संघटित गुन्हेगारीची भरभराट का होते?
संयुक्त संस्थाने दारूबंदी शतकातील (१९२०-३३) कुविख्यात गँगस्टर ॲल कपोन याने दावा केला की तो केवळ कायद्याचे,—पुरवठा आणि मागणीच्या कायद्याचे पालन करणारा एक व्यापारी आहे. जपानमधील सर्वात मोठ्या याकूझा स्थापनेसाठी कार्य करणाऱ्या एका वकिलाने असे म्हटले: “[शरीरसुख, मादक पदार्थ आणि जुगार] यांच्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टींची जोरदार मागणी आहे हे सत्य नाकारता येत नाही.” या मागणीमुळे संघटित गुन्हेगारीला खतपाणी मिळते. स्वतः गुन्हेगारीला बळी पडण्याची कुणाचीही इच्छा नसली तरीसुद्धा, काहीजण गुन्हेगारी संघटनांची मदत घेतात आणि त्यांच्याद्वारे मिळणाऱ्या सेवांचा लाभ घेतात.
उदाहरणार्थ, अनेक देशांतल्या टोळ्यांचे पैसा कमवण्याचे मुख्य माध्यम म्हणजे संरक्षण रॅकेट्स आहेत. प्रसंगी ते प्रामाणिक दुकानदारालाही बळीचा बकरा बनवत असले तरीसुद्धा ते सहसा आक्षेपार्ह उद्योग चालवणाऱ्यांनाच लुटतात. शीन्युक्यू, टोकियो येथे व्हिडियो गेम पार्लरच्या नावाखाली धंदा करणाऱ्या एका जुगार अड्ड्याच्या मालकाने म्हटले: “मागे एका क्लर्कला चाकूने भोसकून, २० लाख [येन (२०,००० डॉलर)] लुटण्यात आले. पण, आम्ही पोलिसांना बोलावले नाही.” का बरं? “कारण आम्ही बेकायदेशीर धंदा (जुगार) करतो, आम्हाला पोलिसांचे लफडे नको असतात. एखाद्या ग्राहकाने गडबड केलीच तर आम्ही याकूझांना बोलावतो.” जुगार अड्ड्याच्या या मालकाला याकूझांना दर महिन्याला ४,००० डॉलर द्यावे लागतात, पण तेवढ्या एका महिन्यातच त्याला आपल्या बेकायदेशीर धंद्यातून जो ३,००,००० डॉलरचा नफा होतो त्याच्या तुलनेत ही रक्कम फारच लहान आहे. एवढा पैसा येतो कोठून? अर्थात, बेकायदेशीर जुगाराची मौज लुटणाऱ्यांच्या खिशातून.
अब्रूदार उद्योगधंदे करणाऱ्यांपैकीही, ज्यांना अडचणी टाळायच्या असतात त्यांचीही सारखीच परिस्थिती असते. न्यूयॉर्क येथील एका अधिकारसूत्राच्या अंदाजानुसार, गँगस्टर्सचा खिसा गरम केल्यामुळे वर्षाला १ कोटी ५० लाख डॉलर कमवणाऱ्या एका पेन्टिंग कॉन्ट्रॅक्टरचे ३८ लाख डॉलर वाचले. त्यांना पैसा दिल्यामुळे या कॉन्ट्रॅक्टरला निम्न-मजूरीवर कामगारही मिळाले आणि टोळीचे नियंत्रण असलेल्या युनियनच्या भानगडी पण टळल्या. जपानमध्ये आर्थिक भरभराटीच्या काळात भांडवल पुरवणाऱ्या अनेकांनी स्थावर संपत्तीत आपला पैसा लावला आणि दिमाखदार इमारती उभ्या करण्यासाठी जुनी घरे, दुकाने जमीनदोस्त केली. त्या ठिकाणी राहणारे लोक दुसरीकडे जायला किंवा आपली जमीन विकायला तयार झाले नाहीत, तेव्हा या गुंतवणूकदारांनी त्यांना जबरदस्तीने घालवण्यासाठी याकूझा-संबंधित कंपन्या, अर्थात, जीआगेआ यांची मदत घेतली.
८० च्या दशकात, कर्ज घेऊन पैसा कमवणे अगदीच सोपे आहे हे याकूझांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी कंपन्या स्थापन करून स्थावर संपत्तीचा व्यापार आणि स्टॉक्सची सट्टेबाजी सुरू केली. बँकांनी व वित्तीय संस्थांनी, अर्थातच स्वतःच्या फायद्यासाठी या कंपन्यांमध्ये भरमसाट पैसा ओतला. तथापि, शेवटी त्यांना जेव्हा जबरदस्त तडाखा बसला, तेव्हा बँकांना आपला पैसा वसूल करणे अतिशय कठीण गेले. जपानमध्ये काही काळापासून चाललेल्या सौम्य मंदीबद्दल न्यूजवीक नियतकालिकाशी बोलताना एका माजी पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले: “थकबाकी-कर्जाच्या समस्या तातडीने न सोडवता येण्याचे मूळ कारण म्हणजे यांपैकी पुष्कळांचा संघटित गुन्हेगारीशी संबंध आहे.”
वस्तुतः, कोणत्याही मार्गाने का होईना पण आपल्या वासना तृप्त करायला जेव्हा लोक उत्सुक असतात तेव्हा समाजात गुन्हेगारीला अंकुर फुटतो आणि तिची भरभराट होते. भोगविलासाची कामना, लैंगिक वासना आणि धनसंपत्तीच्या हव्यासामुळे मादक पदार्थांचा अवैध व्यापार, वेश्याव्यवसाय, जुगार आणि अवास्तव व्याजावर सावकारी करणे यांसारख्या गैरधंद्यांना वाव मिळतो. अशा गोष्टींमध्ये सामील होऊन लोक सहसा गुन्हेगारी टोळ्यांच्या भरभराटीला हातभार लावत असतात. संघटित गुन्हेगारी ही स्वतःच्या विषयासक्त वासना तृप्त करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणाऱ्या लोकांच्याच मागण्या पूर्ण करते हे निर्विवाद सत्य आहे!
कृत्रिम कौटुंबिक व्यवस्था
गैरधंद्यांच्या मागणीव्यतिरिक्त, आजच्या काळात आणखी एक गरज आढळते, जिच्यामुळे संघटित गुन्हेगारीला वाव मिळतो. आपण केवळ कायद्याने वाळीत टाकलेल्यांना आश्रय देऊन त्यांना जिव्हाळ्याने वागवतो आणि अशा रितीने आणखी कोडगे बनण्यापासून त्यांना वाचवतो असा जपानमधील सर्वात मोठ्या याकूझा संघटनेच्या दिवंगत प्रमुखाचा दावा होता. तो स्वतःला टोळीतल्या गुंडांचा वडील म्हणवत होता. कोणत्याही राष्ट्राच्या असल्या तरीसुद्धा, बव्हंशी क्राइम सिंडिकेट्स अशाच प्रकारच्या कृत्रिम कौटुंबिक नात्यांच्या आधारावर आपल्या संघटना उभ्या करत असतात.
हाँगकाँग येथल्या एका गरीब कुटुंबातून आलेल्या ची सनa याचेच उदाहरण घ्या. त्याचे वडील त्याला सहसा लहानसहान कारणांवरून मारहाण करायचे. कोवळ्या वयातच ची सन बंडखोर बनला आणि वयाच्या १२ व्या वर्षीच तो ट्रायड्स नामक कुविख्यात गुन्हेगारी संघटनेत सामील झाला. या संघटनेबद्दल त्याला “आपुलकी” वाटू लागली. सशस्त्र चकमकींमध्ये त्याने दाखवलेल्या धाडसामुळे त्याला लवकरच बढती मिळाली आणि तो अनेक गुंडांचे नेतृत्त्व करू लागला. शेवटी, जेमतेम १७ वर्षांचा असताना त्याला गजाआड करण्यात आले.
स्वतःच्या घरात कौटुंबिक जिव्हाळा नसल्यामुळे ची सन याच्यासारखे अनेकजण गुन्हेगारी संघटनांचा आश्रय घेतात. संघटनेतील सदस्य वरकरणी जिव्हाळा दाखवतात खरा, पण वास्तविकतः प्रत्येक सदस्याला आपापला स्वार्थ आहे याचा प्रत्यय आल्यावर अननुभवी तरुणांची घोर निराशा होते.
तेजस्वी स्वर्गदूत
जपान येथल्या सर्वात मोठ्या गुन्हेगारी समूहाला १९९२ साली एका नवीन गँगविरोधी कायद्याखाली हिंसक गट ठरवण्यात आले तेव्हा या समूहाच्या प्रमुखांपैकी एकाच्या म्हणण्यानुसार या गटाचे सदस्य स्वतःला अनीतीविरुद्ध लढणारे “सत्हृदयी” समजत होते. १९९५ साली कोबेला भूकंपाचा हादरा बसला तेव्हा याच टोळीने आपल्या आपद्ग्रस्त बांधवांसाठी अन्न, पाणी आणि इतर अत्यावश्यक सामानांचे वाटप केले. असाही ईव्हनिंग न्यूजच्या वृत्तानुसार, “अशाप्रकारच्या औदार्यामुळे, कायद्याने बहिष्कृत केलेले असूनही सन्माननिय असण्याच्या याकूझाच्या जुन्या प्रतिमेला जपानमध्ये नक्कीच पुनरुज्जीवन प्राप्त होणार आहे.”
गुन्हेगारी संघटनांच्या प्रमुखांनी सहसा आपण लोकहितेच्छु आहोत असा दिखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कोलंबियामध्ये मादक पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्या मेडेलिन संघटनेचा कुख्यात प्रमुख, पॉब्लो एस्कोबार याच्याविषयी ॲना कॅरगन यांनी न्यूजवीक नियतकालिकात लिहिले की तो शहरातील झोपडपट्टी निवासीयांच्या नजरेत जणू “काल्पनिक कथांमधील महापुरुष—एका अर्थाने मसीहा, एका अर्थाने रॉबिनहुड आणि पॉट्रोन, अर्थात प्रमुख या नात्याने सरंजाम किंवा गॉडफादर बनला होता.” त्याने मुलांसाठी स्केटिंग करावयासाठी बर्फांगणे आणि गरीबांसाठी राहण्यालायक घरे बांधून दिली; शिवाय, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना नोकऱ्याही मिळवून दिल्या. त्याच्या मोठ्या मनामुळे ज्यांचे ज्यांचे कल्याण झाले त्या सर्वांच्या नजरेत तो महान होता.
आपल्या संघटनेच्या आड लपणारे हे गुन्हेगार, खरे पाहता गुन्हेगारांच्या एका जागतिक सूत्रधाराच्या इशाऱ्यांवर नाचणाऱ्या कठपुतळ्यांसारखे आहेत. बायबल त्याची ओळख करून देते. ‘सैतान स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल.’ (२ करिंथकर ११:१४, १५) सैतान एक वास्तविक व्यक्ती आहे यावर आज बहुतेक लोक विश्वास करत नाहीत. १९ व्या शतकातल्या एका फ्रेंच कवीने म्हटले: “दियाबल आपल्याला तो अस्तित्वातच नाही असे समजण्यास प्रवृत्त करतो ही त्याची सर्वात कावेबाज युक्ती आहे.” तो जणू पडद्यामागेच राहून, केवळ गुन्हेगारी संघटनांचाच नव्हे तर सबंध विश्वातला कारभार आपल्या कह्यात ठेवतो. बायबल स्पष्ट सांगते, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” येशूनेही सैतानाचे वर्णन करताना म्हटले की, “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता . . . तो लबाड व लबाडीचा बाप आहे.”—१ योहान ५:१९; योहान ८:४४.
बायबलमधील भविष्यवाद दाखवून देतात की १९१४ सालापासून दियाबल सैतान अतिशय क्रियाशील राहिला आहे. त्या वर्षापासून, तो देवाच्या लोकांविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी आपल्या सैन्याची जमवाजमव करत आहे. तो मानवजातीला अराजकतेच्या भोवऱ्यात ओढू पाहतो आहे. गुन्हेगारी आणि गुन्हेगारी संघटना आज का फोफावतात याचे मुख्य कारण तोच आहे.—प्रकटीकरण १२:९-१२.
पृथ्वीवरच्या गुन्हेगारी संघटनांच्या प्रमुख सूत्रधाराला कधी निकालात काढले जाईल का? मानवजातीला कधी शांती आणि सुव्यवस्था लाभेल का? सैतानाने पृथ्वीवर प्रस्थापित केलेल्या दुष्ट साम्राज्यातून तुम्ही स्वतःची सुटका करून घेऊ शकता का?
[तळटीपा]
a संबंधितांच्या सुरक्षेसाठी काही नावे बदलण्यात आली आहेत.
[७ पानांवरील चौकट]
तुमच्या कुटुंबाची सुरक्षा कशी कराल
कुटुंबात प्रेमपूर्ण, एकजुटीचे वातावरण नसल्यास कोवळी मुले सहज गुन्हेगारी संघटनांच्या जाळ्यात सापडू शकतात. असे सांगण्यात येते की संयुक्त संस्थानांत टोळी युद्धांत सामील होणारी बव्हंशी तरुण मुले, सहसा हलाखीची परिस्थिती असलेल्या किंवा विघटित कुटुंबांतून आलेली असतात. उत्तर कॅरोलिना येथील एका स्थानबद्धता केंद्राचे अधिकारी सांगतात, “अभावजन्य परिस्थितीतून आल्यामुळे ही मुलं, टोळीचा म्होरक्या आणि त्याच्या चेल्यांमध्ये असणाऱ्या अतूट बंधनानं, तसंच, जीवनात पहिल्यांदाच अनुभवलेल्या, संघटनेतील एकजुटीच्या वातावरणानं अगदीच भारावून जातात.”
पौर्वात्य देशांतही, आपल्या टोळीप्रमुखाच्या सुरक्षेसाठी स्वतःचे समर्पण केलेला एक तरुण याकूझा म्हणतो, “घरी मी सदान्कदा एकटाच असायचो. रक्ताचं नातं असूनही, परस्परांजवळ आम्ही मनातलं बोलून दाखवू शकतो असं मला कधीही वाटलं नाही. . . . पण, या सर्व छोकऱ्यांशी मी अगदी मनातलं बोलू शकतो.” गुन्हेगारी संघटनेचे सदस्य या एकलकोंड्या मुलांना कुटुंबासारख्या वातावरणात आणतात आणि यामुळेच ही मुले त्यांचे ऋणी बनतात.
“याकूझा संघटनेचे लोक खरंच खूप जिव्हाळा लावतात,” असे ओकिनावा येथल्या एका मोटारसायकलस्वार मुलींच्या टोळीचे नेतृत्त्व करणाऱ्या मुलीने म्हटले. “कदाचित ही त्यांची चलाखीही असेल; पण त्याचं काय आहे, की प्रेमाचा ओलावा आम्हाला कधीच लाभलेला नसल्यामुळे साहजिकच आम्ही त्यांच्या वागणुकीनं भारावून जातो.” अल्पवयीन अपराधी मुलींसाठी असलेल्या एका गृहाचे व्यवस्थापकही या गोष्टीला दुजोरा देऊन सांगतात की, टोळीतले गुंड “मुलीचं मन जिंकण्यात खरंच तरबेज असतात.” या एकलकोंड्या मुलींनी त्यांना रात्रीअपरात्री जरी बोलावले तरी हे गुंड लगेच हजर होतात आणि सहसा कोणतेही लैंगिक चाळे न करता त्यांना आपल्या मनातलं बोलू देतात.
ज्या तरुण मुलामुलींना जाळ्यात अडकवायचे असते त्यांना पूर्णपणे कह्यात घेईपर्यंतच त्यांची ही जिव्हाळ्याची मनोवृत्ती टिकते. एकदा का हे तरुण त्यांना वश झाले की मग त्यांची मरेस्तोवर पिळवणूक केली जाते—मुलींची कुंटणखान्यांमध्ये तर मुलांची गुन्हेगारी यंत्रणेत.
तुम्ही तुमच्या प्रियजनांचे संरक्षण कसे करू शकता?
बायबल आदेश देते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” (कलस्सैकर ३:२१) याचा अर्थ पालकांनी आपल्या मुलांना अगदीच मोकाट सोडावे असे नाही. बायबलमधील एका नीतिसूत्रानुसार: “मोकळे सोडिलेले पोर आपल्या आईला खाली पाहावयास लावते.” (नीतिसूत्रे २९:१५) उलटपक्षी, बायबल पित्यांना—आणि मातांना सुद्धा—आपल्या मुलांशी वागताना समंजस असण्याचे, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आणि त्यांच्यासोबत मनमोकळे दळणवळण ठेवण्याचे प्रोत्साहन देते. असे केल्यास, मुले जेव्हा कोणत्याही संकटात सापडतील तेव्हा त्यांना आपल्या आईवडिलांना विश्वासात घ्यावे असे मनापासून वाटेल.
खुले दळणवळण ठेवण्याव्यतिरिक्त, आईवडिलांनी आपापल्या मुलांना जीवनात काही आदर्श घालून देणेही जरुरीचे आहे. असे मार्गदर्शन पित्याला कोठून प्राप्त होऊ शकेल? बायबल म्हणते: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) कौटुंबिक बायबल अभ्यासाच्या सत्रांदरम्यान आपल्या मुलांसोबत बायबलचे परीक्षण करण्यासाठी वेळ काढा. तसेच, त्यांच्या मनात यहोवाबद्दल एक हितावह भय बिंबवा; यामुळे ती नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनानुरूप वागतील आणि असे केल्याने त्यांचेच कल्याण होईल.—यशया ४८:१७.