स्थलांतराच्या रहस्यांचा छडा लावणे
स्पेनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
कॅलिफोर्निया, अमेरिका येथील सॅन जुॲन कॅपिस्ट्रॅनो शहरात असलेल्या जुन्या सॅन जुॲन कॅपिस्ट्रॅनो मिशनमध्ये भांडीक पक्ष्यांच्या परतण्यासंबंधाने एक जुने गीत आहे. दरवर्षी मार्च १९ या तारखेला, ते न चुकता तेथे असलेल्या त्यांच्या घरट्यांत परत जातात असे म्हटले जाते.
युरोपियन भांडीक सुद्धा जवळजवळ सारखेच वेळापत्रक पाळतात. एक स्पॅनिश म्हण असे भाकीत करते की मार्च १५ पर्यंत भांडिकाचे गाणे पुन्हा ऐकू येईल.
उत्तर गोलार्धातील ग्रामस्थांनी, वसंतऋतूचे परंपरागत पूर्वचिन्ह म्हणजेच भांडिकाच्या परत येण्याचे नेहमीच स्वागत केले आहे. परंतु काही जिज्ञासू लोकांना, हिवाळ्यात त्यांच्या अनुपस्थितीत ते कोठे गेले असावेत हे जाणण्याची देखील उत्कंठा होती. ते शीतनिष्क्रीय झाले असावेत असे काहींना वाटले. ते चंद्रावर गेले असतील असे इतरांनी सुचवले—कोणाएकाने अंदाज बांधला की ते दोन महिन्यात तेथे पोहंचू शकतात. भांडिकांनी तलाव व पाणथळांच्या तळाशी पाण्याखाली थव्याने एकत्र राहून हिवाळा घालवला असा दावा सोळाव्या शतकातील आर्चबिशप यांनी केला. त्यांच्या संशोधनात्मक निबंधात कोळी भांडिकांनी भरलेले जाळे खेचत आहेत असे दाखविणारे चित्र देखील होते. हे विचार विक्षिप्त वाटत असले तरी वस्तुस्थितीसुद्धा जवळजवळ काल्पनिक कथांसारखीच विचित्र असल्याची दिसून आली.
या शतकादरम्यान पक्षिविद्यावेत्त्यांनी हजारो भांडिकांच्या पायाला कडे अडकविले. थोड्याच परंतु महत्त्वपूर्ण प्रमाणात हे कडे अडकविण्यात आलेले पक्षी त्यांच्या हिवाळ्यात राहण्याच्या ठिकाणी आढळले. असंभव वाटत असले तरीसुद्धा, ब्रिटन व रशियातून आलेले पक्षी घरापासून हजारो किलोमीटर दूर—आफ्रिकेच्या सर्वात दूरच्या आग्नेयी टोकात एकत्र हिवाळा घालवत असल्याचे निरीक्षण्यात आले. उत्तर अमेरिकेतील त्यांच्यासारखे काही भांडीक दक्षिणेकडे, अर्जेंटिना किंवा चिलीपर्यंत उडून जातात. तसेच, असे लांबचे प्रवास करणाऱ्यांपैकी, भांडीक एकटेच पक्षी नाहीत. उत्तर गोलार्धातील कोट्यावधी पक्षी दक्षिण गोलार्धात हिवाळा घालवतात.
भांडिकासारखा इवलासा पक्षी २२,५०० किलोमीटरचा प्रवास करून पुढच्या वसंतऋतूत त्याच घरट्यात परत येऊ शकतो हे जाणून पक्षिविद्यावेत्त्यांना मोठा अचंबा वाटला. भांडीक कोठे गेले होते हे समजल्याने तर आणखीनच बुचकळ्यात पाडणारे प्रश्न उपस्थित झाले.
“भांडीका, तू तुझे घरटे का सोडतोस?”
पक्षी पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला का जातो? किंवा, स्पॅनिश म्हणीप्रमाणे, “भांडीका, तू तुझे घरटे का सोडतोस?” थंड हवामानामुळे किंवा अन्न शोधण्यास तर नाही? निःसंशये, उत्तर हे हिवाळ्याची सुरुवात नसून अन्नाचा पुरेसा साठा हे आहे. कारण कडाक्याच्या थंडीत ज्यांचे जिवंत राहणे कठीण आहे असे अनेक लहान पक्षी स्थलांतर करत नाहीत. परंतु, पक्ष्यांचे स्थलांतर म्हणजे केवळ अन्नाच्या शोधात भटकणे नव्हे. स्थलांतर करणाऱ्या मानवांच्या विपरीत, पक्षी पुढे जाण्यास, वाईट काळ येईपर्यंत थांबत नाहीत.
वैज्ञानिकांनी असा शोध लावला आहे की लहान दिवस, स्थलांतर करण्याची तीव्र इच्छा जागृत करण्यास कारणीभूत ठरतात. शरदऋतूत, कैद करून ठेवण्यात आलेली पाखरे लवकर अंधार पडू लागतो तेव्हा अस्वस्थ होतात. प्रकाश कृत्रिमरित्या निर्माण करण्यात येतो व पक्षी, संशोधकांनीच वाढविलेले असतात अशा वेळेस देखील हाच परिणाम घडून येतो. पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पक्ष्याला, त्याच्या स्थलांतराच्या उड्डाणाच्या वेळेस कोणत्या दिशेने जायचे आहे हे उपजतपणे माहीत असते व तो त्या दिशेला तोंड देखील वळवितो. स्पष्टपणे, वर्षाच्या विशिष्ट वेळेस व निश्चित दिशेने स्थलांतर करण्याची तीव्र इच्छा अन्तर्जात असते.
पक्षी मोठ्या अंतरांवर यशस्वीपणे कसे सफर करतात? अनेक पक्षी भौगोलिक खूण नसलेल्या समुद्र व वाळवंटांवरून स्थलांतर करतात व ते हा प्रवास अहोरात्र करत असतात. काही जातींमध्ये पक्ष्यांची पिले अनुभवी प्रौढांच्या मदतीशिवाय एकट्यानेच प्रवास करतात. वादळे किंवा कडेचे वारे असले तरीही, ते कसेही करून त्यांच्या मार्गावर टिकून राहतात.
सफर—विशेषतः अथांग समुद्र व वाळवंटांवरून—निश्चितच सोपी नाही. मनुष्याला तिजवर प्रभुत्व मिळविण्यास हजारो वर्षे लागली. वेधयंत्र व होकायंत्र यांसारख्या समुद्रयात्रेच्या साधनांशिवाय ख्रिस्टोफर कोलंबसने समुद्रावर इतक्या दूरवर प्रवास करण्याचे धाडस कधीच केले नसते यात शंका नाही.a असे असले तरीही, त्याची पहिली समुद्रयात्रा संपण्याच्या बेतात होती तेव्हा त्याला बहामाकडे जाण्याची दिशा दाखविणारे मात्र पक्षीच होते. जुन्या काळातील खलाश्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यास जमीनीवर राहणारे पक्षी स्थलांतर करत असताना नैर्ऋत्य दिशेने उडत असलेले दिसले तेव्हा त्याने त्याचा मार्ग त्या दिशेस वळविला.
सफर यशस्वी होण्याकरता, अविचल मार्ग टिकवून ठेवण्यासाठी प्रणाली व जागा निश्चित करण्याची सोय असणे आवश्यक असते. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, तुमच्या लक्ष्याच्या संबंधाने तुम्ही सध्या कोठे आहात व तेथपर्यंत पोहंचण्यासाठी तुम्ही कोणत्या दिशेने जावे हे माहीत असणे जरूरीचे आहे. आपण मानव असे कार्य साधनांशिवाय हाताळण्यास समर्थ नाही—पण स्पष्टपणे पक्षी मात्र आहेत. उडण्यासाठी योग्य दिशा कोणती हे पक्षी कसे ठरवतात या विषयावर प्रकाश टाकणाऱ्या माहितीची वैज्ञानिकांनी सबुराईने जुळवाजुळव केली आहे.
काही उत्तरे
अचूकपणे स्वगृही परतणारी कबुतरे, पक्ष्यांच्या सफरीची रहस्ये उलगडण्याचा संकल्प केलेल्या वैज्ञानिकांचे जणू आवडते “गीनी पिग” आहेत. विशिष्ट खुणा पाहता येऊ नयेत म्हणून सहनशील कबुतरांच्या डोळ्यांवर काचेचे अर्धवट पारदर्शक “चश्मे” लावण्यात आले. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापासून मार्गदर्शन न मिळवू देण्यासाठी इतरांच्या पाठीवर लोहचुंबकाच्या पिशव्या बांधण्यात आल्या. बाहेरची वाट कळायला मार्ग राहू नये याची खात्री करण्यासाठी काहींना तर जेथे त्यांना मोकळे सोडतात त्या ठिकाणी नेत असताना गुंगीचे औषध देखील दिले गेले. युक्तिबाज कबुतरांना काही अडचणींच्या संमीलनाने यशस्वीपणे स्वगृही परत येऊ दिले नाही तरीसुद्धा त्यांनी प्रत्येक अडथळा वेगवेगळा पार केला. स्पष्टतः, पक्षी केवळ एका सफर प्रणालीवर अवलंबून नसतात. ते कोणकोणत्या पद्धती उपयोगात आणतात?
कृत्रिम सूर्य अथवा रात्रीचे आकाश वापरून करण्यात आलेले प्रयोग दर्शवितात, की पक्षी दिवसा सूर्यप्रकाशात व रात्री ताऱ्यांच्या प्रकाशात सफर करतात. आकाश मेघाच्छादित असले तर? जणू काही स्वभावतःच रचलेले होकायंत्र असल्याप्रमाणे, पक्षी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करून देखील मार्ग निश्चित करू शकतात. त्याच घरट्यात किंवा खुराड्यात परतण्यासाठी त्यांना परिचित खुणा ओळखता आल्या पाहिजे. शिवाय, संशोधकांच्या पाहण्यात आले आहे की आवाज व वासांच्या बाबतीत पक्षी मानवांपेक्षा अधिक संवेदनशील असतात—तथापि, सफरीसाठी ही क्षमता कितपत उपयोगात आणली जाते हे त्यांना कळू शकले नाही.
“पक्ष्यांसंबंधी नकाशाचे” रहस्य
पक्षी निश्चित दिशेने कसे उडू शकतात हे स्थापित करण्याच्या दृष्टीने ह्या सर्व संशोधनाने पुरेसा हातभार लावला असला तरीही एक गोंधळात टाकणारी समस्या अजूनही शिल्लक आहे. विश्वसनीय होकायंत्र असणे तर आवश्यक आहेच परंतु त्यासोबतच घरी पोहंचण्यासाठी तुमच्याजवळ नकाशा असणे देखील आवश्यक आहे—एकतर तुम्ही कोठे आहात हे ठरविण्यासाठी व त्यानंतर सर्वोत्तम मार्ग योजण्यासाठी.
पक्षी कोणते “पक्ष्यांसंबंधी नकाशे” वापरतात? घरापासून शेकडो किलोमीटर दूर एखाद्या अज्ञात ठिकाणी नेल्यावर आपण कोठे आहोत हे त्यांना कसे कळते? त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याजवळ कोणतेही नकाशे किंवा रस्त्यावरील खुणेचे खांब नाहीत असे भासत असताना ते सर्वोत्तम मार्ग कसा ठरवतात?
जीवशास्त्रज्ञ, जेम्स एल. गोल्ड म्हणतात की, “पक्ष्याची नकाशांबद्दल असलेली जाणीव, प्राण्यांच्या व्यवहारातील सर्वाधिक अनाकलनीय व चित्तवेधक रहस्य असल्याची आपली ख्याती टिकवून ठेवील असे संभवते.”
रहस्यामागील बुद्धिसामर्थ्य
स्थलांतर उपजत बुद्धीचा गुण आहे हे अगदीच स्पष्ट आहे. पक्षांच्या अनेक जाती वर्षाच्या विशिष्ट वेळेस स्थलांतर करावे अशा प्रकारे अनुवंशिकरित्याच आदेशित असतात व यशस्वीपणे सफर करण्यासाठी लागणारे कौशल्य व संवेदना त्यांच्याठायी जन्मतःच असतात. ही जन्मजात क्षमता कोठून आली बरे?
तर्कशुद्धपणे, ही उपजत बुद्धी, केवळ अशा बुद्धिमान निर्मात्याकडून येणे शक्य होते जो पक्ष्यांची अनुवंशिक सामग्री “आदेशित करण्यास” समर्थ होता. देवाने कुलपिता ईयोबास निक्षून विचारले: “तुझ्या बुद्धीने ससाणा उडतो आणि आपले पंख दक्षिणेकडे उडून जाण्यास पसरतो काय?”—ईयोब ३९:२६, पंडिता रमाबाई भाषांतर.
पक्ष्यांच्या स्थलांतरावर शंभर वर्षे सखोल संशोधन केल्यानंतर, वैज्ञानिक पक्ष्यांच्या इवल्याशा मेंदूंचा आदर करू लागले आहेत. प्रमुख स्थलांतर मार्ग शोधून काढल्यावर, काही पक्षी ज्यांचा प्रवास करतात ती विश्वास बसणार नाही अशी अंतरे पाहून, वैज्ञानिक चाट होतात. स्थलांतर करणारे कोट्यावधी पक्षी पिढ्यांपिढ्या, वसंत व शरदऋतूत, पृथ्वीचा प्रवास करतात. ते दिवसा सूर्यप्रकाशात व रात्री ताऱ्यांच्या प्रकाशात सफर करतात. ढगाळ वातावरणात ते पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा उपयोग करतात व परिचित भूप्रदेश ओळखणे ते फार लवकर शिकतात. कदाचित ते वासाच्या किंवा ध्वनीलहरींच्या तरंगांवरून सुद्धा पुरी ओळख करून घेतात.
त्यांच्या प्रवासाची योजना ते कशी आखतात हे अजूनही गूढच आहे. सर्व भांडीक कोठे जातात हे आम्हाला माहीत आहे; ते तेथे कसे जातात हे आम्हाला माहीत नाही. असे असले तरीही, पानगळीत जेव्हा आपण भांडिकांना एकत्र थव्याने उडताना पाहतो तेव्हा त्यांचे स्थलांतर ज्याने शक्य केले त्या देवाच्या बुद्धीचे थोडे थांबून नवल करणे एवढेच काय ते आपण करू शकतो.
[तळटीपा]
a वेधयंत्र, अक्षांश मोजण्यासाठी उपयोगात आणले जात असे.
[१८ पानांवरील चौकट]
स्थलांतर करणारे विश्व विजेते
अंतर. सन १९६६ च्या उत्तरी उन्हाळ्यात, उत्तर वेल्स, ग्रेट ब्रिटन येथील आर्क्टिक टर्न या पक्ष्याच्या पायात कडे अडकविण्यात आले. त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात—तो बरोबर—न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे पोहंचला. सहा महिन्यांत तो १८,००० पेक्षा अधिक किलोमीटर अंतर उडाला होता. आर्क्टिक टर्न ह्या पक्ष्यांसाठी हा पराक्रम बहुधा अगदीच सर्वसाधारण आहे. एका वर्षाच्या कालावधीत, यातील काही पक्षी पृथ्वीला नियमितपणे प्रदक्षिणा घालतात.
वेग. अमेरिकन सोनेरी प्लोवर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी बहुधा सर्वाधिक वेगवान आहेत. अलास्का, येथील ॲल्यूशियन बेटांपासून, हवाईला वेगळे करणाऱ्या समुद्राचे ३,२०० किलोमीटरचे अंतर यातील काही पक्ष्यांनी फक्त ३५ तासांत पार केले—दर तासाला ९१ किलोमीटर एवढ्या सरासरी वेगाने!
सहनशक्ती. केवळ २० ग्रॅम वजन असलेले उत्तर अमेरिकेतील ब्लॅकपोल वॉर्ब्लर हे पक्षी सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन धावक आहेत. दक्षिण अमेरिकेला जात असताना, ते सलग ३,७०० किलोमीटरचा प्रवास करून फक्त साडेतीन दिवसांत ॲट्लांटिक पार करतात. सहनशक्तीच्या या विलक्षण परीक्षेची तुलना, १,९०० किलोमीटर धावणाऱ्या माणसाशी करण्यात आली आहे जो प्रत्येक किलोमीटर, चार मिनीटांमध्ये पूर्ण करतो. हे उड्डाण, वजनाबाबत अतिदक्ष असणाऱ्या लोकांची इच्छापूर्ती सुद्धा आहे कारण—वॉर्ब्लर पक्षी त्याच्या शरीराचे जवळजवळ निम्मे वजन घटवतो.
वक्तशीरपणा. भांडिकाशिवाय, करकोचा (वर दाखवलेला) सुद्धा वक्तशीरपणाबद्दल सुविख्यात आहे. आपली “घरी परतण्याची वेळ” व “देशाटन करण्याचा ऋतू” जाणणारा पक्षी असे म्हणून यिर्मया संदेष्ट्याने करकोच्याचे वर्णन केले आहे. (यिर्मया ८:७) अजूनही दर वसंत ऋतूत जवळजवळ पाच लाख करकोचे इस्राएलातून जातात.
सफर कौशल्य. मँक्स शियरवॉटर्स या पक्ष्याला त्याच्या घरट्यासारखे दुसरे ठिकाण नाही असे वाटते. ग्रेट ब्रिटन येथे एका मादीला तिच्या घरट्यातून काढून जवळजवळ ५,००० किलोमीटर दूर बॉसटन, अमेरिका येथे सोडण्यात आले. तिला सोडण्यात आल्याबाबत तपशील देणारे पत्र हवाई टपालाने येण्याआधीच तिने साडेबारा दिवसांत ॲट्लांटिक पार केले व घरी परतली. हा विक्रम अधिकच आश्चर्यजनक होता कारण एरवी हे पक्षी त्यांच्या स्थलांतर प्रवासात उत्तर ॲट्लांटिक वरून कधीच जात नाहीत.
[१६ पानांवरील चित्र]
करकोचा दरवर्षी त्याच्या घरट्यात वक्तशीरपणे परततो
[१७ पानांवरील चित्र]
वैशिष्ट्यपूर्ण व्ही-आकारात उडत असलेले स्थलांतर करणारे बगळे
[१५ पानांवरील चित्राचे श्रेय]
Photo: Caja Salamanca y Soria