्ये नाही. वाईट लोकांमध्ये आहेत त्याचप्रमाणे चांगल्या लोकांमध्येही सर्ब्स, क्रोट्स आणि मुस्लिम आहेत.”
दुसऱ्या बाजूला पाहता, अनेक प्रौढ लोक वेगळ्याप्रकारे विचार करतात. द्वेष करण्यासाठी त्यांच्याकडे पुष्कळ कारणे आहेत असे त्यांना वाटते. का बरे?
अन्याय. द्वेषाचे मुख्य कारण अन्याय आणि जाच हे आहे. बायबल म्हणते त्याप्रमाणे, “जुलूम केल्याने शहाणा वेडा बनतो.” (उपदेशक ७:७) लोक बळी पडतात किंवा त्यांना पाशवीरीतीने वागवले जाते तेव्हा सहजपणे ते जुलूम करणाऱ्यांबद्दल द्वेष बाळगू शकतात. आणि ते तर्कशुद्ध नसले किंवा निव्वळ “वेडेपणा” असला तरीही, बहुधा एका संपूर्ण गटाच्या विरुद्ध द्वेष बाळगला जातो.
वास्तविक किंवा काल्पनिक अन्याय हे द्वेषाचे मुख्य कारण असले तरी, ते एकमेव कारण नाही. कलुषितपणा हे आणखी एक कारण आहे.
कलुषितपणा. कलुषितपणाचा उगम एखाद्या, विशिष्ट जातीच्या किंवा राष्ट्राच्या गटाविषयी अज्ञानातून होतो. अफवा, पारंपारिक वैरभाव किंवा एक किंवा दोन व्यक्तींच्या वाईट अनुभवामुळे काही जण, संपूर्ण वंश किंवा राष्ट्रावर नकारात्मक गुणांचा आरोप लावतील. एकदा कलुषितपणाने मूळ धरले, की तो सत्याबद्दल लोकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधतो. “आपण काही लोकांचा द्वेष करतो कारण आपण त्यांना ओळखत नाही; आणि आपण त्यांची ओळखही करून घेणार नाही कारण आपण त्यांचा द्वेष करतो,” असे चार्ल्स केलब कॉल्टन या इंग्रज लेखकाने निरीक्षिले.
दुसऱ्या बाजूला पाहता, राजकारणी आणि इतिहासकार मुद्दाम, राजकारण किंवा राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी कदाचित द्वेष भावना चेतवतील. हिटलर याचे प्रथम उदाहरण होता. हिटलर युवक चळवळीचा भूतपूर्व सदस्य जॉर्ज म्हणतो: “नात्सी प्रचाराने आम्हाला सुरवातीला यहूद्यांचा, मग रशियन लोकांचा आणि मग ‘रिकचे शत्रू’ असलेल्या सर्वांचा द्वेष करण्यास शिकवले. किशोरवयीन असल्यामुळे मला जे काही सांगण्यात येत, त्यावर मी विश्वास ठेवत होतो. परंतु माझी दिशाभूल करण्यात आली होती हे मला नंतर कळाले.” नात्सी जर्मनी आणि इतर ठिकाणी असल्याप्रमाणे, राष्ट्रीयतेची कास धरुन वंश किंवा जातीय कलुषितपणाचे समर्थन करण्यात आले आहे व हा द्वेषाचा आणखी एक उगम आहे.
राष्ट्रवाद, जमातीवाद आणि वंशवाद. इतिहासकार पिटर गे यांनी द्वेषाची वाढ (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात पहिल्या महायुद्धाचा उद्रेक झाला तेव्हा काय घडले याचे वर्णन दिले: “निष्ठेच्या परस्परविरोधी युद्धात, राष्ट्रवाद इतर सर्वांपेक्षा बळकट ठरला. एखाद्याचे राष्ट्रासाठी प्रेम आणि त्याच्या शत्रूबद्दलचा द्वेष, त्या शतकाने निर्माण केलेल्या आक्रमणासाठी सर्वात गुणकारी बुद्धिवाद ठरला.” जर्मन राष्ट्रवादाच्या भावनांमुळे “द्वेषाचे गीत” (हिम ऑफ हेट) हे युद्धविषयक गीत लोकप्रिय झाले. गे म्हणतात, ब्रिटन आणि फ्रान्समधील द्वेष फैलावणाऱ्यांनी, जर्मन सैनिकांबद्दल स्त्रियांवर बलात्कार केल्याच्या आणि लहान बाळांची कत्तल केल्याच्या खोट्या गोष्टी रचल्या. सिगफ्रेड ससून नावाच्या एका इंग्रज सैनिकाने ब्रिटिश युद्धाच्या प्रचाराचा सारांश अशाप्रकारे दिला: “असे दिसत होते, की सर्व जर्मन लोकांना ठार मारण्यासाठी मानवाला निर्माण करण्यात आले होते.”
राष्ट्रवादाप्रमाणेच, एखाद्या जातीय गटाला किंवा वंशाला प्रमाणापेक्षा जास्त उच्चता दाखवणे, इतर जातीय गटांमध्ये किंवा वंशांमध्ये द्वेष भडकवण्यास कारणीभूत ठरू शकते. आजही अनेक आफ्रिकी राष्ट्रांमध्ये, जमातीवाद हिंसा भडकावत आहे, तर वंशवाद पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेला पीडित करत आहे. राष्ट्रवादाशी संमिश्रित होऊ शकेल असा आणखी एक विभाज्य घटक धर्म आहे.
धर्म. जगाच्या सर्वात अनिवार्य झगड्यांमध्ये मजबूत धार्मिक घटक असतो. उत्तर आर्यलंड, मध्य पूर्व आणि इतर ठिकाणी, लोक ज्या धर्माचे असल्याचा दावा करतात त्यामुळे त्यांचा द्वेष केला जातो. सुमारे दोन शतकांपूर्वी, जॉनथन स्विफ्ट नावाच्या एका इंग्रज लेखकाने निरीक्षिले: “आपल्याकडे द्वेष करण्यासाठी पुरेसा धार्मिक प्रभाव आहे; परंतु एकमेकांवर प्रीती करण्यासाठी तितकासा नाही.”
सन १९३३ मध्ये, हिटलरने ओस्नाब्रुकच्या बिशपला कळवले: ‘यहूद्यांच्या बाबतीत, १,५०० वर्षांपासून कॅथलिक चर्चने जे धोरण अंगीकृत केले, तेच धोरण मी अनुसरत आहे.’ बहुतेक जर्मन चर्च नेत्यांनी त्याच्या या द्वेषपूर्ण पूर्वरचित कत्तलीचा कधीच धिक्कार केला नाही. पॉल जॉनसन त्यांच्या ख्रिस्ती विश्वासाचा इतिहास (इंग्रजी) या पुस्तकात लिहितात: “ज्या कॅथलिकांनी, मृत्यूनंतर त्यांचे प्रेत दहन करावे असे त्यांच्या मृत्युपत्रात लिहून दिले, त्यांना चर्चने बहिष्कृत केले, . . . परंतु छळछावण्या किंवा हत्याकांडाच्या छावण्यांमध्ये काम करण्यासाठी त्यांना बंदी नव्हती.”
काही धार्मिक नेत्यांनी तर द्वेषाकडे कानाडोळा करण्याइतपत मजल मारली आहे—त्यांनी त्याला पवित्र केले आहे. सन १९३६ मध्ये, स्पॅनिश मुलकी युद्धाचा उद्रेक झाला तेव्हा पोप पायस ११ वे यांनी प्रजासत्ताकामध्ये कॅथलिक पाळक असताना देखील, ‘देवाबद्दलच्या त्यांच्या सैतानी द्वेषासाठी’ प्रजासत्ताकांचा धिक्कार केला. त्याचप्रकारे, मुलकी युद्धादरम्यान स्पेनचे मुख्य उपाध्याय कार्डिनल गोमा यांनी, ‘सशस्त्र लढाईविना शांती आणणे अशक्य होते’ असा दावा केला.
धार्मिक द्वेष कमी होण्याचे काहीच चिन्ह दिसत नाही. ग्रीक कर्मठ चर्चचे अधिकारी यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध द्वेष भावना कशी चेतवत होते त्याबद्दल १९९२ मध्ये सरहद्दीविना मानवी हक्क (इंग्रजी) या नियतकालिकाने त्यांच्यावर उघडपणे आरोप केला. अनेक उदाहरणांपैकी त्या नियतकालिकाने एका ग्रीक कर्मठ पाळकाच्या खटल्याचा उल्लेख केला ज्याने दोन १४ वर्षांच्या साक्षीदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती. त्यांच्यावरील आरोप? ‘ते त्याला त्याचा धर्म बदलण्यास जबरदस्ती करीत होते’ असा त्याने त्यांच्यावर दोष लावला.
द्वेषाचे परिणाम
संपूर्ण जगभरात, अन्याय, कलुषितपणा, राष्ट्रवाद आणि धर्म यांच्याद्वारे द्वेषाचे बीज पेरून त्यांना खतपाणी घातले जाते. त्याचे अपरिहार्य प्रतिफळ क्रोध, आक्रमण, युद्ध आणि नाश हेच आहे. बायबलच्या १ योहान ३:१५ मधील विधान, आपल्याला याची गंभीरता पाहण्यास मदत करते: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे.” निश्चितच, जेथे द्वेषाची भरभराट आहे तेथे शांती—जर किंचितही असली तर—धोक्यात असते.
नोबल पारितोषिक विजेते आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या सर्वनाशातून वाचलेले एली विझल लिहितात: “जे काही घडले त्याची साक्ष देणे ही बचावलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे . . . अशा गोष्टी पुन्हा होऊ शकतात व दुष्टाला मोकळीक मिळू शकते असा तुम्ही लोकांना इशारा दिला पाहिजे. वंश द्वेष, हिंसा, मूर्तिपूजा—त्यांची अजूनही भरभराट होत आहे.” द्वेष आपोआप विझणारी आग नाही याचा पुरावा २० वे शतक देतो.
द्वेषाच्या भावनेला लोकांच्या अंतःकरणातून कधी उपटता येईल का? द्वेष नेहमीच नाशकारक आहे का, किंवा त्याची सकारात्मक बाजू आहे का? आपण पाहू या.