वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १/८ पृ. ११-१३
  • आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आरोग्याची पुनःप्राप्ती
  • एकाकी हृदय नाहीत
  • कुटुंबीयांना आधाराची गरज
  • लक्षणे ओळखून हालचाल करणे
    सावध राहा!—१९९७
  • साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • मला खिन्‍नता का वाटते?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • तुम्ही आध्यात्मिक हार्ट अटॅक टाळू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १/८ पृ. ११-१३

आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर कोणालाही भीती आणि काळजी वाटणे अगदी साहजिक आहे. मला पुन्हा झटका येईल का? वेदनेमुळे आणि शक्‍ती, चैतन्य गमावल्यामुळे मी अपंग किंवा अक्षम तर होणार नाही?

आमच्या दुसऱ्‍या लेखात उल्लेखलेल्या जॉनला वाटत होते की काही काळानंतर त्याला निरंतर वाटणारी अस्वस्थता आणि छातीतील दुखणे थोडे कमी होईल. पण काही महिने उलटून गेल्यावर तो म्हणाला: “अजूनही त्रास कमी झालेला नाहीय. शिवाय, मला थकवाही लगेच येतो, धडधडू लागतं, यामुळे ‘आपल्याला दुसरा झटका येतो की काय?’ हा प्रश्‍न मला सततच भेडसावत असतो.”

अमेरिकेत राहणाऱ्‍या जेनला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती एक तरुण विधवा होती; ती कबूल करते: “मी जास्त जगणार नाहीय, पुन्हा झटका येऊन त्यात मी खतम होणारंय, असं मला सारखं वाटायचं. माझ्या तीन मुलांच्या काळजीने माझ्या मनात धास्तीच भरली.”

जपानच्या हिरोशीने सांगितले: “माझे हृदय पूर्वीसारखे काम करणार नाही हे समजलं तेव्हा मला धक्काच बसला; माझ्या हृदयाची पंपिंग करण्याची गती ५० टक्क्यांनी घसरली होती. यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक सेवक या नात्यानं माझी काही कामं मला आता कमी करावी लागणार, याची मला खात्री वाटू लागली होती, कारण पूर्वीपेक्षा निम्मंही करणं मला कठीण झालं होतं.”

एखाद्याजवळ पुरेशी शक्‍ती नसते तेव्हा विषण्णतेच्या भावना आणि आपण काहीच करण्यालायक राहिलो नाही अशा प्रकारचे विचार मनात घर करतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचार कार्यात स्वतःला पूर्णवेळेसाठी वाहून घेतलेल्या ऑस्ट्रेलियातील ८३ वर्षीय मारीने दुःखाने म्हटले: “पूर्वीसारखं काम करण्यास असमर्थ झाल्यामुळे मी पार खचून गेले. इतरांना मदत करण्याऐवजी, मलाच आता इतरांच्या मदतीची गरज होती.” दक्षिण आफ्रिकेचा हॅरल्ड म्हणाला: “मी तीन महिने काहीही काम करू शकत नव्हतो. जास्तीतजास्त, बागेत फेरफटका मारायचो, एवढंच. खरंच, वैताग आला होता!”

दुसरा हृदयविकाराचा झटका आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या थॉमसला बायपास सर्जरी करावी लागली. तो म्हणतो: “मला थोडीही वेदना सहन करायची म्हटलं की नकोसं होतं, साहजिकच, एवढ्या मोठ्या ऑपरेशनची कल्पना मला असह्‍य होती.” हृदय शस्त्रक्रियेनंतरच्या परिणामांबद्दल सांगताना ब्राझीलचा झॉर्झ म्हणाला: “आमच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे, मी गेल्यावर माझ्या बायकोला आधार राहणार नाही, ती एकटी पडेल अशी भीती मला होती. मी जास्त दिवस टिकणार नाहीय, असं वाटायचं.”

आरोग्याची पुनःप्राप्ती

आरोग्य पुन्हा प्राप्त करून आपल्या भावनांवर ताबा मिळवण्यासाठी बऱ्‍याच जणांना कशामुळे मदत मिळाली आहे? जेनने सांगितले: “मला भीती वाटू लागली की मी लगेच यहोवाला प्रार्थना करायचे, त्यावर माझ्या सगळ्या विवंचनांचा भार टाकून मग त्याविषयी निश्‍चिंत व्हायचे.” (स्तोत्र ५५:२२) एखाद्या व्यक्‍तीला, चिंता सतावतात तेव्हा आवश्‍यक असणारी शक्‍ती आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी, प्रार्थना सहायक ठरते.—फिलिप्पैकर ४:६, ७.

जॉन आणि हिरोशी पुनर्वसन कार्यक्रमांत सहभागी झाले. उत्तम आहार आणि व्यायामामुळे त्यांच्या हृदयाला बळकटी मिळाली आणि परिणामस्वरूप, दोघेही पूर्ववत काम करू लागले. आपली मानसिक आणि भावनात्मक सुस्थिती परत मिळवण्याचे श्रेय त्यांनी देवाच्या आत्म्याच्या शक्‍तीला दिले.

थॉमसला त्याच्या ख्रिस्ती बांधवांच्या आधारामुळे ऑपरेशनला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले. तो म्हणतो: “ऑपरेशनच्या आधी एक पर्यवेक्षक मला भेटायला आले आणि त्यांनी माझ्यासोबत प्रार्थना केली. अत्यंत कळकळीची याचना करत, त्यांनी यहोवाला मला धैर्य देण्याची विनंती केली. त्या रात्री मी त्यांच्या प्रार्थनेवर विचार केला तेव्हा त्यांच्यासारखे वडील आपल्याला लाभले, आपण किती आशीर्वादित आहोत याची मला जाणीव झाली; मनात भावनिक घालमेल होत असताना त्यांनी दाखवलेली सहानुभूतीच बरे होण्यात मोठा हातभार लावते.”

इटलीच्या आन्‍नाने विषण्णतेच्या भावनांना असे तोंड दिले: “निराश वाटतं तेव्हा, मी देवाच्या सेवकांपैकी असल्यामुळे आजवर मला मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल आणि मिळणाऱ्‍या देवाच्या राज्यातील आशीर्वादांबद्दल मी विचार करते. असं केल्यामुळे मला माझी मानसिक शांती पुन्हा मिळते.”

मारी यहोवाच्या मदतीबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. तिचे कुटुंबीय सतत तिच्या पाठीशी उभे राहिले आहेत; शिवाय ती म्हणते: “आपापल्या काळज्या व विवंचना असतानाही, माझ्या आध्यात्मिक भाऊबहिणींनी मला भेटायला येण्यासाठी, फोन करण्यासाठी किंवा काड्‌र्स पाठवण्यासाठी वेळातून वेळ काढला. एवढं भरभरून प्रेम मिळाल्यावर दुःख कसलं?”

एकाकी हृदय नाहीत

असे म्हणण्यात आले आहे की उपचाराधीन असणारे हृदय एकाकी असता कामा नये. ज्यांचे हृदय अक्षरशः आणि लाक्षणिकरित्या बरे होताहेत अशांना या काळात कुटुंबाचा आणि मित्रांचा आधार मिळाल्यास, त्यांच्या बरे होण्यात पुष्कळसा हातभार लागतो.

दक्षिण आफ्रिकेच्या मायकलने असा अभिप्राय मांडला: “आपली निराशा इतरांना समजावून सांगणं अत्यंत कठीण असतं. पण, राज्य सभागृहात पाऊल ठेवताच बांधव इतक्या आपुलकीने विचारपूस करतात की त्यामुळे मला खूप आनंद लाभतो आणि धैर्यही मिळतं.” मंडळीतील लोकांनी दाखवलेल्या गाढ प्रीतीमुळे आणि समजूतदारपणामुळे ऑस्ट्रेलियातील हेन्रीला पण खूप साहाय्य मिळाले. तो म्हणतो: “दिलासा देणाऱ्‍या त्या कोमल शब्दांसाठी मी खरंच आसूसलो होतो.”

झॉर्झ पुन्हा काम करायला समर्थ झाला, परंतु तोपर्यंत त्याच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करण्याद्वारे इतरांनी जी काळजी आणि आपुलकी दाखवली, ती तो अजूनही विसरलेला नाही. स्वीडनची ओल्गा देखील तिच्या अनेक आध्यात्मिक भाऊबहिणींनी तिला आणि तिच्या कुटुंबाला खऱ्‍या अर्थाने दिलेल्या मदतीबद्दल कृतज्ञ आहे. काहींनी तिच्यासाठी बाजारहाट केला तर काहींनी तिच्या घरातील स्वच्छतेकडे लक्ष दिले.

सहसा हृदयविकाराच्या रुग्णांना, ते पूर्वी ज्या कार्यांत हिरीरीने भाग घेत होते त्या कार्यांतील त्यांचा सहभाग नंतर कमी करावा लागतो. स्वीडनच्या स्वेनने सांगितले: “जोरदार वारं असतं किंवा हवेत गारठा असतो तेव्हा मला सेवाकार्यात भाग घेता येत नाही, कारण अशा वातावरणामुळे व्हॅस्क्युलर स्पॅझम होण्याची शक्यता असते. माझे सह साक्षीदार याबाबतीत जो समजूतदारपणा दाखवतात त्याची मी मनापासून प्रशंसा करतो.” तसेच, अंथरुणातून बाहेर पडता येत नाही अशा वेळेसही, स्वेनला सभेतील भाग ऐकायला मिळतात कारण त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे बांधव टेपवर हे भाग त्याच्यासाठी रेकॉर्ड करतात. “मंडळीत काय चाललंय याविषयी ते मला इत्थंभूत माहिती देतात, आणि यामुळे जणू आपणही सहभागी होतो असं मला भासतं.”

मारी अंथरुणाला खिळलेली आहे, पण ती ज्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करते ते लोक तिच्याकडे येत असल्यामुळे आपल्याला फार मोठा आशीर्वाद लाभला आहे असे तिला वाटते. निदान यामुळे तरी, ती ज्या अद्‌भुत भविष्याची वाट पाहत आहे त्याविषयी अशा स्थितीतही ती चर्चा करू शकते. आपल्याबद्दल दाखवलेल्या कळकळीविषयी आभार व्यक्‍त करताना थॉमस म्हणतो: “वडिलांनी खरंच खूप समजूतदारपणा दाखवला आणि ते आता मला पूर्वीइतक्या नेमणुका देत नाहीत.”

कुटुंबीयांना आधाराची गरज

आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल करणे रुग्णाला तर कठीण असतेच पण त्यासोबत कुटुंबातील सदस्यांनाही त्यादरम्यान सोपे जात नाही. त्यांना बऱ्‍याच तणावाला आणि निरंतर भीतीला तोंड द्यावे लागते. दक्षिण आफ्रिकेचा ॲल्फ्रेड आपल्या बायकोच्या चिंतेविषयी सांगताना म्हणाला: “इस्पितळातून घरी आल्यानंतर, रात्रीच्या वेळेस मी अजून ठीकठाक आहे याची खात्री करून घेण्यासाठी ती मला अनेकवेळा झोपेतून उठवायची, शिवाय दर तीन महिन्यांनी मी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्यावा असा तिचा अट्टाहास असायचा.”

नीतिसूत्रे १२:२५ नुसार, “मन चिंतेने दबून जाते.” इटली येथील कार्लो सांगतो की त्याला हृदयविकाराचा झटका आल्यापासून प्रेमाने आधार देणारी त्याची पत्नी “पार खचून गेलीय.” ऑस्ट्रेलियाच्या लॉरेन्सने सांगितले, “आपल्या वैवाहिक सोबत्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. तो किंवा ती देखील भयंकर तणावाखाली असते.” म्हणूनच मुलांसहित, कुटुंबातील सर्वांच्याच गरजा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या देखील, या विशिष्ट प्रसंगी त्यांच्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतात.

आमच्या दुसऱ्‍या लेखात उल्लेखलेला जेम्स त्याच्या वडिलांच्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर कमालीचा धीरगंभीर बनला. तो म्हणतो: “यापुढे कुठलीच मौजमजा करायची नाही असं मला वाटू लागलं, आपण मौजमजा करायला जाऊ आणि काहीतरी अनिष्ट घडेल अशी मला भीती होती.” त्याने या भीतीविषयी आपल्या वडिलांजवळ बोलून दाखवले आणि चारचौघांत मिसळण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे त्याचा चिंतातुरपणा थोडा कमी होऊ लागला. त्यादरम्यान जेम्सने असे आणखी काहीतरी केले, ज्याचा त्याच्या जीवनावर मोठा परिणाम झाला. तो सांगतो, “मी बायबलच्या माझ्या वैयक्‍तिक अभ्यासाला आणि ख्रिस्ती सभांच्या तयारीला आणखी वेळ देऊ लागलो.” तीन महिन्यांनंतर त्याने यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि याचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. तो म्हणतो, “तेव्हापासून यहोवा देवासोबत माझं खूप घनिष्ट नातं झालंय. खरंच, मी कशाकशाबद्दल त्याचे उपकार मानू?”

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर, माणूस साहजिकच नव्याने आपल्या जीवनाचे अवलोकन करतो. उदाहरणार्थ, जॉनचा दृष्टिकोन पार बदलला. तो म्हणतो: “जगिक सुखविलास अगदीच निर्रथक असून, आपल्या माणसांचं प्रेमच खऱ्‍या मोलाचं असतं याची जाणीव मला झालीय, शिवाय यहोवाच्या नजरेत आपली किंमत आहे याचीही खात्री पटलीय. यहोवा, माझं कुटुंब आणि माझे आध्यात्मिक बांधव यांच्यासोबतचं माझं नातं माझ्या नजरेत पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचं बनलंय.” आपल्या भयंकर अनुभवाविषयी विचार करताना तो पुढे म्हणतो: “सर्व वेदना नाहीशा होतील अशा काळाची आशा डोळ्यांपुढे जर नसती, तर मी हे सारं खरंच सहन करू शकलो असतो का? या न त्या कारणानं हताश झालो की मी भविष्याच्या विचारात रमतो आणि मग आता होणाऱ्‍या या गोष्टी आपोआप धूसर होतात.”

आरोग्याच्या पुनःप्राप्तीकडे वाटचाल करतेवेळी असंख्य चढउतारांना तोंड देताना, हृदयविकाराच्या झटक्यामधून बचावलेले हे लोक, येशूने ज्यासाठी आपल्याला प्रार्थना करण्यास शिकवले त्या राज्यावर आपली नजर सतत खिळवून ठेवतात. (मत्तय ६:९, १०) देवाचे राज्य मानवजातीला परादीस पृथ्वीवर परिपूर्णावस्थेत सार्वकालिक जीवन देईल. तेव्हा हृदयविकार आणि इतरही सर्व असमर्थतांचे कायमचे उच्चाटन होईल. नवे जग आता फार दूर नाही. खरोखर, परमसौंदर्य ल्यालेले जीवन भविष्यात राखून ठेवलेले आहे!—ईयोब ३३:२५; यशया ३५:५, ६; प्रकटीकरण २१:३-५.

[१३ पानांवरील चित्र]

कुटुंबाचा आणि मित्रांचा आधार बरे होण्यात महत्त्वाचा हातभार लावतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा