देवाने आम्हाला त्याचा शोध लागणे शक्य केले
राजा दावीद आपला पुत्र शलमोन यास राजपद देण्यास तयार झाला तेव्हा, त्याने त्याला हा सल्ला दिला: “तू आपल्या बापाच्या देवाला ओळख आणि सात्विक चित्ताने व मनोभावे त्याची सेवा कर; परमेश्वर [यहोवा, NW] सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात, तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल, पण तू त्याला सोडिले तर तो तुझा कायमचा त्याग करील.”—१ इतिहास २८:९.
आमच्या बाबतीत हे खरे ठरल्याचे आम्ही पाहिले. आम्ही देवाचा शोध केला आणि—अनेक खोट्या मार्गांकडे परावृत्त झाल्यावरच आम्हाला तो प्राप्तही झाला. आमच्या विचारांचा रोख त्याच्यावर आणि त्याच्या सेवेवर किती जोरदारपणे केंद्रित होता हे यहोवाने समजून घेतले, आणि आम्हाला त्याचा शोध लागू देण्यास त्याने यश दिले असा विश्वास आम्ही करतो. ते कसे घडले याचा अहवाल येथे आहे.
आम्ही चार भाऊ, अमेरिकेतील फ्लोरिडा येथे मोठे झालो. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आमचे वडील आचारी म्हणून दीर्घकाळापर्यंत काम करत असत, आई घरातली व्यवस्था पाहत असे, आणि आम्ही चार मुले गवत कापणे, वृत्तपत्र पोहंचविणे—अशा प्रकारे कुटुंबाच्या मिळकतीला हातभार लावणारे कोणतेही काम करीत होतो. आई कॅथलिक आणि वडील बॅप्टिस्ट पंथाचे होते. आम्हा सर्वांचा विश्वास देवावर आणि बायबलवर होता पण त्यासाठी आम्ही काहीच केले नाही, तसेच आम्ही फारच क्वचित चर्चला जात होतो. १९७० च्या दशकाच्या सुरवातीची ही घटना आहे जेव्हा, शांती, बेल-बॉटम जीन्स, लांब केस आणि रॉक संगीत फारच लोकप्रिय होते. या सर्वांचा आमच्या जीवनावर परिणाम झाला.
सन १९८२ मध्ये आम्हापैकी स्कॉट आणि स्टीव्ह—क्रमशः २४ आणि १७ वय असलेले—अशा आम्ही दोघांनी बायबलचा गंभीरतेने विचार केला आणि खालावणाऱ्या जगिक परिस्थितींबद्दल आम्हाला अतिशय चिंता वाटू लागली. स्कॉटकडे स्वतःचा बांधकामाचा व्यवसाय होता. त्यातून बराच फायदा होत असल्यामुळे, आम्ही एकत्र मिळून एका अपार्टमेंटमध्ये स्थानांतर केले. आम्हाला त्याच त्याच दारूच्या अड्ड्यांचा आणि तेथील जीवनशैलीचा कंटाळा आला होता आणि दुसऱ्या ठिकाणी यापेक्षा चांगले जीवन असेल हे आम्हाला ठाऊक होते. आध्यात्मिक गोष्टींची भूक आम्हाला जाणवू लागली. बायबलचे नियमितपणे वाचन केल्याने देव वचनातून अधिक ज्ञान आणि अंतर्दृष्टी प्राप्त करण्याची इच्छा आम्हाला होऊ लागली.
रविवारच्या दिवशी आम्ही विविध चर्चला जाऊ लागलो. लेक वर्थ, फ्लोरिडा येथील घराजवळच्या चर्चेसमध्ये आम्ही जात होतो तेव्हा, २५ मिनिटांचे रविवारचे प्रवचन पैसे देण्याविषयी असायचे. “सढळ हाताने दान करा, उदार मनाने दान करा,” असे म्हणून तो सेवक उच्चपीठावर निम्मा वाकायचा. एका सभेत ते बहुधा तीन वेळा दानपात्र फिरवत ज्यामुळे घरी परततांना खिसे रिकामे होत असत. आम्ही पुष्कळ चर्चमध्ये गेलो, पण तेथेही दानपात्रे फिरवत असल्याचे आणि सामाजिक मेळावे अधिक असल्याचे आम्हाला आढळले.
यहोवाच्या साक्षीदारांविषयी इशारा देण्यात आला
आम्ही ज्यास बायबलच्या मूळ शिकवणी समजत होतो, त्या आमच्या मनावर बिंबवण्यात आल्या होत्या, आणि आम्ही त्यांचा स्वीकार केला कारण तेथील शिक्षक पेशेवाईक वेदान्ती होते. यातील एका वर्गात अमेरिकेतील पंथांविषयी चर्चा होती आणि यादीत सर्वप्रथम यहोवाच्या साक्षीदारांचे नाव होते. ते येशूवर विश्वास ठेवत नव्हते, त्यांच्याजवळ त्यांच्या स्वतःचे असे बायबल होते, ते स्वर्गात जाणार नव्हते आणि नरक नाही असा त्यांचा विश्वास होता अशाप्रकारचा इशारा आम्हाला देण्यात आला. यामुळे, साक्षीदारांचे चुकीचे आहे अशा निष्कर्षास आम्ही पोहोंचलो.
आतापर्यंत आम्हाला अतिशय आवेश होता परंतु तो अचूक ज्ञानाच्या अनुरूप नव्हता. (रोमकर १०:२) आम्ही प्रचार करावा आणि शिष्य बनवावे—असे मत्तय २८:१९, २० मध्ये येशूने जे म्हटले त्याची आम्हाला जाणीव होती. त्या वेळी २,००० सदस्य असलेल्या बायबल टाऊन नामक चर्चला आम्ही उपस्थित राहत होतो, आणि तेथे आम्ही १७ ते ३० वयोगटातील १०० सदस्यांच्या युवक गटाचे भाग होतो. त्यांनी प्रचार करावा म्हणून स्कॉटने त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला—परंतु ते सर्व व्यर्थ ठरले.
म्हणून, आम्ही स्वतःच्याच प्रचाराची मोहीम सुरू केली. स्थानीय जुन्या बाजारात एखादे स्टॉल टाकून पत्रिका आणि बायबल वितरण करण्याची कल्पना स्कॉटने दिली. आम्ही तसेच केले. आम्ही स्थानीय “ख्रिस्ती” पुस्तकालयात गेलो व पत्रिका आणि बायबलचा भरपूर साठा विकत घेतला, जुन्या बाजारात गेलो, तेथे दोन पायखोडे रोवले, त्यावर प्लायवुड घातले, त्यावर आमच्या पत्रिका आणि बायबल ठेवले आणि ‘केवळ ऐकणारे नव्हे तर वचनाप्रमाणे आचरण करणारे’ होण्याचा प्रयत्न केला.—याकोब १:२२.
प्रत्येक आठवडी आमची तथाकथित जुन्या बाजारातील सेवा वाढतच गेली व आम्ही इंग्रजी तसेच स्पॅनिश साहित्य सादर करीत होतो. तसेच, आमच्याजवळ बायबल, ३० वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका आणि “देव तुम्हावर प्रीती करतो” असे लिहिलेले बिल्ले देखील होते. “तुम्ही आज तुमचे बायबल वाचले आहे का?,” “मी का हसत आहे? येशू माझ्या अंतःकरणात आहे,” आणि असे पुष्कळ बायबल संदेश टी-शर्टवर छापण्यासाठी स्कॉटने लवकरच एक डेकल यंत्र विकत घेतले. एकावर “प्रकटीकरण” असे लिहिलेले आणि चार घोडेस्वारांचे चित्र होते.
आम्ही ते टी-शर्ट घालून मुक साक्ष देत आहोत असे आम्हाला वाटत होते. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी, सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत जुन्या बाजारातील सेवा चालू असे. पार्किंग करण्याच्या जागेतून चालत असताना, तुम्ही कारवर काही पत्रिका पाहिल्या म्हणजे, आम्ही तेथे गेलो होतो. सर्व साहित्य दान दिलेल्या पैशाने खरेदी केले जात परंतु तरी फारच कमी दान मिळत असे. एके वर्षी, आम्ही त्या वर्षाचा खर्च पाहिला, तो १०,००० डॉलर्स पेक्षा अधिक झाला.
आम्ही एका यहोवाच्या साक्षीदाराला भेटतो
एकदा, बॉनेट स्प्रींग्झच्या एका किनाऱ्यावर आम्ही पोहत असताना, एक वृद्ध मनुष्य आमच्याजवळ आला आणि आमच्या ट्रकवर बंपर स्टिकर असल्याचे आणि आमच्या टी-शर्टचे निरीक्षण केल्याचे त्याने सांगितले. तो बायबलबद्दल बोलू लागला आणि शास्त्रवचनांच्या मदतीने तर्क करू लागला. त्याने प्रेषितांची कृत्ये २:३१ मधील हा मुद्दा काढला व विचारले: “अग्निमय नरक अस्तित्वात असते आणि जर केवळ वाईट लोकच तेथे जात असते, तर येशू तेथे होता असे बायबलमध्ये का सांगितले असते?” त्याने पुढे बोलणे चालू ठेवले, आणि इतर अनेक शास्त्रवचनांची चर्चा केली. शेवटी, स्कॉट म्हणाला: “तुम्ही यहोवाचे एक साक्षीदार दिसता.” तो म्हणाला: “होय.” मग स्कॉट म्हणाला: “तुम्ही लोक येशूवर विश्वास ठेवत नाही.” त्या साक्षीदाराने नंतरची २० मिनिटे येशूविषयी सांगितले, पण त्याचा आमच्यावर काहीच प्रभाव पडला नाही.
सप्ताहांती जुन्या बाजारातील आमची सेवा आम्ही चालूच ठेवली. असे आम्ही तीन वर्षांपासून करत होतो—आमच्याजवळ सत्य आहे आणि आम्ही योग्य ते करत आहोत असाच आम्ही सतत विश्वास करत होतो. आम्ही अद्याप चर्चला जात होतो, दर रविवारी रात्री एका नवीन चर्चला जात होतो आणि आम्ही उपस्थित राहिलेल्या चर्चपैकी एकही चर्च आम्हाला समाधानकारक वाटले नव्हते. आम्ही बाकी उरलेल्या चर्चला भेटी देत होतो म्हणून एके रात्री आम्ही “यहोवाच्या साक्षीदारांच्या चर्चला” जाण्याचे ठरवले; आम्ही त्यांस तसे संबोधत होतो. आम्ही त्यांना येशूविषयी प्रचार करणार होतो. दूरध्वनी पुस्तकात आम्हाला त्यांचा पत्ता सापडला आणि एके रविवार सायंकाळी आम्ही तेथे गेलो. सर्व इतर चर्चप्रमाणे त्यांच्या सभा रविवारी सायंकाळी भरल्या जात नाहीत असे कळाल्यावर, ते खरोखरच येशूवर विश्वास करत नाहीत असा निष्कर्ष आम्ही काढला. सभांच्या वेळा दाखवलेल्या फलकावर सोमवार रात्रीची वेळ पुस्तक अभ्यासाची असल्याचे आम्ही पाहिले. म्हणून आमचे बायबल घेऊन आणि आमचे टी-शर्ट घालून आम्ही पुन्हा आलो. कोणते टी-शर्ट घालावेत—कोणत्या टी-शर्टमुळे चांगली साक्ष दिली जाईल—ते ठरवण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागला हे आम्हाला आठवते. आम्ही तेथे थोडे लवकर पोहंचलो, मग काही बांधव आम्हाजवळ आले. ते स्नेही आणि मैत्रिपूर्ण होते. तेव्हाच प्रकटीकरणावर आमची खोलवर चर्चा सुरू झाली. आम्ही सभेला उपस्थित राहावे म्हणून त्यांनी विनंती केली. त्यांनी आम्हाला उपासनेतील ऐक्य पुस्तक दिले, म्हणून आम्ही बसलो.a एका बांधवाने प्रार्थनेने अभ्यासाची सुरवात केली.
आम्ही लक्षपूर्वक ऐकले. प्रार्थनेच्या शेवटी, ते म्हणाले: “येशूच्या नावाने. आमेन.” आम्ही स्तंभित होऊन एकमेकांकडे पाहिले. “ते काय म्हणाले ते आपण चांगल्याप्रकारे ऐकले का? त्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली!” त्या वेळी जणू आमचे डोळे उघडले आणि डोळ्यांवरील खपल्या पडल्या. आमची मने आम्हाला सांगत होती ते खरे असल्यास, हीच आमच्याकरता ऐकण्याची वेळ होती. त्या बांधवाने सर्वांना उपासनेतील ऐक्य पुस्तकातील २१ अध्याय काढण्यास सांगितला, तो येशूविषयी आणि जगाचे भाग न होण्याविषयी होता. उपस्थित राहण्याइतका इतर कोणताही अभ्यास यापेक्षा उत्तम नव्हता. तो येशूचे जीवन आणि सेवा, शेवटले दिवस आणि तटस्थता याविषयी होता. आम्हाला माहीत नसलेल्या मुद्यांवर लहान मुलांना विवेचन करताना आम्ही पाहिले. मग पुन्हा, सभा समाप्त करताना, त्या बांधवाने येशूच्या नावाने प्रार्थना केली!
आमची आध्यात्मिकरित्या भरवणूक केली जाते
सत्यासाठी तान्हेले असल्यामुळे आम्ही त्या सभागृहात गेलो आणि तेथेच सत्य होते. आम्ही बाहेर पडलो तेव्हा, आध्यात्मिकरित्या भरवले गेल्याचे आम्हाला जाणवले आणि त्यानंतर आम्ही चर्चमध्ये कधीच पाऊल ठेवले नाही. दुसऱ्या दिवशी रात्री, लाँड्रोमॅटमध्ये आमचे कपडे धूत असताना, सोडा यंत्राजवळ टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचा एक मोठा गठ्ठा आम्हाला दिसला—त्यात किमान १५० तरी नियतकालिके होती. आम्ही आधी ती कधीच वाचली नसती, पण आता आम्हाला पुष्कळ विषयांबद्दल आस्था असल्यामुळे आम्ही ती सोबत घेऊन गेलो.
एका लेखात असा प्रश्न होता, “तुम्ही त्रैक्य मानता का?” दुसऱ्यामध्ये, “नरक खरोखरच आहे का?” एका सावध राहा! नियतकालिकेत मूर्तिपूजेविषयी एक लेख होता. त्या रात्री स्टीव्हने त्रैक्यावरील ते नियतकालिक वाचले, सर्व शास्त्रवचने काढून पुष्कळ संशोधन केले आणि त्याने जे काही शिकले त्यामुळे पहाटे १२.३० वाजता स्कॉटला जागे केले. दुसऱ्या दिवशी, बुधवारी, कामानंतर स्टीव्हने नरकावरील लेख वाचला. येशूने योहान ११:११ मध्ये लाजार झोपी गेला आहे असे सांगितले त्यावर तेथे तर्क केला होता. स्टीव्हने स्कॉटकडे पाहिले तेव्हा, तो म्हणाला: “माझे बायबल अग्निमय नरक असल्याची शिकवण देत नाही.” मूर्त्या आणि विविध प्रकारच्या क्रूसांवरील सावध राहा! वाचल्यावर आम्ही आमचे साहित्य एका ट्रकवर फेकले आणि ते जात असलेले पाहिले. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले, मान हलवली आणि स्मित केले. काही खास—सत्य—मिळाले असल्याचे आम्हाला माहीत होते.
एक दिवसानंतर दोन पेट्या आल्या. त्यामध्ये, ५,००० पत्रिका होत्या व तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर नरकात जाल असे त्यात म्हटले होते. अशा अनेक पत्रिका बायबल शिकवणीच्या सुसंगतेत नाहीत असे आम्हाला आता ठाऊक होते. आम्ही थोडे गोंधळलो होतो पण पुन्हा सोमवार रात्रीच्या पुस्तक अभ्यासाला उपस्थित राहिलो आणि आमच्या पुष्कळ पत्रिका सोबत आणल्या. आम्ही विचारले, “हे ठीक आहे का?” एके रात्री आम्ही त्या सर्व वाचून पाहिल्या. लवकरच जमिनीवर पत्रिकांचा ढीग साचला; त्यातील एकही बायबल शिकवणींच्या एकवाक्यतेत नव्हती. आम्ही त्या सर्व फेकून दिल्या. आमच्या नवीन विश्वासामुळे आम्हाला तसेच आम्ही ज्यांना प्रचार करतो त्यांना जीवन मिळणार होते हे आम्हाला माहीत होते. कोणत्याही अडथळ्याविना बायबलचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला तेथून निघून जायचे होते.
आम्ही अलास्का येथे स्थानांतर केले. तेथील आमच्या पहिल्या सभेत, आम्ही एका वडिलांना ते आमच्यासोबत दररोज अभ्यास करतील का असे विचारले. उपस्थित असलेल्या सर्वांनी आमचे बोलणे ऐकले असे मला वाटते. आम्ही उत्तम प्रगती केली आणि अनंतकाल जगू शकाल पुस्तक संपवले व आम्हाला एका दोन-दिवसीय संमेलनात बाप्तिस्मा घेण्याची इच्छा होती.* परंतु आम्हाला काही काळ थांबावे लागले. पायनियरींग करणे हे आमचे ध्येय होते. अनपेक्षितपणे, आमचे वडील आजारी पडले, आणि त्यांना मदत करण्यासाठी आम्हाला फ्लोरिडा येथे जावे लागले.
आध्यात्मिक प्रौढतेप्रत आमची प्रगती
फ्लोरिडामध्ये आम्ही उत्तम प्रगती केली, उपासनेतील ऐक्य पुस्तक संपवले आणि मग १९८७ मध्ये बाप्तिस्मा घेतला. सत्य स्वीकारून आम्हाला ११ महिने झाले होते. लगेचच आम्ही सहा महिन्यांकरता साहाय्यक पायनियर बनलो आणि मग नियमित पायनियर बनलो. केवळ दीड वर्षानंतर, आम्हा दोघांना सेवा सेवक म्हणून नेमण्यात आले. बाप्तिस्म्याच्या दोन वर्षांनंतर आम्ही बेथेलमध्ये सेवा करत होतो, तेथे स्कॉट आजही सेवा करत आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून चिनी भाषा शिकत आहे. स्टीव्ह सध्या मॉस्को, रशिया येथे, नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे. आम्हा दोघांनाही सत्य आणि त्याचा शोध नीतिसूत्रे २:१-५ मध्ये वर्णिल्याप्रमाणेच वाटला, जेथे म्हटले आहे: “माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारिशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेविशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारिशील, सुज्ञतेची आराधना करिशील, जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध करिशील, व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढिशील, तर परमेश्वराच्या [यहोवाच्या] भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.”
स्टीव्ह मॉस्कोत कसा पोहंचला
न्यूयॉर्कमध्ये राहून एक जादा भाषा येत असल्याने प्रचार कार्य अधिक मनोरंजक होईल—आणि कदाचित यहोवा लवकरच रशियामध्ये मार्ग मोकळा करील—असा विचार करून मी रशियन भाषा घेण्याचा निश्चय केला. त्यावेळी, ब्रुकलिन बेथेलमध्ये काम करताना, मी रशियन भाषेच्या पुस्तक अभ्यासाला हजर होऊ लागलो. एकच रशियन भाषेच्या पुस्तक अभ्यासाचा गट होता जो शुक्रवारी भेटत असे. कालांतराने, मी रशियन गटासोबत अधिक गोवला गेलो. मी त्यांच्यासोबत प्रचाराच्या कार्यहालचालीत भाग घेत असे जी रशियन लोकांच्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे फार आनंददायक असे. माझी बदली रशियन गटात करावी असे मी सेवा विभागाला लेखी विनंती केली. त्यांनी यास सहमती दिली तेव्हा मला आनंद झाला.
एके दिवशी बेथेलमधील सकाळच्या उपासनेच्या वेळी, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट संस्थेचे अध्यक्ष मिल्टन जी. हेन्शल यांनी एक खास अहवाल दिला जाईल असे कुटुंबाला सांगितले. मग, यहोवाच्या साक्षीदारांना रशियामध्ये सरकारी मान्यता मिळाली असून आपले बांधव आता उपासनेतील स्वातंत्र्य अनुभवू शकतात अशी घोषणा त्यांनी केली. त्या सकाळी ही आनंदाची बातमी ऐकल्यावर आम्हाला जो आनंद झाला तो बेथेलमधील कोणीही कधी विसरू शकेल असे मला वाटत नाही. त्या वेळी मला असे वाटले, की त्या मोठ्या नवीन क्षेत्रात जाणे एक महान सुसंधी असेल.
क्रास्नोदार, रशिया येथे राहत असलेल्या व्लोद्ये नावाच्या एका रशियन बांधवाशी मी पत्रव्यवहार करू लागलो. त्याने मला रशियाला भेट देण्यास आमंत्रण दिले. म्हणून जून १९९२ मध्ये मी माझे सामानसुमान बांधून मॉस्कोला निघालो. तेथे पोहंचल्यावर, बंधू व्लोद्ये विमानतळावर आलेले पाहून मला खूप आनंद झाला. मी ४५ वर्षे सत्यात असणाऱ्या बंधू स्तेफन ल्वीनस्की यांच्यासोबत राहिलो. मला मॉस्कोत भेटलेले ते पहिले साक्षीदार होते आणि सत्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवासात घालवली होती. बांधवांनी दाखवलेले आदरातिथ्य खरोखरच उत्तम होते.
तर असा मी मॉस्कोत होतो व मला तेथील भाषा जास्त येतही नव्हती. त्या वेळी, केवळ चार मंडळ्या होत्या आणि आम्हाला जणू सर्व बांधवांचा परिचय होता. तेव्हापासून मी पुष्कळ प्रयत्न करून कसाबसा माझा वीसा लांबवत आलो आहे. माझे खर्च भागविण्याकरता मी वेळोवेळी काम करू शकतो. दळणवळण करता येईल आणि सभांमध्ये आध्यात्मिकरित्या भरणपोषण करता येईल इतकी रशियन भाषा शिकून घेणे ही सर्वात मोठी अडचण होती. त्यात हळूहळू प्रगती झाली, आणि अर्थात, मी अजूनही त्यावर काम करत आहे.
मला अनेक अधिवेशनांना उपस्थित राहण्याची तसेच आश्चर्यकारक वाढ पाहण्याची व बाप्तिस्म्याचे उल्लेखनीय प्रमाण पाहण्याची सुसंधी प्राप्त झाली आहे. आपल्या येथील बांधवांचा शुद्ध आवेश पाहणे अतिशय विश्वास मजबूत करणारा अनुभव ठरला आहे. याची अदलाबदल मी कशासोबतही करणार नाही. मी आलो तेव्हा मला भेटलेले अनेक बंधू व बहिणी जे नुकतेच अभ्यास करत होते किंवा ज्यांनी नुकताच बाप्तिस्मा घेतला होता ते आता पूर्ण वेळेचे पायनियर, अथवा सेवा सेवक किंवा रशियातील सेंट पीटर्सबर्ग जवळील सोलनेकनोये येथे बेथेल सदस्य या नात्याने सेवा करत आहेत.
मी उपस्थित राहणाऱ्या मंडळीत प्रत्येक रविवारी ५३० इतकी उपस्थिती असून ती गच्च भरत आहे आणि प्रत्येक महिन्याला सरासरी १२ बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक असतात. मागील आकडेवारी अशी होती, ३८० प्रचारक, ३ वडील आणि ७ सेवा सेवक. आमची मंडळी ४८६ पेक्षा अधिक गृह बायबल अभ्यासांचा अहवाल देते. फेब्रुवारी १९९५ मध्ये, आमच्या २९ पुस्तक अभ्यासांना भेटी देऊन सेवा भाषण देण्याची सुसंधी मला लाभली. मी दर आठवडी चार गटांना भेटी देत असे. प्रत्येक अधिवेशनाआधी, बाप्तिस्म्याच्या उमेदवारांची प्रश्ने घेण्यातही आम्ही फार व्यग्र असतो. मे १९९५ मध्ये, आमचा खास संमेलन दिवस होता आणि आमच्या मंडळीतील ३० जणांनी बाप्तिस्मा घेतला. एकूण, ६०७ जणांनी बाप्तिस्मा घेतला आणि १०,००० उपस्थिती होती. उन्हाळ्यातील प्रांतीय अधिवेशनात, आमच्या मंडळीतील २४ जण बाप्तिस्मा घेतलेल्या ८७७ लोकांपैकी होते! आमच्या मंडळीत १३ पायनियर आहेत आणि ३ खास पायनियर आहेत. ते सुमारे ११० अभ्यासांचा अहवाल देत आहेत! सध्या, आमच्याकडे १३२ बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आहेत.
सन १९९५ मधील आमच्या स्मारक विधीसाठी १,०१२ इतकी उपस्थिती होती! संस्थेने अलीकडेच मटेश या पोलिश बांधवाला आमच्या मंडळीत पाठवले आहे. त्याने सेवा प्रशिक्षण प्रशालेतून पदवी घेतली आहे आणि तो अतिशय मदतीचा ठरेल. आता आमच्याकडे तीन वडील आहेत. यास्तव, आणखी एक मंडळी स्थापन केली जाईल आणि आमचे क्षेत्र—ज्यात जवळजवळ दहा लाखाची लोकसंख्या आहे—याचे दोन विभाग केले जातील. दोन मंडळीतील प्रत्येकात सुमारे २०० प्रचारक असतील. एका मंडळीत दोन वडील तर दुसऱ्या मंडळीत एक वडील असतील. आमचे आणखी एक संमेलन येत असल्यामुळे त्या वेळी बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार असलेल्या ४४ जणांचे प्रश्न आम्ही सध्या घेत आहोत. विलक्षण वाटते! खरोखरचे एक आध्यात्मिक परादीस! हे आश्चर्यजनक आहे! खरेच यहोवाचा हात कार्य करत आहे. यावेळी त्याचा रथ जणू रशियातून भरधाव वेगाने जात आहे. ऑक्टोबर १९९५ या रोजी सांगितल्याप्रमाणे, मॉस्कोत सुमारे ४० मंडळ्या आहेत. पुरेसे वडील असते तर त्यांचे प्रमाण सहजगत्या दुप्पट झाले असते.
जुन्या बाजारातील आमच्या सेवेला बराच काळ उलटून गेला आहे. स्कॉट ब्रुकलिन बेथेलमध्ये आहे, स्टीव्ह वडील या नात्याने मॉस्कोतील एका मंडळीत सेवा करत आहे—देवाने आम्हाला त्याचा शोध घेण्यात यशस्वी केल्याबद्दल आम्ही दोघेही त्याचे फार आभारी आहोत. लाखो लोक देवाचा शोध घेतील आणि तो त्यांना त्याचा शोध घेणे शक्य करील अशी आम्ही प्रार्थना करतो.—स्कॉट आणि स्टीव्ह डेवीसने निवेदित केल्याप्रमाणे.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित.
[१८ पानांवरील चित्र]
स्कॉट
[१९ पानांवरील चित्र]
स्टीव्ह
[२१ पानांवरील चित्रं]
मॉस्कोतील एका मंडळीत प्रत्येक रविवारी ५३० पेक्षा अधिक उपस्थिती असते