वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ४/८ पृ. १९-२१
  • दांडगाई करण्यात गैर काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दांडगाई करण्यात गैर काय?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दांडगाई करणाऱ्‍याची ओळख
  • दांडगाईची सुरवात
  • कायमचे दुष्परिणाम
  • बदल कसा करावा
  • मी त्रास देणाऱ्‍यांचा सामना कसा करू शकतो?
    तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं
  • तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • जगावरील दृष्टिक्षेप
    सावध राहा!—१९९८
  • सूड घेण्यात काय चूक आहे?
    सावध राहा!—२००२
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ४/८ पृ. १९-२१

तरुण लोक विचारतात . . .

दांडगाई करण्यात गैर काय?

‘अरेच्या! मी तर फक्‍त थोडीशी गंमत करत होतो. एवढं बिथरायला काय झालंय? नाही तरी, तो रॉन आहेच या लायकीचा.’

तुम्ही कदाचित तुमच्या सोबत्यांच्या तुलनेत जास्त धडधाकट आणि बळकट असाल. किंवा तुम्ही हजरजवाबी, फटकळ आणि हटवादी असाल. कारण काहीही असो पण कुणाला घाबरवणं, चिडवणं किंवा कुणाची फटफजिती करून हसणं जणू तुमच्या स्वभावातच भिनलेलं आहे.

इतरांवर दादागिरी करताना तुमच्या मित्रांमध्ये कदाचित हशा पिकतील, पण खरं पाहता हा हसण्यावारी नेण्यासारखा विषय नाहीय. उलट काही संशोधकांना तर असं आढळलं आहे की ज्याच्यावर दांडगाई केली जाते त्याला यामुळे, आपण कधी कल्पनाही केली नसेल इतकं नुकसान होतं. संयुक्‍त संस्थानांतील शाळकरी मुलांच्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, “दांडगाईला तोंड द्यावं लागणाऱ्‍या मुलांपैकी ९० टक्के मुलांनी सांगितलं की यामुळे त्यांना अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात—त्यांचे मार्क घसरतात, चिंता वाढते, मित्रांमधील संबंध कलुषित होतात आणि सामाजिक जीवनाचा नाश होतो.” “दांडगाई करणाऱ्‍यांनी तीन वर्षांपासून आपल्याला कसे छळले याविषयी एक लांबलचक चिठ्ठी लिहिल्यावर” जपानमध्ये एका १३ वर्षांच्या मुलाने “गळफास लावून आत्महत्या केली.”a

दांडगाई करणारा असा का बनतो? आणि तुम्ही स्वतः असं वागत असल्यास, तुम्ही कसे बदलू शकता?

दांडगाई करणाऱ्‍याची ओळख

नोहाच्या काळातला जलप्रलय येण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या काही दांडगाई करणाऱ्‍यांबद्दल बायबल आपल्याला सांगते. त्यांना नेफिलीम [महाकाय] म्हणायचे—“जे इतरांना खाली पाडतात,” असा या शब्दाचा अर्थ होतो. त्यांच्या दहशतीच्या राज्यात “पृथ्वी . . . जाचजुलमांनी भरली होती.”—उत्पत्ति ६:४, ११.

पण दांडगाईचा अर्थ फक्‍त लोकांना मारहाण किंवा अरेरावी करण्यापुरता मर्यादित नाहीय. जो कुणी इतरांना—विशेषतः दुर्बळ आणि भोळ्याभाबड्यांना—निष्ठुर किंवा अपमानास्पद वागणूक देतो तो दांडगाईच करत असतो. (पडताळा उपदेशक ४:१.) दांडगाई करणारे धाकदपटशा करतात, घाबरवण्याचा आणि रुबाब गाजवण्याचा प्रयत्न करतात. पण सहसा यांपैकी पुष्कळसे, हात उगारण्याऐवजी तोंड चालवतात. खरं तर, अशा प्रकारच्या दुर्व्यवहारांपैकी भावनात्मक दडपशाहीचा प्रकार सर्वात जास्त आढळतो. त्यात अपमान, टोमणेबाजी, थट्टा करणं आणि नावं ठेवणं समाविष्ट करता येईल.

कधीकधी मात्र, दांडगाई अप्रत्यक्ष स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, लिसा नावाच्या मुलीचा अनुभव लक्षात घ्या.b तिची काही मुलींशी लहानपणापासूनच गाढ मैत्री होती. पण, ती १५ वर्षांची झाली तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलू लागली. लिसा खूपच देखणी दिसू लागली आणि आकर्षणाचं केंद्र बनली. ती सांगते: “माझ्या मैत्रिणी मला एकटं पाडू लागल्या आणि माझ्या पाठीमागे—आणि प्रत्यक्षही माझ्याविषयी भलंबुरं बोलू लागल्या.” त्यांनी तिचं नाव खराब करण्यासाठी तिच्याविषयी खोट्यानाट्या गोष्टी पसरवल्या. जळफळाटामुळे, त्यांनी तिच्या भावनांची पर्वा न करता तिच्यावर निष्ठुरपणे दांडगाई केली.

दांडगाईची सुरवात

एखाद्याच्या आक्रमक वागणुकीचा सहसा त्याच्या घरातल्या वातावरणाशी संबंध असतो. स्कॉट नावाचा एक तरुण म्हणतो, “माझे वडील आक्रमक स्वभावाचे होते, म्हणून मीही आक्रमक स्वभावाचा बनलो.” एरन या मुलाचं देखील घरातलं जीवन अतिशय कठीण होतं. तो आठवून सांगतो: “माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल अर्थात, ती चारचौघांसारखी नाहीय याबद्दल लोकांना कल्पना आहे हे मला माहीत होतं—पण ते सहानुभूती दाखवून वागायचे तेव्हा मला चीड यायची.” या कारणामुळे, एरन जेव्हा जेव्हा खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचा तेव्हा तेव्हा त्याच्या मनात जिंकण्याची जिद्द असायची. पण, नुसतं जिंकून त्याचं समाधान होत नसे. तो आपल्या प्रतिस्पर्धकांचा अपमान करीत, त्यांच्या पराभवाची वारंवार आठवण करून देऊन त्यांना डिवचत असे.

दुसरीकडे पाहता, ब्रेंट नावाच्या एका मुलाचं देव-भीरू आईवडिलांकडून संगोपन झालं होतं. तरीही तो कबूल करतो: “मी लोकांना हसवायचो, पण कधी कधी आपण काय बोलतोय हे कळण्याआधी मी कुणाच्यातरी भावना दुखावून बसायचो.” मौजमजा करण्याची आणि स्वतःकडे लक्ष आकर्षित करण्याची इच्छा असल्यामुळे ब्रेंटला इतरांच्या भावनांचा विसर पडला.—नीतिसूत्रे १२:१८.

इतर तरुणांवर टीव्हीचा प्रभाव असल्याचं आढळतं. त्यातील कार्यक्रमांत दाखवलेल्या गुन्हेगारीतून, ‘रफटफपणा’ फारच प्रशंसनीय असून विनयशीलता म्हणजे नामर्दीचं लक्षण आहे असं भासवलं जातं. पुष्कळशा लोकप्रिय कॉमेडींमध्ये टोमणेबाजीची भरमार असते. बातमीवृत्तांमध्येही, खेळांच्या दरम्यान हाणामारी आणि शिवीगाळ होताना हमखास दाखवली जाते. आपण इतरांना जी वागणूक देतो त्यावर आपल्या मित्रांचाही पुष्कळसा प्रभाव असतो. आपले मित्र दांडगाई करणारे असल्यास, त्यांच्याकडून एखाद्या वेळेस आपलीच फजिती होईल या भीतीने त्यांच्यासोबत दांडगाई करण्यात सामील होणं आपल्याला साहजिकच जास्त सोपं जातं.

तुमची परिस्थिती काहीही असो, पण जर तुम्ही दांडगाईचे डावपेच खेळत असला तर त्यामुळे फक्‍त तुमच्या गैरवागणुकीला बळी पडणाऱ्‍यांनाच नुकसान होतंय असं मुळीच समजू नका.

कायमचे दुष्परिणाम

सायकॉलॉजी टुडे या नियतकालिकाच्या वृत्तानुसार: “दांडगाई करण्याची सुरवात कदाचित बालवयात होत असेल, पण प्रौढावस्थेतही ही प्रवृत्ती कायम राहते.” द डॅलस मॉर्निंग न्यूज या बातमीपत्रात प्रसिद्ध झालेल्या संशोधन अभ्यासातून असं दिसून आलं की, “दुसऱ्‍या वर्गातच दांडगेपणाचा शिक्कामोर्तब झालेल्या मुलांपैकी ६५ टक्के मुलं चोविसावे वर्ष गाठेपर्यंत घोर अपराधांत गोवली जातात.”

दांडगाई करणारी सर्वच्या सर्व मुलं अपराधी बनत नाहीत हे कबूल आहे; परंतु, उठताबसता लोकांशी बेपर्वाईने वागल्यास पुढे तुम्हाला जीवनात बऱ्‍याच गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागेल. हीच सवय वैवाहिक जीवनातही जारी ठेवल्यास, तुमच्या साथीदाराला आणि मुलांना यामुळे अतिशय त्रास सहन करावा लागेल. नोकरी देणारेही सहसा मनमिळावू लोकांच्या शोधात असल्यामुळे, दांडगाईच्या प्रवृत्तीमुळे तुम्ही रोजगाराच्या संधी देखील गमावू शकता. भविष्यात ख्रिस्ती मंडळीतही तुम्हाला काही विशेषाधिकार नाकारण्यात येऊ शकतील. ब्रेंट सांगतो, “मला भविष्यात मंडळीत वडील म्हणून कार्य करायला आवडेल, पण माझ्या बाबांनी मला जाणीव करून दिली की, मी झोंबणारं उत्तर देईन ही भीती असल्यास, कुणीही माझ्याजवळ आपल्या समस्यांविषयी बोलून दाखवायला धजणारच नाही.”—तीत १:७.

बदल कसा करावा

आपल्याला नेहमीच आपल्या त्रुटी स्पष्टपणे दिसत नाहीत. शास्त्रवचनं तर असाही इशारा देतात की, “आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही,” अशी एखादा आपल्या मनाची समजूत करून घेतो. (स्तोत्र ३६:२) असं असल्यामुळे, तुम्ही आईबाबांपैकी कुणाला, एखाद्या विश्‍वासू मित्र किंवा मैत्रिणीला किंवा एखाद्या अनुभवी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनीला त्यांचे मत विचारून पाहू शकता. कदाचित ते ऐकून तुम्हाला बोचणी होईल, पण तुम्ही स्वतःमध्ये कोणते बदल करावेत हे समजण्यासाठी कदाचित तुम्हाला यामुळे मदत मिळेल. (नीतिसूत्रे २०:३०) एरन म्हणतो, “माझ्या मते सल्ला ऐकून घेतल्यामुळे मला सर्वात मोठा फायदा झाला. जे प्रामाणिक होते त्यांनी मला मी कुठे चुकतोय ते सांगितले. त्यांच्या बोलण्यानं कधी कधी वाईटही वाटायचं, पण अशा कानउघाडणीची मला खरंच गरज होती.”

पण, तुम्हाला तुमचे व्यक्‍तिमत्त्व नखशिखांत बदलावे लागेल असा याचा अर्थ होतो का? नाही; कदाचित, फक्‍त तुमच्या विचारसरणीत आणि थोड्याफार प्रमाणात तुमच्या वागणुकीत फेरबदल करावे लागतील. (२ करिंथकर १३:११) उदाहरणार्थ, तुमची मोठी शरीरयष्टी, बळ आणि चाणाक्ष बुद्धी यांमुळे आजपर्यंत तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत आला असाल. तथापि, बायबल “लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना,” असा सल्ला आपल्याला देते. (फिलिप्पैकर २:३) धडधाकट शरीरयष्टी किंवा शारीरिक बळ असो किंवा नसो—हे नेहमी लक्षात असू द्या, की इतरांजवळ जे प्रशंसास्पद गुण आहेत ते तुमच्यापाशी नाहीत.

तुम्हाला कदाचित तुमच्या आक्रमक किंवा अधिकार गाजवण्याच्या प्रवृत्तीवरही मात करावी लागेल. ‘आपलेच हित न पाहता, दुसऱ्‍याचेही हित पाहण्याचा’ प्रयत्न करा. (फिलिप्पैकर २:४) स्वतःचं मत मांडायचंही असल्यास, तुमचं बोलणं अपमान, उपरोध किंवा हेटाळणीच्या स्वरात असू नये.—इफिसकर ४:३१.

दांडगाईचा मार्ग पत्करण्याची इच्छा झाल्यास, लक्षात असू द्या की देवाने दांडगाई करणाऱ्‍या नेफिलीमांचा नाश केला होता. (उत्पत्ति ६:४-७; ७:११, १२, २२) अनेक शतके लोटल्यावर संदेष्टा यहेज्केलाच्या काळात, अशक्‍तांना ‘धक्के देणाऱ्‍या’ आणि ‘हुंदडून हाकून देणाऱ्‍या’ लोकांवर देव अत्यंत नाराज झाला. (यहेज्केल ३४:२१) यहोवाला दांडगाईविषयी तीव्र घृणा आहे याची जाणीवच मुळात आवश्‍यक बदल करण्यासाठी बऱ्‍याच प्रमाणावर चालना देते!

बायबलच्या तत्त्वांवर प्रार्थनापूर्वक मनन केल्यामुळेही तुम्हाला बऱ्‍याच प्रमाणावर मदत लाभते. सुवर्ण नियमानुसार: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) कुणावर धाकदपटशा करण्याचा मोह झाल्यास, स्वतःला प्रश्‍न विचारा: ‘धाकदपटशा करून, भीती दाखवून कुणी माझा अपमान केला तर ते मला आवडेल का? मग मी इतरांना असं का वागवतो?’ बायबल आपल्याला, “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा,” असा आदेश देते. (इफिसकर ४:३२) याबाबतीत येशूने सर्वतोपरी उत्तम उदाहरण मांडले. तो इतर सर्व मानवांपेक्षा श्रेष्ठ असला तरीसुद्धा, त्याने सर्वांना दया, सहानुभूती आणि आदरानं वागवलं. (मत्तय ११:२८-३०) तुमच्यापेक्षा दुबळी व्यक्‍ती समोर आल्यास—किंवा तुम्हाला कुणाचा खूप राग येत असला तरीसुद्धा, येशूसारखेच वागण्याचा प्रयत्न करा.

परंतु, तुम्हाला घरात मिळत असलेल्या गैरवागणुकीमुळे राग येऊन तुम्ही आक्रमकपणे वागत असल्यास काय? काही वेळा हा राग समजण्याजोगा असू शकतो. (पडताळा उपदेशक ७:७) तरीसुद्धा, बायबलमध्ये आपल्याला नीतिमान ईयोबाला दिलेली ताकीद वाचायला मिळते: “आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत होऊ नको . . . संभाळ, दुष्टतेकडे वळू नको.” (ईयोब ३६:१८, २१) तुम्हाला नीट वागवले जात नसले तरीसुद्धा, इतरांशी गैरवर्तन करण्याचा तुम्हाला अजिबात हक्क नाही. यापेक्षा तुमच्या आईवडिलांशी याबाबतीत चर्चा करणे जास्त शहाणपणाचं ठरेल. फारच त्रासदायक दुर्व्यवहार होत असल्यास, तुम्हाला आणखी अपाय होऊ नये म्हणून बाहेरून मदत घेण्याची कदाचित गरज पडेल.

बदलणं सहजसोपं नसलं तरीसुद्धा ते शक्य आहे. ब्रेंट म्हणतो: “मी याविषयी जवळजवळ दररोजच प्रार्थना करतो आणि यहोवाने मला काही फायदेकारक बदल घडवून आणण्यासाठी मदत दिली आहे.” अशाचप्रकारे, तुम्हीपण लोकांसोबतच्या तुमच्या वर्तनात बदल घडवून आणता तसतसे तुम्ही लोकांना पूर्वीपेक्षा जास्त आवडू लागाल. लक्षात असू द्या, दांडगाई करणाऱ्‍यांचा लोकांना कदाचित धाक वाटेल, पण खरं पाहिल्यास ते कुणालाही आवडत नाहीत.

[तळटीपा]

a दांडगाईला तोंड देणाऱ्‍यांनी छळणूक कशी टाळावी याविषयी सविस्तर माहिती आमच्या ऑगस्ट ८, १९८९ इंग्रजी अंकातील, “तरुण लोक विचारतात . . . शाळेत दादागिरी करणाऱ्‍यांना मी कसं तोंड द्यावं?,” हा लेख पाहावा.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

“दांडगाई करण्याची सुरवात कदाचित बालवयात होत असेल, पण प्रौढावस्थेतही ही प्रवृत्ती कायम राहते.”

[२० पानांवरील चित्र]

अपमानास्पद बोलणंही दांडगाईचाच प्रकार आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा