वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. १६-१८
  • प्लॅटिपस नावाचं कोडं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्लॅटिपस नावाचं कोडं
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्लॅटिपसला पाहायला यायचंय?
  • विलक्षण चोच
  • त्या काट्यांना जरा जपून!
  • अंडी घालण्याचा काळ
  • आमच्या वाचकांचे मनोगत
    सावध राहा!—१९९७
  • अभक्‍त जगात सत्याचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • एड्‌स—साथीचा अंत दिसत नाही
    सावध राहा!—१९९८
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. १६-१८

प्लॅटिपस नावाचं कोडं

ऑस्ट्रेलियामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा प्लॅटिपसला पाहिलं, तेव्हा त्याचं कसं वर्गीकरण करावं हेच त्यांना कळेनासं झालं. एक किलोग्रॅम वजनाचा हा जिवंत विरोधाभास, त्यांच्या काही वैज्ञानिक समजुतींना चक्क आव्हान देत होता! या लक्ष वेधणाऱ्‍या, लाजऱ्‍याबुजऱ्‍या लहानशा गोंडस ऑस्ट्रेलियन प्राण्याला भेटायचंय? तर मग, आधी आपण १७९९ या सालाकडे परत जाऊन, प्लॅटिपसचे कातडे अगदी पहिल्यांदा ब्रिटिश वैज्ञानिकांच्या हाती लागले तेव्हा कसा धुमाकूळ माजला ते पाहू या.

ब्रिटिश संग्रहालयाच्या नॅचरल हिस्ट्री विभागाचे असिस्टंट कीपर डॉ. शॉ यांच्याविषयी सांगताना एक विश्‍वकोष असे म्हणतो की, “त्यांना आपल्या डोळ्यांवर काही केल्या विश्‍वासच बसेना. कुणीतरी एखाद्या चतुष्पाद प्राण्याच्या शरीराला बदकाची चोच जोडली की काय,” अशी शंका त्यांना आली. “त्यांनी ती चोच शरीरापासून वेगळी करण्याचा प्रयत्नही केला, आणि म्हणूनच त्या पहिल्या कातड्यावर त्यांच्या कात्रीच्या खुणा आजही पाहायला मिळतात.”

हे कातडे खरेखुरे आहे याची खात्री पटली तरीसुद्धा वैज्ञानिक गोंधळातच पडले होते. प्लॅटिपस या नावाचा अर्थ “सपाट-पायांचा” असा आहे; या प्राण्याची प्रजोत्पादक संस्था तर पक्षासारखी आहे पण गंमत म्हणजे त्याला स्तन ग्रंथी अर्थात दूध स्रवणाऱ्‍या ग्रंथी देखील आहेत. या विरोधाभासामुळे साहजिकच प्रश्‍न असा उद्‌भवला की, हा जगावेगळा प्राणी अंडी घालतो की नाही?

अनेक वर्षांच्या वादविवादानंतर असे कळून आले की प्लॅटिपस खरोखरंच अंडी घालतो. तथापि, एकेक शोध लागत गेला तसतसा गुंता आणखीनच वाढत चाललाय असं भासू लागलं. आणि यात काही नवल नाही कारण जो प्राणी (१) अंडी घालतो आणि ज्याला स्तन ग्रंथी पण आहेत; (२) ज्याच्या अंगावर फर आहे आणि ज्याला बदकासारखी चोचही आहे; शिवाय (३) सांगाड्यात अनियततापी सरिसृप प्राण्यांची लक्षणं असून जो वास्तविक पाहता नियततापी आहे, अशा विचित्र प्राण्याचे वर्गीकरण करायचे तरी कसे?

कालांतराने, प्लॅटिपस हा मोनोट्रिमॅटा गणातला सस्तन प्राणी आहे यावर वैज्ञानिकांचं एकमत झालं. सरिसृप प्राण्यांसारखे मोनोट्रिमॅटा गणातल्या प्राण्यांतही अंडी, बीज, मल व मूत्र शरीराबाहेर टाकण्यासाठी एक छिद्र अर्थात अवस्कर असते. प्लॅटिपसला वगळता सध्या जिवंत असणारा एकुलता एक मोनोट्रिमॅटा गणातला प्राणी म्हणजे इकिडना. प्लॅटिपसचं शास्त्रीय नाव ऑर्निथोऱ्‍हिन्ककस ॲनॅटिनस असून त्याचा अर्थ, “पक्षाची चोच असलेला बदकासारखा प्राणी” असा आहे.

प्लॅटिपसला पाहायला यायचंय?

तसं एखाद्या प्राणीसंग्रहालयात जाऊनही काम भागलं असतं, पण प्रत्यक्ष जंगलात जाऊन या लब्बाड प्लॅटिपसला गाठायची आगळीच मजा आहे—हा अनोखा अनुभव तर बऱ्‍याचशा ऑस्ट्रेलियन लोकांनीही घेतलेला नाहीय. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडेच असणाऱ्‍या पुष्कळशा गोड्यापाण्याच्या नद्या, नाले, आणि तलावांतही शोध घेता आला असता, पण आपण मात्र ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडे, सिड्‌नीच्या पश्‍चिम दिशेला असणाऱ्‍या ब्लू माउनटन्समध्ये आपला शोध सुरू करू या.

काठाकाठाने निलगिरीचे वृक्ष असणाऱ्‍या, नितळ पाण्याच्या नदीवर एका जुन्या लाकडी पुलाजवळ आपण भल्या पहाटे येतो. पाण्याकडे पाहताना, एक आकृती दिसेल या आशेने आपण काहीही आवाज न करता शांतपणे वाट पाहात असतो. आपल्याला फार वेळ प्रतीक्षा करावी लागत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अंदाजे ५० मीटरच्या अंतरावरून आपल्याकडे येत असलेली एक आकृती आपल्याला दिसते. आता मात्र आपण अजिबातच हालचाल करायला नको.

चोचीमुळे पाण्यात निर्माण होणारे असंख्य तरंग पाहून हा प्लॅटिपसच आहे याची खात्री पटते. नदीच्या तळाशी भटकताना मिळालेलं अन्‍न प्लॅटिपसनं आपल्या तोंडातील पिशव्यांमध्ये साठवलेलं असतं आणि हेच अन्‍न तो आता चावत असल्यामुळे पाण्यावर हे तरंग निर्माण होतात आणि हा प्लॅटिपसच आहे याची आपल्याला सूचना देतात. ऋतूमानाप्रमाणे प्लॅटिपसचा आहार बदलत असला तरीही मुख्यतः कृमी, किटकांचे डिंबक आणि गोड्यापाण्यातील कोळंबी हेच त्याचे अन्‍न होय.

प्लॅटिपसचा लहानसा आकार पाहून तुम्हाला नवल वाटलं का? पुष्कळांना वाटतं. त्यांना प्लॅटिपस हा जवळपास बीव्हर किंवा ऑटर या प्राण्यांएवढा मोठा असेल असं वाटतं. पण जसं तुम्ही पाहातच आहात, तो सर्वसामान्य पाळीव मांजरीपेक्षाही लहान आहे. नराची लांबी ४५-६० सेंटिमीटरइतकी असते आणि त्याचे वजन एक ते अडीच किलोग्रॅम इतके असते. माद्या त्यांपेक्षा थोड्या लहान असतात.

पडदे असलेल्या आपल्या पुढच्या पायांनी आळीपाळीने पाण्यावर मारत असता तो पुढे ढकलला जातो आणि अशा रीतीने तो हळूहळू पुलाच्या दिशेने पोहत येतो. मग हळूच पाण्यात सूर मारून तो एखाददोन मिनिटं पाण्याखालीच राहतो. मागच्या पायांच्या बोटांमध्येही अर्धवट पडदे असून या मागच्या पायांचा उपयोग शरीराला पुढे ढकलण्यासाठी न करता तो त्यांचा सुकाणुंसारखा उपयोग करतो आणि पोहताना त्याच्या शेपटीसोबत त्यांची हालचाल होत असते. तसेच, बिळं करताना त्याचे मागचे पाय शरीराला आधार देतात.

प्लॅटिपसला हालचालीची चाहूल लागल्यास तो जोराने सूर मारतो, पण मग काही तो पुन्हा दिसायचा नाही! म्हणून आपण तो पाण्याखाली असतानाच आपसांत बोलतो. अगदी हळू आवाजात एखादा विचारतो, “या इवल्याशा प्राण्याला ऊब कुठून मिळते, विशेषतः हिवाळ्यातल्या गारठलेल्या पाण्यात?” प्लॅटिपसला याबाबतीत फारसं जड जात नाही; दोन मुख्य कारणांमुळे: एकतर त्याच्या शरीरातली चयापचय क्रिया मोठ्या वेगाने ऊर्जा निर्माण करत असल्यामुळे शरीरात ऊब राहते, शिवाय, त्याच्या शरीरावरच्या दाट फरमुळे ही ऊब कायम राहते.

विलक्षण चोच

प्लॅटिपसची ती मऊ, चामड्यासारखी चोच काही साधीसुधी नाहीये. या चोचीवर स्पर्श व विद्युत्‌ हालचालींसाठी असंख्य संवेदना इंद्रिये असतात. नदीच्या तळाशी गेल्यावर प्लॅटिपस आपली चोच आजूबाजूला हळुवारपणे हलवत वेध घेतो आणि आपल्या भक्ष्याच्या स्नायूंच्या आकुंचनांमुळे निर्माण झालेल्या मंद विद्युत्‌ क्षेत्रांचाही त्याला चटकन पत्ता लागतो. पाण्याखाली असताना ही चोच बाह्‍य परिसराशी संपर्कात राहण्याचे त्याचे मुख्य माध्यम असते कारण त्याचे डोळे, कान व नाक पूर्णपणे बंद असतात.

त्या काट्यांना जरा जपून!

हा छोटासा प्लॅटिपस नर असल्यास, त्याच्या मागच्या पायांच्या घोट्यांमागे दोन काटे असतील जे वाहिन्यांद्वारे त्याच्या मांडीच्या भागातील दोन विष ग्रंथींना जोडलेले असतात. घोडेस्वार आपल्या घोड्याला आर टोचतो त्याचप्रकारे प्लॅटिपस स्वतःवर हल्ला करणाऱ्‍याच्या शरीरात हे दोन्ही काटे जोराने खुपसतो. यामुळे सुरवातीला जोरदार धक्का तर बसतोच पण त्यानंतर लगेच, अत्यंत वेदना होऊन शरीराच्या त्या विशिष्ट भागावर सूज येते.

कैदेत मात्र प्लॅटिपस कुत्र्यांच्या लहान पिलासारखाच माणसाळतो. व्हिक्टोरिया येथील हील्सविल्‌ सँच्युरीमध्ये कितीतरी दशकांपासून या प्राण्यांना ठेवण्यात आले आहे आणि अहवालानुसार असं सांगितलं जातं, की काही वर्षांपूर्वी एक प्लॅटिपस “आपल्या पोटाला गुदगुल्या कराव्यात म्हणून पुन्हापुन्हा आडवातिडवा होऊन सँच्युरीला भेट देणाऱ्‍यांचे तासन्‌तास मनोरंजन करत असे . . . या इवल्याशा असाधारण प्राण्याला पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करायचे.”

पूर्वेकडील डोंगरांवर सूर्याची कोवळी किरणं पडताच आपला हा दोस्त आता आजचा शेवटचा सूर मारतो. रात्रभर त्याने स्वतःच्या वजनाच्या पंचमांश भागाएवढं, नव्हे त्याहीपेक्षा जास्त अन्‍न खाल्लंय. तो पाण्याबाहेर येतो तेव्हा त्याच्या पुढच्या पायांच्या बोटामधले पडदे आकसले जातात आणि त्याची अणकुचीदार नखं दिसू लागतात. आता तो आपल्या अनेक बिळांपैकी एकाच्या दिशेने निघतोय; ही बिळं झिजून बुजू नयेत म्हणून झाडांच्या मुळांमध्ये मोठ्या हुशारीने खोदलेली असतात. घरट्याची कोठी असलेली बिळं सहसा, सुमारे आठ मीटर लांब असतात पण इतर बिळं एक मीटर ते जवळजवळ तीस मीटर लांब असू शकतात आणि त्यांच्यातून कधीकधी आणखी अनेक लहान बिळं निघतात. अत्यंत थंड किंवा उष्ण हवामानापासूनही या बिळांत संरक्षण मिळतं आणि या उबदार घरट्यांत माद्या आपल्या लहान पिलांचं संगोपन करतात.

अंडी घालण्याचा काळ

वसंत ऋतूत मादी आणखीन खोलवर, गवताचे अस्तर असलेल्या आपल्या बिळात जाऊन एक ते तीन (सहसा दोन), अंगठ्याच्या नखाएवढी अंडी घालते. ही अंडी ती आपल्या शरीरात आणि गुबगुबीत शेपटीत गुंडाळून उबवते. साधारण दहा दिवसांनी, चामड्यासारख्या कवचातून पिलं बाहेर पडतात आणि ती आईच्या दोन स्तन ग्रंथींतून स्रवणारे दूध पिऊ लागतात. आणि बरं का, मादी प्लॅटिपस एकटीच आपल्या पिलांचं संगोपन करते; हे सस्तन प्राणी प्रदीर्घकाळ जोडीने राहतात असं काही दिसत नाही.

जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंत म्हणजे साडेतीन महिन्यांच्या काळात, भराभर वाढ झाल्यावर पिलं पाण्यात उतरायला तयार होतात. एका विशिष्ट सरोवरात किंवा नदीत मर्यादित प्राणीच राहू शकत असल्यामुळे, कालांतरानं कदाचित ही पिलं कमी प्राणी असणाऱ्‍या नद्या, सरोवरे हुडकून काढतील ज्याच्यासाठी त्यांना कधीकधी धोकादायक प्रदेशही पार करावे लागतात.

कैदेत असणारे प्लॅटिपस २० वर्षांपेक्षा जास्त जगले आहेत पण जंगलात मात्र ते सहसा इतकी वर्षं जगत नाहीत. ते दुष्काळ आणि पुरांना बळी पडतात किंवा गोॲना (मोठ्या मॉनिटर पाली), कोल्हे, मोठे भक्षक पक्षी आणि दुरस्थ उत्तर दिशेला क्वीन्सलँडमध्ये, कधीकधी मगरीही त्यांचा बळी घेतात. तथापि, प्लॅटिपसला सर्वात मोठा धोका आहे तो मनुष्यांकडून, अर्थात मुद्दामहून त्यांना ठार करण्यामुळे तर नव्हे, (प्लॅटिपस प्राण्यांना आता कडक सुरक्षा आहे) पण सतत त्यांच्या निवासक्षेत्रावर अतिक्रमण करत असल्यामुळे.

तुम्हाला कधी ऑस्ट्रेलियाच्या प्रवासाची संधी मिळाली तर तुम्ही बदकाची चोच असलेल्या या जगावेगळ्या, लहानशा संमिश्र प्राण्याला त्याच्या स्वाभाविक निवासक्षेत्रात प्रत्यक्ष पाहू शकता, कारण याशिवाय जगातल्या इतर कोणत्याही प्रदेशातल्या अरण्यांत तुम्हाला हा आढळणार नाही. प्लॅटिपसच्या रूपात तुम्हाला निर्माणकर्त्याच्या असीम कल्पनाशक्‍तीच्या आणि विनोदबुद्धीच्या आणखी एका नवीन पैलूचे दर्शन घडेल.

[१७ पानांवरील चित्र]

पडदे असलेल्या आपल्या पायांचा उपयोग करून प्लॅटिपस शरीराला पुढे ढकलतो

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Taronga Zoo

[१७ पानांवरील चित्र]

प्लॅटिपस हा पाळीव मांजरीपेक्षा लहान असून एक ते अडीच किलोग्रॅम वजनाचा असतो

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Dr. Tom Grant

[१७ पानांवरील चित्र]

पाण्याखालील भक्ष्य शोधण्यास अतिसंवेदनशील चोचीचा उपयोग होतो. (हील्सविल सँच्युरीतील प्लॅटिपस)

[चित्राचे श्रेय]

Courtesy of Healesville Sanctuary

[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]

फ़ोटो: Courtesy of Dr. Tom Grant

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा