संघटित गुन्हेगारीपासून संबंध तोडणे “मी याकूझा होतो”
“पप्पा तुम्ही घरी आल्यावर आपण सगळेजण सभांना जाऊ या. तुम्ही नक्की येणार ना?” मी तिसऱ्या वेळी तुरुंगात असताना माझ्या दुसऱ्या मुलीनं हे पत्र लिहिलं होतं. माझ्या पत्नीसोबत ती यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना नियमितपणे जात होती. माझ्या कुटुंबाकडून येणाऱ्या पत्रांनीच मला सांत्वन मिळायचं म्हणून तिच्या म्हणण्यानुसार मी करीन असं मी तिला वचन दिलं.
‘माझ्या कुटुंबापासून दूर करणारं गुन्हेगारीचं जीवन मी का जगतोय?’ असा मी स्वतःला प्रश्न केला. तरुण असतानाचे दिवस मला आठवले. मी फक्त १८ महिन्यांचा असतानाच माझे वडील वारले म्हणून मला त्यांचा चेहरासुद्धा आठवत नाहीय. त्यानंतर आईनं दोनदा लग्न केलं. अशा या कुटुंबाच्या परिस्थितींचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि हायस्कूलमध्ये असताना मी गुंडगिरी करणाऱ्यांबरोबर सहवास ठेवू लागलो. बहुतेकवेळा, रागाच्या भरात येऊन मी शाळेबाहेर मारामारी करायचो. हायस्कूलच्या दुसऱ्या वर्षांत असताना, दुसऱ्या एका टोळीबरोबर मारामारी करायला मी स्वतःची एक टोळी बनवली. परिणामतः, मला अटक झाली आणि काही काळासाठी एका सुधारगृहात पाठवण्यात आलं.
मी उतरणावरून खाली हिंसक जीवनशैलीकडे गडगडत जाणाऱ्या चेंडूसारखा होतो. काही काळातच, मी गुंडगिरी करणाऱ्या लोकांची एक टोळी बनवली आणि आम्ही सतत याकूझा टोळीच्या दप्तराबाहेर हिंडत राहायचो. १८ वर्षांचा झाल्यावर, मी त्या टोळीचा पूर्णतः सदस्य बनलो. २० वर्षांचा असताना वेगवेगळ्या हिंसक कृत्यांमुळे मला अटक झाली आणि तीन वर्षांची कैद देण्यात आली. सर्वप्रथम, मी तरुणांकरता असलेल्या नारा तुरुंगात शिक्षा भोगली पण माझ्यात काही सुधार झाला नाही. म्हणून प्रौढांच्या दुसऱ्या तुरुंगात मला पाठवण्यात आलं. पण, मी आणखीनच बिथरलो आणि शेवटी निबर गुन्हेगारांकरता असलेल्या क्योटो येथील तुरुंगात मला पाठवण्यात आलं.
‘असले गुन्हे मी का करत राहतो?’ असं मी स्वतःला विचारलं. गतकाळाकडे पाहिल्यावर, माझ्या मूर्खपणाच्या तर्कामुळे हे सगळं झालं असं मला जाणवतं. त्यावेळी, मला वाटायचं की असलं वागणं म्हणजे शूरपणाचं आहे आणि त्यातून माझं पौरुषत्व दिसून येतं. २५ वर्षांचा असताना, तुरुंगातून मला सोडलं तेव्हा, माझ्या सोबतचे गुंड मला कोणी खास व्यक्ती समजायचे. आता माझ्याकरता गुन्हेगारी जगातल्या शिडीवर चढण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
माझ्या कुटुंबाची प्रतिक्रिया
त्याच सुमारास माझं लग्न झालं, आणि त्यानंतर काही काळातच आम्हाला दोन मुली झाल्या. पण, मी मात्र तसाचा तसाच राहिलो. कधी घरात तर कधी तुरुंगात असं माझं चालत राहिलं—मी हाणामारी आणि फसवे धंदे करायचो. या प्रत्येक कृत्यामुळे माझे सोबती माझ्याकडे आदराने पाहायचे आणि माझ्या बॉसचा भरवसा वाढायचा. शेवटी, माझ्यापेक्षा थोर असलेला माझा याकूझा “बंधू” टोळीचा नायक बनला. त्यामुळे मला दुय्यम स्थान मिळाल्याचा अतिशय आनंद झाला.
‘माझ्या पत्नीला आणि मुलींना माझ्या या जीवनपद्धतीविषयी काय वाटतं?’ असा मी स्वतःशी विचार केला. कोणी गुन्हेगार, पती आणि वडील असावा याची त्यांना निश्चितच लाज वाटत असावी. पुन्हा एकदा ३० वर्षांचा असताना आणि मग ३२ वर्षांचा असताना मला तुरुंगात डांबण्यात आलं. यावेळी मात्र, तुरुंगाची तीन वर्षांची शिक्षा माझ्याकरता खरंच कठीण होती. माझ्या मुलींना मला भेटण्याची परवानगी नव्हती. त्यांच्याशी बोलायला आणि त्यांना प्रेमाने कुरवाळायला मिळत नसल्यामुळं मला त्यांची अतिशय आठवण यायची.
मी ही शेवटची शिक्षा भोगत होतो तेव्हा, माझी पत्नी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर अभ्यास करू लागली. शिकत असलेल्या सत्याविषयी ती प्रत्येक पत्रात मला कळवू लागली. मी विचार करायचो, ‘ही माझी बायको कोणत्या सत्याबद्दल बोलतीय?’ तुरुंगात असताना मी सबंध बायबल वाचून काढलं. माझ्या बायकोनं पत्रांमध्ये भवितव्याची आशा आणि देवाचा उद्देश याबद्दल जे काही लिहिलं होतं त्यांचा मी विचार करू लागलो.
परादीस पृथ्वीवर अनंतकाळासाठी जिवंत राहण्याची आशा मला आकर्षक वाटली कारण मला मरणाची अतिशय भीती वाटत होती. मी नेहमी विचार करायचो, ‘तू मेलास, म्हणजे तू हारलास.’ गतकाळाविषयी विचार केल्यावर, मरणाची हीच भीती, इतरांनी माझं नुकसान करण्याआधी त्यांचं नुकसान करायला मला चेतवत होती. तसंच माझ्या बायकोच्या पत्रांनी, गुन्हेगारी जगातील शिडीवर चढत जाण्याचं माझं ध्येय किती अर्थहीन आहे याचीही मला जाणीव करून दिली.
तरीही, सत्य शिकून घ्यायला मला प्रेरणा मिळाली नाही. माझ्या पत्नीने यहोवाला समर्पण केलं आणि बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार सुद्धा बनली. माझ्या पत्रात मी त्यांच्या सभांना जायचं कबूल केलं होतं तरीपण, यहोवाचा साक्षीदार बनण्याचा माझा विचार नव्हता. माझी पत्नी आणि मुली मला मागं टाकून फार पुढं गेलेत असं मला वाटलं.
तुरुंगातून बाहेर पडणं
शेवटी माझ्या सुटकेचा दिवस आला. नागोया तुरुंगाच्या गेटपाशी टोळीतले पुष्कळ सदस्य माझं स्वागत करायला ओळीनं उभे होते. पण, त्या मोठ्या घोळक्यात माझी नजर फक्त माझ्या पत्नीला आणि मुलींना शोधत होती. तीन वर्षं, सहा महिन्यांच्या कालावधीत माझ्या मुली किती मोठ्या झाल्या होत्या ते पाहून माझे डोळे अश्रुंनी डबडबले.
घरी गेल्यावर दोन दिवसांनी माझ्या दुसऱ्या मुलीला दिलेलं वचन मी पाळलं आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला गेलो. उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून मला आश्चर्य वाटलं. साक्षीदारांनी माझं अतिशय प्रेमळपणे स्वागत केलं पण मला मात्र त्यांच्यामध्ये विचित्र वाटत होतं. माझ्याकडे येऊन बोललेल्या लोकांना मी गुन्हेगार असल्याचं ठाऊक होतं हे मला नंतर कळालं तेव्हा तर मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. पण, मला त्यांच्यातला जिव्हाळा जाणवला आणि तिथं दिलेलं बायबल आधारित भाषणही अतिशय आवडलं. परादीस पृथ्वीवर अनंतकाळासाठी राहणाऱ्या लोकांबद्दल ते भाषण होतं.
माझी बायको आणि माझ्या मुली परादीसमध्ये जातील आणि मी मात्र नाश होईन हा विचारच मला सहन होत नव्हता. माझ्या कुटुंबाबरोबर मलाही अनंतकाळासाठी जगायला काय केलं पाहिजे याचा मी गंभीरपणे विचार केला. गुंडगिरीचं जीवन सोडून देण्याचा आणि बायबल अभ्यास सुरू करण्याचा मी विचार करू लागलो.
गुन्हेगारी जीवनासोबतचा संबंध तोडणे
मी टोळीच्या सभांमध्ये जायचं सोडून दिलं आणि याकूझाशी सहवास राखण्याचंही सोडलं. माझ्या विचारसरणीत बदल करणं तितकं सोपं नव्हतं. मी असंच मजेसाठी म्हणून भल्यामोठ्या कारमधून फिरायचो—तोरा मिरवायला. तीन वर्षांनंतर मी माझी कार देऊन साधारण मॉडेलची कार घेतली. तसंच, कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात सोपा उपाय शोधून काढण्याची माझी मनोवृत्ती होती. तथापि, सत्य शिकताशिकता मला बदल करावे लागतील हे मला कळालं. पण यिर्मया १७:९ म्हणतं त्यानुसार, “हृदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे.” कोणता मार्ग योग्य होता ते मला सांगता येत होतं पण शिकत असलेल्या गोष्टींना अंमलात आणणं कठीण गेलं. माझ्या समस्या मला पर्वतासारख्या अवाढव्य वाटायच्या. मी अतिशय त्रासून जायचो आणि पुष्कळदा अभ्यास सोडून द्यावा आणि यहोवाचा साक्षीदार बनण्याचा विचार मनातून काढून टाकावा असं मला वाटायचं.
मग, माझ्यासोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीने एकदा आमच्या मंडळीत भाषण द्यायला आलेल्या प्रवासी पर्यवेक्षकांना माझ्याकडे येण्याचं आमंत्रण दिलं; त्यांची पार्श्वभूमी काहीशी माझ्यासारखीच होती. अकीटावरून म्हणजे ६४० किलोमीटरच्या अंतरावरून ते फक्त मला उत्तेजन द्यायला सझुकाला आले होते. त्यानंतर, जेव्हा मला कंटाळा यायचा आणि सगळं काही सोडून द्यायचा विचार माझ्या मनात यायचा तेव्हा मी प्रभूच्या मार्गात खंबीरपणे चालत आहे का असं त्यांचं पत्र मला मिळायचं.
याकूझा टोळीशी सर्व संबंध तोडून टाकायला मी यहोवाकडे मदत मागत राहिलो. यहोवा माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल अशी मला खात्री होती. शेवटी एप्रिल १९८७ मध्ये, मला याकूझा संघटनेतून सुटका मिळाली. माझ्या स्वतःच्या व्यापारामुळे दर महिन्याला कुटुंब सोडून परदेशी जावं लागत असल्यामुळं मी साफ-सफाईचं आणि दुरुस्ती वगैरे करायचं काम घेतलं. यामुळे दुपारच्या वेळी आध्यात्मिक गोष्टींसाठी सवड मिळायची. आयुष्यात पहिल्यांदा मला पगाराचं पाकीट मिळालं. पगार फार कमी होता पण मला मनापासून आनंद वाटला.
याकूझा संघटनेत माझं दुय्यम स्थान होतं तेव्हा, पैशांची चणचण कधीच भासली नव्हती पण आता माझ्याजवळ कधीही न संपणारी आध्यात्मिक धनसंपत्ती आहे. मला यहोवाची ओळख पटलीय. मला त्याच्या उद्देशांची माहिती झाली आहे. माझं जीवन तत्त्वांनी नियंत्रित आहे. माझी काळजी घेणारे खरे मित्र आहेत. याकूझा जगात, बाकीचे सोबती काळजी आहे असं वरच्यावर दाखवायचे, पण इतरांसाठी स्वतःचा जीव देईल असा अक्षरशः एकही याकूझा नव्हता.
ऑगस्ट १९८८ मध्ये, मी यहोवाला केलेले समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याने चिन्हांकित केले, आणि पुढच्याच महिन्यापासून माझ्या जीवनात कशामुळे बदल झाला त्याविषयी इतरांना सांगण्यात प्रत्येक महिन्याला ६० तास खर्च करू लागलो. मार्च १९८९ पासून मी पूर्ण-वेळेचा सेवक या नात्याने सेवा करत आहे आणि आता मला मंडळीत सेवा सेवक म्हणून कार्य करण्याचा सुहक्क मिळाला आहे.
माझ्या याकूझा जीवनाचे नामोनिशाण काढून टाकण्याचा मी प्रयत्न केला. पण, एक निशाणी मात्र अजूनही आहे. माझ्या शरारीवरचं गोंदण मला, माझ्या परिवाराला आणि इतरांनाही माझ्या याकूझा जीवनशैलीची आठवण करून देतं. एकदा, माझी थोरली मुलगी शाळेतून रडत घरी आली आणि म्हणू लागली की, मी याकूझा होतो आणि माझ्या अंगावर गोंदलंय असं तिच्या मैत्रिणींनी तिला सांगितल्यामुळे ती शाळेला जाणार नाही. मी माझ्या मुलींशी त्याविषयी सविस्तर चर्चा केली आणि मग त्यांना सगळं कळालं. पृथ्वीचे परादीस बनेल आणि माझं शरीर “बालकाच्यापेक्षा टवटवीत” होईल त्या दिवसाची मी उत्कंठतेने वाट पाहत आहे. मग माझ्या अंगावरचं हे गोंदण आणि २० वर्षांचं याकूझा जीवन गतकाळात जमा होतील. (ईयोब ३३:२५; प्रकटीकरण २१:४)—यासुओ काटाओका यांनी निवेदित केल्यानुसार.
[२६ पानांवरील चित्र]
माझ्या अंगावरचं गोंदण निघून जाईल त्या दिवसाची मी वाट पाहत आहे
[२८ पानांवरील चित्र]
राज्य सभागृहात माझ्या कुटुंबासोबत