जगावरील दृष्टिक्षेप
थंड पाण्यात बुडण्यापासून निभावणे
अत्यंत थंड पाण्यात बुडणाऱ्या लोकांचा इतक्या लवकर मृत्यू का होतो, यावर परीक्षण करणाऱ्या शास्त्रज्ञांना हे आढळून आले आहे, की थंड पाण्याच्या धक्क्याप्रती, शरीराचा स्वाभाविक प्रतिसाद अतिवायूवीजन होणे हा आहे. “अचानक श्वास घेतल्याने पाणी आत जाते व त्याचा परिणाम नंतर बुडण्यात होतो,” असे न्यू सायन्टिस्ट नियतकालिक म्हणते. अतिवायूवीजन टाळता येत नाही. तर मग, वायू आत घेण्याचा प्रतिसाद बहुधा दोन तीन मिनिटांत कमी होईपर्यंत, पाण्याच्या पृष्ठभागावर डोके ठेवणे यावरच बचाव आधारित आहे.
सत्य सांगणे बंधनकारक नाही
अमेरिकेच्या अलीकडील न्यायालयीन चौकशींनी जगव्याप्तपणे जनतेचे लक्ष वेधवून घेतले आहे व पाहणाऱ्यांना थक्क करून सोडले आहे. “जरी अभियोक्त्यांना सत्य सादर करणे बंधनकारक असते तरी बचाव पक्षाचे वकील काही वेगळीच उद्दिष्टे साध्य करत असतात,” असे द न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्र म्हणते. “बचाव पक्षाच्या वकिलाचे कार्य, अशीलास दोषमुक्ती मिळवून देणे, अधिमतास न पोहंचणारे ज्यूरी मिळवून देणे (केवळ एकाही ज्यूरी सदस्याच्या मनात तर्कशक्तीसंपन्न संशय उत्पन्न करून) किंवा किमान गंभीर अशा दोषारोपांवर दृढ विश्वास मिळवून देणे, हे आहे.” “एखादे दोषविरहित अधिमत योग्य असल्याचे निश्चित करण्याचे बंधन त्यांना नाही,” असे स्टिफन गिलअर्स, जे न्यूयॉर्क विद्यापीठ विधी प्रशालेत वैध नीतिशास्त्राचे शिक्षक आहेत त्यांनी म्हटले आहे. “सत्याच्या शोधासाठी चौकशी केली जात आहे असे आम्ही ज्यूरीला सांगतो आणि बचाव पक्षाचे वकील त्यांना मूर्ख बनवण्याची शक्यता आहे, असे आम्ही त्यांना कदापि सांगत नाही.” “अशीलास स्पष्टपणे गोवणाऱ्या वस्तुस्थिती सामोऱ्या आल्यानंतर, त्या वस्तुस्थितींकडे दुर्लक्ष करून दोषमुक्ती जाहीर करण्यासाठी वकिलांना अनेकदा ज्यूरीकरता, स्वतः स्पष्टीकरण देऊ शकतील अशा गोष्टी बनविणे भाग असते,” असे टाईम्स वृत्तपत्र विधान करते. अशील दोषी असूनही ज्यूरीसमोर खटला आणण्याचा आग्रह धरतात असे वकिलांना कळते तेव्हा काय होते? “तेव्हा वकिलांना त्या गोष्टी १०० टक्के खोट्या आहेत, असे माहीत असूनही ते ‘डेविड कॉपरफिल्ड’ या कादंबरीतील यरिआ हीप ह्या पात्राप्रमाणे खोट्या नम्रतेने न्यायालयात जातील आणि आपल्या अशीलांच्या गोष्टींच्या प्रामाणिकतेवरील सखोल विश्वास जाहीर करतील,” असे गिलअर्स म्हणतात.
मगर वार्ता
अलीकडेच उत्खनन केलेल्या एका पुरातन मगरीच्या जबड्याचे अवशेष, मगर वंशाच्या “प्रथमच ज्ञात असलेल्या शाकाहारी सदस्याचे प्रतिनिधीत्त्व करू शकते,” असा अहवाल निसर्ग (इंग्रजी) नियतकालिक देते. मानवाला भीती वाटणाऱ्या आजच्या मगरीच्या लांब टोकदार दांतांऐवजी, ह्या प्राचीन पूर्वजास सपाट दात होते जे गवत खाण्यास अधिक अनुरूप होते, असे अहवालानुसार सांगण्यात येते. चीनच्या हॉबे प्रांतातील यांगस्टे नदीच्या दक्षिण तिरावरील एका डोंगरावर, चीन आणि कॅनडाच्या संशोधकांनी शोधून काढलेला हा प्राणी—उभयचर नसून भूचर होता, अशी चिन्हे दाखवून देतात. तिचा आकार? तिची लांबी तीन फूट इतकी होती.
वाढता तणाव
अलीकडेच ब्राझीलच्या रीउ दे झानेइरुमधील एका अभ्यासाद्वारे हे आढळून आले, की वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३५% पेक्षा अधिक लोक अनेक प्रकारचा मानसिक त्रास सहन करत आहेत, असा अहवाल वेझहॉ नियतकालिक देते. त्या नियतकालिकाने, जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्लूएचओ) संचालक डॉ. झॉर्झ ऑलबेरटू कॉसटा ई सीलवा यांना विचारले: “या आकड्यांचे स्पष्टीकरण कसे दिले जाऊ शकते? जग अधिकच वाईट झाले आहे का किंवा मानसिकदृष्ट्या लोक दुर्बल झाले आहेत?” त्यांचा प्रतिसाद: “अत्यंत जलदरीतीने परिवर्तन होत असलेल्या काळात आपण जगत आहोत आणि मानवी इतिहासात कधी दिसून आले नाही एवढ्या प्रमाणात त्याचा परिणाम सरतेशेवटी चिंता आणि तणाव यांत होतो.” तणावाचा एक सर्वसाधारण उगम, रीउ दे झानेइरुत सार्वत्रिक असणारा हिंसाचार आहे, असा दावा ते करतात. अनेकवेळा याचा परिणाम प्रचंड आघातानंतर उद्भवणाऱ्या तणावात होतो आणि “ज्यावेळी लोक जीव धोक्यात घालणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत असतात त्यावेळी हा तणाव त्यांच्यावर परिणाम करतो,” असे स्पष्टीकरण ते देतात. “दिवसा ते प्रत्येक गोष्टीसंबंधी असुरक्षितता प्रदर्शित करतात. रात्रीच्या वेळी त्यांना भयानक स्वप्ने पडतात व ज्या विशिष्ट घटनेने त्यांचे जीवन धोक्यात घातले होते त्याच घटनेचा आपल्या कल्पनेत ते पुनः अनुभव घेत असतात.”
आरोग्य तफावत
समृद्ध व गरीब राष्ट्रांमधील तफावत विस्तृत होत आहे. अल्प विकसित राष्ट्रांत राहणाऱ्या व त्यांत जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यमानाची सरासरी अपेक्षित मर्यादा ५४ वर्षें असून यांच्या तुलनेत प्रगमनशील राष्ट्रांत राहणाऱ्यांची ७६ वर्षें आहे, असा जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्लूएचओ) अंदाज आहे. सन १९५० रोजी गरीब राष्ट्रांतील बालमृत्यू, समृद्ध राष्ट्रांपेक्षा तीन पट जास्त होता; सध्या तो १५ पटीने जास्त आहे. सन १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, प्रसूतिसंबंधी असणाऱ्या गुंतागुंतीच्या आजारांमुळे गरीब राष्ट्रांतील मृत्यूचे प्रमाण, समृद्ध राष्ट्रांपेक्षा १०० पट अधिक होते. यात आणखी भर घालण्यातील खरी गोष्ट म्हणजे गरीब राष्ट्रांत राहणाऱ्या केवळ अर्ध्यापेक्षा कमी लोकांनाच शुद्ध पाणी व आरोग्यवर्धनाची सोय आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, “किमान विकसित राष्ट्रांची” संख्या सन १९७५ मध्ये २७ पासून वाढून सन १९९५ मध्ये ४८ पर्यंत वाढली. जगभरात १३० कोटी दरिद्री लोक आहेत व त्यांची संख्या वाढतच आहे.
सर्वोत्कृष्ट हिवाळी अंगरखा
अस्वल पांढऱ्या रंगांचे आहेत आणि बर्फाच्छादित प्रदेशात वस्ती करतात, केवळ या सुव्यक्त कारणासाठीच विमानांतून ध्रुवप्रदेशीय अस्वलांना शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी ते अत्यंत कठीण काम आहे असे नाही. पॉप्युलर सायन्स नियतकालिकानुसार या समस्याकरता शास्त्रज्ञांकडे, ज्यास बुद्धिमान समजले जात होते असा एक उपाय होता: त्यांनी सूक्ष्मभेदग्राही इनफ्रार्ड फिल्मचा वापर केला व असा तर्क केला, की त्या अवाढव्य प्राण्याच्या शरीरातून निघणारी उष्णता ती फिल्म सहज शोधून काढू शकेल. परंतु, ती फिल्म कोरीकरकरीतच होती! ध्रुवप्रदेशीय अस्वलाचा अंगरखा विद्युतरोधकाप्रमाणे अतिशय प्रभावकारी असल्यामुळे या प्राण्याच्या शरीरातून फार कमी उष्णता बाहेर पडत असल्याचे दिसून येते. अंगरख्यावरील ते केस सूर्याचे अल्ट्रा व्हायोलेट किरण वाहण्यास उत्तम असून अस्वलात असणाऱ्या सौर घटांमध्ये त्यांना वेधवून घेतात जे कसेतरी प्रकाशाचे रूपांतर उष्णतेत करण्यात यशस्वी होतात, असे टिपण देखील त्या नियतकालिकाने केले.
बेशुद्ध पडणारे शौकीन
वाद्यसंगीत जलसेत अनेक शौकीन बेशुद्ध का पडतात बरे? जर्मनीच्या, बर्लिन येथील युनिवर्सिटी हॉस्पिटलमधल्या एका मज्जातंतुशास्त्रज्ञाने अलीकडेच या घटनेवर संशोधन केले आहे. बर्लिनच्या वाद्यसंगीत जलसेत, ज्या तरुण स्त्रिया प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यांपैकी सुमारे ४०० स्त्रिया प्रयोग चालू असताना बेशुद्ध पडल्या. शोध (इंग्रजी) नियतकालिकानुसार, बेशुद्ध पडणाऱ्यांपैकी ९० टक्के जण समोरच्या रांगेत उभे होते, असे एका मज्जातंतुशास्त्रज्ञास समजले. पहिल्या रांगेतील ह्या बैठका मिळविण्याकरता त्या मुली अनेक तास रांगेत उभ्या होत्या आणि कित्येकांनी जेवण केले नव्हते किंवा आदल्या रात्री झोप घेतली नव्हती. दुसरी कारणे—त्यांचे स्वतःचे ओरडणे आणि मागून जमावाची रेटारेटी—याने छातीवर दबाव पडल्यामुळे रक्त दाब कमी होऊन याचा परिणाम पुढे, मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा होण्याचे थांबण्यात व शेवटी बेशुद्ध पडण्यात झाला. वाद्यसंगीत शौकिनांनी आधीच जेवण करावे आणि झोप घ्यावी, प्रयोगादरम्यान आपल्या जागेवर बसून राहावे, शांत असावे आणि जमावापासून दूर राहावे, असा सल्ला जरी मज्जातंतुशास्त्रज्ञाने दिला असला तरी थोडकेच किशोरवयीन शौकीन त्याचे पालन करतील हे त्यांनी कबूल केले.
वेळ कशी निघून जाते
वेळ कशी निघून गेली? उत्तर अभिप्रत असलेला हा प्रश्न पुष्कळजण विचारतात परंतु अलीकडेच केलेल्या एक अभ्यासाने वैज्ञानिकरित्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतील इलिनॉइस येथील एका संशोधन संस्थेने, सुमारे ३,००० लोकांच्या दैनिक कार्यहालचालींचा तीन वर्षे अभ्यास केला. या लोकांना, ते त्यांचा वेळ कसा घालवतात याबद्दल अखंडित अहवाल देण्यास सांगितले होते. तो गट १८ ते ९० वयोगटातील व विविध पार्श्वभूमींचा होता. वेळ खर्च होण्यात प्रमुख कारण म्हणजे झोप ही होती. त्यानंतरच्या कामात प्रती दिवशी सरासरी १८४ मिनिटे लागली. त्याच्या मागोमाग टीव्ही व व्हिडियो पाहण्यात १५४ मिनिटे खर्च झाले होते. गृहकार्यांमध्ये ६६ मिनिटे, प्रवास करण्यात ५१ मिनिटे, वेशभूषा करण्यात ४९ मिनिटे आणि मूल व लाडक्या प्राण्याच्या निगेसाठी २५ मिनिटे खर्च होत होती. यादीच्या शेवटी, प्रती दिवशी भक्तीकरता सरासरी १५ मिनिटे खर्च केल्याचा उल्लेख होता.
मुलांची विनामूल्य देखभाल
उपनगरातील त्रासलेल्या पालकांनी, आपल्या मुलांची देखभाल करण्याकरता एक नवीन मार्ग शोधून काढला आहे ज्यामुळे थोडाफार बाजारहाट करण्याकरिता त्यांना मोकळीक मिळू शकेल. ते आपल्या मुलांना खेळणीच्या किंवा विविध खेळ असणाऱ्या संगणकाच्या दुकानात सोडतात ज्यामुळे हायटेक यंत्रांनी मोहीत झालेली ही मुले, पालक येईपर्यंत प्रदर्शनासाठी ठेवलेल्या नमुन्यांशी खेळत असतात. परंतु, या प्रवृत्तीमुळे विक्रेते नाखुष होतात यात काही नवल नाही, असा अहवाल न्यूजवीक नियतकालिक देते. एक मुख्य गोष्ट म्हणजे मुले एकतर संभाव्य ग्राहकांना प्रदर्शनाचे नमुने वापरण्यापासून वंचित करत असतात किंवा यापेक्षाही वाईट म्हणजे त्या प्रदर्शन नमुन्यांची ते मोडतोड करतात. काही पालक पुन्हा येऊन, त्यांची मुले कोठे आहेत याबद्दल कोणाला माहिती आहे का किंवा त्यांना कोणी प्रसाधन गृहात घेऊन गेले आहे का, असे विचारत असल्याचे इतरांना आढळून आले आहे! त्यासाठी काही दुकाने या प्रवृत्तीला तोंड देण्यासाठी—एकतर प्रदर्शनासाठी ठेवलेले संगणक अशा ठिकाणी ठेवत असतात ज्यामुळे मुले ते सहज प्राप्त करू शकणार नाहीत किंवा मुले एकटे आहेत असे दिसल्यास शिपायास बोलवतात.
नवीन मूल्ये
रशियामधील युवकांची व त्याचप्रमाणे सर्वसामान्यपणे रशिया समाजाची मूल्ये एका निर्णायक स्थितीला येऊन पोहंचत आहेत. रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे अलीकडेच केलेल्या एका पाहणीत, युवकांच्या मनाचा अधिकाधिक कल, “मानवजातीस सामान्य असणारी मूल्ये—म्हणजेच आरोग्य, जीवन, संयुक्त कुटुंब आणि प्रीती व त्याचप्रमाणे व्यक्तिगत यश, करिअर, सुखसोयी आणि भौतिक सुरक्षितता या गोष्टींकडे असल्याचा दिसून आला आहे,” असा अहवाल रशियातील सॉक्ट पीटरबूर्ग्सकिया हे वृत्तपत्र देते. इतर प्रमुख मूल्ये म्हणजे पालक, पैसा, कल्याण, सौख्यानंद, मैत्री आणि ज्ञान यांवर केंद्रित आहेत. चित्तवेधक गोष्ट ही आहे, की युवकांच्या मनांत ज्यांना शेवटले स्थान आहे त्या गोष्टींपैकी दोन गोष्टी म्हणजे चांगला नावलौकिक मिळवणे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा आनंद उपभोगणे ह्या आहेत. तर मग सर्वात शेवटले स्थान कशास दिले जाते? प्रामाणिकपणा. “जर लबाडी त्यांच्याकरता एक सर्वसामान्य बाब बनली आहे तर मग वयात येणाऱ्या युवा पिढ्यांच्या मनांत [प्रामाणिकपणा] केवळ कवडीमोलाचा आहे,” अशाप्रकारे तो अहवाल अखेरीस म्हणतो.