थकवा ट्रक चालकांसाठी अदृश्य सापळा
जर्मनीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
तासन्तास गाडी चालवल्यावर, इंजिनची एकसुरी घरघर आणि १४ चाकांचा सुन्न करणारा आवाज यांमुळे ट्रक चालकाच्या थकव्यात आणखीच भर पडते. हेडलाईट्सच्या प्रकाशात रस्त्यावरची आखणी ट्रकसोबत पळत असते. अचानक, मागचा ट्रेलर हेलकावे खाऊ लागतो; ट्रक रस्त्यावरून बाजूला सरू लागला आहे.
स्टेअरिंग चाक जोराने फिरवून चालक आपली ४० टन वजनाची गाडी कशीबशी पुन्हा एकदा रस्त्यावर आणतो. शुद्धीत आल्यावर, त्याला नेमके काय घडले तेच कळत नाही. त्याला थकवा आलेला आहे.a
गाडी चालवताना थकवा आलेल्या व्यक्तीला काही क्षणांसाठी सहजपणे डुलकी लागू शकते. आजकालच्या गजबजलेल्या रस्त्यांचा विचार करता, हे अत्यंत धोकेदायक असू शकते—रस्त्यावर जाणाऱ्या इतर लोकांकरता देखील. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेत जानेवारी १९८९ आणि मार्च १९९४ दरम्यान घडलेल्या जड मालवाहक वाहनांच्या अपघातांमध्ये ३५ टक्के पेक्षा अधिक अपघात चालकांना गाडी चालवताना झोप लागल्यामुळे घडले होते.
चालक वर्तनविषयावरील संशोधक, प्राध्यापक जी. स्टोकर यांनी फॉरशूल या जर्मन पत्रिकेत म्हटले की, जास्त थकव्यामुळे गुंगी येते आणि मद्यासारखाच त्याचाही परिणाम होतो. अर्थात, त्यांचे हे विवेचन केवळ ट्रक चालकांनाच नव्हे तर सर्व चालकांना लागू होते.
थकव्याची कारणे
अनेक राष्ट्रांमध्ये ट्रक चालकाने जास्तीत जास्त किती तास गाडी चालवावी हे नियमात सुचवलेले असताना किंवा तसा प्रतिबंध असतानाही थकव्यामुळे इतके अपघात का घडतात? पहिल्यांदा आपण ट्रक चालकांची एकूण काम करण्याची वेळ पाहायला हवी; यात गाडी चालवण्याचीच नव्हे तर इतर कामे करत असतानाची वेळही येते. ही कामाची वेळ बहुधा दीर्घकाळाची आणि अनियमित असते.
अनेक ट्रक चालकांना एकदा काम हाती घेतल्यावर ते संपवल्याशिवाय थांबायला आवडत नाही; आणि यासाठी त्यांना कोणत्याही ऋतूत ग्राहकापर्यंत माल पोचता करावाच लागतो. केवढे अंतर कापले जाते आणि पोचवलेला माल यावर कार्यक्षमता ठरवली जाते. कामाची वेळ सरासरीपेक्षा चांगलीच जास्त असते. जर्मनीत, बहुतेक लोक एका आठवड्यात ४० तासांपेक्षा कमी काम करतात, पण अनेक ट्रक चालक मात्र त्यापेक्षाही दुप्पट काम करतात.
इतर देशांमध्येही तीच गत आहे. दक्षिण आफ्रिकेत, कमी पगार मिळत असल्यामुळे चालक जास्त वेळ काम करून अधिक पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. भारतातल्या अहवालानुसार, ट्रान्सपोर्ट कंपन्या प्रवासासाठी चालकांना पुरेसा वेळ देत असल्या तरीही पुष्कळसे ट्रक चालक इतर ठिकाणी आणखी माल पोचवण्याचे काम हाती घेऊन जास्त पैसा कमावतात; यामुळे त्यांना एरवीपेक्षा अधिक वेळ गाडी चालवावी लागते. मग कंपनीला दिलेल्या वेळेत पोहंचायला त्यांना जागरण करावे लागते.
युरोपियन युनियनमध्ये, नियमाप्रमाणे ठरवलेल्या जास्तीत जास्त तासांसाठी गाडी चालवून एखादा ट्रक चालक एका आठवड्यात ५६ तासांसाठी गाडी चालवतो. पण, नंतरच्या आठवड्यात त्याला जास्तीत जास्त ३४ तासच गाडी चालवता येते. त्याच्या कामाची वेळ, शिवाय माल भरणे आणि उतरवण्याची वेळही एका तपास यंत्रात नोंदवली जाते. या नोंदणीमुळे प्रत्येक चालक निर्बंधांनुरूप वागतो का याचा तपास लावला जाऊ शकतो.
वाहन चालवण्यात किती वेळ घालवावा लागतो यावर मालकाच्या दृष्टिकोनाचाही परिणाम होतो. त्याचा ट्रक म्हणजे महाग गुंतवणूक असून तिचा सदुपयोग व्हावा, शक्य असल्यास दिवसाचे २४ तासही उपयोग व्हावा आणि गाडी कधीच मोकळी राहू नये असे त्याला वाटते. ट्रान्सपोर्ट कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि मॅनेजर आपल्या चालकांवर स्वेच्छेने अधिक वेळ काम करायला दबाव आणतात.
अधिक वेळ काम करावे लागत असल्यामुळे तर थकवा जाणवतोच, पण अवेळी काम करावे लागत असल्यामुळेही थकवा जाणवतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, काम सुरू करण्याची वेळ सहसा पहाटे एक ते चारच्या दरम्यानची असते. अगदी याच वेळी अनेक चालक सुस्थितीत नसतात आणि त्यांची एकाग्रता नाहीतच जमा असते. ज्या कंपन्यांमध्ये कमीत कमी साठा ठेवला जातो तेथे कामाचा ताण आणखीनच वाढतो कारण माल ‘वेळेवर’ आणण्याची अपेक्षा केली जाते. याचाच अर्थ, चालकाला माल घेऊन ठरलेल्या वेळेतच ग्राहकाकडे पोचावे लागते. वाहनांची वर्दळ, वाईट हवामान आणि रस्त्याची दुरुस्ती यांमुळे उशीर होऊ शकतो पण चालकाला मात्र कसेही करून वेळेवर पोचावेच लागते.
गाडी किती वेळ चालवावी यावर निर्बंध घातलेले असतानाही, नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे पोलिसांच्या आकस्मिक तपासांवरून निष्पन्न झाले आहे. पॉलिसाय फरकेर उन्त तेक्नीक या पत्रिकेनुसार, “ट्रक, बस आणि धोकेदायक मालवाहक गाड्यांच्या ८ चालकांपैकी १ चालक तरी असा असतोच की जो चालवणे आणि विश्रांतीसाठी दिलेल्या वेळेचे निर्बंध पाळत नाही.” हॅमबर्ग येथील एका वाहन तपासणीत, विश्रांती न घेता लागोपाठ ३२ तास गाडी चालवलेला एक ट्रक चालक पोलिसांना सापडला.
धोका ओळखणे
तीस वर्षे आंतरराष्ट्रीय माल वाहून नेणाऱ्या एका दीर्घपल्ल्याच्या चालकाला थकव्याच्या समस्येविषयी विचारणा केली असता त्याने सांगितले: “अहंभाव आणि फाजील आत्मविश्वासामुळे एखादा चालक थकव्याकडे दुर्लक्ष करू शकतो. आणि मग अपघात घडतात.” थकव्याची चिन्हे पृष्ठ २२ वरील रकान्यात दिली आहेत.
सुरवातीच्या इशाऱ्याच्या चिन्हांना ओळखल्यास जीव वाचू शकतात. संयुक्त संस्थानांत, राष्ट्रीय वाहन संरक्षण बोर्डाने केलेल्या अभ्यासावरून धक्केदायक आकडेवारी लक्षात आली आहे: १०७ एक-ट्रक अपघातांपैकी ६२ अपघात थकव्यामुळे घडले होते. म्हणून, चालकाला ज्या ज्या वेळी डुलकी लागते त्या त्या वेळी इशारा देणारी तांत्रिक साधने निर्माण करण्याला वाहन उद्योग आता अधिक महत्त्व देऊ लागलाय.
एक जपानी कंपनी एक इलेक्ट्रॉनिक साधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यात व्हिडिओ कॅमेऱ्याच्या साहाय्याने चालक किती वेळा पापण्या मिटवतो हे पाहिले जाते. पुष्कळदा पापण्या मिटवल्या तर पूर्वध्वनीमुद्रित आवाज त्याला त्याच्या धोकेदायक स्थितीचा इशारा देतो. एक युरोपियन कंपनी असे यंत्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहे ज्याद्वारे गाडी किती सुरळीत चालली आहे हे पाहिले जाते. गाडी हेलकावे खाऊ लागली तर, कॅबिनमध्ये इशारा दिला जातो. परंतु, प्रभावकारी साधनांचे उत्पादन सुरू व्हायला वेळ लागेल.
धोक्याविरुद्ध प्रतिक्रिया
जवळजवळ सर्वच वाहनांमध्ये थकवा हा आगंतुक आणि नापसंत असा प्रवासी राहिला आहे. परंतु, त्याला बाहेर कसा काढावा हाच आता प्रश्न आहे. काही चालक कॅफेन असलेले पेय भरपूर प्रमाणात पितात, पण तरीही थकवा जात नाही. इतरजण आणखी इतर उद्दीपक घेतात. यामुळे आरोग्याला धोके उत्पन्न होतात हे काही वेगळे सांगायची गरज नाही. मेक्सिकोत, काही चालक जागे राहण्याकरता मिरचीचे तुकडे (अतिशय तिखट प्रकाराची) चगळतात.
काम लवकर सुरू करण्याआधी पुरेशी झोप घेणे केव्हाही चांगले. शिवाय, नियम म्हणून एखाद्याने विशिष्ट वेळेपर्यंतच गाडी चालवावी. दक्षिण आफ्रिकेत, तज्ज्ञ प्रत्येक पाच तासांनंतर विश्रांती घ्यायला सांगतात. कंटाळवाण्या रस्त्यांवर चालकाने सतर्क राहावे आणि एकाग्रता ठेवावी. काही चालक रेडिओ ऐकतात किंवा सीबी रेडिओवरून इतर चालकांशी बोलतात. यहोवाचा साक्षीदार असलेला एक चालक टेहळणी बुरूज आणि सावध राहा! आणि बायबलमधील उतारे यांसारखे बायबलसंबंधी कॅसेट्स ऐकतो. इतर सल्ले या पानावरील रकान्यात आढळतील.
राहणीमानाकरता पुरेशी मिळकत कमावणे जास्तच कठीण होत चालले आहे आणि म्हणून समतोल राखणे इतके काही सोपे नाही. थकव्याच्या सापळ्याचा चालकांना इतका काही धोका नाही असे काही कंपन्या किंवा मॅनेजर समजतात. म्हणून ट्रान्सपोर्ट धंद्यात असणाऱ्या सर्वांनी आतापर्यंत थकव्याबद्दल जे काही जाणून घेतले आहे ते लक्षात ठेवल्यास बरे होईल. शिवाय, चालकांकडेच आपल्या अनुभवावरून मिळालेले काही सल्ले असतात जे इतरांना झोप टाळण्याविषयी मदत देऊ शकतात.
अर्थात, सतर्क राहण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शरीराच्या गरजा भागवणे होय: तुम्हाला इशारा मिळताच शक्य असल्यास पुढच्या ठिकाणी थांबून थोडीफार झोप घ्या. मग वाटल्यास पुन्हा एकदा चालवण्याचे आव्हान स्वीकारा. थकव्याच्या अदृश्य सापळ्यात अडकू नका!
[तळटीप]
a जर्मनीत स्त्रिया ट्रक चालक अल्प असल्यामुळे या लेखात ट्रक चालकाला पुल्लिंगी संबोधले आहे.
[२२ पानांवरील चौकट]
तत्काळ मदत देण्याजोगे इशारे
• तुमच्या डोळ्यांची जळजळ होत आहे किंवा पापण्या मिटत आहेत का?
• तुम्ही कल्पना करू लागता किंवा दिवास्वप्न पाहू लागता का?
• रस्ता अरूंद वाटू लागून तुम्ही मधल्या रेषेवरून गाडी चालवू लागता का?
• प्रवास केलेली काही ठिकाणे तुम्हाला आठवेनाशी होतात का?
• एरवीपेक्षा तुम्ही स्टेअरिंग व्हील किंवा ब्रेकला जास्त हिसका देत आहात का?
वरील प्रश्नांपैकी कोणत्याही एका प्रश्नाचेही तुमचे उत्तर होय असल्यास, तुम्हाला तत्काळ विश्रांतीची गरज आहे
[२३ पानांवरील चौकट]
दीर्घपल्ल्याच्या प्रवासात
• पुरेशी झोप घ्या
• उद्दीपकांवर अवलंबून राहू नका
• नियमितपणे विश्रांती घ्या आणि तजेला येण्यासाठी व्यायाम करा
• कंटाळवाणे रस्ते विशेषतः धोक्याचे असतात हे लक्षात ठेवा
• उपाशी पोटी प्रवासाला सुरवात करू नका. स्वतःला जेवणासंबंधी चांगल्या सवयी लावून घ्या: हलका आणि स्वास्थ्यकारी आहार घ्या
• भरपूर प्रमाणात पेये घ्या पण मद्य मात्र टाळा