वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ९/८ पृ. १८-२०
  • मांसाहार अयोग्य आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मांसाहार अयोग्य आहे का?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काहीजण मांस का वर्ज्य करतात?
  • प्राण्यांची हत्या करणे अयोग्य?
  • खाद्यासाठी प्राण्यांचा उपयोग
  • प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी आदर दाखवणे
  • प्राण्यांवर दया करणे
  • ख्रिस्ती व्यक्‍तीने शाकाहारी असणे आवश्‍यक?
  • प्राण्यांशी क्रूरतेने वागणे—गैर आहे का?
    सावध राहा!—१९९८
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • प्राणी मेल्यानंतर स्वर्गात जातात का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
सावध राहा!—१९९७
g97 ९/८ पृ. १८-२०

बायबलचा दृष्टिकोन

मांसाहार अयोग्य आहे का?

“अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पति व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्‍न होतील.”—उत्पत्ति १:२९.

देवाने पहिल्या मानवाला अर्थात आदामाला दिलेली ही आहारविषयक सूचना, एका शाकाहारी हिंदू कुटुंबातील अठरा वर्षीय सुजाताला एकदम पटली. पण तिने लगेच प्रश्‍न केला: “मग, खाण्यासाठी इतक्या सर्व वस्तू असताना लोक प्राण्यांची हत्या का करतात?”

जगाच्या पाठीवर कितीतरी लोकांना हाच प्रश्‍न पडतो. पूर्वेकडील कोट्यवधी लोकांच्या आहारात मांस अजिबातच नसते. शिवाय, पाश्‍चात्त्य देशांतही शाकाहाऱ्‍यांची संख्या वाढते आहे. एकट्या अमेरिकेतच, जवळजवळ १.२४ कोटी लोक स्वतःला शाकाहारी म्हणवतात; एका दशकापूर्वीच्या संख्येशी तुलना केल्यास यात ३० लाख लोकांची भर पडली आहे.

मांसरहित आहार अधिक पसंत करणाऱ्‍यांची संख्या इतकी मोठी का आहे? प्राण्यांच्या जीवनाविषयीचा योग्य दृष्टिकोन कोणता आहे? मांसाहारातून जीवनाबद्दल अनादर व्यक्‍त होतो का? उत्पत्ति १:२९ येथील माहिती लक्षात घेता, मांसाहार करणे अयोग्य आहे का? पण त्याआधी, काहीजण मांसाहार का करीत नाहीत ते विचारात घ्या.

काहीजण मांस का वर्ज्य करतात?

सुजाताच्या नजरेत, तिच्या आहाराचा तिच्या धार्मिक समजुतींशी संबंध आहे. ती खुलासा करून सांगते, “मी हिंदू धर्मात लहानाची मोठी झाले, त्यामुळे अर्थातच पुनर्जन्माच्या सिद्धान्तावर माझा विश्‍वास आहे. मानवी जीव प्राण्याच्या रूपातही परत येऊ शकत असल्यामुळे, मी प्राण्यांना स्वतःसारखेच समजते. साहजिकच खाण्याच्या उद्देशाने त्यांची हत्या करणं अयोग्यच वाटतं.” इतर धर्म देखील शाकाहाराचा पुरस्कार करतात.

लोकांच्या आहारविषयक आवडीनिवडींवर केवळ धार्मिक समजुतींचाच प्रभाव असतो, असे नाही. उदाहरणार्थ, डॉ. नील बर्नार्ड स्पष्ट शब्दांत सांगतात: “लोक मांसाहार करतात, तो एकतर सवयीमुळे किंवा अज्ञानामुळे.” डॉ. बर्नार्ड यांचे ठाम मत, मांस खाण्यामुळे ओढवणाऱ्‍या आरोग्यविषयक धोक्यांवर आधारलेले आहे, उदाहरणार्थ हृदयविकार आणि कर्करोग.a

अमेरिकेत, जर कोणत्या विशिष्ट वयोगटात शाकाहाऱ्‍यांची संख्या झपाट्याने वाढत असेल तर ते म्हणजे किशोरवयीन. आणि यामागचे एक कारण म्हणजे प्राण्यांवरचे त्यांचे प्रेम. पीपल फॉर दि एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स या संघटनेच्या ट्रेसी रायमन म्हणतात त्याप्रमाणे “मुलांना प्राणी प्रिय असतात. खाद्य म्हणून उपयोगात आणण्यापूर्वी त्यांना किती निर्दय वागणूक दिली जाते हे मुलांना समजू लागते तेव्हा प्राण्यांसाठी त्यांचा जीव आणखीनच हळहळतो.”

तसेच, खाद्य म्हणून वापरण्याआधी पशुपालनावर किती मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने खर्च होतात, याचा पर्यावरणाविषयी डोळस दृष्टिकोन बाळगणारे कित्येक जण स्वतःच्या आहाराशी संबंध लावतात. उदाहरणार्थ, फक्‍त एक किलो बीफच्या उत्पादनासाठी ३,३०० लिटर आणि कोंबडीच्या प्रत्येकी एका किलोमागे ३,१०० लिटर पाणी खर्च होते. काहीजण या कारणामुळे मांसाहार करण्याचे टाळतात.

तुमच्याविषयी कसे? तुम्ही मांस खाण्याचे सोडून द्यावे का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याआधी, ही बाब एका वेगळ्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. स्तोत्र ५०:१०, ११ येथे आपण वाचतो त्याप्रमाणे सर्व गोष्टींचा निर्माता, यहोवा देव म्हणतो: “वनातील सर्व पशु, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानांतील प्राणी माझ्या लक्षात आहेत.” खरे तर सर्वच पशुपक्षी देवाच्या मालकीचे असल्यामुळे, प्राण्यांच्या जीवनाविषयी आणि त्यांचा खाद्य म्हणून उपयोग करण्याविषयी निर्माणकर्त्याचा कोणता दृष्टिकोन आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

प्राण्यांची हत्या करणे अयोग्य?

सुजातासारखेच, प्राण्यांना मनुष्यांच्या बरोबरीचे समजणाऱ्‍या इतर जणांच्या मतेही, प्राण्याची कोणत्याही उद्देशासाठी हत्या करणे हे अयोग्य आहे—आणि खाद्यासाठी त्यांची हत्या करणे तर आणखीनच आक्षेपार्ह आहे. तथापि, शास्त्रवचनांत सूचित केल्यानुसार देवाच्या नजरेत प्राण्यांच्या आणि मनुष्यांच्या जीवनात फरक आहे आणि काही उद्देशांसाठी प्राण्यांची हत्या करण्याला तो परवानगी देतो. उदाहरणार्थ इस्राएलमध्ये, एखाद्या प्राण्याकडून माणसाच्या जिवाला किंवा गुराढोरांना धोका असल्यास त्या प्राण्याला मारून टाकण्याची परवानगी होती.—निर्गम २१:२८, २९; १ शमुवेल १७:३४-३६.

अगदी पुरातन काळांपासून, उपासनेत प्राण्यांना बलिदान म्हणून अर्पण करण्यास देवाची स्वीकृती होती. (उत्पत्ति ४:२-५; ८:२०, २१) शिवाय, इजिप्तमधून सुटका झाल्यावर इस्राएल लोकांनी तेथून केलेल्या निर्गमनाच्या स्मरणार्थ दरवर्षी वल्हांडण सण पाळण्याचा आदेश देवाने त्यांना दिला; या सणात एखाद्या मेंढराचे किंवा बकऱ्‍याचे बलिदान करून त्याचे मांस खावयाचे होते. (निर्गम १२:३-९) आणि मोशेच्या नियमशास्त्राधीन आणखी काही प्रसंगी देखील प्राण्यांचे अर्पण केले जात असे.

पहिल्यांदा बायबल वाचणाऱ्‍या एक ७० वर्षीय हिंदू महिलेला प्राण्यांच्या बलिदानांच्या विचाराने कसेसेच झाले. परंतु, तिचे शास्त्रवचनांचे ज्ञान वाढत गेले तसतसे तिला समजू लागले की देवाने आज्ञापिलेल्या बलिदानांमागे एक उद्देश होता. पापांची क्षमा होण्यासाठी आवश्‍यक असणारी न्यायसंगत अट पूर्ण करण्यासाठी भविष्यात होणार असलेल्या येशू ख्रिस्ताच्या बलिदानाकडे, ही प्राण्यांची बलिदाने संकेत करीत होती. (इब्री लोकांस ८:३-५; १०:१-१०; १ योहान २:१, २) बहुधा या बलिदानांचा, याजकांच्या आणि काही वेळा भाविकांच्या खाद्यासाठी उपयोग होत असे. (लेवीय ७:११-२१; १९:५-८) प्रत्येक सजीव प्राणी ज्याच्या मालकीचा आहे, त्या देवाला विशिष्ट उद्देशासाठी अशाप्रकारची एक व्यवस्था सुरू करण्याचा हक्क होता. अर्थात, येशूचा मृत्यू झाल्यानंतर मात्र, उपासनेत प्राण्यांची बलिदाने देण्याची आवश्‍यकताच राहिली नाही.—कलस्सैकर २:१३-१७; इब्री लोकांस १०:१-१२.

खाद्यासाठी प्राण्यांचा उपयोग

तथापि, खाद्यासाठी प्राण्यांची हत्या करण्याविषयी काय? मुळात मानव हा शाकाहारीच होता हे अगदी खरे आहे. पण नंतर यहोवाने त्याच्या खाद्यपदार्थांत वाढ करून त्यांत प्राण्यांच्या मांसाचाही समावेश केला. सुमारे ४,००० वर्षांआधी—नीतिमान नोहाच्या काळात—यहोवाने एक जगव्याप्त जलप्रलय आणून त्याकाळी पृथ्वीवर अस्तित्वात असलेली दुष्टाई संपुष्टात आणली. नोहा, त्याचे कुटुंबीय आणि त्याने तारवात ज्या सजीव प्राण्यांना नेले होते ते या जलप्रलयातून जिवंत बचावले. ते तारवातून बाहेर पडले तेव्हा यहोवाने अगदी पहिल्यांदा असे म्हटले: “सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्‍न होतील; वनस्पति ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो.” (उत्पत्ति ९:३) पण त्याच वेळी देवाने त्यांना हा नियम दिला: “जो कोणी मनुष्याचा रक्‍तपात करील त्याचा रक्‍तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्‍न केला आहे.” (उत्पत्ति ९:६) देवाने प्राण्यांना मनुष्याचा दर्जा बहाल केला नाही हे अगदी स्पष्ट आहे.

प्राण्यांविषयी सुजाताचे ठाम मत वास्तविकतः पुनर्जन्माच्या सिद्धान्तावरील तिच्या विश्‍वासावर आधारलेले होते. याबाबतीत बायबल खुलासा करते की मनुष्य आणि प्राणी हे जरी जिवात्मे असले तरीसुद्धा जीव हा अमर नाही. (उत्पत्ति २:७; यहेज्केल १८:४, २०; प्रेषितांची कृत्ये ३:२३; प्रकटीकरण १६:३) जीव या नात्याने, मनुष्य आणि प्राणी देखील मरतात आणि त्यांचे अस्तित्व संपते. (उपदेशक ३:१९, २०) तथापि, मनुष्यांना मात्र देवाच्या नव्या जगात पुनरुत्थानाची अद्‌भुत आशा आहे.b (लूक २३:४३; प्रेषितांची कृत्ये २४:१५) यावरूनही दिसून येते, प्राणी हे मनुष्यांच्या बरोबरीचे नाहीत.

“ते काहीही असो, पण आहारात हा बदल कशासाठी?” सुजाताला जाणून घ्यायचे होते. जलप्रलयामुळे पृथ्वीच्या हवामानात नक्कीच कमालीचा बदल घडून आला होता. वनस्पतींचा तुटवडा असलेल्या प्रदेशांत राहणाऱ्‍यांच्या भावी गरजा लक्षात घेऊनच तर यहोवाने माणसाच्या आहारात मांसाचा समावेश केला नसेल, याविषयी बायबल काही सांगत नाही. पण सर्व जीवित वस्तूंच्या निर्मात्याला अशाप्रकारचा बदल घडवून आणण्याचा अधिकार होता हे सुजाताला पटले.

प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी आदर दाखवणे

तरीसुद्धा सुजाताने प्रश्‍न केला की ‘आपण प्राण्यांच्या जीवनाविषयी निदान थोडा तरी आदर दाखवायला नको का?’ हो, दाखवायलाच हवा. आणि सर्व वस्तूंच्या निर्मात्याने आपण हे कसे करावे याविषयी सांगितले आहे. प्रारंभ (उत्पत्ति) ९:४ (पं.र.भा.) येथे नमूद असलेल्या त्याच्या आदेशानुसार, “ज्यात त्याचे [प्राण्याचे] जीवन म्हणजे त्याचे रक्‍त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नका.” रक्‍ताचे सेवन करण्याविषयी असा हा निर्बंध का म्हणून? कारण बायबलनुसार, “शरीराचे जीवन तर रक्‍तात असते.” (लेवीय १७:१०, ११) यहोवाने एक आवश्‍यकता नेमून दिली आहे: ‘मारलेल्या पशूचे रक्‍त पाण्याप्रमाणे जमिनीवर टाकून द्यावे.’—अनुवाद १२:१६, २४.

पण मांस खाण्याच्या या तरतुदीमुळे, निव्वळ शिकारीची मौज चाखण्यासाठी किंवा स्वतःचे शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी उगीचच प्राण्याचे रक्‍त सांडण्याचा परवाना आपल्याला मिळत नाही. निम्रोदाने मात्र हीच चूक केली असे दिसते. बायबल त्याची, “परमेश्‍वरासमोर [“यहोवाच्या विरोधात,” NW] बलवान पारधी” या शब्दांत ओळख करून देते. (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ति १०:९) आज देखील, प्राण्यांची शिकार करण्याच्या आणि त्यांना ठार मारण्याच्या रोमांचात काहीजण सहज वाहवत जाऊ शकतात. पण अशाप्रकारची प्रवृत्ती प्राण्यांच्या जीवनाविषयी अनादर दाखवण्यापेक्षा काही वेगळी नाही, आणि देवाला अशी प्रवृत्ती पसंत नाही.c

प्राण्यांवर दया करणे

आधुनिक मांस उद्योगांत प्राण्यांना ज्या निर्दयतेने हाताळले जाते त्याविषयी देखील काही शाकाहारी लोकांना मनापासून काळजी वाटते. शाकाहार मार्गदर्शिका यात विवेचित केल्यानुसार, “कृषिउद्योगांत प्राण्यांच्या नैसर्गिक स्वभावाची फारशी दखल घेतली जात नाही.” या पुस्तकात पुढे असेही सांगितले आहे की, “भयानक गजबजपुऱ्‍यात आणि अनैसर्गिक वातावरणांत पालन केल्या जाणाऱ्‍या . . . या आधुनिक काळातल्या प्राण्यांचे पूर्वी कधीच झाले नसेल एवढ्या भयंकर प्रमाणावर शोषण होत आहे.”

खाद्यासाठी प्राण्यांचा उपयोग करणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध नसले तरीही, त्यांना निर्दय वागणूक देणे हे मात्र त्याच्या इच्छेविरुद्ध आहे. नीतिसूत्रे १२:१० येथे बायबल म्हणते त्यानुसार, “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो.” शिवाय, मोशेच्या नियमशास्त्रात पाळीव प्राण्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासंबंधी नियमांचाही समावेश होता.—निर्गम २३:४, ५; अनुवाद २२:१०; २५:४.

ख्रिस्ती व्यक्‍तीने शाकाहारी असणे आवश्‍यक?

येथपर्यंतच्या चर्चेतून स्पष्ट झाल्याप्रमाणे, शाकाहारी बनण्याचा—किंवा शाकाहारीच राहण्याचा प्रश्‍न—हा एक पूर्णपणे वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, परिस्थितिकी किंवा प्राण्यांविषयीच्या प्रेमामुळे कदाचित एखादी व्यक्‍ती शाकाहार पाळण्याचे ठरवेल. पण वेगवेगळ्या आहारपद्धतींपैकी शाकाहार ही केवळ एक पद्धती आहे याची जाणीव या व्यक्‍तीने ठेवावी. मांस खाण्याचे पसंत करणाऱ्‍यांची त्याने टीका करू नये, आणि जो मांस खातो त्याने शाकाहारी व्यक्‍तीच्या विरोधात बोलू नये हेही तितकेच खरे. मांस खाणे किंवा ते वर्ज्य करणे यावर काही माणसाचा चांगुलपणा अवलंबून नाही. (रोमकर १४:१-१७) तसेच, आहाराने मनुष्याच्या जीवनातील सर्वात प्रमुख स्थान घेता कामा नये. येशूने म्हटले, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.”—मत्तय ४:४.

प्राण्यांना दाखविण्यात येणारी क्रूरता आणि पृथ्वीच्या साधनांच्या गैरवापराचा विचार करता, यहोवाने या नीतिभ्रष्ट आणि लोभी व्यवस्थीकरणाचा नाश करून त्याऐवजी एक नवे जग अस्तित्वात आणण्याचे वचन दिले आहे. (स्तोत्र ३७:१०, ११; मत्तय ६:९, १०; २ पेत्र ३:१३) ते नवे जग आल्यावर मनुष्य आणि प्राणी यांमध्ये सर्वदा परस्पर शांती असेल, आणि यहोवा ‘आपली मूठ उघडून प्रत्येक प्राणिमात्राची इच्छा पुरी करील.’—स्तोत्र १४५:१६; यशया ६५:२५.

[तळटीपा]

a सावध राहा! जुलै ८, १९९७ अंकातील पृष्ठे ३-१३ पाहा.

b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित टेहळणी बुरूज मे १५, १९९७ अंकात पृष्ठे ३-८ पाहा.

c टेहळणी बुरूज मे १५, १९९० (इंग्रजी) अंकातील पृष्ठे ३०-१ पाहा.

[१८ पानांवरील चित्राचे श्रेय]

Punch

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा