वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. २५-२८
  • साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आधार आणि साहाय्य
  • प्रेमळ पर्यवेक्षकांकडून साहाय्य
  • योग्य वेळी खरी मदत
  • वरून येणारे ज्ञान
  • एकमेकांना आधार द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • मंडळीची उन्‍नती होवो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • मंडळीमध्ये यहोवाची स्तुती होवो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “ऊब घ्या व तृप्त व्हा” असे नुसते बोलण्यापेक्षा करून दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. २५-२८

साहाय्य आणि आधार देणारी—ख्रिस्ती मंडळी

पोपी. नुकतीच विशीत पदार्पण केलेली एक तरुणी. आपल्या कौटुंबिक समस्यांमुळे अत्यंत वैतागलेली. आईवडिलांसोबत हवे तितके मनमोकळे दळणवळण नसल्यामुळे दुःखी.a एका ख्रिस्ती वडिलांकडे आणि त्यांच्या पत्नीकडे आपले मन मोकळे केल्यानंतर, तिने त्यांना असे लिहिले: “तुम्ही माझ्यासाठी, माझी विचारपूस करण्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मी तुमची अत्यंत आभारी आहे. माझ्याबद्दल ही कळकळ दाखवून तुम्ही माझ्यावर किती उपकार केलेत, याची तुम्हाला कल्पना नाही. ज्यांच्याजवळ मन मोकळं करता येईल अशी तुमच्यासारखी भरवशाची, जिव्हाळ्याची माणसं मला मिळालीत याबद्दल मी यहोवाचे आभार मानते.”

अलीकडेच विधवा झालेली टूला. दोन किशोरवयीन मुलांची आई. भावनात्मक समस्या आणि आर्थिक अडचणी यांमुळे अगदी बेजार झालेली. दरम्यान, मंडळीतले एक ख्रिस्ती जोडपे नियमितपणे तिला व तिच्या मुलांना भेटून त्यांना दिलासा देत राहिले. जीवनातले हे अतिशय कठीण वळण पार केल्यानंतर, टूलाने त्या जोडप्याला एक कार्ड पाठवले; त्यात तिने लिहिले, “प्रार्थनेत मी नेहमी तुमची आठवण करते. तुम्ही कितीदा तरी माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला आधार दिलात हे मी कधी विसरणार नाही.”

या जगाच्या वाढत्या दबावांमुळे तुम्हालाही कधीकधी “भाराक्रांत” झाल्यासारखे वाटते का? (मत्तय ११:२८) “समय व प्रसंग” यांमुळे तुमच्यावरही दुःखद परिस्थिती ओढावल्या आहेत का? (उपदेशक ९:११, पं.र.भा.) तुमच्याप्रमाणेच अनेकांवर अशी संकटे कोसळली आहेत. पण हजारो दुःखी लोकांना अनुभव आल्याप्रमाणे तुम्हाला देखील यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती मंडळीत खरी मदत मिळू शकते. सा.यु. पहिल्या शतकात प्रेषित पौलाला खास करून काही बांधवांकडून “आधार” मिळाला होता. (कलस्सैकर ४:१०, ११, इझी टू रीड वर्जन) तुम्हाला देखील हा आधार मिळू शकतो.

आधार आणि साहाय्य

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये, “मंडळी” या शब्दाचे एक्लीसिया या ग्रीक शब्दावरून भाषांतर करण्यात आले असून त्याचा अर्थ एका ठिकाणी एकत्रित करण्यात आलेला लोकांचा समूह असा होतो. या शब्दात एकोप्याची आणि परस्परांना पाठबळ देऊन चालण्याची भावना गोवलेली आहे.

ख्रिस्ती मंडळी देवाच्या वचनातील सत्याला उचलून धरते आणि त्याच्या राज्याची सुवार्ता घोषित करते. (१ तीमथ्य ३:१५; १ पेत्र २:९) पण, यासोबतच ती आपल्या सदस्यांना आधार आणि साहाय्य देखील पुरवते. मंडळीत आपल्याला प्रेमळ, कळकळ व्यक्‍त करणारे, काळजी घेणारे स्नेही मिळतात जे संकटकाळी मदत करायला आणि सांत्वन द्यायला तयार असतात.—२ करिंथकर ७:५-७.

यहोवाच्या सेवकांसाठी त्याची मंडळी नेहमीच एक सुरक्षित आश्रयस्थान ठरली आहे. स्तोत्रकर्त्याच्या शब्दांवरून सूचित होते की त्याला देखील देवाच्या लोकांच्या मेळाव्यांत आनंद मिळाला आणि सुरक्षितता जाणवली. (स्तोत्रसंहिता २७:४, ५; ५५:१४; १२२:१) त्याचप्रमाणे आजदेखील ख्रिस्ती मंडळी सहविश्‍वासू बांधवांचा एक समाज आहे, ज्यात सर्वजण एकमेकांची उभारणी करतात आणि एकमेकांना उत्तेजन देतात.—नीतिसूत्रे १३:२०; रोमकर १:११, १२.

मंडळीतल्या सदस्यांना, “सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे” असे शिकवले जाते. (गलतीकर ६:१०) त्यांना मिळणारे बायबल-आधारित शिक्षण परस्परांबद्दल बंधुप्रेम आणि खरा स्नेहभाव दाखवण्याची प्रेरणा त्यांना देते. (रोमकर १२:१०; १ पेत्र ३:८) मंडळीतील आध्यात्मिक बंधू आणि भगिनी कृपाळू, शांतीपूर्ण, आणि स्नेहपूर्ण असण्यासाठी प्रवृत्त होतात. (इफिसकर ४:३) ते केवळ औपचारिक उपासक नाहीत, तर ते एकमेकांबद्दल प्रेमळ आस्था बाळगतात.—याकोब १:२७.

म्हणूनच, अन्याय आणि दुःखामुळे गांजलेल्यांना ख्रिस्ती मंडळीत आल्यावर एका उबदार कौटुंबिक वातावरणात आल्यासारखे वाटते. (मार्क १०:२९, ३०) प्रेमाच्या बंधनाने एकमेकांशी जुळलेल्या या जिव्हाळ्याच्या माणसांत असल्याची भावना त्यांना बळकट करते. (स्तोत्र १३३:१-३) मंडळीच्याच माध्यमाने ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आपल्याला शक्‍तिवर्धक आध्यात्मिक अन्‍न ‘यथाकाळी खावयास देतो.’—मत्तय २४:४५.

प्रेमळ पर्यवेक्षकांकडून साहाय्य

ख्रिस्ती मंडळीचे सदस्य त्यात आध्यात्मिक साहाय्य आणि उत्तेजन देऊ शकतील असे प्रेमळ, समजूतदार आणि कार्यक्षम मेंढपाळ असण्याची अपेक्षा करू शकतात. हे गुण ज्यांच्याजवळ आहेत, असे मेंढपाळ “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा” असतात. (यशया ३२:१, २) आत्म्याकरवी नियुक्‍त केलेले वडील, अर्थात पर्यवेक्षक देवाच्या मेंढरांसमान लोकांची काळजी वाहतात, आजारी आणि निराश लोकांना दिलासा देतात आणि ज्यांच्या हातून चुका झाल्या असतील अशांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा यत्न करतात.—स्तोत्र १००:३; १ पेत्र ५:२, ३.

अर्थात, मंडळीचा वडीलवर्ग सहविश्‍वासू बांधवांना सहन कराव्या लागणाऱ्‍या शारीरिक किंवा मानसिक विकारांवर उपचार करू शकणारे प्रशिक्षित तज्ज्ञ किंवा डॉक्टर नसतात. या व्यवस्थीकरणात तरी आजाऱ्‍यांना ‘वैद्याची गरज’ आहे. (लूक ५:३१) पण ज्यांना आध्यात्मिक मदतीची गरज आहे अशा लोकांना मात्र हे मेंढपाळ साहाय्य देऊ शकतात. (याकोब ५:१४, १५) आणि शक्य असेल तेव्हा वडील इतर प्रकारची मदत देण्याचीही व्यवस्था करतात.—याकोब २:१५, १६.

ही प्रेमळ तरतूद मुळात कोणी केली आहे? स्वतः यहोवा देवाने! यहेज्केल संदेष्ट्याने आपल्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे यहोवा असे घोषित करतो: “मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन; त्यांस मी हुडकीन. . . . त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांस वाचवून आणीन. मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांची निजण्याबसण्याची सोय करीन” तसेच जी मेंढरे दुर्बल आणि अशक्‍त आहेत त्यांच्याविषयीही देवाला काळजी आहे.—यहेज्केल ३४:११, १२, १५, १६.

योग्य वेळी खरी मदत

ख्रिस्ती मंडळीत खरी मदत खरोखरच मिळते का? हो. खाली दिलेली उदाहरणे वेगवेगळ्या अशा परिस्थितींची आहेत ज्यांत ख्रिस्ती मंडळी एखाद्या व्यक्‍तीला मदतदायक ठरू शकते.

◆ प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू. ॲनाचे पती एका प्रदीर्घ आजारानंतर मृत्यू पावले. “तेव्हापासून ख्रिस्ती बंधूभगिनींनी मला भरभरून प्रेम दिले आहे,” असे ती म्हणते. “सतत मला आधार आणि उत्तेजन देण्यासाठी त्यांचं माझ्याशी प्रेमानं जवळ घेऊन बोलणं, विचारपूस करणं या सर्वामुळं मी माझ्या दुःखातून सावरू शकले, त्यात पूर्णपणे बुडून गेले नाही आणि यासाठी मी यहोवाचे उपकार मानते. त्यांच्या प्रेमाने मला जाणीव करून दिली की, मला आधार देणारे, सांभाळून घेणारे आणि जिवाभावाने माझी काळजी घेणारे लोक आहेत.” तुम्हालाही कदाचित आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूचा अतिशय दुःखदायक अनुभव आला असेल. अशा प्रसंगी अत्यंत आवश्‍यक असणारे सांत्वन आणि भावनात्मक पाठबळ मंडळीतले सदस्य पुरवू शकतात.

◆ आजारपण. पोलंडचे आर्थर नावाचे एक प्रवासी पर्यवेक्षक मध्य आशियातील मंडळ्यांना आध्यात्मिक साहाय्य देण्यासाठी त्यांना नियमित भेटी द्यायचे. एकदा एका मंडळीत गेले असताना ते खूप आजारी पडले आणि प्रकृती सुधारत असताना त्यांच्या शरीरात बऱ्‍याच गुंतागुंती निर्माण झाल्या. तो अनुभव आठवून आर्थर मोठ्या कृतज्ञतेने सांगतात: “[कझाकस्थान येथील एका शहरातल्या] बंधूभगिनींनी माझी किती काळजी घेतली हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मी ज्यांना ओळखतही नव्हतो, अशा अनेक बंधू बहिणींनी—आणि आस्थेवाईक लोकांनी देखील—मला पैसे, खाण्याच्या वस्तू आणि औषधं आणून दिली. . . . आणि हे सर्व मोठ्या आनंदानं त्यांनी केलं.

“मला एका पाकिटात काही पैसे आणि एक पत्र मिळाले; त्या पत्रातला हा मजकूर वाचून माझ्या भावनांची कल्पना करा, ‘प्रिय बंधू, सप्रेम नमस्कार. माझ्या आईनं मला आइस्क्रीमसाठी पैसे दिले होते, पण मी ते तुम्हाला औषधासाठी द्यायचे ठरवले. लवकर बरे व्हा. यहोवाला अजून खूप दिवस आपल्या सर्वांची गरज आहे. तुम्हाला माझ्या अनेक शुभेच्छा. आणि, आम्हाला आणखी खूप छान छान, बोधाच्या गोष्टी सांगाल ना? व्होव्हा.’” हो, वरील घटनेतून दिसून आल्याप्रमाणे ख्रिस्ती मंडळीतले सर्व बांधव, लहान मुले देखील, आजारपणाच्या वेळेस आधार आणि मदत देऊ शकतात.—फिलिप्पैकर २:२५-२९.

◆ नैराश्‍य. टेरी हिला एक पायनियर, अर्थात एक पूर्ण वेळेची राज्य प्रचारक व्हायची मनस्वी इच्छा होती. पण काही अडचणींमुळे तिला पायनियरिंग थांबवावे लागले. ती म्हणते, “मी पायनियर सेवा हाती घेतली आणि धड एक वर्षही निभावू शकले नाही याबद्दल मला खूपच लाजिरवाणे वाटायचे.” टेरीची चुकीची समजूत होती की कोण किती सेवा करतो या आधारावर यहोवा त्यांना पसंत करतो. (मार्क १२:४१-४४ यासोबत तुलना करा.) ती अतिशय निराश झाली आणि मंडळीपासून दूर राहू लागली. पण मग, तिला मंडळीतून मदत मिळाली आणि तिला तिचा हरवलेला उत्साह पुन्हा लाभला.

टेरी आपला अनुभव सांगते: “एक वयस्क पायनियर बहिणीने माझी मदत केली. मी तिला आपल्या मनातले सर्व भडाभडा सांगून टाकले. तिने शांतपणे सर्व ऐकून घेतले. तिच्या घरून मी जायला निघाले तेव्हा मला अगदी हलके वाटत होते. त्यानंतर ही बहीण आणि तिचे पती, जे मंडळीत वडील आहेत, या दोघांनी मिळून मला अतिशय मोलाची मदत दिली. ते दररोज फोन करून माझी विचारपूस करायचे. . . . कधीकधी ते मला आपल्या कौटुंबिक अभ्यासालाही येण्याचे निमंत्रण द्यायचे, आणि यामुळे कौटुंबिक सदस्यांमध्ये घनिष्ट संबंध असणे किती महत्त्वाचे आहे हे मला पाहायला मिळाले.”

बऱ्‍याच जणांना—समर्पित ख्रिश्‍चनांना देखील—अधूनमधून निराश, निरुत्साहित आणि एकाकी वाटू शकते; यात विचित्र असे काहीच नाही. पण, देवाच्या मंडळीत निःस्वार्थ प्रेमाने साहाय्य करणारे लोक आहेत याबद्दल आपण किती कृतज्ञ असले पाहिजे!—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

◆ विपत्ती आणि दुर्घटना. चार जणांच्या या कुटुंबाच्या जागी स्वतःला ठेवून पाहा; त्यांच्या घराला आग लागून त्यात त्यांचे सर्वकाही बरबाद झाले. लवकरच त्यांना एक विलक्षण अनुभव आला; त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, “एक असा अनुभव ज्याच्या आठवणीने आम्हाला आजही गदगदून येते, एक असा अनुभव ज्याने यहोवाच्या लोकांना एकमेकांबद्दल असणाऱ्‍या खऱ्‍या प्रेमाची आम्हाला जाणीव करून दिली.” ते खुलासा करून सांगतात: “या दुर्घटनेनंतर लगेच आम्हाला दिलासा देण्यासाठी आणि सहानुभूती व्यक्‍त करण्यासाठी आमच्या आध्यात्मिक बंधूभगिनींकडून एकापाठोपाठ एक, कितीतरी फोन आले. फोन सारखा खणाणत होता. सर्वांनी व्यक्‍त केलेली कळकळ आणि त्यांचे प्रेम पाहून आम्ही इतके भारावून गेलो की आम्ही कृतज्ञतेचे अश्रू रोखू शकलो नाही.”

यानंतर लगेच मंडळीच्या वडिलांनी बांधवांना एका मोठ्या गटात संघटित केले आणि काही दिवसांतच त्यांनी या कुटुंबाला एक नवीन घर बांधून दिले. हे पाहून शेजारची एक बाई म्हणाली: “ते दृश्‍य खरंच असामान्य होतं! पुरुष, स्त्रिया, काळे, हिस्पॅनिक—सर्व प्रकारचे लोक एकत्र काम करत होते!” खरोखर, बंधुप्रेमाचा एक जिवंत पुरावा.—योहान १३:३५.

सहख्रिश्‍चनांनी त्यांना कपडे, अन्‍नधान्य आणि पैसे देखील पुरवले. या कुटुंबाचे वडील म्हणतात: “ते नाताळाचे दिवस होते; या दिवसांत सर्वजण एकमेकांना भेटवस्तू देत असतात, पण खरं सांगतो, आम्हाला जो मनःपूर्वक आणि अतिशय मोठा उदारपणा दाखवण्यात आला त्याची तुलनाच करता येणार नाही.” पुढे ते म्हणतात: “त्या दुर्घटनेच्या आठवणी आता हळूहळू विरत चालल्या आहेत पण आता आम्हाला प्रेमळ कृत्यांच्या आणि प्रेमळ बंधुभगिनींच्या अनेक मोलवान आठवणी मिळाल्या आहेत. आम्ही आपला प्रेमळ स्वर्गीय पिता यहोवा याचे आभार मानतो, ज्याने या पृथ्वीवर बंधुभगिनींचे एक अतिशय अद्‌भुत एकजूट कुटुंब बनवले आहे आणि या कुटुंबात आम्ही आहोत याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत!”

अर्थात, अशा प्रकारच्या प्रत्येक दुर्घटनेत अशी मदत करणे शक्य होईलच असे नाही आणि अशी अपेक्षाही केली जात नाही. पण, मंडळी किती मोठा आधार ठरू शकते हे या उदाहरणावरून निश्‍चित दिसून येते.

वरून येणारे ज्ञान

अनेकांना ख्रिस्ती मंडळीतून एक वेगळ्या प्रकाराने मदत आणि आधार मिळाला आहे. तो कसा? ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाने’ तयार केलेल्या प्रकाशनांच्या माध्यमाने. यांपैकी सर्वात प्रमुख टेहळणी बुरूज व सावध राहा! ही नियतकालिके होय. ज्ञानवर्धक सल्ला आणि व्यवहार्य बोध देणारी ही प्रकाशने बायबलमधील देवप्रदत्त ज्ञानावर मुख्यतः आधारित असतात. (स्तोत्र ११९:१०५) बायबल आधारित माहितीसोबतच यांत विश्‍वसनीय आणि सप्रमाण संशोधनाच्या आधारावर मानसिक निराशा, लैंगिक अत्याचाराच्या दुष्परिणामांवर मात करणे, वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक समस्या, तरुणांपुढे असणारी आव्हाने आणि विकसनशील देशांतल्या विशिष्ट समस्या यांसारख्या नानाविध विषयांवरही माहिती प्रकाशित केली जाते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही प्रकाशने देवाचा मार्गच सर्वात उत्तम जीवनमार्ग आहे म्हणून त्याचे समर्थन करतात.—यशया ३०:२०, २१.

दर वर्षी, वॉच टावर संस्थेला प्रशंसा व्यक्‍त करणारी हजारो पत्रे येतात. उदाहरणार्थ, आत्महत्येच्या विषयावर प्रकाशित केलेल्या एका सावध राहा! अंकाबद्दल रशियाच्या एका तरुणाने असे लिहिले: “मी मुळातच निराश असल्यामुळे, . . . कित्येकदा आत्महत्या करण्याचे ठरवले होते. या लेखाने माझा विश्‍वास दृढ केला की देव मला माझ्या सर्व समस्यांना तोंड देण्यास मदत करेल. मी जगावे अशी त्याची इच्छा आहे. या लेखातून त्याने मला दिलेल्या पाठबळाबद्दल मी त्याचा ऋणी आहे.”

या जगाच्या तुफानी वादळांपुढे टिकाव धरणे तुम्हाला अशक्य वाटू लागले असेल, तर तुम्ही खात्री बाळगू शकता की ख्रिस्ती मंडळी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. प्रेमाला पोरके झालेल्या या व्यवस्थीकरणाच्या निर्जल मरुभूमीत चालून चालून तुम्ही तृषित झाला असाल, तर यहोवाच्या संघटनेत तुम्हाला पाण्याच्या जीवनदायक झऱ्‍याजवळ आल्यासारखे वाटेल. ख्रिस्ती मंडळीकडून मिळणारे साहाय्य अनुभवल्यानंतर तुम्हीही एका ख्रिस्ती स्त्रीच्या शब्दांत आपल्या भावना व्यक्‍त कराल, जिने आपल्या पतीच्या गंभीर आजारपणाला यशस्वीपणे तोंड दिल्यानंतर असे म्हटले: “मला जे प्रेम दाखवण्यात आलं, माझी ज्याप्रकारे काळजी घेतली गेली त्यावरून मला असं वाटतं जणू या संकटातून यहोवानं मला आपल्या तळव्यावर उचलून घेतलं होतं. यहोवाच्या महान संघटनेत असल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे!”

[तळटीपा]

a नावे बदलण्यात आली आहेत.

[२६ पानांवरील चित्र]

आजारी असणाऱ्‍यांना, प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावलेल्यांना आणि अशाच इतरांनाही आपण साहाय्य आणि पाठबळ पुरवू शकतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा