आमच्या वाचकांचे मनोगत
प्राणी कथा तुम्ही प्राण्यांविषयी जे लेख लिहिता ते वाचायला मला फार आवडतात. पूर्वी कधीच मी प्लॅटिपसविषयी ऐकलं नव्हतं, त्यामुळं “प्लॅटिपस नावाचं कोडं” (जानेवारी ८, १९९७) हा लेख वाचून मी स्तंभित झालो! त्याच अंकात, प्राणी व मानव यांच्यातले लोभस स्नेहबंधन रेखाटणारा लेख, “ह्या कुडूला विस्मरण झाले नाही,” माझ्या हृदयाला स्पर्शून गेला. मानव, प्राण्यांवर प्रेम करतात आणि त्यांचा आदर करतात तेव्हा किती सुखकारक वाटतं!
एफ. ए., ब्राझील
हृदयविकाराचा झटका आम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याखेरीज, आमच्या शारीरिक स्वास्थ्याचीही काळजी वाहणाऱ्या संघटनेचा भाग असल्याबद्दल मला खरोखर भूषण वाटतं. “हृदयविकाराचा झटका—यावरील उपाय?” (जानेवारी ८, १९९७) या श्रृंखलेनं, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं कशी ओळखावीत हे दाखवून दिलं. माझ्या सासऱ्यामध्ये अशीच लक्षणं दिसून आली तेव्हा आम्ही ताडलं, की त्यांची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे आणि आम्ही लागलीच त्यांना एका रुग्णालयात नेलं. खरं तर त्यांना हृदयविकाराचाच झटका आला होता; पण २४ दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर ते या धोक्यातनं बाहेर पडले.
ई. एस., ब्राझील
माझे बाबा, १९९५ साली महारोहिणी विस्फारामुळं वारले, त्यामुळं हा अंक पहिल्यांदाच माझ्या हातात पडला तेव्हा तो वाचण्याचं धाडसंच मला झालं नाही. पण मग, एका महिन्यानंतर मी तो वाचला तेव्हा त्या लेखांमुळं मला खूप सांत्वन मिळालं, कारण हृदयरोगाच्या झटक्यामुळं एखाद्या कुटुंबावर ओढवणारी शोकांतिका इतरांनीही अनुभवलीय हे मला समजलं होतं.
एस. जे. कॅनडा
मागच्या जुलैमध्ये, घरोघरचे प्रचार कार्य करत असताना माझे पती अचानक कोसळून पडले आणि त्यांना लगेच रुग्णालयात न्यावं लागलं. मात्र सुदैवाने, त्यातून ते कसेबसे सावरले. तुमचे लेख, आमच्यासाठी अगदी योग्य वेळी आले. “कुटुंबाना आधाराची गरज” हा त्यामधील भाग वाचून आम्हाला अश्रू आवरले नाहीत कारण आम्ही अगदी त्याच मनोदशेत आहोत.
एम. ए., जपान
मागच्या रविवारी, माझा डावा हात सतत दुखत होता आणि माझ्या हाताच्या बोटांची टोकंही अगदी बधीर होऊन गेली होती. मला असं वाटलं जणू हे आपलं नेहमीचंच दुखणंखुपणं असावं. पण हृदयविकाराच्या झटक्यावरील तुमचे लेख मी वाचले तेव्हा मला तीव्रपणे जाणवलं, की ही नेमकी त्याचीच लक्षणं आहेत! मी रुग्णालयातील तातडीच्या विभागात गेलो आणि डॉक्टरांना समजलं की माझ्या हृदयातील एक प्रमुख रोहिणी बंद झाली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी शस्त्रक्रिया केली. हे अगदी शंभर टक्के खरं आहे, की तुम्ही हे लेख लिहिले नसते तर हे आभारपत्र लिहिण्यासाठी मी आज जिवंत राहिलो नसतो!
एन. एस., संयुक्त संस्थाने
“हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे” हा रकाना मला विशेष आवडला. तुम्हाला आमच्या समस्यांमध्ये खास आस्था आहे आणि त्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती मदतही तुम्ही पुरवता हे मला त्यावरून समजलं.
एम. बी., सेनेगल
माझ्या बाबांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आमच्या कौटुंबिक जीवनात एक नाट्यमय बदल झाला. या कठीण काळात, तुमचे लेख खूपच सांत्वनदायी ठरले.
पी. जी., इटली
लूई पाश्चर मी बारा वर्षांची आहे आणि मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं, की “लूई पाश्चर—त्यांच्या कार्याने काय प्रकट केले” (जानेवारी ८, १९९७) हा लेख मला खूपच आवडला. आमच्या विज्ञानाच्या वर्गात आम्ही त्यांच्याविषयीच शिकत आहोत. एक अहवाल तयार करताना मी या लेखाचा उपयोग केला आणि त्यासाठी मला दहा गुण जास्त मिळाले!
ए. पी., संयुक्त संस्थाने