बायबलने बदलले जीवन!
मोटारसायकली, अंमली पदार्थांचे सेवन आणि खेळ यांच्यापलिकडे विचारच करू न शकणाऱ्या व्यक्तीने, देवाची सेवा पूर्ण वेळ करण्याची निवड कशी काय केली? एक अट्टल जुगारी त्याच्या या व्यसनातून मुक्त होऊन, मानाने पैसा कमवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास कसा प्रवृत्त झाला? यहोवाची साक्षीदार म्हणून वाढलेल्या परंतु वाट चुकलेल्या एका स्त्रीने परत बायबल तत्त्वांचे पालन करायचे का ठरवले? त्यांच्याच तोंडून त्यांचे अनुभव ऐकूया.
संक्षिप्त जीवनचरित्र
नाव: टेरेन्स जे. ओब्रायन
वय: ५७
देश: ऑस्ट्रेलिया
माझा गतकाळ: अंमली पदार्थांचे सेवन, मोटारसायकलींचे वेड
माझी पूर्व जीवनशैली: माझं बालपण, क्वीन्सलँडची राजधानी असलेल्या ब्रिसबेन नावाच्या गजबजलेल्या शहरात गेलं. आमचं कुटुंब कॅथलिक होतं. पण मी आठ वर्षांचा झाल्यावर आम्ही चर्चला जायचं थांबवलं आणि घरात कधीच धर्माचा उल्लेख केला नाही. दहा वर्षांचा झालो तेव्हा आमचं कुटुंब ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट नावाच्या भागात राहायला आलं. आमचं घर समुद्र किनारी असल्यामुळे किशोरवयात मी पोहण्याचा व सर्फिंगचा मनसोक्त आनंद लुटला.
तरीपण माझं बालपण सुखाचं नव्हतं. मी आठ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील घर सोडून निघून गेले. माझ्या आईनं दुसरं लग्न केलं. आमच्या घरात, मद्यपान आणि भांडणतंटे रोजच व्हायचे. एकदा रात्री माझ्या आईवडिलांचं कडाक्याचं भांडण झालं. मी माझ्या बिछान्यावर बसून हे सर्व पाहत होतो. तेव्हाच मी मनाशी ठरवलं, की मी लग्न केलंच तर मी माझ्या बायकोशी कधीच भांडणार नाही. आमच्या घरात भांडणं व्हायची तरीपण आमचं कुटुंब, म्हणजे आम्ही सहा भावंडं, आई आणि सावत्र वडील एकत्रच होतो.
मी सतरा-अठरा वर्षांचा होतो तेव्हा माझे मित्र अधिकाराविरुद्ध बंड करायचे. गांजा, तंबाखू व इतर अंमली पदार्थ नेमके काय असतात म्हणून मौजेखातर घेऊन पाहायचे. शिवाय ते मद्यपानही करायचे. माझ्या मित्रांसारखाच मीसुद्धा स्वच्छंदी बनलो होतो. मला मोटारसायकली चालवायला खूप आवडायचे. पुष्कळदा माझे मोठमोठे अपघात झाले होते तरीपण मोटारसायकलींचं माझं वेड काही केल्या कमी झालं नाही. मोटारसायकलीवरून संपूर्ण ऑस्ट्रेलियात भ्रमंती करायचं मी ठरवलं.
तसं पाहायला गेलो तर मी स्वतंत्र होतो तरीपण जगाची अवस्था पाहून, बहुतेक लोक इतरांच्या समस्यांबद्दल इतके बेपर्वा कसे असू शकतात हा विचार करून मी खूप अस्वस्थ व्हायचो. देव, धर्म, जगाची परिस्थिती यांबद्दल काय खरं आहे, हे जाणून घेण्याची माझी उत्कट इच्छा होती. मी दोन कॅथलिक पाळकांना मला सतावत असलेले प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरांनी मी निराश झालो. मग मी वेगवेगळ्या प्रोटेस्टंट सेवकांबरोबर या विषयांवर चर्चा केली. कोणीच मला समाधानकारक उत्तरं दिली नसल्यामुळे मी उदास झालो. मग एकदा माझ्या एका मित्राने, एडी नावाच्या एका यहोवाच्या साक्षीदाराबरोबर माझी गाठ घालून दिली. एडीबरोबर माझी चार वेळा चर्चा झाली आणि प्रत्येक वेळा त्यानं माझ्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधून दिली. पहिल्या चर्चेपासूनच मला सारखं वाटतं होतं, की मला काही तरी खास गवसलय. पण, माझ्या जीवनशैलीत मी बदल केले पाहिजेत, असं तेव्हा मला वाटलं नाही.
बायबलनं माझं जीवन बदललं: ऑस्ट्रेलियात भ्रमंती करताना माझी भेट आणखी एका यहोवाच्या साक्षीदाराबरोबर झाली. त्याच्याबरोबरही माझी चर्चा झाली. पण क्वीन्सलँडला परत आल्यावर सहा महिन्यांपर्यंत साक्षीदारांबरोबर माझा काहीच संपर्क नव्हता.
एकदा मी कामावरून घरी येत असताना, नीटनेटके कपडे घातलेल्या व हातात ब्रीफकेस असलेल्या दोन पुरुषांना रस्त्यावरून जाताना पाहिलं. हे यहोवाचे साक्षीदारच असावेत असं मला वाटलं. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना तसं विचारलं. त्यांनी होकार दिल्यावर, तुम्ही माझ्याबरोबर बायबलचा अभ्यास कराल का, असं त्यांना विचारलं. त्यानंतर मी साक्षीदारांच्या सभांनाही जाऊ लागलो व १९७३ साली सिडनीमध्ये भरलेल्या एका मोठ्या अधिवेशनालाही गेलो. पण माझ्या घरातल्या लोकांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते, विशेषकरून माझी आई माझ्यावर खूप चिडली. या व इतर कारणांसाठी मग मी साक्षीदारांबरोबरचा माझा सहवास थांबवला. एक वर्षभर मी, मला असलेल्या आणखी एका छंदात म्हणजे क्रिकेट खेळण्यात माझा वेळ घालवला.
पण नंतर मला जाणवलं, की खरं तर यहोवाच्या साक्षीदारांबरोबर मी बायबलचा अभ्यास करत होतो तेव्हाच मी आनंदी असायचो. म्हणून मग मी पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधला आणि सभांना जाऊ लागलो. अंमली पदार्थ घेणाऱ्या माझ्या मित्रांनाही मी सोडून दिलं.
बायबलमधून शिकलेल्या ईयोबाच्या उदाहरणामुळे मी खरं तर माझ्या जीवनात बदल केले. बिल नावाचे एक दयाळू परंतु कडक स्वभावाचे साक्षीदार बांधव माझ्याबरोबर बायबल विषयांवर चर्चा करायचे. ईयोबाच्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी मला एक प्रश्न विचारला: ईयोबाव्यतिरिक्त आणखी कोण कोण यहोवाची अर्ध्या मनानं सेवा करत असल्याचा खोटा आरोप सैतानानं केला आहे? (ईयोब २:३-५) मी बायबलमधल्या मला माहीत असलेल्या सर्व पात्रांची नावं सांगितली आणि बंधू बिल यांनी, “हो, त्यांच्यावरसुद्धा सैतानानं आरोप केला आहे,” असं शांतपणे उत्तर दिलं. मग माझ्याकडे पाहत ते मला म्हणाले: “सैतानानं आरोप केलेल्या लोकांमध्ये तूही सामील आहेस.” हे ऐकून मी जवळजवळ उडालोच! या चर्चेआधी माझी खात्री पटली होती, की मी शिकत असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. पण, आता मला जाणवलं, की मी शिकत असलेल्या गोष्टींचा माझ्या जीवनात अवलंब का केला पाहिजे. यानंतर चार महिन्यांनी मी बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा साक्षीदार झालो.
मला काय फायदा झाला: बायबलमधील स्तरांनुसार जीवन कसं जगायचं हे जर मी शिकलो नसतो तर माझं जीवन कसं असतं या नुसत्या विचारानंच मला धडकी भरते. मी कदाचित आज जिवंत नसतो. माझे अनेक दोस्त एकतर ड्रग्जमुळे किंवा मद्यपानामुळे मरण पावले. त्यांचं वैवाहिक जीवनही समाधानी नव्हतं. त्यांच्याकडे पाहून मला वाटतं, माझी गत त्यांच्यासारखीच झाली असती.
आता माझं लग्न झालं आहे आणि माझी बायको मार्ग्रेट आणि मी, सध्या ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयात सेवा करत आहोत. माझ्या कुटुंबातलं कोणीच यहोवाची उपासना करत नाही. पण मार्ग्रेट व मला अनेक लोकांबरोबर व जोडप्यांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याची सुसंधी मिळाली. या सर्वांनी माझ्याप्रमाणेच आपल्या जीवनात बदल केले आहेत. आम्हाला खूप चांगले मित्र लाभले आहेत. शिवाय, साक्षीदार म्हणूनच लहानाची मोठी झालेल्या मार्ग्रेटनं, जवळजवळ ४० वर्षांपूर्वी मी मनाशी जे ठरवलं होतं त्यानुसार वागण्यास मला साथ दिली आहे. आमच्या लग्नाला २५ पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. आम्ही दोघं सुखानं संसार करीत आहोत. सगळ्याच गोष्टीत आमचं पटतं असं नाही पण आमच्यात भांडणं होत नाहीत. बायबलमुळेच हे शक्य झालं आहे, असं आम्हा दोघांना वाटतं.
संक्षिप्त जीवनचरित्र
नाव: मासाहिरो ओकाबायाशी
वय: ३९
देश: जपान
माझा गतकाळ: जुगारी
माझी पूर्व जीवनशैली: नागोयापासून ट्रेननं अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या इवाकुरात मी लहानाचा मोठा झालो. हे ठिकाण त्यामानानं जरा लहानच आहे. माझे आईवडील दोघंही दयाळू होते. पण नंतर मला समजलं, की माझे वडील याकुजा होते म्हणजे एक गुंड होते. खरं तर काही काळ फसवाफसवीचे धंदे करून त्यांनी आम्हा पाच जणांना सांभाळलं. ते दररोज खूप दारू प्यायचे आणि मी २० वर्षांचा असताना ते यकृताच्या विकारानं मरण पावले.
माझे वडील कोरियन असल्यामुळे, समाजातले लोक आमच्या कुटुंबाला खालच्या दर्जाचे लेखायचे. या आणि इतर समस्यांमुळे माझं तरुणपण दुःखात गेलं. शाळेत माझं नाव घातलं होतं पण मी नेहमी दांड्या मारायचो आणि एक वर्षानंतर तर मी शाळाच सोडून दिली. पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये, माझ्यावर गुन्हे दाखल असल्यामुळं व मी अर्धा कोरियन असल्यामुळं मला कोणी नोकरी देत नव्हतं. शेवटी कसं तरी मला एक काम मिळालं पण माझ्या गुडघ्याला मार लागल्यामुळे मी जड काम करू शकत नव्हतो.
मग मी पाचिंको अर्थात जुगार खेळू लागलो आणि एका मुलीबरोबर राहू लागलो. मी एखादी पक्की नोकरी करावी व तिच्याशी लग्न करावं असं ती मला सारखं सांगायची. पण जुगारात मी खूप पैसा कमवत होतो आणि मला माझी जीवनशैली बदलायची नव्हती.
बायबलनं माझं जीवन बदललं: एकदा, एक यहोवाचा साक्षीदार आमच्या घरी आला आणि त्यानं मला जीवनाची सुरुवात कशी झाली? उत्क्रांतीने की उत्पत्तीने? हे पुस्तक दिलं. मी आयुष्यात पूर्वी कधी या प्रश्नावर विचार केला नव्हता. पण हे पुस्तक वाचल्यानंतर, बायबलची अधिक माहिती घेण्यास मी तयार झालो. मेल्यानंतर काय होतं हा प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा. या आणि आणखी इतर प्रश्नांची स्पष्ट उत्तरं बायबलमधून मिळाल्यावर, जणू काय माझ्या डोळ्यांवरच्या खपल्या पडल्या असं मला वाटलं.
बायबलमधून मी शिकत असलेल्या गोष्टी माझ्या जीवनात लागू केल्या पाहिजेत, याची मला जाणीव झाली. मी जिच्याबरोबर राहत होतो तिच्याबरोबर कायदेशीररीत्या लग्न केलं, धुम्रपान सोडून दिलं, लाल रंगवलेले व वाढवलेले केस कापले आणि गबाळपणे राहणं सोडून दिलं. तसंच मी जुगारही सोडून दिला.
हे सर्व बदल करणं मला सोपं नव्हतं. उदाहरणार्थ, मी स्वतःच्या बळावर तंबाखूची सवय सोडू शकलो नाही. यहोवा देवाला कळकळीने प्रार्थना केल्यामुळं व त्याच्यावर पूर्ण विसंबून राहिल्यामुळं मी ही सवय सोडू शकलो. तसेच, पाचिंको जुगार खेळायचं सोडून दिल्यानंतर मला जी नोकरी मिळाली ती करणे देखील माझ्यासाठी कठीण होतं. जुगारातून मी जितकं कमवत होतो त्याच्या निम्मंच आता मिळत होतं. शिवाय हे काम कष्टाचं होतं. पण बायबलमधील फिलिप्पैकर ४:६, ७ या वचनांनी मला हा कठीण काळ निभावून नेण्यास मदत केली. त्यात म्हटलं आहे: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” बायबलमधील या अभिवचनाचा पुष्कळदा मला अनुभव आला आहे.
मला काय फायदा झाला: यहोवाच्या साक्षीदारांबरोबर मी बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या बायकोला हे आवडलं नाही. पण तिनं जेव्हा माझ्या वागणुकीतले मोठे बदल पाहिले तेव्हा तीही माझ्याबरोबर बायबल अभ्यासाला बसू लागली आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना माझ्याबरोबर येऊ लागली. आता आम्ही दोघंही यहोवाचे साक्षीदार आहोत. एकत्र मिळून यहोवाची सेवा करणं खरोखरच किती मोठा आशीर्वाद आहे!
बायबलचा अभ्यास करण्यापूर्वी मला वाटायचं, की मी आनंदी आहे. पण आता मला, खरा आनंद काय आहे ते कळालं आहे. बायबलच्या तत्त्वांनुसार जगणं तसं सोपं नाही, पण हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी माझी खात्री पटली आहे.
संक्षिप्त जीवनचरित्र
नाव: एलिझबेथ जेन श्कोफिल्ड
वय: ३५
देश: संयुक्त राज्य
माझा गतकाळ: शनिवार-रविवार मौजमजा करण्यासाठी जगणं
माझी पूर्व जीवनशैली: स्कॉटलंडमधील ग्लासगो शहराच्या बाहेर असलेल्या हार्डगेट नावाच्या एका लहानशा गावात मी लहानाची मोठी झाले. मी सात वर्षांची होते तेव्हा यहोवाची साक्षीदार बनलेल्या माझ्या आईनं मला बायबल शिकवायला सुरुवात केली. पण मी १७ वर्षांची झाले तेव्हा मला माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवायला म्हणजे, त्यांच्याबरोबर नाईट क्लब्सला जाण्यास, हेवी मेटल संगीत ऐकण्यास, मद्यपान करण्यास आवडू लागलं. देव, बायबल या गोष्टींशी मला काही देणं-घेणं नव्हतं. शनिवार-रविवार कधी येतो त्याची मी वाट पाहायचे कारण मला फक्त मौजमजा करायची होती. पण मी जेव्हा २१ वर्षांची झाले तेव्हा सर्वकाही बदललं.
उत्तर आर्यलंडमध्ये राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांकडं मी सुटीला गेले होते. तिथं असताना मी प्रोटेस्टंट लोकांची ऑरेंज वॉक नावाची एक मोठी मिरवणूक पाहिली. त्या प्रसंगी, प्रोटेस्टंट व कॅथलिक यांच्यामधील द्वेष व धर्मवेडेपणा मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. हे पाहून मला धक्का बसला व मी शुद्धीवर आले. आईनं बायबलमधून शिकवलेल्या गोष्टी मला आठवल्या. देवाच्या प्रेमळ दर्जांकडं दुर्लक्ष करणाऱ्या लोकांचा देव स्वीकार करत नाही हे मला माहीत होते. तेव्हा मला जाणीव झाली, की मी तर माझ्याच स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यात गुंग झाले होते; मी माझं जीवन कसं जगलं पाहिजे याबद्दल देवाच्या इच्छेकडं कानाडोळा करत होते. तेव्हाच मी ठरवलं, की मी स्कॉटलंडला घरी गेल्यावर बायबल खरोखरच काय शिकवतं त्याचं गंभीरपणे परीक्षण करून पाहीन.
बायबलनं माझं जीवन बदललं: आईबरोबर मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला पहिल्यांदा गेले तेव्हा मला अवघडल्यासारखं वाटत होतं. पण सर्वांनी माझं प्रेमानं स्वागत केलं. बायबलमधून शिकलेल्या गोष्टींचे मी पालन करू लागले आणि मंडळीतल्या एका प्रेमळ बहिणीनं माझ्याशी दोस्ती केली. पुन्हा एकदा मंडळीचा सदस्य बनण्यास तिनं मला खरोखरच मदत केली. माझे पूर्वीचे मित्रमैत्रिणी मला नाईटक्लबला जायला बोलवायचे पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी आता बायबल दर्जांनुसार जगणार आहे. हळूहळू त्यांनी माझ्याशी संपर्क तोडून टाकला.
पूर्वी मला बायबल हे नियमांचं पुस्तक वाटायचं. आता माझा दृष्टिकोन बदलला. मला जाणवलं, की बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेले लोक माझ्यासारखेच खरे लोक होते, त्यांच्याही माझ्यासारख्याच भावना व कमतरता होत्या. त्यांच्याही हातून चुका झाल्या होत्या व त्यांनी जेव्हा मनापासून पश्चात्ताप केला तेव्हा यहोवानं त्यांना क्षमा केली होती. यातून माझा हा आत्म-विश्वास वाढला, की तरुण असताना मी जरी यहोवाकडे पाठ फिरवली होती तरी आता मी त्याला संतुष्ट करायचा प्रयत्न केला तर तो मला क्षमा करेल आणि माझ्या चुका विसरून जाईल.
माझ्या आईच्या वर्तनाचा देखील माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला. मी यहोवाला सोडून दिलं पण ती त्याच्याशी जडून राहिली. तिची चिकाटी व एकनिष्ठा पाहून मला जाणवलं, की यहोवाची सेवा करण्याकरता आपल्याला करावे लागणारे प्रयत्न वाया जाणार नाहीत. लहान असताना मी आईबरोबर घरोघरच्या प्रचार कार्याला जायची खरी, पण हे कार्य मी आनंदानं करत नसे. लोकांना देवाबद्दल तास न् तास इतकं काय सांगायचय हेच मला समजत नव्हतं. पण आता मी मत्तय ६:३१-३३ मध्ये येशूनं दिलेलं वचन अजमावून पाहायचं ठरवलं. या वचनांत त्यानं म्हटलं आहे: “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. . . . तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” बाप्तिस्मा घेऊन यहोवाची साक्षीदार बनल्यानंतर मी माझी पूर्ण वेळेची नोकरी सोडून दिली, अर्धवेळ नोकरी धरली आणि पूर्ण वेळेची ख्रिस्ती सेवक बनले.
मला काय फायदा झाला: तरुण असताना मी फक्त शनिवार-रविवारखातर जीवन जगत होते, तरीपण मी समाधानी नव्हते. माझ्या जीवनात एक प्रकारची पोकळी मला जाणवायची. पण आता मी स्वतःला यहोवाची सेवा करण्यात झोकून दिलं असल्यामुळे मी समाधानी आहे. माझ्या जीवनाला अर्थ व उद्देश आहे. आता माझं लग्न झालं आहे आणि मी व माझा नवरा, दर आठवडी यहोवाच्या साक्षीदारांच्या वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देऊन तेथील बंधूभगिनींना उत्तेजन देतो. हे काम माझ्या जीवनातला सर्वात मोठा विशेषाधिकार आहे, असं मला वाटतं. यहोवानं मला पुन्हा एक संधी दिल्याबद्दल मी त्याचे खूप आभार मानते. (w०९-E ११/०१)
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पहिल्या चर्चेपासूनच मला सारखं वाटत होतं, की मला काही तरी खास गवसलय. पण, माझ्या जीवनशैलीत मी बदल केले पाहिजेत, असं तेव्हा मला वाटलं नाही”
[३१ पानांवरील संक्षिप्त आशय]
“मी स्वतःच्या बळावर तंबाखूची सवय सोडू शकलो नाही. यहोवा देवाला कळकळीने प्रार्थना केल्यामुळे व त्याच्यावर पूर्ण विसंबून राहिल्यामुळे मी ही सवय सोडू शकलो”
[३२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पूर्वी मला बायबल हे नियमांचं पुस्तक वाटायचं. आता माझा दृष्टिकोन बदलला. मला जाणवलं, की बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेले लोक माझ्यासारखेच खरे लोक होते, त्यांच्याही माझ्यासारख्याच भावना व कमतरता होत्या”