परादीसकडे परतीचा प्रवास
परादीससाठी मनुष्याला असलेल्या उत्कंठेचा आणि त्याचे पुनर्निर्माण करण्याच्या त्याच्या लहानमोठ्या प्रयत्नांचा विचार केल्यावर कोणी म्हणेल की एव्हाना ही पृथ्वी एका नयनरम्य परादीसमध्ये रूपांतरीत झाली असावी. पण तसे घडलेले नाही.
उलटपक्षी, मानवजातीने आपल्या हव्यासाला प्राधान्य देऊन त्याच्या नियंत्रणाखाली पर्यावरण आणि निसर्गातील विविध प्रकारच्या सजीव वस्तूंवर आघात केला आहे. भौतिक धनसंपत्तीलाच प्राधान्य दिले जाईल याची जाणीव असल्यामुळे अनेकांना ही पृथ्वी कधी एदेन वाटिकेसारख्या परादीसमध्ये रूपांतरीत होईल अशी आशाच राहिलेली नाही. उलट परादीस पाहण्याची शेवटची आशा म्हणून ते स्वर्गात मृत्योपरांत जीवनाची आस धरतात. या दृष्टिकोनाचा मतितार्थ असा की, पहिले म्हणजे, एदेन पुन्हा मिळण्याची आपली उत्कंठा कायमची निष्फळ ठरेल आणि दुसरे म्हणजे, देव या ग्रहाला मानवाचा अविचारीपणा आणि हव्यास यांच्या स्वाधीन करून मोकळा झाला आहे. हे खरे आहे का? भवितव्यात नेमके काय राखून ठेवले आहे? आणि ते भवितव्य आपल्याला कोठे लाभेल?
परादीस—स्वर्गात की पृथ्वीवर?
जवळजवळ २,००० वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने आपल्या शेजारच्या वधस्तंभावर खिळलेल्या एका पश्चात्तापी चोराशी बोलताना म्हटले: “आज मी तुला खरे सांगतो, तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.” (लूक २३:४३, NW) येशूच्या बोलण्याचा अर्थ, तो चोर त्याच्यासोबत स्वर्गात जाईल असा होता का? नाही.
त्या अपराध्याने तसा विचारही केला नसेल. का बरे? कारण त्याच्या काळात अस्तित्वात असलेल्या इब्री शास्त्रवचनातील उताऱ्यांशी तो कदाचित परिचित असावा, उदाहरणादाखल स्तोत्र ३७:२९ या वचनाचा सुरवातीचा भाग असा आहे: “नीतिमान् पृथ्वीचे वतन पावतील.” येशूने हेच सत्य शिकवले, तो म्हणाला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ५:५) सहसा जिला प्रभूची प्रार्थना म्हणतात त्या प्रार्थनेचा या वचनाशी मेळ आहे; त्यात असे म्हटले आहे: “जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो.”—मत्तय ६:९, १०.
बायबल शिकवते त्यानुसार देवाने मानवी कुटुंबाच्या वास्तव्यासाठी पृथ्वीची निर्मिती केली, स्वर्गाची नव्हे. त्याचे वचन सांगते की, त्याने पृथ्वी “निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) किती काळापर्यंत? “तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीहि ढळणार नाही.” (स्तोत्र १०४:५) होय, “पृथ्वीच कायती सदा कायम राहते.”—उपदेशक १:४.
आपली सेवा करणाऱ्या बहुतांसाठी देवाने असे उद्देशिले आहे की त्यांनी पृथ्वीवर सदासर्वदा वास्तव्य करावे. याविषयी देवाचे वचन, बायबल काय म्हणते ते पाहा. स्तोत्र ३७:११ भाकीत करते: “पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.” किती काळापर्यंत? स्तोत्र ३७:२९ सांगते: “नीतिमान् पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (तिरपे वळण आमचे.) त्यावेळी, “तू [देव] आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा” अर्थात, देवाच्या इच्छेच्या एकवाक्यतेत असणारी मनोकामना, “पुरी करितोस,” असे घोषित करणाऱ्या वचनाची पूर्तता होईल.—स्तोत्र १४५:१६.
ज्यांना देवाच्या इच्छेनुसार चालण्याची अजिबातच इच्छा नाही अशांबद्दल काय? नीतिसूत्रे २:२१, २२ स्पष्ट सांगते: “कारण सरळ जनच देशात [पृथ्वीवर] वस्ती करितील; सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून [पृथ्वीवरून] उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”
पुनर्स्थापित परादीस
आता लवकरच, या दुष्ट जगाविरुद्ध देवाचे न्यायदंड अंमलात आणले जातील. (मत्तय २४:३-१४; २ तीमथ्य ३:१-५, १३) पण, देव त्या येणाऱ्या विनाशातून ‘एका मोठ्या समुदायाचा’ बचाव करून आपण निर्मिलेल्या नव्या जगात त्यांचा प्रवेश करवील.—प्रकटीकरण ७:९-१७.
यानंतर, देवाचे मानवी प्रजाजन, त्याच्या निर्देशनानुसार, सबंध पृथ्वीचे रूपांतर करून तिला मानवजातीसाठी एक परादीसमय निवासस्थान बनवण्याची आनंददायक कामगिरी पार पाडतील. बायबल आश्वासन देते: “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. . . . कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.”—यशया ३५:१, ६.
त्या विस्तारत जाणाऱ्या परादीसमध्ये त्यानंतर कधीही उपासमार, दारिद्र्य, गलिच्छ वस्त्या, उघड्यावर राहणारे लोक किंवा गुन्हेगाऱ्यांची साम्राज्ये आढळणार नाहीत. ‘भूमीत भरपूर पीक येईल.’ (स्तोत्र ७२:१६) “मळ्यांतील झाडे फलद्रूप होतील, भूमि आपला उपज देईल.” (यहेज्केल ३४:२७) “ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील आणि त्यांत दुसरे राहतील, ते लावणी करितील आणि फळ दुसरे खातील, असे व्हावयाचे नाही.” (यशया ६५:२१, २२) “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.
काहींचे स्वर्गात जाण्याचे कारण
पुष्कळ जण कदाचित कबूल करतील की त्यांना पृथ्वीवरील परादीसची उत्कंठा आहे. हे स्वाभाविक आहे कारण देवाने स्वर्गाबद्दलची ओढ त्यांच्या मनात घातलीच नाही; त्यांना तर स्वर्गातले जीवन कसे असेल याची कल्पना देखील करता येत नाही. पॅटचेच उदाहरण घ्या; ती एक प्रांजळ चर्च सदस्य असली तरीही, चर्च ऑफ इंग्लंडच्या एका पाळकाशी बोलताना, ती म्हणाली: “स्वर्गात वगैरे जाण्याचे विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. मला जायचंही नाहीय, नाहीतरी तिथं जाऊन मी करणार काय?”—पडताळा स्तोत्र ११५:१६.
मानवांपैकी एका मर्यादित संख्येचे, म्हणजे १,४४,००० लोक स्वर्गात जातात असे बायबल शिकवते, हे खरे आहे. (प्रकटीकरण १४:१, ४) याचे कारणही त्यात स्पष्ट केलेले आहे: “आमच्या ‘देवासाठी’ त्यास ‘राजे’ व ‘याजक’ असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (तिरपे वळण आमचे.) (प्रकटीकरण ५:९, १०) त्यांचा राजा, येशू ख्रिस्त याच्यासह ते ‘राज्याचे,’ अर्थात पृथ्वीच्या त्या नवीन स्वर्गीय सरकाराचे भाग आहेत ज्यासाठी ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात. या सरकारच्या देखरेखीखाली पृथ्वी आणि मानवजातीचे पूर्णार्थाने पुनर्वसन होईल.—दानीएल २:४४; २ पेत्र ३:१३.
तथापि, स्वर्गात राहण्याची मानवांत स्वाभाविकतःच इच्छा नसल्यामुळे, देवाचा आत्मा विलक्षणरित्या कार्य करून या १,४४,००० लोकांना “साक्ष देतो,” जेणेकरून त्यांना या ‘वरील पाचारणाची’ जाणीव होते. (रोमकर ८:१६, १७; फिलिप्पैकर ३:१४) तथापि, सर्वसाधारण मानवांसाठी पवित्र आत्म्याचे अशा प्रकारचे कार्य साहजिकच जरूरीचे नाही, कारण त्यांचे कायमचे वास्तव्य एका परादीस पृथ्वीवर असणार आहे.
आध्यात्मिक परादीसकरवी पूर्वतयारी
एखादी व्यक्ती पृथ्वीवरील परादीसमध्ये कायम जिवंत राहण्यासाठी कशाप्रकारे पात्र ठरू शकते? येशूने म्हटले, “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताचे त्यांनी ज्ञान घ्यावे.” (योहान १७:३, NW) शांतीपूर्ण मानवी नातेसंबंध आणि देवाचे ज्ञान यांमधील संबंधाविषयी सांगताना यशया ११:९ म्हणते: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.”—पडताळा यशया ४८:१८.
हे ज्ञान म्हणजे, अर्थातच, केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. या ज्ञानाचा व्यक्तीच्या सबंध व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो आणि त्यामुळे “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” यांसारख्या ईश्वरी गुणांना वाव मिळतो. (गलतीकर ५:२२, २३) यहोवाचे साक्षीदार या गुणांचा विकास करण्यासाठी झटतात आणि त्यामुळे आजही, त्यांना एक आध्यात्मिक परादीस लाभले आहे.—यशया ६५:१३, १४.
अधर्म आणि नीतिभ्रष्टतेत दिवसानुदिवस बुडत जाणाऱ्या जगाशी तुलना केल्यास त्यांची आध्यात्मिक स्थिती किती वेगळी आहे! तथापि, लवकरच देव या दुष्ट जगाचा नाश करील. त्यादरम्यान, यहोवाचे साक्षीदार त्यांना लाभलेले आध्यात्मिक परादीस पाहण्याचे—होय, त्याचे परीक्षण करण्याचे तुम्हाला निमंत्रण देतात. अदृश्य स्वर्गीय राजा येशू, पृथ्वीवरील परादीस आणि सार्वकालिक जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद मार्गावरून त्या नव्या जगाच्या भावी रहिवाशांना कसा शांतीने नेत आहे याची स्वतःच प्रचिती करून घ्या!—मत्तय ७:१३, १४; प्रकटीकरण ७:१७; २१:३, ४.
[८ पानांवरील चित्र]
या जगाच्या अंतातून बचावणारे, पृथ्वीचे रूपांतर करून तिला एक परादीस बनवण्याच्या कामात आनंदाने सहभाग घेतील