तुमचे मूत्रपिंड जीवनदायी गाळणी
आयर्लंडमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
पृथ्वी आणि मानवी शरीरात एक साम्यता आहे: जीवन टिकवण्याकरता दोघांनाही गाळणीची आवश्यकता आहे. सूर्याच्या हानीकारक किरणांच्या सतत भडिमारापासून पृथ्वीला संरक्षण लागते. आपल्या वातावरणातला ओझोन थर या किरणांना गाळून जीवनदायी प्रकाशाला पृथ्वीवर येऊ देतो. आणि तुमच्या शरीराबद्दल काय? तुमच्या शरीरातल्या पुष्कळशा रासायनिक प्रक्रिया रक्तप्रवाहात विषारी पदार्थ आणि मल सोडतात. जर का त्यांना राहू दिले, तर गंभीर समस्या उद्भवू शकतात, मृत्यूही संभवू शकतो. हे पदार्थ सतत गाळून शरीराबाहेर टाकावे लागतात.
ही गाळण्याची क्रिया तुमच्या मूत्रपिंडाचे एक प्रमुख कार्य आहे. पण असले घातक पदार्थ ओळखणे, वेगळे करणे आणि काढून टाकणे शिवाय तुमच्या शरीराचे पोषण करणारे महत्त्वपूर्ण घटक राहू देणे हे या इवल्याशा अवयवांना कसे साध्य होते? आणि मूत्रपिंडांनी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
मूत्रपिंडांत आहे तरी काय?
मानवांना साधारणतः दोन मूत्रपिंडे असतात—पाठीच्या खालच्या भागात मणक्याच्या दोन्ही बाजूला दोन असे असतात. प्रत्येक मूत्रपिंड दहा सेंटीमीटर लांब, पाच सेंटीमीटर रुंद आणि अडीच सेंटीमीटर जाड असून त्याचे वजन ११० ते १७० ग्रॅम इतके असते. वरून खाली मूत्रपिंडाला छेद दिल्यास, दाखवलेल्या चित्रांमध्ये दिसते त्याप्रमाणे अनेक स्पष्ट वैशिष्ट्ये दिसून येतात.
मूत्रपिंडे कसे काम करतात याचे चित्र मनासमोर उभे करायला एका स्टेडियमची कल्पना करा ज्यात हजारो प्रेक्षक एखाद्या कार्यक्रमासाठी जमा होत आहेत. सुरवातीला, या लोकांना लहान लहान अशा पुष्कळ ओळींमध्ये उभे राहावे लागते. मग, एकएक करून त्यांना सुरक्षा गेटमधून जावे लागते; ज्यांच्याकडे तिकिटे नसतात त्यांना ओळीतून बाहेर काढले जाते. तिकिटे असलेले प्रेक्षक गेटमधून जाऊन आपापल्या जागी बसतात.
अगदी अशाच तऱ्हेने, रक्तातल्या सर्व घटकांना संपूर्ण शरीरातून प्रवास करावा लागतो. परंतु, असे करताना मात्र त्यांना वारंवार मोठ्या रक्तवाहिनींद्वारे अर्थात प्रत्येक मूत्रपिंडासाठी असलेल्या वृक्क रोहिणीद्वारे मूत्रपिंडांमधून जावे लागते. (पृष्ठ २४ वरील चित्र पाहा.) मूत्रपिंडात प्रवेश केल्यावर, वृक्क रोहिणी, मूत्रपिंडाच्या आंतरिक आणि बाह्य थरांमध्ये लहान वाहिनींच्या रूपात पसरते. अशाप्रकारे, तुमच्या रक्तातले विविध घटक, लहान आणि अधिक सुलभ “ओळींमधून” पाठवले जातात.
सरतेशेवटी, रक्त चिमुकल्या पुंजक्यांमध्ये येते; प्रत्येक पुंजक्यात घट्ट फास असलेल्या सुमारे ४० सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात. केशिकागुच्छ नाव असलेल्या प्रत्येक पुंजकाभोवती बोमन्स संपुट नावाचे दुपदरी पटल असते.a केशिकागुच्छ आणि बोमन्स संपुट या दोघांचे मिळून तुमच्या मूत्रपिंडाच्या ‘सुरक्षा गेटचा’ पहिला भाग तयार होतो, अर्थात वृक्क एकक—तुमच्या मूत्रपिंडातले मूलभूत गाळण एकक. हरएक मूत्रपिंडात दहा लाखांपेक्षा अधिक वृक्क एकक असतात. पण ते इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहायला तुम्हाला सूक्ष्मदर्शक यंत्राची गरज लागेल!—पृष्ठ २५ वर वृक्क एककाचे मोठे केलेले चित्र पाहा.
तुमच्या रक्ताची दुहेरी गाळण क्रिया
तुमच्या रक्तप्रवाहातल्या रक्त पेशी आणि प्रथिने अत्यावश्यक असतात. ते तुमच्या शरीराला ऑक्सीजनचा साठा, संरक्षण आणि मोडतोडीची भरपाई अशा महत्त्वपूर्ण सेवा देतात. रक्त पेशी आणि प्रथिने वाया जाऊ नयेत म्हणून, गाळण क्रियेच्या पहिल्या टप्प्यात यांना इतर सर्व घटकांपासून वेगळे करण्यात येते. हे वैशिष्ट्यपूर्ण काम बोमन्स संपुटांद्वारे साध्य होते. पण कसे?
केशिकागुच्छात प्रवेश करणाऱ्या रक्तवाहिन्या, पातळ पटल असलेल्या बारीक केशिकांमध्ये विभाजित होतात. मग, रक्तदाबामुळे या पातळ पटलांमधून थोडेफार पाणी आणि इतर सूक्ष्म रेणू रक्तप्रवाहातून बाहेर ढकलले जाऊन बोमन्स संपुटात जातात आणि तेथून त्याला जोडलेल्या वेटोळ्या नळीत प्रवेश करतात. या नळीला परिवलित नलिका म्हणतात. प्रथिनांचे मोठे रेणू आणि सर्व रक्त पेशी, रक्त प्रवाहातच राहतात आणि केशिकांमधून वाहत असतात.
त्यानंतर गाळण क्रिया अधिकच निवडक बनते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेले काही निसटू नये याची पक्की खात्री मूत्रपिंडांनी करायची असते! या क्षणी नलिकेतून वाहणारा द्रव पाण्यासारखे पातळ मिश्रण असून त्यात विरघळलेले उपयुक्त रेणू त्याचप्रमाणे मल आणि अनावश्यक पदार्थ असतात. नलिकेच्या आतील भिंतीवर असलेल्या खास पेशी पाणी, क्षार, शर्करा, खनिज, जीवनसत्त्व, हार्मोन्स आणि ॲमिनो ॲसिडसारख्या उपयुक्त रेणुंना ओळखतात. या उपयुक्त रेणुंना कार्यकुशलतेने नलिकेच्या भिंतीत शोषून भोवतालच्या केशिकांच्या जाळ्यात पाठवले जाते जेथून ते पुन्हा तुमच्या रक्तप्रवाहात मिसळतात. या केशिका लहान लहान शिरांमध्ये जोडल्या जाऊन त्यांची वृक्क शिर नावाची रक्तवाहिनी तयार होते. यातून तुमचे गाळलेले आणि शुद्ध केलेले रक्त मूत्रपिंडातून बाहेर पडते आणि तुमच्या शरीरातल्या जीवनाचे संवर्धन करायला निघते.
मल बाहेर टाकणे
पण नलिकेत राहिलेल्या द्रवाचे काय? स्पष्टतः, त्या द्रवात तुमच्या शरीराला नको असलेले पदार्थ असतात. हा द्रव नलिकेतून मोठ्या संग्राहक नलिकेकडे किंवा संग्राहक वाहिनीकडे वाहत जातो, तेव्हा नलिकेतल्या भिंतीतल्या इतर पेशी त्यात ॲमोनिया, पोटॅशियम, युरिया, युरिक ॲसिड आणि जादा पाणी शिवाय वेगवेगळे स्राव सोडत जातात. हा अंतिम पदार्थ मूत्र असतो.
विविध वृक्क एककातल्या संग्राहक नलिका एकत्र येऊन कोणस्तूपाच्या टोकाला असलेल्या रंध्रांतून मूत्र सोडतात. हे मूत्र, वृक्कद्रोणात जाते आणि मग मूत्रवाहिनीमार्गे बाहेर पडते; मूत्रवाहिनी ही मूत्रपिंड आणि मूत्राशयाला जोडणारी नलिका आहे. मूत्र शरीराबाहेर फेकण्याआधी ते तुमच्या मूत्राशयात साठवले जाते.
इतके सूक्ष्म असतानाही, तुमच्या मूत्रपिंडातले २० लाखांपेक्षा अधिक वृक्क एकक उत्कृष्ट कामगिरी पार पाडतात. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो: “वृक्क एकक . . . दर ४५ मिनिटांना रक्तातले संपूर्ण पाच लिटर पाणी गाळत असतात.” निरनिराळे पदार्थ पुन्हा शोषून घेईपर्यंत आणि विविध क्रिया पूर्ण होईपर्यंत, एक सर्वसाधारण, निरोगी शरीर दर २४ तासांना मूत्राच्या रूपात जवळजवळ दोन लिटर मल विसर्जित करू शकते. केवढी ही परिश्रमी आणि पक्की गाळण व्यवस्था!
आपल्या मूत्रपिंडांची काळजी घ्या!
तुमचे मूत्रपिंड स्वतःला स्वच्छ करणारे आणि स्वतःची देखभाल करणारे असून ते दीर्घ काळापर्यंत कार्य करू शकतात. तथापि, त्यांचे कार्य पूर्ण करण्यात तुमचाही एक भाग आहे. तुमचे शरीर निरोगी राहावे म्हणून तुमच्या मूत्रपिंडांमधून भरपूर पाणी जायला हवे. तसे पाहिले तर, मूत्रपिंडाचे संसर्ग आणि मूतखडे टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे हा मूलभूत उपाय मानला जातो.b पाणी पिणे हे तुमच्या पचन आणि कार्डियोवॅस्क्यूलर संस्थांसाठी देखील उपयुक्त आहे, असे न्यूयॉर्क येथील लाँग आयलंड कॉलेज हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सी. गोडेक यांचे म्हणणे आहे.
किती पाणी? डॉ. गोडेक आणि आणखी इतर डॉक्टरांच्या मते, अन्य भोजन आणि पेयांव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी निदान दोन लिटर पाणी तरी प्यायलेच पाहिजे. “अनेक लोकांना निर्जलीकरण होतंय,” असे डॉ. गोडेक यांनी सावध राहाला! सांगितले. त्यांचे असे निरीक्षण आहे की, जोपर्यंत मूत्रपिंडाला किंवा हृदयाला रोग झालेला नाही तोपर्यंत पाणी हे केव्हाही चांगलेच असते. “पण पाणी भरपूर प्रमाणात प्यायला हवं,” डॉ. गोडेक म्हणाले. “पुष्कळजण पाणी पीत नाहीत.”
काहीजण पाण्यात लिंबू वगैरे फ्लेवर मिसळणे पसंत करतात. इतरांना स्प्रिंगवॉटर किंवा सक्रियित कोळशातून गाळलेल्या पाण्याची चव आवडते. पण, इतर कोणत्याही पेयापेक्षा साधे किंवा अगदी कमी फ्लेवर मिसळलेले पाणी तुमच्या मूत्रपिंडांसाठी उत्तम असते. खरे तर, फलरसांमधल्या आणि गोड पेयांमधल्या साखरेमुळे शरीराला पाण्याची अधिकच गरज भासते. मद्य किंवा कॅफेन असलेले पेय शरीरातले पाणी घालवून देतात.
दररोज दोन लिटर पाणी पिण्याची सवय लावून घेणे हे काही सोपे नव्हे. त्याचे एक कारण म्हणजे, अनेकांना एरवीपेक्षा अधिक वेळा लघवीला जाणे गैरसोयीचे वाटते किंवा त्यांना त्याची लाज वाटते. पण तुम्ही हा जादा प्रयास केल्यास तुमचे शरीर तुमचे कृतज्ञ राहील. प्रकृती टिकवून ठेवण्यासाठी मदत करण्याशिवाय भरपूर पाणी प्यायल्याने तुमचे स्वरूपही सुधारू शकते. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, त्वचेला वरून लावायच्या कोणत्याही मिश्रणापेक्षा पौष्टिक आहार आणि भरपूर पेय घेणे हाच त्वचा निर्मळ राखण्यावरील सर्वात गुणकारी उपाय आहे.
दुर्दैवाची गोष्ट अशी, की आपले तहान तंत्र सदोष आहे, आणि आपण जसजसे वृद्ध होत जातो तसतशी त्याची संवेदनक्षमता कमी होत जाते. म्हणून, आपल्याला किती पाणी हवे आहे यासाठी आपण केवळ तहान लागण्यावरच अवलंबून राहू शकत नाही. पुरेसे पाणी घेण्याची तुम्ही खात्री कशी करू शकता? काहीजण, सकाळी दोन ग्लास पाणी पितात आणि मग अधूनमधून एखादा ग्लास पीत असतात. इतरजण पाण्याची पारदर्शक बाटली अगदी समोरच ठेवतात—मग दिवसभरात अधूनमधून पाणी प्यावे अशी आठवण राहते. तुमची कोणतीही पद्धत असली, तरी भरपूर प्रमाणात शुद्ध, निर्मळ पाणी पिणे हा तुमच्या मूत्रपिंडांप्रती—तुम्हाला जिवंत ठेवणाऱ्या अद्भुत गाळणीप्रती—कदर दाखवण्याचा उत्तम मार्ग आहे.
[तळटीपा]
a सन १८४० च्या दशकाच्या सुरवातीला इंग्रज शस्त्रवैद्य आणि सूक्ष्मशरीरविज्ञानतज्ज्ञ विल्यम बोमन यांनी या इवल्या संपुटाचे आणि त्याच्या क्रियेचे वर्णन केले. मग यास त्यांचे नाव देण्यात आले.
b ऑगस्ट २२, १९९३, पृष्ठे २०-२ आणि मार्च ८, १९८६, पृष्ठ १८ चे सावध राहा! (इंग्रजी) अंक पाहा.
[२४, २५ पानांवरील चित्र]
वृक्क शिर, नुकतेच गाळलेले रक्त शरीरात नेते
वृक्क रोहिणी, मूत्रपिंडात अशुद्ध रक्त नेते
वृक्क कोणस्तूप हे शंकूच्या आकाराचे असून ते वृक्कद्रोणाला मूत्र पोचवतात
बाह्यकात प्रत्येक वृक्क एककाचा केशिकागुच्छ असतो
वृक्कद्रोण ही मूत्र गोळा करून मूत्रवाहिनीत नेणारी नलिका आहे
मूत्रवाहिनी, मूत्रपिंडातली लघवी मूत्राशयात पोचवण्याचे काम करते
[पानांवरील चित्र]
वृक्क एकक अर्थात सुमारे २० लाख नळीच्या आकाराच्या गाळण्या रक्ताचे शुद्धीकरण करतात
बोमन्स संपुट
केशिकागुच्छ
परिवलित नलिका मूत्र गोळा करते आणि मग ते मूत्राशयात जाते
केशिका
[२५ पानांवरील चौकट]
वृक्क एकक—मूलभूत गाळण एकक
प्रत्येक मूत्रपिंडात एक कोटीपेक्षा अधिक वृक्क एकक असतात. प्रत्येक वृक्क एककातली नलिका संस्था सुमारे तीन सेंटीमीटर लांब तर केवळ ०.०५ मिलीमीटर रुंद असते. तरीपण, जर एकाच मूत्रपिंडातल्या सर्व नलिकांचा गुंता सोडला तर ते जवळजवळ ३० किलोमीटरपर्यंत तरी पोचतील!
बोमन्य संपुट हे खरे म्हणजे वृक्क एककाच्या परिवलित नलिकेचा शेवटचा दंतुर भाग आहे. या नलिकेभोवती केशिका म्हटल्या जाणाऱ्या अतिसूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे असते. ही नलिका एका संग्राहक वाहिनीला जाऊन मिळते, जी वाहिनी वृक्क एककाने गाळलेला मल आणि विषारी पदार्थ वाहून नेते.