उद्यानाविषयी आपल्याला वाटणारी ओढ
गलबला आणि जीवनातल्या धकाधकीपासून सुटका मिळवण्यासाठी एखाद्या मनोरम उद्यानातील नीरव शांतता तुम्हाला हवीहवीशी वाटते का? घरच्यांसोबत सहलीला जायचे असल्यास किंवा एखाद्या मित्र अथवा मैत्रिणीबरोबर फेरफटका मारायचा असल्यास आणखी कुठे जाण्यापेक्षा, दाट हिरवळ, निरनिराळी फुलं, गर्द सावली देणारी वृक्षे तसेच लहानसे तलाव असलेल्या बागबगिच्यांतील प्रशांत वातावरणातच जाणे तुम्ही अधिक पसंत करता का? खरंच, बागेतलं वातावरण किती रमणीय, चेतनादायी, प्रशांत आणि रोगनिवारक असतं!
कदाचित वेळेअभावी, काहीजण बागबगिचा लावण्याच्या भानगडीत पडू इच्छित नसले तरीसुद्धा, बागेतल्या बहुविध रंगछटा, सुवास, ध्वनी आणि रसाळ फळांचा मोह सहसा कुणालाही आवरत नाही हे मात्र तितकेच खरे. वास्तूशिल्पकार, वैज्ञानिक, वकील, शोधक आणि अमेरिकेचे राष्ट्रपती—थॉमस जेफ्फरसन यांना बागबगिच्यांबद्दल विशेष प्रेम होते. त्यांनी लिहिले: “जमिनीची मशागत करताना मिळणारा आनंद मला आणखी कुठल्याच कामात मिळत नाही . . . मी आजही बागकामाचा भोक्ता आहे. म्हातारा माणूस असलो तरीही मी अगदी तरुण बागवान आहे.”
आजही, अनेकजण त्यांच्या मताचे आहेत. जगातील सुप्रसिद्ध उद्याने, उदाहरणार्थ इंग्लंडमधील क्यू गार्डन्स (रॉयल बोटॅनिकल गार्डन्स); क्योटो, जपान येथील बगिचे; फ्रान्समधील पॅलेस ऑफ व्हर्साय सभोवती असणारी उद्याने; अमेरिकेतील पेन्सिल्व्हानिया येथे असणारी लाँगवुड गार्डन्स इत्यादी पाहण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी पर्यटक गर्दी करतात. अनेक देशांतील शहरांचे विशिष्ट भाग असे असतात जेथे रस्त्यांच्या कडेकडेने हिरव्यागार वृक्षांच्या रांगा असतात, आणि त्यांच्याशेजारी वसलेल्या टुमदार घरांभोवती वृक्षवल्ली आणि हजारो फुलांच्या रंगाची उधळण असते—जणू लहानसा रम्य परिसरच.
बागबगिचे आरोग्यवर्धक असतात
फक्त आपल्या खिडकीतून बाहेरची फुलं, झाडंझुडपं, पाखरं पाहण्याइतकंच का होईना, पण निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने मनुष्याचे आरोग्य अधिक चांगले राहते असे पाहण्यात आले आहे. या कल्पनेनेच न्यूयॉर्क शहरातील एका इस्पितळाने त्यांच्या इमारतीच्या छतावर एक बाग फुलवली. या इस्पितळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सर्वांनी याचे मोठ्या आनंदोत्साहाने स्वागत केले. या बागेने रुग्ण आणि कर्मचारी दोघांचेही मनोबल वाढवलेय. . . . या बागेपासून भविष्यातही अनेक रोगनिवारक फायदे होण्याच्या संभावना आम्हाला दिसताहेत.” अभ्यासांतून तर असेही दिसून आले आहे की आपल्या ज्ञानेंद्रियांकरवी, निसर्गाची अनुभूती घेतल्यामुळे मनुष्याला शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक लाभ होतो.
शिवाय, आध्यात्मिक प्रवृत्तीच्या माणसाला देवाच्या निर्मितीच्या सान्निध्यात असताना जणू देवाच्याच समीप असल्यासारखे वाटेल. याचा संबंध या पृथ्वीवरील पहिल्यावहिल्या बागेशी आहे—एदेन बागेशी जेथे देव पहिल्यांदा मनुष्याशी बोलला.—उत्पत्ति २:१५-१७; ३:८.
बागबगिच्यांची ओढ सर्वव्यापक आहे. आणि जसे आपण पाहणारच आहोत, ही बाब अर्थसूचक आहे. तथापि, त्यात जाण्याआधी चला आपण इतिहासातील काही बागबगिच्यांतून “फेरफटका” मारू आणि पाहू की सर्व लोकांना परादीसची खरोखर किती मनःपूर्वक उत्कंठा आहे.