वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g96 ४/८ पृ. २२-२४
  • मी क्रीडा संघात सामील व्हावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी क्रीडा संघात सामील व्हावे का?
  • सावध राहा!—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्याही किंमतीवर जिंकणे?
  • नैतिक तडजोडी
  • शारीरिक प्रशिक्षण अथवा शारीरिक दुखापत?
  • विचारात घेण्याजोग्या इतर बाबी
  • योग्य निर्णय घेणे
  • देवाची उपासना की शारीरिक प्रशिक्षण?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • खेळांतील स्पर्धा अयोग्य आहे का?
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९६
g96 ४/८ पृ. २२-२४

तरुण लोक विचारतात . . .

मी क्रीडा संघात सामील व्हावे का?

“एखाद्या संघात असण्यात एवढे विशेष काय आहे?” असा प्रश्‍न सेवंटीन नियतकालिकातील एका लेखाने मांडला. उत्तर देताना या लेखाने म्हटले: “समान उद्दिष्टासाठी कार्य करत असल्यामुळे तुम्ही एकमेकांच्या अगदी जवळ येता. तसेच, सामूहिकपणे समस्या कशा सोडवाव्यात, समंजस व लवचीक कसे असावे आणि तडजोड कशी करावी यांसारखी दळणवळणाची कौशल्येही तुम्हाला शिकण्यास मिळतात.”

अशा प्रकारे, सांघिक खेळांत भाग घेण्याचे पुष्कळ फायदे असल्याचे दिसून येते व त्यांपैकी मौज व व्यायाम हेही काही कमी महत्त्वाचे नाहीत.a काहीजण तर असेही म्हणतात की संघटित खेळ खेळल्याने एखाद्याचा गुणसमुच्चय विकसित करण्यात मदत होते. यामुळेच की काय तरुणांच्या एका बेसबॉल क्रीडामंडळाचे ब्रीद, “सद्‌गुण, धैर्य, निष्ठा” असे आहे.

परंतु, खेदाची बाब अशी की संघटित खेळ नेहमीच अशा उदात्त आदर्शांना उंचावून धरत नाहीत. मुलांचे खेळ (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “काही वेळा ज्यांच्या मनावर चटकन प्रभाव पडतो अशी लहान मुले, शिवीगाळ करणे, फसवणे, भांडणे, दादागिरी करणे व इतरांना दुखावणे शिकतात.”

कोणत्याही किंमतीवर जिंकणे?

सेवंटीन नियतकालिकातील एका लेखाने कबूल केले: “जिंकण्यास अत्याधिक महत्त्व दिले जाते ही खेळांची अवांछनीय बाजू आहे.” “आपण एकमेकांना चिथावून व एकमेकांचा हेवा करून पोकळ अभिमानाची इच्छा करणारे असे नसावे,” या बायबलच्या शब्दांच्या हे अगदीच विरोधात आहे. (गलतीकर ५:२६, पंडिता रमाबाई भाषांतर) थोडीशी मैत्रीपूर्ण स्पर्धा खेळातील रोचकपणा व मौज वाढवू शकते हे खरे असले तरीही स्पर्धात्मक भावनेचा अतिरेक, शत्रुत्वास कारणीभूत ठरून—खेळण्यातील मौज घालवू शकतो.

उच्च माध्यमिक शाळेचा भूतपूर्व फुटबॉल पटू, जॉन, आठवण करून सांगतो: “आमचे एक प्रशिक्षक भलतेच वेडे होते; ते नेहमीच आमच्यावर खेकसायचे . . . मी सरावासाठी जाण्यास फार भीत होतो . . . जणू छळ-छावणीत असल्यासारखे मला वाटत असे.” सर्वच प्रशिक्षक शिवीगाळ करणारे नसतात हे खरे असले तरी त्यांपैकी अनेकजण जिंकण्यावर अत्याधिक जोर देतात. एका लेखकाने असा निष्कर्ष काढला: “अनेक खेळाडू अशा स्थितीपर्यंत येऊन पोहंचतात जेथे स्पर्धा करण्याच्या आनंदाच्या परिणामस्वरूपात, त्यांच्यावर जिंकण्याचे असह्‍य दडपण येते.” यामुळे काय घडू शकते?

महाविद्यालयीन फुटबॉल व बास्केटबॉल खेळाडूंपैकी, “१२ टक्के जणांनी, मानसिक दुःख, शारीरिक दुःख, मादक पदार्थ घेण्याची किंवा मद्यपान करण्याची अनावर इच्छा, मानसिक व शारीरिक दुर्व्यवहार तसेच असमाधानकारक शालेय कार्यसिद्धी या पाच क्षेत्रांपैकी किमान दोन क्षेत्रांत समस्या असल्याचे सांगितले,” असे प्रकट करणाऱ्‍या एका पाहणीबद्दल विज्ञान वार्ता (इंग्रजी) ने अहवाल दिला. याच धर्तीवर, ऑन द मार्क हे पुस्तक असा अहवाल देते: “खेळांच्या सर्वच थरात मादक पदार्थांचा दुरुपयोग करणे ही एक गंभीर समस्या आहे यासोबत, संघटित मैदानी खेळांशी संबंधित असलेला जवळजवळ प्रत्येक जण सहमत आहे.”

नैतिक तडजोडी

जिंकण्याचे दडपण एखाद्या तरुण खेळाडूला, न्याय्यपणा व प्रामाणिकपणाच्या वाजवी दर्जांसोबत तडजोड करण्यासही भाग पाडू शकते. खेळांत तुमचे मूल (इंग्रजी) हे पुस्तक असे निरीक्षण करते: “खेळाच्या आधुनिक जगात, जिंकणे केवळ चांगले नसून तेच सर्वकाही आहे. हारणे केवळ वाईट नाही, तर ते अक्षम्य आहे.”

आणखी एक कटू सत्य: प्रशिक्षक अनेकदा खेळाडूंवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना दुखापत करण्याचे प्रचंड दडपण आणतात. आजचे मानसशास्त्र (इंग्रजी) यात एका लेखाने असे म्हटले: “खेळांत चांगले असण्यासाठी तुम्हाला वाईट असावेच लागते. निदान, अनेक खेळाडू, प्रशिक्षक व खेळांचे शौकीन तरी असेच समजतात.“ एक पेशेवाईक फुटबॉल खेळाडू त्याच्या स्थायी स्वभावाचे वर्णन, “कोमल, समंजस व मनमिळावू” असे करतो. परंतु खेळाच्या मैदानावर, त्याच्या स्वभावाचे जणू जेकिल-ॲण्ड-हाइड रुपांतर घडते. मैदानावरील त्याच्या स्वभावाचे वर्णन करताना तो म्हणतो: “मी त्यावेळेपुरता नीच व खवळलेला असतो. . . . मी खरंच किती घृणास्पद बनतो. मी ज्याला जोराने ढकलणार, त्या व्यक्‍तीबद्दल मला जराही आदर वाटत नाही.” प्रशिक्षक अशा मनोवृत्तीला अनेकदा प्रोत्साहन देतात.

बायबल ख्रिश्‍चनांना असे प्रोत्साहन देते: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सैकर ३:१२) तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना दुखापत करण्यास, त्यांना चिरडून टाकण्यास व त्यांना पांगळे करण्यास आर्जवणारे उत्साहवर्धक भाषण दररोज देण्यात आल्यास, तुम्ही असे गुण विकसित करू शकाल का? सोळा वर्षीय रॉबर्ट कबूल करतो: “मी संघटित खेळ खेळले आहेत. जिंकण्याची खात्री असल्यास तुम्ही कोणाला दुखापत करता यास काही महत्त्व नसते.” आता तो एक बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती असल्यामुळे त्याचे विचार बदलले आहेत. तो म्हणतो: “मी पुन्हा कधीही तसे करणार नाही.”

शारीरिक प्रशिक्षण अथवा शारीरिक दुखापत?

शारीरिक धोक्यांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. निव्वळ मौज करण्यासाठी मित्रांसोबत खेळताना देखील खेळ धोकेदायक आहेत हे खरे आहे. तथापि, तरुणांना होता होईल तितके पेशेवाईक खेळाडूंसारखे खेळण्यास प्रशिक्षित केले जाते तेव्हा हे धोके अधिकच वाढतात.

खेळांत तुमचे मूल हे पुस्तक सांगते: “पेशेवाईक खेळाडूंना दुखापत होऊ शकते. परंतु, ते अत्यंत कुशल, शारीरिकदृष्ट्या धडधाकट, दुखापत होण्याची स्वेच्छेने जोखीम पत्करणारे प्रौढ असतात व त्यांना असे करण्यासाठी चांगला पैसा मिळतो. एवढेच नव्हे तर त्यांना सामान्यपणे सर्वोत्कृष्ट असलेलेच सर्वकाही दिले जाते, निपुण तज्ज्ञांतर्फे उत्तम प्रशिक्षण, सर्वोत्तम साधने व पहिल्या प्रतीचा अत्यंत काळजीपूर्वक वैद्यकीय उपचार. . . . शाळकरी मुलांना या सुविधा उपलब्ध नसतात.” ख्रिश्‍चनांना, “आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी,” असे सांगण्यात येते. (रोमकर १२:१) तुमच्या शरीरास अनावश्‍यक किंवा अवाजवी जोखिमेत घालण्यापूर्वी तुम्ही पुरेसा विचार करायला नको का?

विचारात घेण्याजोग्या इतर बाबी

जरी आरोग्यविषयक धोके अत्यल्प आहेत असे भासतात तरीसुद्धा संघटित खेळ वेळ-खाऊ असतात. सरावाचे सत्र तुमच्या सामाजिक जीवनाचा वेळ तर घेतीलच पण त्यासोबतच ते, अभ्यास व गृहपाठासाठी तुम्ही बाजुला ठेवायला हवा अशा वेळातील देखील पुष्कळ वेळ घेऊ शकतील. विज्ञान वार्ता याने अहवाल दिला की अभ्यासक्रमाव्यतिरिक्‍त असणाऱ्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेणाऱ्‍या इतर विद्यार्थ्यांपेक्षा महाविद्यालयीन खेळाडूंची “गुणप्राप्ती किंचित कमी” असते. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, क्रीडा संघात असल्यामुळे, बायबलमध्ये “उत्कृष्ट गोष्टी” म्हणण्यात आलेली आध्यात्मिक ध्येये, मिळणे कठीण बनते असे तुम्हाला दिसून येण्याची शक्यता आहे. (फिलिप्पैकर १:१०, पंडिता रमाबाई भाषांतर) स्वतःला विचारा, ‘क्रीडा संघात भाग घेतल्यामुळे मला ख्रिस्ती सभा चुकवाव्या लागतील का किंवा त्यामुळे प्रचार कार्यातील माझा सहभाग मर्यादित होईल का?’

नैतिक स्तर, शुद्ध भाषा किंवा स्पर्धेबाबत तुमच्या विचारांशी सहमत नसणाऱ्‍या तरुण व प्रौढांसोबत बराचसा वेळ घालवण्याचे संभाव्य परिणामसुद्धा बारकाईने लक्षात घ्या. काही झाले तरी, “कुसंगतीने नीति बिघडते” असे बायबल म्हणते. (१ करिंथकर १५:३३) उदाहरणार्थ, द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्रातील संपादकीय पानासोबत विशेष सदरांसाठी असणाऱ्‍या पानावरील एक लेख विचारात घ्या: “लॉकर रूम म्हणजे, वर्णनात्मक लैंगिक शब्दांत स्रियांच्या शरीरांविषयी चर्चा करण्याचे, लैंगिक समागम करण्यात यश प्राप्त झाल्याविषयी बढाई मारण्याचे व स्त्रियांना मारहाण करण्याबद्दल विनोद करण्याचे पुरुषांचे ठिकाण.” अशा वातावरणात असणे तुम्ही निवडल्यास आध्यात्मिकदृष्ट्या तुम्हावर कोणता परिणाम घडून येईल?—पडताळा याकोब ३:१८.

योग्य निर्णय घेणे

तुम्ही क्रीडा संघात नाव घालण्याच्या विचारात आहात का? तर मग, असे करण्यात काय समाविष्ट आहे याचा विचार करण्यास वरील माहिती कदाचित तुम्हाला मदत करील. निर्णय घेतेवेळी इतरांच्या विवेकाचा विचार करा. (१ करिंथकर १०:२४, २९, ३२) अर्थात, कोणताही कडक नियम घालून देता येत नाही कारण अवघ्या जगातील परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. काही ठिकाणी खेळांत भाग घेणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असू शकेल. परंतु, तुम्हाला शंका असल्यास तुमच्या पालकांशी किंवा कोणा प्रौढ ख्रिश्‍चनाशी याबाबतीत बोला.

अनेक ख्रिस्ती तरुणांनी सांघिक खेळ न खेळण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. तुमचा खेळांकडे कल असल्यास व तुम्हाला खेळांत खरोखरच रस असल्यास असे करणे सोपे नाही! शिक्षक, प्रशिक्षक व पालकांकडून येणारे दडपण वैफल्याच्या भावनेत आणखी भर पाडू शकतात. तरुण जिम्मी कबूल करतो: “न खेळणे हा स्वतःशीच संघर्ष आहे असे मला वाटते. सत्य मानत नसलेले माझे वडील उच्च माध्यमिक शाळेत असताना सराईत खेळाडू होते. क्रीडा संघात नाव न घालणे मला काही वेळेस फार कठीण वाटते.” तरीसुद्धा, तुमच्या निर्धाराला धरून राहण्यासाठी, सत्य मानणारे पालक व मंडळीतील प्रौढ ख्रिश्‍चनांचा आधार फार सहायक ठरू शकेल. जिम्मी म्हणतो: “मी माझ्या आईचा ऋणी आहे. खेळांत भाग घेण्याच्या दडपणाने कधी कधी मी फार उदास होतो. पण माझ्या जीवनातील यथार्थ ध्येयांची आठवण करून देण्यासाठी ती नेहमी माझ्या पाठीशी असते.”

सांघिक खेळ, खेळाडूंना सहकार्य करणे व समस्या सोडवणे शिकवू शकतील. परंतु, अशा गोष्टी शिकण्यासाठी ख्रिस्ती मंडळीत कार्य करताना भरपूर संधी उपलब्ध असतात. (पडताळा इफिसकर ४:१६) सांघिक खेळ मनोरंजक देखील असू शकतील पण त्यांची मजा लुटण्यासाठी क्रीडा संघात असणे अनिवार्य नाही. काही खेळांची मजा, घरामागील अंगणात किंवा स्थानीय उद्यानात ख्रिस्ती मित्रांसोबत खेळण्याद्वारे देखील लुटता येईल. कौटुंबिक सहली अशा हितकारक खेळासाठी अधिक संधी उपलब्ध करून देऊ शकतील. सोळा वर्षांचा ग्रेग म्हणतो, “मंडळीतील इतरांसोबत खेळणे कितीतरी पटीने अधिक चांगले असते. ते निव्वळ मौज म्हणून असते व आपण आपल्या मित्रांसोबतच असतो!”

विजयी संघात असण्याचा रोमांच, घरामागील अंगणात खेळण्यात येऊ शकणार नाही हे मान्य आहे. तथापि, सर्वात अनुकूल परिस्थितीत “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे; सुभक्‍ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे,” हे कधीही विसरू नका. (१ तीमथ्य ४:८) ईश्‍वरी भक्‍ती विकसित करा, असे केल्यास देवाच्या नजरेत तुम्ही निश्‍चितच विजयी व्हाल!

[तळटीपा]

a आमच्या फेब्रुवारी २२, १९९६ (इंग्रजी) अंकात, “तरुण लोक विचारतात . . . सांघिक खेळ—ते माझ्यासाठी चांगले आहेत का?” हा लेख पाहा.

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आमचे एक प्रशिक्षक भलतेच वेडे होते; ते नेहमीच आमच्यावर खेकसायचे . . . मी सरावासाठी जाण्यास फार भीत होतो”

[२४ पानांवरील चित्र]

जवळजवळ नेहमीच, प्रशिक्षक जिंकण्यावर जोर देतात—यासाठी इतरांना दुखापत करावी लागली तरी देखील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा