काही प्रसिद्ध उद्यानांवर दृष्टिक्षेप
सध्याच्या टर्कीमधील वॅन सरोवराजवळ असलेल्या एदेन नावाच्या प्रदेशातील एका बागेत मनुष्याला परादीसचा पहिल्यांदा साक्षात्कार घडला. आदाम व हव्वा यांना या बागेची “मशागत व राखण” करावयाची होती; चार फाटे असलेल्या एका नदीतून त्यांच्या या बागेला जलपुरवठा मिळत असे. ‘दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशा सर्व जातीच्या झाडांनी’ बहरलेल्या बागेची देखरेख करण्यात किती विलक्षण आनंद मिळत असावा!—उत्पत्ति २:८-१५.
एदेन हे एक आदर्श निवासस्थान होते. आदाम, हव्वा आणि त्यांच्या वंशजांवर या बागेचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती; अर्थात देवाच्या अप्रतिम अशा मूळ नमुन्याच्या आधारावरच त्यांना असे करायचे होते. कालांतराने, सबंध पृथ्वी एक परादीस बनून, सर्वांना सोयीस्कर इतक्या प्रमाणावर ती माणसांनी भरली असती. तथापि, आपल्या पहिल्या पालकांनी जाणूनबुजून आज्ञाभंग केल्यामुळे त्यांना या अभयारण्यातून हाकलण्यात आले. दुःखाने म्हणावे लागते की, मानवी कुटुंबातील बाकीचे सर्वजण एदेन येथील निवासस्थानाबाहेरच जन्मास आले.
तरीसुद्धा, निर्माणकर्त्याने मानवजातीची रचना परादीसमध्ये राहण्याच्या उद्देशानेच केली होती. हे लक्षात घेता, भावी पिढ्यांनी स्वतःभोवती त्या परादीससारखीच उद्याने निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, यात काही नवल नव्हते.
पुरातन उद्याने
बॅबिलोनच्या हँगिंग गार्डन्सना प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी एक असण्याची ख्याती प्राप्त झाली. नबुखद्नेस्सर राजाच्या मेदी राणीला सतत तिच्या माहेरच्या देशांतल्या अरण्यांची आणि डोंगरांची आठवण सतावत असल्यामुळे आजपासून २,५०० वर्षांपूर्वी, त्याने तिच्यासाठी ही उद्याने निर्माण केली. या २२ मीटर उंचीच्या उतरत्या उद्यानात दाट हिरव्यागार वृक्षवल्लींनी आच्छादलेल्या उंच कमानी होत्या; शिवाय, मोठमोठाली वृक्षे वाढू शकतील अशी मुबलक जमीनही येथे होती. या एदेनसारख्या परिसराच्या पायऱ्यांवरून फिरताना माहेरच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या या राणीला कदाचित तिचे जगणे थोडेसे सुसह्य झाल्यासारखे वाटत असावे.
इजिप्तच्या सुपीक नाईल खोऱ्यात उद्यान वास्तूकला प्रचलित होती. द ऑक्सफर्ड कम्पॅनियन टू गार्डन्स यातील माहितीनुसार, “उद्यानांची सर्वात पुरातन चित्रे इजिप्तमध्ये गवसतात आणि हे एकमेव असे स्थान आहे जेथे उद्याननिर्मितीची . . . फारच जुनी परंपरा आढळते.” स्थूलमानाने सा.यु.पू. १४०० च्या कालखंडातील थेबीस येथील एका ईजिप्शियन अधिकाऱ्याच्या उद्यानाच्या वास्तूकला नमुन्यात पाण्याचे पाट, दोन्ही बाजुला वृक्षांच्या रांगा असलेले रस्ते आणि मंडप पाहायला मिळतात. शाही उद्यानांच्या पाठोपाठ वृक्ष, फुलझाडे, आणि हिरव्यागार झुडपांनी नटलेल्या मंदिर उद्यानांचेही आगळेच सौंदर्य होते; या उद्यानांतील कमळांनी सुशोभित केलेल्या उथळ जलाशयांत आणि तलावांत पाणकोंबड्यांची आणि माशांची रेलचेल होती आणि यांतून काढलेल्या पाटांतून वाहणाऱ्या पाण्याने वृक्षवल्लींचे सिंचन होत असे.—पडताळा निर्गम ७:१९.
उद्याननिर्मितीच्या क्षेत्रात पर्शियन लोकांनी देखील आपले स्थान कायम केले. पर्शिया आणि इजिप्त येथील उद्याने अत्यंत रमणीय होती; यामुळेच, थोर सिकंदरचे विजयशाली सैन्य सा.यु.पू. चौथ्या शतकात ग्रीसला परतले तेव्हा त्यांनी येताना आपल्यासोबत भरपूर बी बियाणे, रोपटी आणि नवनवीन कल्पनांची जणू लूटच आणली. अथेन्समध्ये, ॲरिस्टॉटल आणि त्याचा शिष्य थियोफ्रॅस्टस यांनी अनेकविध प्रकारच्या वनस्पतिसमूहांचा संग्रह करून या वनस्पतींचा अभ्यास आणि वर्गीकरण करण्यासाठी शास्त्रीय उद्यान तयार केले. पूर्वीच्या ईजिप्शियन आणि पर्शियन लोकांप्रमाणेच अनेक धनाढ्य ग्रीकांच्या खाजगी मालकीची राजसी उद्याने होती.
शहरांत राहणाऱ्या रोमन लोकांनी शहराच्या जेमतेम जागेत घर आणि बगिच्याचे सोयीस्कर संयोजन केले. श्रीमंतांनी आपल्या गावाकडील बंगल्यांभोवती प्रेक्षणीय उद्याने केली. जुलमी निरो राजाला देखील स्वतःचे एदेन हवे होते, म्हणून त्याने निर्दयीपणे हजारो लोकांना हुसकावून लावले, त्यांची घरे उद्ध्वस्त केली आणि त्याठिकाणी आपल्या राजवाड्याभोवतीच्या १२५ एकर जमिनीवर एक खाजगी उपवन उभारले. यानंतर, रोमन स्थलशिल्पकारातील एक अभूतपूर्व निर्मिती म्हणजे सुमारे १३८ सा.यु. च्या दरम्यान हॅड्रियन सम्राटाचे तिवली येथील उद्यानगृह. या उद्यानगृहाभोवती ६०० एकरपर्यंत पसरलेल्या वाटिका, सरोवरे, तलाव आणि कारंजे होते.
जुन्या काळातील इस्राएलातही उपवने आणि उद्याने होती. यहुदी इतिहासकार जोसीफस, जेरुसलेमपासून सुमारे १३ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या ईटॅम नावाच्या ठिकाणी असंख्य झरे असलेल्या आल्हाददायक बगिच्यांचे वर्णन करतो. बायबलप्रमाणे शलमोनाने ज्या ‘बागा, वने आणि तलाव आपल्यासाठी करविले,’ त्यात कदाचित ईटॅमच्या उद्यानांचाही समावेश असावा. (उपदेशक २:५, ६) जेरुसलेमपासून अगदीच थोड्या अंतरावरील जैतुनांच्या डोंगरावर गेथशेमानेची बाग होती; या बागेला येशू ख्रिस्तामुळे ख्याती प्राप्त झाली. गलबल्यापासून दूर आपल्या शिष्यांना शांतपणे शिकवण्यासाठी येशू येथे आश्रय घेत असे.—मत्तय २६:३६; योहान १८:१, २.
अरबी उद्यानांपासून इंग्रजांच्या उद्यानांपर्यंत
सा.यु. सातव्या शतकात अरब सैन्य पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे पांगले तेव्हा सिकंदरला पाहायला मिळाली तशी त्यांना देखील पर्शियाची उद्याने पाहायला मिळाली. (पडताळा एस्तेर १:५.) हॉवर्ड लॉक्सटन यांनी लिहिल्यानुसार, “अरबांना पर्शियन उद्याने पाहून, वफादारांना परादीस मिळण्याविषयीची कुराणात जी प्रतिज्ञा देण्यात आली होती त्या परादीसची आठवण झाली.” मूरांची चलती होती तेव्हाच्या स्पेनपासून काश्मीरपर्यंत, पर्शियन संकल्पनेवर आधारित असलेल्या नमुनेदार अरबी उद्यानांत मधोमध एक उथळ जलाशय किंवा कारंजे आढळते, ज्यात उद्यानाला चार भागांत विभाजित करणाऱ्या चार पाण्याच्या प्रवाहांचा संगम होतो; ही रचना एदेन वाटिकेतील चार नद्यांचे स्मरण देते.
उत्तर भारतात, काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यातील दल सरोवराशेजारी १७ व्या शतकातील मोगल बादशहांनी परादीसशी तुलना करता येईल अशी ७०० पेक्षा अधिक उद्याने निर्मिली. येथे डोळे दिपवून टाकणारी असंख्य रंगांची उधळण व ठिकठिकाणी विखुरलेले शेकडो कारंजे, पायऱ्या आणि धबधबे होते. ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहानने दल सरोवराच्या काठावर जो काळ्या संगमरवराचा मंडप उभारला त्यावर आजही हा शिलालेख आढळतो: “पृथ्वीवर जर कुठे परादीस असेल, तर ते इथेच आहे, इथेच आहे, इथेच आहे.”
काही शतकांपूर्वी, युरोपने मध्य युगांतून बाहेर पडून १४ व्या शतकातील प्रबोधन काळात प्रवेश केला होता. सा.यु. पाचव्या शतकात मध्य युगांचा प्रारंभ झाला तेव्हा रोमच्या उद्याननिर्मितीच्या परंपरेला उतरती कळा लागली होती पण आता ती पुन्हा बहरू लागली—मात्र या वेळेस चर्चच्या साम्राज्याच्या अधीन. ख्रिस्ती धर्मजगताच्या लेखी, उद्यान म्हणजे ‘तात्पुरते परादीस’ होते. नवव्या शतकातील एका मठाच्या योजनेत दोन उद्याने आढळतात ज्यांना “परादीस” असे नाव देण्यात आले होते. ख्रिस्ती धर्मजगताची उद्याने पाहता पाहता आणखीन विस्तीर्ण आणि शानदार बनली, पण आध्यात्मिक आदर्शांचा पुरस्कार करण्याऐवजी यांपैकी बव्हंशी उद्याने सत्ता आणि संपत्तीची प्रतीके बनली.
फ्रान्सच्या आठव्या चार्ल्सने १४९५ साली इटलीचे नेपल्स शहर हस्तगत केल्यावर आपल्या घरच्यांना पत्र लिहिले: “या शहरात मला मिळालेल्या विलक्षण सुंदर उद्यानांची तुम्हाला कल्पनाही करता यायची नाही . . . पृथ्वीवरील या परादीसमध्ये जणू आदाम व हव्वा यांचीच तेवढी उणीव आहे.” परंतु चार्ल्स १७ व्या शतकापर्यंत जिवंत राहिला असता तर तो फ्रान्समध्ये म्हणजे स्वतःच्या मायभूमीवर, चौदाव्या लूई राजाने उभारलेली विस्तृत उद्याने आपल्या डोळ्यांनी पाहू शकला असता. उद्यान (इंग्रजी) या पुस्तकाचा असा दावा आहे की पॅलेस ऑफ व्हर्साय येथील उद्याने, “आजही जगातली सर्वात मोठी आणि सर्वात अप्रतिम आहेत असे निर्विवादपणे म्हणता येईल.”
तथापि, प्रबोधन काळात परादीसला एक नवीन अर्थ लाभला: निसर्ग हा ज्ञानवान मनुष्याच्या वर्चस्वाखाली असावा, मनुष्याने निसर्गातील बेतालपणा नाहीसा करून त्यात सुसंबद्धता आणावी. वृक्ष आणि फुलांच्या ताटव्यांची चपखल भौमितिक आकृत्या वापरून मांडणी करण्यात आली. अशाप्रकारे, सुरवातीच्या रोमन टोप्यरीला, अर्थात, झाडाझुडपांना कापून त्यांना विशिष्ट आकारात वळवण्याच्या कलेला व्यापक प्रमाणावर नवजीवन प्राप्त झाले.
यानंतर, १८ व्या आणि १९ व्या शतकात समुद्री संशोधन व व्यापारांमुळे पाश्चात्त्य जगाला नवनवीन वनस्पतींचा आणि उद्यान संवर्धनासंबंधी कल्पनांचा परिचय घडला. इंग्लंडमध्ये उद्याननिर्मितीला महत्त्व प्राप्त होऊ लागले. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिकाच्या शब्दांत, “१८ व्या शतकातील इंग्लंडमध्ये, मनुष्य आपल्या सभोवतीच्या नैसर्गिक जगाविषयी अतिशय संवेदनशील बनला. निसर्गावर कृत्रिम भौमितिक सुसंबद्धता लादण्याऐवजी तो स्वतःचे जीवन निसर्गाच्या अनुरूप जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागला.” उद्यान स्थलशिल्पाच्या क्षेत्रात विल्यम केंट आणि लँस्लट ब्राऊन यांनी अत्युत्कृष्ट कामगिरी बजावली. ब्राऊन यांनी इंग्लंडमध्ये दोनशेहून अधिक इस्टेटींवर उद्यानांची रचना केली. कालांतराने, संयुक्त संस्थानांचे राष्ट्रपती बनलेल्या थॉमस जेफ्फरसन आणि जॉन ॲडम्स या दोघांनी, १७८६ साली इंग्रजांच्या उद्यानांचा अभ्यास करण्याकरता इंग्लंडचा दौरा केला.
पौर्वात्य स्थलशिल्पे
इजिप्त, ग्रीस आणि रोम या देशांच्या उद्याननिर्मिती परंपरेचा जसा पाश्चात्त्य संस्कृतींवर पगडा आहे तसाच चीनच्या उद्याननिर्मिती परंपरेचा पौर्वात्य संस्कृतींवर मोठा पगडा आहे. चिनी लोक सुरवातीला एका जडप्राणवादी धर्माचे अनुयायी होते, ज्यात नद्या, खडक आणि डोंगर या सर्व जडवस्तूंत आत्मे आहेत अशी त्यांची समजूत होती आणि या कारणाने त्यांना महत्त्व द्यायचे होते. कालांतराने या देशांत ताओवाद, कन्फुशियनवाद आणि बौद्ध धर्माची लाट आली आणि त्यांच्या प्रभावातून उद्यानांनी नवीनच रूपे धारण केली.
जपानी समुद्राच्या पैलतीरी, जपानी उद्यानांची एक आगळीच शैली होती; येथे रंगछटेपेक्षा आकाराला जास्त महत्त्व असून प्रत्येक वस्तूला विशिष्ट स्थान असते. जेमतेम जागेत निसर्गाचे सौंदर्य आणि त्यातील वैविध्य जतन करण्याच्या उद्देशाने या उद्यानांचा रचनाकार मोठ्या शिताफीने खडकांची मांडणी करतो, तसेच तो बगिच्यातील झाडेझुडपे लावताना आणि त्यांना वळण देताना बारकाव्यांकडे लक्ष देतो. याचे एक उदाहरण म्हणजे बॉनसाई (म्हणजे “कुंड्यांतील झाड”) ही कला; यामध्ये एखादा लहानसा वृक्ष किंवा एक लघु अरण्य-वाटिका विशिष्ट आकारात आणि प्रमाणात वाढवतात.
पौर्वात्य उद्यानाची शैली पाश्चात्त्य उद्यानापेक्षा वेगळी असली तरीसुद्धा यातूनही परादीसविषयीची ओढ व्यक्त होते. उदाहरणार्थ, जपानी उद्यानांचे इतिहासकार वीबे काउटर्ट यांनी असे लिहिले, की जपानमध्ये हेआन काळात (७९४-११८५) बागवानांनी ‘पृथ्वीवरच्या परादीससारख्या’ वातावरणाचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
विश्वव्यापी आकर्षण
“नैसर्गिक” उद्यानांत, अर्थात जंगल, अरण्ये आणि गवताळ प्रदेशांत राहात असलेल्या शिकार आणि खाद्यसंकलन करणाऱ्या जमातींनाच नव्हे—तर विश्वव्यापी प्रमाणावर, सर्वांनाच उद्यानांविषयीचे आकर्षण असल्याचे दिसून येते. ब्रिटॅनिकाच्या शब्दांत, “कब्जा मिळवणाऱ्यांनी मेक्सिकोतील ॲझटेक लोकांच्या आणि पेरूमधील इन्कास लोकांच्या, डोंगरांवरील उतरत्या पायऱ्या, अरण्यवाटिका, कारंजी आणि अलंकारिक जलसरोवरे यांनी सुशोभित केलेल्या भव्यदिव्य उद्यानांविषयी सांगितले . . . त्याच कालखंडातील पाश्चात्त्य उद्यानांपेक्षा ही फारशी वेगळी नव्हती.”
खरोखर, नाइलच्या काठी असलेल्या प्राचीन अरण्यवाटिका, पौर्वात्य स्थलशिल्पे, आधुनिक शहरांतील उद्याने आणि शास्त्रीय उद्याने—काय दाखवून देतात? मानवाला वाटणारी परादीसची ओढ. मानवजातीला ही “परादीसविषयी जी हुरहूर” नेहमीच जाणवली आहे त्यासंबंधी सांगताना लेखक टेरी कॉमीटो यांनी म्हटले: “उद्यान म्हणजे असे ठिकाण आहे जिथे माणसाला स्वतःच्या घरी असल्याचा भास होतो.” आणि ‘माझे घर एदेन वाटिकेसारखे सुंदर आहे’ असे म्हणताना कोणत्या मनुष्याला आनंद होणार नाही? तथापि, संपूर्ण पृथ्वी एदेनसारखी—आणि त्यातल्या त्यात ज्याचे सुख केवळ श्रीमंतच नव्हे तर सर्वजण उपभोगू शकतील अशा उद्यानासारखी होईल, हे निव्वळ स्वप्न आहे का? की ही भविष्यात होऊ घातलेली निश्चित गोष्ट आहे?
[७ पानांवरील चित्र]
बॅबिलोनच्या हँगिंग गार्डन्सचे एका कलाकाराचे कल्पनाचित्र
[७ पानांवरील चित्र]
जपानमधील पारंपरिक उद्यान
[७ पानांवरील चित्र]
व्हर्साय, फ्रान्स
सबंध इतिहासात मनुष्याला परादीसविषयी ओढ जाणवली आहे
[चित्राचे श्रेय]
French Government Tourist Office/Rosine Mazin