रस्ता राग तुम्ही याचा सामना कसा करू शकता?
ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
जागतिक बातम्यांमध्ये राग अनावर होणे आणि त्यामुळे घडणारी हिंसा या गोष्टी अधिकाधिक ठळक होत चालल्या आहेत. ट्रॉली राग (जेथे ट्रॉली किंवा फूड कार्ट वापरणारे सुपरमार्केटमधले ग्राहक एकमेकांवर भडकतात) आणि फोन राग (जेथे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तुमच्याशी बोलणारी व्यक्ती तुम्हाला थांबायला लावून दुसऱ्याशी बोलते) तर आहेतच पण ब्रिटनमध्ये रस्ता रागाने सगळ्यांचे लक्ष आता वेधले आहे.
रस्ता राग इतका व्यापक झाला आहे की १९९६ च्या वाहन चालवण्याच्या सवयींवरील एका अहवालानुसार “त्याची जणू साथ लागली आहे; गत वर्षात जवळजवळ निम्म्या चालकांनी कोणत्या न कोणत्या तरी प्रकारचा हल्ला किंवा वाईट वागणूक सहन केली होती!” एका मोटार संघटनेच्या सर्वेक्षणाने समस्या आणखीन पुढे गेल्याचे सांगून “दहापैकी नऊ मोटार चालक रस्ता रागाला बळी पडल्याचे” वृत्त दिले. पण गंमत म्हणजे, त्याच मतनोंदणीनुसार, “दहा [मोटार चालकांपैकी] केवळ सहा जणांनी गाडी चालवत असताना स्वतःचा राग अनावर झाल्याचे कबूल केले.”
रस्ता राग कशामुळे भडकतो? तुम्हाला हे सहन करावे लागत असल्यास, तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता? दुसऱ्या व्यक्तीच्या चालवण्यामुळे जर तुम्हाला राग येत असला तर तुम्ही काय करावे? अर्थात, रस्ता राग जगभर फोफावत असताना तुम्ही त्याचा सामना कसा करू शकता?
कारण-परिणाम
चिडणारे चालक काही नवीन नाहीत. इंग्रज कवी लॉर्ड बायरन हे प्राचीन काळातले एक आरोपी होते. सन १८१७ मध्ये त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्यात त्यांनी रस्त्यावर केलेल्या एका भांडणाचा उल्लेख केला होता. अहवालानुसार, बायरन यांच्या घोड्याशी रस्त्यावरील दुसरा एक मनुष्य “उद्धटपणे” वागला. परिणामस्वरूप, कवीने त्या मनुष्याच्या कानाखाली एक वाजवली.
अनेक देशांमध्ये, वाहतुकीचे प्रमाण वाढते तसे चालकांचा रागराग करण्याची वृत्तीही वाढते. १९८० च्या दशकात संयुक्त संस्थानांच्या वृत्तपत्रकांनी गाडी चालवण्यासंबंधीच्या हिंसक घटनांना कारणीभूत ठरलेल्या गोष्टीचे वर्णन “रस्ता राग” असे केले. रस्ता राग हा काही गुन्हा नसला, तरी त्यावरून दुसऱ्या चालकांच्या चालवण्याच्या पद्धतीने चिडून काहीतरी हिंसक कृत्य करणाऱ्या चालकांच्या भावना प्रकट होतात.
मी-आधी ही मनोवृत्ती रस्त्यावरील सगळ्यांमध्येच दिसून येऊ लागलीय. चालकांच्या वर्तणुकीच्या संशोधकांचे असे म्हणणे आहे की, “हिंसक कृत्य किंवा रागराग करणाऱ्या लोकांची ‘मी काही केलं नाही त्यांचीच चूक होती,’ अशीच मनोवृत्ती असते.” असे लंडनच्या द टाईम्सचे निरीक्षण आहे. एखादा चालक कितीही बेतालपणे गाडी चालवत असला तरी त्याच्या मते त्यात काहीच गैर नसते. पण, दुसऱ्या चालकाने रस्त्यावरील शिष्टाचार दाखवण्यात लहानशी चूक केली तर मात्र रस्ता राग भडकतो.
तरुण लोकांमध्ये सर्रासपणे दिसून येणारी मादक पदार्थांची भरभराटणारी संस्कृती देखील रस्ता रागाला हातभार लावते. कोकेनचे सेवन करणे हे एका इस्पितळातल्या तज्ज्ञांनुसार, “दारू पिऊन गाडी चालवण्यासारखे आहे.” जे चालक मादक पदार्थ घेतात त्यांना बहुधा स्वतःच्या क्षमतांबद्दल फाजील आत्मविश्वास असतो. परिणामी, काही चालक जीवघेण्या वेगाने गाडी चालवतात. इतर चालक लहरीपणाने गाडी चालवतात, त्यांची मती भ्रष्ट झालेली असते.
शिवाय, चालकावर तणावाचा काय परिणाम होतो त्याचा जरा विचार करा. मेंचस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक कॅरी कुपर यांचे म्हणणे आहे की, १९९० च्या दशकातल्या रस्ता रागाच्या बहुतेक प्रकरणांसाठी दैनिक जीवनातले ताण-तणाव आणि अनिश्चितता जबाबदार होते. “चालकांवर अधिकाधिक तणाव येत आहेत आणि हिंसक हल्ला करण्याची प्रकरणे वाढत आहेत,” असे रॉयल ऑटोमोबाईल क्लबचा एक प्रतिनिधी म्हणाला. एक खूप व्यस्त असणारी जनतासंपर्क महिला अधिकारी, जिला कामाला जाताना आणि परतताना खूप तास गाडी चालवावी लागते ती मान्य करते की पूर्वीसारखी ती सहनशील राहिलेली नाही. “आता मी अगदी लहानसहान गोष्टींवरून फाडकन काहीपण बोलते आणि भडकते सुद्धा; आधी अशा लहानसहान गोष्टींचा मला कधीच त्रास होत नव्हता,” असे तिचे म्हणणे द संडे टाईम्समध्ये देण्यात आले होते. कदाचित तुम्हालाही तसेच वाटत असेल. तसे असल्यास, तुम्ही काय करू शकता?
रस्ता राग भडकवू नका
दुसरे चालक परिपूर्ण नाहीत हे समजून घ्या. कधीकधी ते नियमांचा भंग करतील. हे लक्षात ठेवून त्यानुसार गाडी चालवा. पुढचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मोठ्या महामार्गाच्या कडेने गाडी चालवत आहात. पण, समोर एक जंक्शन येते जेथून बाजूच्या रस्त्यावरील गाड्यांना महामार्गावर यायला संधी मिळते. तुम्हाला अशा एका बाजूच्या रस्त्यावरून महामार्गावर येणारी एक गाडी दिसते. तुम्ही असा तर्क कराल का की, मी आधी येथे चालवत होतो आणि मला या बाजूने जाण्याचा पूर्ण अधिकार आहे? मी त्या महामार्गावर येणाऱ्या गाड्यांना जागा का द्यावी? त्या चालकाला महामार्गावर येऊ देण्यासाठी मला बाजू देता येत असली, तरी मी बाजू का द्यावी? पण जरा विचार करा, तुम्ही जर तुमच्या बाजूवर राहण्याचा आणि वेग कमी न करण्याचा अट्टाहास धरला तर काय होईल? कदाचित महामार्गावर येऊ पाहणारा चालकही तसाच विचार करेल. पण, कोणीतरी नमते घेतलेच पाहिजे; नाहीतर दुर्घटना होईल.
सुज्ञपणा यात आहे की, जो चालक रस्ता राग टाळू इच्छितो तो पुढे पाहतो आणि विचारशीलतेने गाडी चालवतो. त्याला शक्य तेव्हा तो मार्ग देतो आणि त्याच्या सभ्यतेच्या वागणुकीकडे दुसऱ्याने दुर्लक्ष केले तरी तो चिडत नाही. ब्रिटनच्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड मोटोरिस्ट्सचा एक प्रतिनिधी अंदाज लावतो की, प्रत्येक ३ पैकी १ चालकाची मनोवृत्ती घातक आहे. या चालकांना आपल्या गाड्या कुशलतेने चालवता येत असल्या तरी त्यांच्याजवळ सभ्यता नावाची काही गोष्ट नसते. तो त्यांना “उत्तम चालक परंतु असभ्य लोक” म्हणतो.
बहुतांश चालक काहीवेळा रस्त्यावरील दुसऱ्यांचा काही विचारच करत नाहीत. पण, तुमचे तसे वागणे काही योग्य नव्हे. संभवनीय परिणामांचा विचार करा. तुमच्या हट्टी मनोवृत्तीमुळे निश्चितच तुम्हाला अपघात घडवायचा नसेल. संयम गमावू नका. एक चालक तज्ज्ञ सल्ला देतात: “रस्त्यावरील आक्रमक वागणुकीला तुम्ही कधीच प्रतिक्रिया दाखवू नये किंवा त्याला प्रतिसाद देऊ नये.” रस्ता-राग संघात तुम्ही शामील होऊ नका!
तुम्हाला त्याचा त्रास होतो का?
प्रत्यक्षात प्रत्येक चालक कधीकधी रस्ता रागाला बळी पडलेला असतो. उगारलेला हात, शिवीगाळ, चिडून गाडी चालवणे या सर्व गोष्टी एखाद्याला घाबरवू शकतात आणि घाबरवतातही. सर्वात उत्तम संरक्षण म्हणजे, भांडणात पडू नका. दुसरा एक चालक जेव्हा एका चालकाच्या पुढे जाऊ पाहत होता तेव्हा ह्या चालकाला त्याची भीती वाटली. सरतेशेवटी, तो ओव्हरटेक करून त्याच्यापुढे गेला आणि त्याने गाडीचा वेग इतका कमी केला की आता आपल्या गाड्यांची टक्कर होणार अशी भीती ह्या चालकाला वाटू लागली. हे असेच कितीतरी वेळेपर्यंत चालू राहिले; शेवटी ह्या चालकाला दुसऱ्या रस्त्यावर जावे लागले.
इतर चालकांना पुढे जायचे असल्यास, त्यांना जागा देण्याचा होता होईल तितका प्रयत्न करा. रस्त्यावर तुमच्या जागेवरून न हलण्याचा हट्ट धरू नका. तुम्ही जर जाणूनबुजून इतरांना चिडवले तर माफी मागा. अजाणतेने देखील चूक केली असल्यास, इशाऱ्यांनी माफी मागा. लक्षात ठेवा सौम्य शब्दाने राग टळतो.
कारण काहीही असो, तुम्हाला जर कधी रस्ता रागाचा समाना करावा लागला तर तुम्ही भडकू नका. “जशास तसे करू नये,” असा सल्ला फोकस पत्रिका देते. “तुमच्या कारमध्ये घातक हत्यारे म्हणून वापरता येतील अशा वस्तू ठेवू नका.” दुसरे सल्ले: कारच्या दरवाजांना कुलूप लावा आणि खिडक्या बंद ठेवा. चिडलेल्या व्यक्तीकडे जास्त पाहू नका.
रस्ता रागाचा सामना करण्याच्या या वरील सूचना काही नवीन नाहीत. खूप काळाआधी इस्राएलच्या राजा दावीदाने दिलेल्या सल्ल्याशी ते जुळतात: “दुष्कर्म्यांवर जळफळू नको,” असे तो म्हणाला. “अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर.”—स्तोत्र ३७:१, ८.
रस्ता रागाचे प्रमाण वाढत असले तरी तो तुमच्यात वाढू देऊ नका!
[१८ पानांवरील चौकट]
रस्ता रागावर ताबा ठेवणे
मोटार संघटना निरिक्षिते की, रस्ता रागाच्या बाबतीत, “अभियांत्रिकी उपाय शोधून काढणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्वाचे मनोवृत्ती बदलणे देखील आहे.” रस्ता रागाचा सामना करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या आणि रस्त्यावरील इतरांच्या गाडी चालवण्याच्या कुशलतांबद्दल वास्तविक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. दुसऱ्यांच्या चुका ठळकपणे दिसत असल्या, तरीही स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. रस्त्यावरील नियमांकडे कानाडोळा करणारे काही चालक आहेत ही वस्तुस्थिती मान्य करा. गाडी चालवताना जागरूक असा. थकव्यामुळे तणाव आणखी वाढतो. एका क्षणासाठीही लक्ष इकडेतिकडे गेले तरी त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.
खालील सल्ल्याचाही विचार करा, आणि राजा शलमोनाच्या नीतीसूत्रांशी तो कसा जुळतो ते पाहा.
• तुमच्या गाडीतल्या प्रवाशांना तुमचा राग दिसून येतो का? कदाचित तुम्ही शांत व्हावे असे ते सांगत असतील. त्यांचा सल्ला झिडकारून गाडी कोण चालवतोय, तू का मी असे म्हणून त्यांच्यावर खेकसू नका. लक्षात असू द्या की, शांत मनोवृत्ती हितकारक असते आणि प्रसंगी ही मनोवृत्ती अक्षरशः जीवनरक्षक ठरेल! “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे.”—नीतिसूत्रे १४:३०.
• दुसऱ्या चालकाचा विचार करून समस्या टाळा. “सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो.”—नीतिसूत्रे १४:१६.
• आपण चुकलो असे इशाऱ्याने किंवा शब्दाने व्यक्त करून राग टाळा. “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते.”—नीतिसूत्रे १५:१.
• इतरजण रस्ता राग दाखवत असतील पण तुम्हाला त्यांचे अनुकरण करण्याची गरज नाही. “रागीट मनुष्याशी मैत्री करू नको.”—नीतिसूत्रे २२:२४.
• इतरांच्या भांडणात पडू नका. “भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.”—नीतिसूत्रे १७:१४.