वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. २२-२५
  • भरतीची वर्दळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • भरतीची वर्दळ
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नदीमुखाच्या खाड्यांचे महत्त्व
  • उधानाची भरती
  • भरतीची वेळ
  • घाई सुरू होते
  • थांबण्याचे ठिकाण
  • स्थलांतराच्या रहस्यांचा छडा लावणे
    सावध राहा!—१९९५
  • वास्को द गामा नावाचा स्मारक पूल
    सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. २२-२५

भरतीची वर्दळ

ब्रिटनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

दरवर्षी, एक कोटी पक्षी वायव्य युरोपमध्ये हिवाळा काढतात. ते केवळ आर्क्टिकच्या आपल्या विणीच्या ठिकाणाहूनच नव्हे तर कॅनडा आणि मध्य सायबेरिया इतक्या दूरूनही येतात. आफ्रिकेला जाण्याच्या वाटेत, पुष्कळ पक्षी पूर्व अटलांटिक मार्गावर भेटतात; हा ब्रिटिश बेटांपलीकडला प्रवासी मार्ग आहे.

ब्रिटिश समुद्रांमध्ये ३० पेक्षा अधिक नदीमुखाच्या खाड्या अन्‍न आणि संरक्षण पुरवतात. प्रत्येक नदीमुखाच्या खाडीत २०,००० पेक्षा अधिक पक्षी असतात, परंतु इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्‍यावर असलेले वॉश हे ठिकाण सर्वात महत्त्वपूर्ण आहे; तिथं २.५ लाख पेक्षा अधिक पक्षी येतात—कर्ल्यू, डनलिन, गॉडविट, नॉट, ऑयस्टरकॅचर, प्लव्हर, रेडशँक आणि टर्नस्टोन हे सर्व पक्षीसुद्धा तिथं येतात. नदीमुखाच्या खाड्या कोणतं अन्‍न पुरवतात आणि त्या इतक्या महत्त्वपूर्ण का आहेत?

नदीमुखाच्या खाड्यांचे महत्त्व

नदीमुखाच्या खाड्या, अर्धवट झाकलेल्या किनारपट्ट्या असतात जिथं समुद्राचं पाणी गोड्या पाण्यात मिसळतं. इथलं उष्ण पाणी खनिज त्याचप्रमाणे जैव पोषकांनी समृद्ध असल्यामुळं जगातील निम्म्या सागरी जीवनाचं इथं पालनपोषण होतं. कोळंबी, सँड हॉपर्स आणि इतर प्रकारचे जीव वाळूत सापडतात, पण नदीमुखाच्या खाडीतल्या वाळूत त्याहीपेक्षा जास्त अन्‍न असतं.

गाळातून निर्माण होणाऱ्‍या मातीचा प्रकार गाळाच्या आकारावर अवलंबून असतो. मातीच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारात विशिष्ट सागरी प्राणी असतात; हेच पाणपक्ष्यांचंa अन्‍न होय. उदाहरणार्थ, एका प्रकारच्या मातीच्या एक चौरस मीटरमध्ये तीन मिलिमीटरपेक्षा कमी लांबीच्या लाखोलाख बारीक गोगलगाई असतात! शिवाय, या मातीत मॉलस्क, लगवर्म आणि रॅगवर्म तर असतातच आणि इतर अपृष्ठवंशीय प्राण्यांविषयी तर विचारायलाच नको.

उधानाची भरती

नदीमुखाच्या खाडीत हजारो पाणपक्षी असले, तरीही त्यांना शोधणं महाकठीण असतं कारण ते दूरवर पसरलेले असतात. पण, उधानाची भरती असते त्यावेळी मात्र ही स्थिती अचानक बदलते. पाण्याच्या उधानामुळं वाळू आणि मातीवर पाणी भरल्यामुळं पाणपक्ष्यांना समुद्रकाठावरb आणि इतर उंच जागी जाणं भाग पडतं. ते एकत्र येतात आणि त्यांचा मिश्र घोळका बनतो तेव्हा त्याचं निरीक्षण करणं सोपं जातं.

हा एप्रिलचा महिना असून आज सकाळी चांगलं ऊन पडलंय आणि उधानाची भरती होणार आहे. सफकच्या इंग्लिश गावातून ऑल्ड नदी नागमोडी वळणानं उत्तर समुद्रात मिळते तिथल्या शोभिवंत नदीमुखाच्या लहान खाडीजवळ आम्ही गाडीनं जात असताना ईशान्येकडला थंडगार वारा वाहत आहे. इथं, हिवाळ्यात येणाऱ्‍या पाणपक्ष्यांची संख्या ११,००० पेक्षा थोडीशी जास्त असते, आणि हे नदीमुख फक्‍त ०.८ किलोमीटर रुंद असल्यामुळं आम्हाला सहजगत्या त्यांची हालचाल पाहायला मिळेल.

नदीच्या काठावर अडथळे घालून बांध घालण्यात आले आहेत. काठावर कुठं बोरू तर दुसऱ्‍या ठिकाणी मराम गवत वाढलंय. बाकीच्या ठिकाणी काळ्या लाकडाचे ओंडके आणि दगडं घालण्यात आली आहेत. वरच्या बाजूला, उल्लेखनीय व्हिक्टोरियन इमारतींमध्ये ऑल्डबर्ग संगीत महोत्सवाचं माहेरघर असलेलं स्नेप मॉल्टिंग्स कॉन्सर्ट हॉल आहे. पण, आम्ही मात्र खालच्या बाजूला जाऊन एक सुरक्षित स्थान शोधलं पाहिजे. वारा जोराचा वाहतोय आणि झोंबतोय आणि आमचे डोळेही ताठरताहेत.

नदीच्या काठी येताच, (पाहा चित्र, पॉइंट अ) ॲव्हसेटची एक जोडी मंजुळ आवाजानं आमचं स्वागत करते. हे पक्षी, नदीमुखाच्या आमच्या बाजूला आमच्यापासून फक्‍त ४० मीटर दूर असून दोघंही पिसं साफसूफ करत आहेत. दोघंही छातीच्या वरील बाजूकडच्या पिसांमधून आपली बारीक, वर वळालेली चोच फिरवत आहेत. हे पाहायला अतिशय छान वाटतं पण आम्ही पुढं गेलं पाहिजे कारण पुढं पाहण्यासारखं पुष्कळ आहे.

भरतीची वेळ

भरतीचं पाणी वेगानं वाढत चाललंय म्हणून आम्ही आमच्या निवडलेल्या निरीक्षण करण्याच्या ठिकाणी जाण्याची घाई करत आहोत. (पाहा चित्र, पॉइंट ब.) जाता जाता एक रेडशँक पक्षी—नदीमुखाच्या खाडीचा रक्षक या आपल्या नावाप्रमाणेच—उधानाची भरती होत असलेल्या ठिकाणाहून उडत “तुहूहू-तुहूहू” अशा इशारा देत जातो! सूर्याच्या प्रकाशात चकाकणाऱ्‍या पांढऱ्‍या शुभ्र शेपटीवर त्याचे लाल पाय उठून दिसत आहेत. आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहंचल्यावर, वाळू आणि मातीची जमीन भरभर खचताना आम्ही पाहतो.

दूरवर काही रेडशँक पक्षी आरामात, मातीत हळूहळू आपलं अन्‍न शोधत आहेत तर बाकीचे खाडीच्या आतल्या भागात अन्‍न शोधत आहेत. खाली वळालेल्या चोची असलेले डनलिन पक्षी लहान समूहांमध्ये एकमेकांच्या जवळच आहेत. लटपटत्या चालीनं ते पाण्याच्या किनाऱ्‍याजवळ राहून पुढं चालता चालता मातीतून आपलं अन्‍न वेचत जात आहेत. इकडं तिकडं विखुरलेले कर्ल्यू, शिस्तीनं चालत जमिनीतून निघणाऱ्‍या बुळबुळीत, गिळगिळीत पाण्यातून अन्‍न शोधत फिरत आहेत. नदीच्या आतल्या बाजूला पाहिल्यावर, काही टर्नस्टोन पक्षी आपल्या आखूड, थोड्याशा वर वळालेल्या चोचींनी समुद्राच्या जुन्या किनाऱ्‍यावरील गाळ उचकटत अन्‍न शोधत आहेत.

इतक्यात, ग्रे प्लव्हर पक्ष्याचा “ट्‌ली-ओ-ई” अशा तीन स्वरांचा तीव्र, उदास आवाज सगळीकडे घुमतो. वर उडताना, त्याच्या खालच्या फिक्या रंगावर बगलेतील पिसांचा काळा रंग स्पष्ट उठून दिसतो. वारं आल्यामुळं, अंडाकृती घोळक्यात चारशे गोल्डन प्लव्हर पक्षी जवळ जमून पंखांखाली डोकं खुपसून उभे राहिले. एकमेकांच्या श्रेष्ठत्वाची आठवण करून देताना काही प्लव्हर पक्ष्यांमध्ये कधीकधी झगडे होतात. बहुतांश प्लव्हर पक्षांवर अद्यापही ठिपक्याठिपक्यांची हिवाळी पिसं आहेत—वरच्या बाजूला सोनेरी आणि गडद रंग; तर डोळ्यांभोवती, तोंडाचा आणि खालचा भाग फिक्या रंगाचा; आणि चोच काळी आहे. आमची दुर्बिण फिरवल्यावर आम्हाला रिंग्ड प्लव्हरसुद्धा दिसतात.

अचानक सुमारे १,००० टिटव्यांचा एक मोठा समूह येतो. डौलदार वाटत असलेले हे पक्षी आकाशातून विशिष्ट प्रकारे उडत येतात. टिटव्या आणि गोल्डन प्लव्हर पक्षी आपल्या आवडत्या अन्‍न मिळवण्याच्या ठिकाणी अर्थात पश्‍चिमेकडील शेतजमिनीवर होते. ते नदीमुखाच्या खाडीवर फक्‍त अन्‍न शोधायला नव्हे तर पाण्यात डुबकी मारायला आणि पिसं साफ करायला येतात.

खरं तर, पार्श्‍वभूमीत कर्ल्यू पक्षांचा बुडबुड्यांसारखा आवाज, रेडशँक पक्ष्यांची सुरेल शिटी आणि ब्लॅक-हेडेड गल पक्ष्यांची कर्कश किंचाळी स्पष्ट ऐकू येत आहे. दोन पट्टेरी शेपटींचे गॉडविट पक्षी मातीत खोलवर अन्‍न शोधत आहेत. काही ऑयस्टरकॅचर पक्षी, आपल्या जाड लाल चोचींनी लगवर्म बाहेर ओढून काढत आहेत. एक ग्रे प्लव्हर पक्षी, थाटात चालत येतो, थांबतो, उजवा पाय झटकतो मग भक्ष्याचा पाठलाग करून त्यास गट्टम करतो. पण भरतीचं पाणी त्यांच्याकडे भरभर सरसावत आहे!

घाई सुरू होते

अचानक, हे पक्षी वर उडतात आणि आपापल्या जातींनुसार समूह करतात. तो अतिशय नयनरम्य नजारा आहे कारण हे पाणपक्षी एकमेकांच्या जवळ विशिष्ट आकारात उडत आहेत. उडताना आडवे तिडवे होत असता सूर्याची किरणं त्यांच्यावर पडून त्यांची पिसं चकाकत आहेत—कधी गडद तपकिरी तर कधी पांढरा शुभ्र रंग—एकदा स्पष्ट दिसतो तर लागलीच दुसऱ्‍या क्षणी भरतीच्या गढूळ पाण्याशी समरूप होतो. हे रंग गडद ते चंदेरी आणि मग चंदेरी ते गडद असे बदलताहेत त्याचप्रमाणे त्यांचा आकारही सतत बदलत आहे—अंडाकृतीसारख्या आकारापासून गोलाकारात, मग नागमोडी आणि शेवटी उभ्या ओळीत. पुष्कळसे पक्षी, भरती न आलेल्या चिखलावर पुन्हा उतरले.

लवकरच, आमच्याभोवतालची माती आणि वाळू पाण्यानं भरून जाईल म्हणून आम्हीसुद्धा पुष्कळ पाणपक्ष्यांच्या बरोबरीनं वरच्या बाजूला जाण्याची घाई करतो. प्रथम डनलिन पक्ष्यांचे लहान लहान समूह जोराने पंख फडफडत अधूनमधून कर्कश शिटीसारखा छोटा आवाज काढून एकमेकांसोबत संपर्क ठेवत आमच्यापुढे निघून जातात. मागाहून, मोठे रेडशँक पक्षी जातात; त्यांचा समूह विखुरलेला आणि डौलदार दिसतोय. मोठ्या गलच्या आकाराचे कर्ल्यू पक्षी छान, बुडबुड्यांसारखा आवाज काढत जात आहेत. ॲव्हसेट पक्षी एका मोठ्या घोळक्यात उडत जाताहेत, निळ्या आकाशावर त्यांचा काळा-पांढरा रंग कसा उठून दिसतोय. ते नदीमुखाच्या वरील बाजूवर उतरतात, पाण्याच्या जरा वर त्यांचे लांब, राखी निळ्या रंगांचे पाय दिसत आहेत.

थांबण्याचे ठिकाण

नदीमुखाची खाडी जिथं चिंचोळी होते त्या उंच जागी पोहंचण्याची आम्ही घाई करत आहोत. (पाहा चित्र, पॉइंट क.) हे पक्षी आपापल्या जातीनुसार घोळका करतात पण तसं काही ठरलेलं नसतं. भरतीचा वेग वाढला तसं आणखी पक्षी घोळक्यात सामील होत आहेत. किनाऱ्‍यावर उभं राहण्यासाठी जागा कमी पडत असल्यामुळं पक्षी सतत आपली जागा बदलत आहेत; आणि त्यातल्या त्यात उशिरानं येणाऱ्‍या पक्ष्यांमुळं जागेची ही उणीव आणखीनच भासत राहिली.

मग भरतीची वेळ आली. टिटव्या आणि गोल्डन प्लव्हर पक्षी पुन्हा शेतात गेले आहेत. बाकीच्या पक्ष्यांना मातीवर जागा राहिली नसल्यामुळं नदीच्या जुन्या किनाऱ्‍यावर जाणं भाग पडतं. ऑयस्टरकॅचर पक्ष्यांचा एकसारखा गोंगाट चालूच आहे. या गोंधळात रेडशँक आणि कर्ल्यू पक्ष्यांनी देखील भर घातली आणि वरून उडणाऱ्‍या स्कायलार्क पक्ष्याचा आवाज तर सर्वात वरचढ ठरतोय—अतिशय सुंदर वातावरण आहे.

हे सर्व पाणपक्षी दुपारी, भरतीच्या वेळी विश्रांती घेत असताना आम्ही तिथून काढता पाय घेतला. काही पक्षी समुद्रापासून दूर असले आणि त्यांना पाणी दिसत नसलं, तरी पुन्हा मातीवर किंवा किनाऱ्‍यावर कधी जायचं हे त्यांना ठीक माहीत असतं. अगदी वेळेनुसार चालणाऱ्‍या या उपजतच बुद्धिमान असलेल्या पक्ष्यांना भरती-ओहोटीची पूर्ण माहिती आहे.

होय, भरतीची वर्दळ पाहायला मजा येते, खासकरून पहिल्या वेळी!

[तळटीपा]

a संयुक्‍त संस्थानांत आणि कॅनडात, पाणपक्ष्यांना (कॅराड्रायफॉर्म्स या गणातले) शोरबर्डस म्हणून ओळखलं जातं.

b नेहमी उधानाचं पाणी भरत असलेली जमीन

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

वर्दळीच्या वेळेची पुरेपूर मजा लुटा

भरतीच्या वर्दळीची मजा लुटायची असली, तर पहिल्यांदा सोयीस्कर नदीमुखाची खाडी शोधा. मग तुम्हाला त्या जागेविषयी थोडीफार माहिती मिळवावी लागेल जसं की, पाणपक्षी कुठं जातात आणि त्यांना कुठून पाहायचं वगैरे. उधानाच्या मोठ्या भरतीच्या माहितीसाठी भरती-ओहोटीची वेळापत्रकं पाहा; ही भरती पौर्णिमा किंवा अमावस्येनंतर लगेचच होत असते. प्रवास करण्यासाठी लागणाऱ्‍या वेळेखेरीज पक्ष्यांचे निरीक्षण करायला तीन तास द्या आणि भरती होण्याआधी निदान दोन तास तरी लवकर त्या ठिकाणी जा.

तुम्हाला कोणते साहित्य लागेल? तुम्हाला पाणपक्षी ठाऊक नसतील तर त्यांची ओळख पटावी म्हणून एखादं पुस्तक घ्या. तसंच दुर्बिणीचाही पुष्कळ फायदा होतो. तुम्हाला लवकरच दिसून येईल की, प्रत्येक पाणपक्ष्याची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत आणि त्यांच्या चोचीच्या आकाराप्रमाणेच ते अन्‍न गोळा करतात. मोठ्या दुर्बिणीची आवश्‍यकता नसते—पण उबदार, पाण्याला प्रतिरोधक असलेली वस्त्रं मात्र आवश्‍यक असतात! धोक्यांपासून सावध असा. तुम्हाला नीट माहिती नसली तर चिखलाच्या जमिनीवर जाण्याचं साहस करू नका. वेगानं येणाऱ्‍या भरतीत अगदी सहजगत्या माणूस अडकू शकतो. शिवाय, तुमची वाट चुकायला फक्‍त समुद्रावरचं धुकं पुरेसं आहे. वाऱ्‍याचाही विचार करा. वादळामुळं मोठ्या लाटा उसळू शकतात ज्या कोणत्याही नदीमुखाच्या खाडीवर अतिशय धोकेदायक ठरू शकतात.

[२५ पानांवरील चौकट/चित्र]

मुख्य जागतिक नदीमुखाच्या खाड्या

नेदरलंडमधील वॅडन झी हे युरोपमधील सर्वात महत्त्वाचे अंतरावेलीय ठिकाण आहे आणि इथं सुमारे ४० लाखांपेक्षा जास्त पाणपक्षी येतात. हे ठिकाण जटलंडच्या उत्तरेपासून नैऋत्येपर्यंत विस्तारतं. या विशाल परिसरातील तीन प्रेक्षणीय स्थळं म्हणजे डेन्मार्कमधील रेमेला जाणारा महामार्ग; वेसर नदीमुखाची खाडी, जर्मनीत भरतीच्या वेळी थांबण्याची मोठी जागा; आणि नेदरलंडमधील ग्रोनिनजेनजवळील लुवर्झ झे.

आयबेरियन द्वीपकल्पावर, पोर्चुगल टॅगस नदीजवळील नदीमुख सर्वात उल्लेखनीय आहे. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या पॅसिफिक किनारपट्टींवरील नदीमुखाच्या खाड्या, स्थलांतरण करणाऱ्‍या सुमारे ६० ते ८० लाख पाणपक्ष्यांना अन्‍न पुरवतात. यांमधील मुख्य ठिकाणे म्हणजे, कॅलिफोर्निया येथील सॅन फ्रॅन्सिस्को आणि हमबोल्ट उपसागरे; कॅनडाच्या वँखूवर बाऊंड्री उपसागरापासून ब्रिटीश कोलंबियाच्या आयोना बेटापर्यंतचे २०० चौरस किलोमीटर; आणि अलास्कातील स्टिकीन नदीमुखाची खाडी आणि कॉपर नदीचा त्रिभुज प्रदेश. पाणपक्षी पाहण्यासाठी अमेरिकेच्या टेक्सासमधील बोलिवर फ्लॅट आणि गॅलवस्टन; हाँगकाँग इथलं टाय-पो; ईशान्येकडील ऑस्ट्रेलियातील कार्न्झ; केनियातील मोंबासाजवळ, ही ठिकाणं सुद्धा उत्तम आहेत.

[२२ पानांवरील चित्र]

पाच ऑयस्टरकॅचर पक्षी

[२३ पानांवरील चित्र]

थांबण्याच्या ठिकाणाहून निघण्याची घाई करणारे नॉट पक्षी

[२३ पानांवरील चित्र]

ऑल्ड नदीमुखाची खाडी, सफक

स्नेप मॉल्टिंग्स कॉन्सर्ट हॉल

निरीक्षणाचा पॉइंट ब

पॉइंट क

सुरवातीचं निरीक्षण स्थळ अ

[चित्राचे श्रेय]

Snape Maltings Riverside Centre

[२४ पानांवरील चित्र]

नॉट

[२४ पानांवरील चित्र]

रेडशँक

कर्ल्यू

[२५ पानांवरील चित्र]

वर: कर्ल्यू पक्षी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा