धोका कमी करण्यासाठी काय करावे?
हृद्रोहिणी विकाराचा (सीएडी) संबंध अनेक जननिक, वातावरणीय व जीवन शैलीच्या घटकांशी आहे. अनेक दशकांपासून तर म्हणता येणार नाही, पण अनेक वर्षांपासून जर या धोकादायक घटकांपैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक घटक रुग्णात असतील तर सीएडी व त्यासोबत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
वय, लिंग व आनुवंशिकता
वाढत्या वयोमानानुसार हृदयविकाराच्या झटक्याचा धोकादेखील वाढतो. एकूण हृदयविकाराच्या झटक्यांपैकी जवळजवळ ५५ टक्के हृदयविकाराचे झटके ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना येतात. हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होणाऱ्यांपैकी ८० टक्के रुग्ण ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असतात.
पन्नाशी न ओलांडलेल्या स्त्रियांपेक्षा याच वयोगटातील पुरुषांना अधिक धोका असतो. रजोनिवृत्तीनंतर एखाद्या स्त्रीला अधिक धोका असतो कारण त्यानंतर संरक्षक हॉर्मोन इस्ट्रोजेनमध्ये कमालीची घट होते. काही अनुमानांप्रमाणे, इस्ट्रोजेन रिप्लेसमेंट थेरपीमुळे स्त्रियांतील हृदयविकाराच्या प्रमाणात कदाचित ४० टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक घट होऊ शकते, तथापि, काही विशिष्ट कर्करोगांचा धोका यामुळे वाढण्याचा संभव आहे.
आनुवंशिकतेचा घटक देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्यांच्या आईवडिलांपैकी कोणाला ५० वर्षांच्या वयापूर्वी झटका आला होता, त्यांना झटका येण्याची दाट शक्यता असते. आईवडिलांना ५० वर्षांच्या वयानंतर झटका आला असला तरीसुद्धा धोका कायम राहतो. कुटुंबात मागच्या पिढीत कोणाला हृदयविकार असल्यास मुलांतही तशाच प्रकारच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
कोलेस्टेरॉल घटक
कोलेस्टेरॉल हे एक प्रकारचे जीवनावश्यक लिपिड आहे. ते यकृतात तयार होत असून वसाप्रथिने म्हटलेल्या कणांतून रक्ताद्वारे पेशींपर्यंत नेले जाते. ही वसाप्रथिने दोन प्रकारची असतात, निम्न घनतेची वसाप्रथिने (एलडीएल कोलेस्टेरॉल) व उच्च घनतेची वसाप्रथिने (एचडीएल कोलेस्टेरॉल). रक्तात एलडीएल कोलेस्टेरॉलचे प्रमाण अत्यधिक असते तेव्हा कोलेस्टेरॉल हृद्रोहिणी विकारात एक धोकादायक घटक बनतो.
ऊतकांतून कोलेस्टेरॉल काढून ते पुन्हा यकृतापर्यंत नेण्याद्वारे एचडीएल एक संरक्षक भूमिका पार पाडत असते; यकृतात कोलेस्टेरॉलचे स्वरूप बदलते आणि ते शरीरातून बाहेर टाकले जाते. एलडीएलचे प्रमाण जास्त असून एचडीएलचे प्रमाण कमी असले तर हृदयविकाराचा धोका अधिक असतो. एलडीएलचे प्रमाण कमी केल्यास हा धोकाही लक्षणीयरित्या कमी होतो. उपचारात पथ्यपाणी हेच मुळात महत्त्वाचे आहे, शिवाय व्यायाम देखील फायदेकारक ठरू शकतो. निरनिराळे औषधोपचार जरी गुणकारक असले तरीही यांपैकी काहींमुळे अपायकारक दुष्परिणाम उद्भवू शकतात.a
कोलेस्टेरॉल व तृप्त वसा यांचे कमी प्रमाण असणारा आहार सहसा उत्तम असल्याचे सांगण्यात येते. मोठ्या प्रमाणावर तृप्त वसा असणाऱ्या, उदाहरणार्थ, लोण्यासारख्या अन्नपदार्थांऐवजी त्याचे कमी प्रमाण असणारे, कनोला किंवा ऑलिव्हच्या तेलासारखे पदार्थ घेतल्यास एलडीएलचे प्रमाण कमी होऊन एचडीएलचे संवर्धन होऊ शकते. दुसरीकडे पाहता, अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ असे सांगते की पुष्कळशा मार्जरीन आणि वनस्पती-उत्पादनांत आढळणारी हायड्रोजनेटेड किंवा काही प्रमाणावर हायड्रोजनेटेड वनस्पतीजन्य तेले, एलडीएलचे प्रमाण वाढवून एचडीएलच्या प्रमाणात घट आणू शकतात. अधिक चरबीयुक्त मांस खाण्याचे कमी करून चिकन किंवा टर्कीच्या मांसाचे कमी चरबीयुक्त तुकडे घेण्याचा देखील सल्ला देण्यात येतो.
अभ्यासातून दिसून आले आहे की ई-जीवनसत्व, बीटाकॅरोटीन व सी-जीवनसत्व यांमुळे प्राण्यांत रोहिणी काठिन्याचा विकार कमी होतो. एका अभ्यासाचा असा निष्कर्ष होता की यांमुळे मानवांतील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण देखील कमी होण्याची शक्यता आहे. बीटाकॅरोटीन व इतर कॅरोटिनाईड्स तसेच सी-जीवनसत्वाचे भरपूर प्रमाण असणाऱ्या भाज्या व फळे उदाहरणार्थ, टमाटे, हिरव्या पालेभाज्या, ढोबळ्या मिरच्या, गाजर, रताळी व खरबूज वगैरे दररोज आहारात घेतल्यास हृद्रोहिणी विकारापासून थोडेबहुत संरक्षण मिळू शकते.
बी६-जीवनसत्व व मॅग्नेशियम देखील उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. सातू व ओटसारखी धान्ये, शिवाय कडधान्ये, डाळी, काही बिया व कवचफले देखील गुणकारक ठरू शकतात. त्यातल्या त्यात, आठवड्यातून निदान दोन वेळा तरी सामन, मॅकरेल (बांगडा), हेरिंग किंवा ट्यूना (कुप्पा) यांसारखे मासे खाल्यास हृद्रोहिणी विकाराचा धोका कमी होऊ शकतो कारण त्यांत ओमेगा-३ पॉलीअन्सॅच्यूरेटेड वसाम्ले भरपूर प्रमाणात असतात.
बैठी जीवनशैली
सतत बसून असणाऱ्यांना हृदयविकाराच्या झटक्याचा अधिक धोका असतो. ते सहसा दिवसभर फारशी शारीरिक हालचाल करत नाहीत आणि पुन्हा त्यांना नियमित व्यायामाचीही सवय नसते. सहसा अशा लोकांना, कधीतरी एकदा कठीण श्रमाची कामे केल्यावर, उदाहरणार्थ थकविणारे बागकाम, जॉगिंग, वजनदार वस्तू उचलणे, किंवा खोदकाम इत्यादी केल्यावर हृदयविकाराचे झटके येतात. उलटपक्षी, जे नियमित व्यायाम करतात त्यांच्या बाबतीत धोका बराच कमी होतो.
आठवड्यातून तीनचार वेळा २० ते ३० मिनिटे भरभर चालल्यामुळे झटक्याची शक्यता कमी होऊ शकते. नियमित व्यायामामुळे हृदयाच्या पंपिंग करण्याच्या क्षमतेत सुधारणा आणि वजन कमी करण्यात मदत तर होतेच, शिवाय त्यामुळे कोलेस्टेरॉल मात्रा व रक्तदाबही कमी होऊ शकतो.
अतिरक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह
हाय ब्लड प्रेशरमुळे (अतिरक्तदाब) रोहिण्यांच्या भिंतींमध्ये दोष निर्माण होऊन या रोहिण्यांच्या आतील आवरणात एलडीएल कोलेस्टेरॉलचा शिरकाव होतो आणि वसा चकत्यांचा वेगाने संचय होऊ लागण्याची शक्यता असते. जसजसा हा वसा संचय वाढू लागतो, तसतसा रक्तप्रवाहात अधिकाधिक अवरोध निर्माण होतो आणि यामुळे रक्तदाबात वाढ होते.
रक्तदाब नियमित तपासून घेणे उत्तम, कारण समस्या असूनही तिची बाह्य लक्षणे दिसतीलच असे नाही. डायस्टॉलिक (खालचा आकडा) रक्तदाबाच्या पातळीत घट होते तेव्हा दर एका पॉइंटसोबत २ ते ३ टक्के या प्रमाणावर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होऊ शकतो. रक्तदाब कमी करण्यासाठी औषधोपचार कामी पडू शकतो. पथ्य तसेच काही केसेसमध्ये आहारात मिठाचे प्रमाण कमी करून याच्या जोडीला लठ्ठपणा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम केल्यास अतिरक्तदाब नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
लठ्ठपणामुळे अतिरक्तदाबास तसेच लिपिडांसंबंधी विकारांना चालना मिळते. मधुमेह टाळण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे एकतर अतिस्थूलपणा टाळणे किंवा त्यावर उपचार करणे. मधुमेहामुळे हृद्रोहिणी विकार आणखी गंभीर बनतो आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही बळावतो.
धूम्रपान
हृद्रोहिणी विकारात वृद्धी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान. अमेरिकेत, हृदयविकारांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूसंख्येतील २० टक्के मृत्यू, तसेच ५५ वर्षांखाली असणाऱ्या स्त्रियांतील ५० टक्के हृदयविकाराचे झटकेही धूम्रपानामुळेच होतात. धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे निकोटीन व कार्बन मोनॉक्साईड यांसारखे विषारी रासायनिक पदार्थ, रक्तात प्रवेश करतात. पर्यायाने, ही रसायने रोहिण्यांना इजा करतात.
धूम्रपान करणारे त्यांच्या सहवासात असणाऱ्या इतरांनाही धोक्यात आणतात. संशोधनातून दिसून येते की धूम्रपान करणाऱ्यांसोबत राहणारे, स्वतः जरी धूम्रपान करत नसले तरीही त्यांना हृदयविकाराच्या झटक्याचा अधिक धोका आहे. म्हणूनच, धूम्रपान सोडणारा स्वतःला असणारा धोका तर कमी करतोच पण त्यासोबत धूम्रपान न करणाऱ्या आपल्या प्रियजनांचाही जीव वाचवतो.
ताणतणाव
निरोगी रोहिण्या असणाऱ्यांच्या तुलनेत हृद्रोहिणी विकाराचे रुग्ण, अतिशय भावनात्मक किंवा मानसिक तणावाखाली असतात तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची व हृदयविकारामुळे आकस्मिक मृत्यू ओढवण्याची अत्यंत दाट शक्यता असते. एका अभ्यासानुसार, वसा चकत्याचे थर असणाऱ्या रोहिण्या तणावामुळे आकुंचन पावतात आणि यामुळे रक्तप्रवाह जवळजवळ २७ टक्क्यांनी खंडित होतो. फारशा रोगग्रस्त न झालेल्या रोहिण्याही तणावामुळे बऱ्याच प्रमाणावर आकुंचन पावत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या एका अभ्यासाकरवी असे सुचविण्यात आले की गंभीर तणावात रोहिण्यांतील आवरणावर असलेल्या वसा चकत्या फुटण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
कन्झ्यूमर रिपोट्र्स ऑन हेल्थ यात सांगितल्याप्रमाणे: “काही जण जणू अपायकारक मनोवृत्ती बाळगूनच जगत असतात. ते स्वभावानेच शंकेखोर, चिडखोर व त्यातल्या त्यात शीघ्रकोपी असतात. आपल्यातील अधिकांश लोक सहसा लहानसहान तक्रारींकडे दुर्लक्ष करतात, मात्र हे भांडखोर लोक अशा लहानमोठ्या बाबी घेऊन भावनातिरेक करतात.” दीर्घकालीन क्रोध आणि भांडखोरपणामुळे रक्तदाबात वाढ होते, हृदयगती वाढते आणि यामुळे रक्तात कोलेस्टेरॉल मिसळण्याची यकृताला चालना मिळते. परिणामी, हृद्रोहिण्यांना इजा होते व यामुळे हृद्रोहिणी विकार उद्भवण्यास मदत होते. क्रोधामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दुप्पट होतो असे म्हटले जाते आणि कोणत्याही क्षणी झटका येण्याचा धोका कमीतकमी दोन तासांपर्यंत कायम राहतो. यावर काय उपाय आहे?
द न्यूयॉर्क टाईम्स नुसार, डॉ. मरी मिट्ट्लमन यांनी सांगितले की भावनिक कलह होतात तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करणारे लोक हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करू शकतील. हे उद्गार शतकानुशतकांपूर्वी लिहिलेल्या बायबलमधील पुढील शब्दांसोबत मिळतेजुळते आहेत: “शांत अंतःकरण [हृदय] देहाचे जीवन आहे.”—नीतिसूत्रे १४:३०.
प्रेषित पौलाला तणावाखाली असण्याचा चांगला अनुभव होता. स्वतःला दररोज भेडसावत असणाऱ्या काळजींचा त्याने उल्लेख केला. (२ करिंथकर ११:२४-२८) तथापि, त्याला देवाच्या साहाय्याचा प्रत्यय आल्यामुळे त्याने लिहिले: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”—फिलिप्पैकर ४:६, ७.
हृदयविकारांशी संबंधित असणारे आणखीन अनेक घटक असले तरीसुद्धा, येथे विचारात घेण्यात आलेले घटक, धोका ओळखून यथोचित पावले उचलण्यासाठी एखाद्याला सहायक ठरू शकतील. तथापि, हृदयविकाराचा झटका आलेले लोक त्याच्या दुष्परिणामांसह कसे जगत असतील असा काहीजण विचार करतात. आरोग्याची पुनःप्राप्ती कितपत शक्य आहे?
[तळटीपा]
a सावध राहा! हे वैद्यकीय, व्यायामासंबंधी अथवा आहारविषयक उपचारपद्धतींचे समर्थन करत नसून फक्त सुसंशोधित माहिती सादर करते. आपण काय करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.
[९ पानांवरील चित्र]
धूम्रपान करणे, सहज क्रोधित होणे, चरबीयुक्त आहार घेणे आणि बैठी जीवनशैली असणे यांमुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो