नागाला भेटावयास तुम्हाला आवडेल का?
भारतामधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
तुम्हाला खरेच भेटावयाचे आहे का? अनेक प्रौढ याचे उत्तर नाही असे देतील. पण एखादे मूल यास नाही म्हणणार नाही. नागासहित सापांची भीती वाटणे हा लहान मुलांमध्ये किंवा प्राणांमध्ये देखील उपजत गुण नाही. अविश्वसनीय माहिती, फुगवून सांगितलेल्या गोष्टी, मिथ्या आणि चुकीच्या समजुतींमुळे सापांबद्दल तिटकारा निर्माण होऊ शकतो.
अर्थात, आम्ही तुम्हाला नागाला भेटण्याचे आमंत्रण देतो तेव्हा सुरक्षित अंतरावरून पाहण्यास सांगत आहोत! नाग अतिशय विषारी असल्यामुळे त्याच्यापैकी एकाच्या जवळ जाऊन त्यावरून हात फिरवण्याची इच्छा आपल्याला होणार नाही. तसेच नाग देखील आपली भेट व्हावयास तेथेच थांबून राहणार नाही; आपली चाहुल लागल्यावर तो लागलीच सुरक्षित ठिकाणी लपण्यासाठी पळून जाईल. या मनोवेधक प्राण्याविषयी काही आकर्षक वास्तविकता शिकण्याद्वारेच आपण नागाला भेटण्याचे समाधान मानू या.
नाग हे सर्पेंटीस या उपदर्जातील आणि पोकळ विषदंत असलेल्या विषारी सापांना दिलेल्या इलॅपिडी नामक सर्पकुलातील सरपटणारे प्राणी आहेत. नागाच्या सुमारे १२ जाती आहेत त्या ऑस्ट्रेलियापासून आशिया आणि आफ्रिकेच्या कटिबंधांतून अरेबिया आणि समशीतोष्ण कटिबंधांपर्यंत आढळतात. अधिककरून नागराज किंवा नाजा हा सर्वात भयंकर नाग आहे. त्याची लांबी तीन ते पाच मीटर असून तो जगातील सर्वात विषारी साप आहे. अतिवृष्टी असलेल्या दाट अरण्याच्या किंवा दलदलीच्या भागात राहण्यास आवडत असल्यामुळे तो दक्षिण चीन, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार आणि भारतातील काही भागांमध्ये आढळतो. काळी कुळकुळीत शेपटी, हिरव्या-पिवळसर शरीरावर रंगीत पट्टे, पूर्ण वाढ झाल्यावर हा रंग हिरवा तपकिरी होतो, आणि त्याच्या फणेवर लहान ठिपक्यांच्या पुंजक्यांमुळे तो अतिशय देखणा दिसतो.
इतर जातीचे नाग एक ते दोन मीटर लांबीचे असतात. फणेवर विलक्षण चष्म्याच्या खुणा असलेला म्हणजेच चष्म्यासारखी दिसणारी खूण असलेला नाग मूळ भारताचा व तेथे सर्वत्र आढळणारा आहे. तो काळा, गडद तपकिरी किंवा पिवळट पांढऱ्या रंगाचा असू शकतो व त्याच्या फणेच्याखाली रुंद, काळसर पट्टा आणि शरीरावर पांढऱ्या व पिवळ्या ठिपक्यांचे पट्टे असतात. श्रीलंका तसेच भारताच्या पूर्व आणि उत्तरपूर्व भागात आढळणारा एक-डोळी चष्म्याची खूण असणारा नाग थोडासा फिकट असून त्याची फणा थोडी लहान आणि जास्त गोल असते व त्यावर एकच पांढरी वर्तुळाकार खूण असते ज्यामुळे त्याला हे नाव मिळाले आहे. भारताच्या वायव्याकडे आणि पाकिस्तानात आपल्याला काळाकुट्ट नाग दिसून येतो. आफ्रिकेत इतर नागांव्यतिरिक्त रिंगल्स अथवा थुंकणारा नाग आणि इजिप्तचा नाग देखील आहेत. नंतरचा, गडद रंगाचा व निमुळत्या फणेचा साप बहुधा तोच विषारी साप असावा ज्यामुळे राणी क्लीयोपात्राचा मृत्यू झाला असे म्हटले जाते.
सापांचे त्यांच्या स्वतःच्या जातीच्या सापांशीच मैथुन होते, एका विशिष्ट कस्तूरी वासाने ते आकर्षिले जातात. नाग इतर सापांपेक्षा कुटुंबात अधिक रस दाखवतो, नर व मादी बहुधा सोबतच राहतात. नागराजाची मादी ही घरटे तयार करणाऱ्या अपवादात्मक सापांमधील एक आहे. ती सुमारे ३० सेंटीमीटर उंचीचा पानांचा ढिगारा करून त्यात २० ते ५० अंडी घालते. मग त्या ढिगाऱ्याभोवती वेटोळे करून ती अंडी उबविण्याच्या सुमारे दोन महिन्याच्या काळात अन्न न खाता तेथेच राहते, नरही बहुधा जवळपासच असतो. इतर नाग घरटे तयार न करता त्यांच्या अंड्यांचे संरक्षण करण्याकरता जवळ असतात.
सापाची पिल्ले अंडे फोडून बाहेर येण्याकरता एका दाताचा उपयोग करतात जो नंतर गळून पडतो. बाहेर आल्यावर ते संपूर्णतः स्वावलंबी असून त्यांच्या विषग्रंथी आणि विषदंतांची पूर्ण वाढ झालेली असते. ते वारंवार त्यांची जीभ बाहेर काढतात, परिसराचा वास घेऊन टाळूवर असणाऱ्या जेकबसन्स अवयवाला रासायनिक माहिती पुरवतात. तो अवयव घ्राणेंद्रियाशी जोडलेला असतो; चव आणि वासाच्या संयोगामुळे सापाला त्याचे भक्ष्य शोधण्याकरता, नर अथवा मादी हुडकण्याकरता किंवा शत्रुंपासून संरक्षण मिळण्याकरता मदत मिळते.
सापाचे पिल्लू झपाट्याने वाढते आणि अल्पावधीतच अतिशय घट्ट झालेली बाह्य कात टाकते. ही असाधारण क्रिया नियमितपणे पुनःपुन्हा घडते कारण नाग त्याच्या जीवनकाळात सतत वाढत असतो, त्याचा जीवनकाळ २० पेक्षा अधिक वर्षांचा असू शकतो. कात टाकण्याच्या एक किंवा दोन आठवड्यांआधी, साप सुस्त होतो, त्याची कात फिकट होते आणि त्याचे डोळे फिकट निळ्या रंगाचे होतात. मग, अचानक, त्याचे डोळे पूर्ववत होतात आणि साप त्याचे डोके दगडांवर घासून तोंडावरची जुनी कात टाकतो. आता तो अक्षरशः त्याच्या कातेतून बाहेर सरपटत येतो आणि अगदी डोळ्यावरील पारदर्शक पटलापासून शेपटीपर्यंत त्या कातेची उलटी बाजू बाहेर येते. आता, एक चैतन्यपूर्ण, चमकदार, नवा दिसणारा साप त्याची सर्वसामान्य कार्यहालचाल करण्यास तयार असतो.
हवेतील तापमानाचा नागांवर अतिशय परिणाम होतो. वातावरण थंड होत जाते तसे ते सुस्त होतात आणि निश्चल देखील होतात आणि फक्त तापमान उष्ण झाल्यावरच क्रियाशील बनतात. अतिशय उष्णता त्यांचा प्राण घेऊ शकते. साप खाणाऱ्या नागराजाशिवाय, त्यांचे अन्न घुशी, उंदीर, बेडूक, पाली, पक्षी आणि इतर लहान प्राणी आहेत. भक्ष्य पकडल्यावर, विषाच्या अंतःक्षेपणाने ते अचल होते. नागाला अन्न चावता येत नसल्यामुळे ते पूर्णपणे गिळले जाते. नागाच्या त्वचेच्या आणि जबड्याच्या लवचिकतेमुळे तो त्याच्या स्वतःच्या डोक्यापेक्षा दोन किंवा तीन पटीने मोठा असलेला प्राणी गिळू शकतो. एखादा पोहणारा श्वासासाठी लांब नळीचा उपयोग करतो त्याचप्रमाणे, तोंड हे संपूर्णतः भक्ष्याने भरल्यामुळे साप, श्वासनलिकेचे द्वार अडथळ्याच्या पुढे आणून श्वास घेतो. आता मागे वळालेल्या दातांच्या पंक्त्या या भक्ष्यास सापाच्या शरीरात सरकवतात. त्या अन्नाचे पचन हळूहळू करण्यासाठी तो एका शांत ठिकाणी पडून राहतो आणि कदाचित पुष्कळ दिवसांसाठी पुन्हा काही खात नाही. नाग त्याच्या शरीरातील साठवलेल्या चर्बीचा उपयोग करून पुष्कळ महिने काही न खाता जगू शकतो.
साप चतुर असतात. (पाहा मत्तय १०:१६.) नाग कदाचित खडकाखाली शिरून किंवा त्याच्या बिळात जाण्याद्वारे अथवा त्याचा पत्ता न लागण्यासाठी निश्चल अवस्थेत पडून स्वतःचे संरक्षण करतो. त्याचा सामना केल्यास, तो शरीराचा पुढचा भाग उभारून फणा काढतो आणि शत्रूला घाबरविण्यासाठी फुसकारे टाकतो. चावणे हा शेवटला पर्याय आहे.
सर्पदंश
आफ्रिका आणि आशियाच्या ग्रामीण भागातील सापाच्या दंशाबद्दल बहुधा कळवले जात नाही, पण जगभरात दर वर्षी दहा लाख लोक विषारी सापांनी दंश केल्याने दगावतात असे दिसून येते. भारतात दगावणाऱ्यांचे सर्वात अधिक प्रमाण आहे—दर वर्षी सुमारे १०,००० लोक—यातील बहुतांश कदाचित चष्म्यासारखी खूण असणाऱ्या नागाच्या दंशामुळे दगावतात. नागाचे जवळजवळ १० टक्के दंश घातक ठरतात. नाग अनेक सापांपेक्षा मंद आहे; चलाख मुगूंस, त्याचा एक प्रमुख शत्रू त्यावर मात करू शकतो. सापावर झडप टाकून त्याचा वारंवार करणारा प्रहार चुकवून मुगूंस नागाला दुर्बल आणि अनिश्चित अवस्थेत टाकतो. फणेच्या मागच्या बाजूवर हल्ला करून तो त्याची मान मोडतो. अनेक साप वेटोळ्या अवस्थेत असताना दंश करतात त्यामुळे किती दूरवर ते पोहंचू शकतात ते समजत नाही पण नाग त्याचे शरीर उभारून सरळ खाली दंश करतो. या अंतराचा अंदाज काढून एखादी व्यक्ती या तुलनात्मक मंद हालचालीच्या मर्यादेबाहेर जाऊ शकते.
काही नाग, जसे की, रिंगल्स, दक्षिण आफ्रिकेतील काळ्या मानेचा नाग आणि भारताच्या ईशान्येकडील नाग थुंकण्याद्वारे स्वतःचा बचाव करतात. शरीर उभारून आपल्या विषदंतांचा नेम बळीवर लावून, हा साप दोनपेक्षा अधिक मीटरच्या अंतरावर बाहेर फुंकणाऱ्या हवेद्वारे विषाचे दोन बारीक फवारे उडवू शकतो. त्वचेवर याचा काही धोका संभावत नाही, पण डोळ्यात शिरल्यास, त्यामुळे तात्पुरते अंधत्व येते आणि लवकर न धुतल्यास कायमचे अंधत्व येते. विलक्षण गोष्ट अशी की, हा साप डोळ्यांवर नेम धरू शकतो.
समजा एकदा नाग तुम्हाला चावला तर तुम्ही काय केले पाहिजे? सापाच्या गालातील विषग्रंथींतून विष दोन लहान, पोकळ आणि सापाच्या जबड्यात असलेल्या विषदंतांमधून अंतःक्षेपित केले जाते. हे विषदंत, कातडीत टोचणाऱ्या पिचकारीप्रमाणे त्वचेत शिरून विषाचे अंतःक्षेपण करतात. सापाच्या दंशावरील एकमेव खात्रीलायक औषध म्हणजे, चार विषारी सापांच्या विषापासून तयार करण्यात आलेले अँटिव्हेनिन होय. २० व्या शतकाच्या सुरवातीला अँटिव्हेनिनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करणारा भारत हा पहिला देश होता. अँटिव्हेनिनची पूड विना शीतकरण पाच वर्षांसाठी प्रभावकारी असते; पुनर्निमाण केल्यावर ते अंतःक्षेपित केले जाते.
नागाने दंश केल्यावर त्या ठिकाणी वेदना होतात आणि सूज येते, दृष्टी मंदावते, अस्थिरता, स्वरयंत्राचा पक्षघात आणि श्वसनक्रिया मंद होणे अशी लक्षणे दिसून येतात. विषाचे अधिक प्रमाण अंतःक्षेपित केले असल्यास आणि कोणताही उपचार न केल्यास मृत्यू दोन तासात ओढवतो.
गारूडी
गारूड्याचा खेळ मनोरंजनाचा एक फार जुना प्रकार आहे. अधिककरून पूर्वेकडे याचा उपयोग होत असून काही पाश्चिमात्य सर्कसमध्ये ही कलाकृती समाविष्ट करण्यात आली आहे. असाधारण फणा आणि अस्वस्थ स्वभावामुळे, चष्म्याची खूण असणारा नाग हा उपयोगात आणला जाणारा सर्वात प्रसिद्ध साप आहे, पण इतर आकर्षक साप जसे, रॉयल साप आणि रेड सँड बोआ देखील वापरले जातात. गारूडी, एक कुशल खेळकरी आपली पुंगी वाजवतो तेव्हा, नाग त्याच्या टोपलीतून बाहेर येतो आणि त्याच्या नेहमीच्या संरक्षक पावित्र्यात फणा काढतो. गारूडीच्या हालचालींमुळे साप प्रतिक्रिया दाखवतो व त्यावर त्याचे लक्ष असून तो हल्ला करण्यास तयार असतो. गारूड्यांकडे असणाऱ्या बहुतांश नागांचे विषदंत काढले जातात, पण काही लोक विषारी सापांशी खेळण्याचा धोका पत्करतात.
प्राचीन भारतात, फेरीवाला गारूडी धार्मिक कल्पना आणि कथा सांगणारा देखील होता आणि म्हणूनच तो लोकप्रिय झाला. आजकाल, फोटो घेणारे पर्यटक जेथे अधिककरून येतात त्या हॉटेलांबाहेर खेळ करणे अधिक किफायतशीर ठरते. काही गारूडी घरोघरी जातात आणि घरमालकाला त्याच्या मोठ्या बागेत साप असण्याची शक्यता आहे असे सांगतात. ठराविक रक्कमेसाठी त्यांना पकडून देण्याचे तो सांगतो. तो झुडुपांमध्ये गायब होतो आणि काही वेळानंतर, त्याच्या पुंगीचा आवाज ऐकू येत असताना, एका पिशवीत साप पकडून आणतो. अर्थात, घरमालकाने त्यावर नजर ठेवणे अथवा निदान त्याने सोबत सापांची थैली आणली का हे तरी तपासण्यास सुज्ञ असावे!
सर्पोद्यान माहिती देतात
सर्पोद्याने सरपटणाऱ्या प्राणांबद्दल आवड निर्माण करण्यास उत्तेजन देतात. ते संशोधन करतात, सर्पाचा दंश टाळणे व त्यावरील उपचार आणि मानवाच्या लोभापासून तसेच बेपर्वाईपासून सापांचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतात. नागांना त्यांच्या सुंदर कातडीसाठी मारले जाते, ज्यातून पट्टे, पर्सेस, बूट आणि इतर चैनीच्या वस्तू केल्या जातात. एका वर्षात, भारतात कातडीच्या उद्योगासाठी एक कोटीपेक्षा अधिक साप ठार मारण्यात आले. सापांना ठार मारून लगेचच त्यांची कात काढली जाते. त्या कातड्यांना रंग देण्यासाठी वनस्पतीजन्य रंग वापरले जातात आणि त्यांच्यावर ग्लास पॉलिशींग करून काहीवेळेस त्यांना चमकदार आणि पाणी-प्रतिसारक बनवण्यासाठी लाखेचा फवारा मारला जातो.
नागाच्या मूल्याची अतिशयोक्ती केली जाऊ शकत नाही. उंदीर आणि इतर उपद्रवकारक प्राण्यांचा फडशा पाडून तो कित्येक टन धान्याचे संरक्षण करतो. त्याच्या विषातून अँटिव्हेनिन, वेदनाशामक आणि इतर औषधे तयार होतात. मुंबईमधील टाटा मेमोरियल कँन्सर इंस्टिट्यूट, कर्क पेशींवरील नागाच्या विषाच्या परिणामाचा अभ्यास करत आहे.
नागाला भेटून तुम्हाला आनंद वाटला का? देखणा, उपयुक्त, दक्ष, स्वतःचे संरक्षण करण्यास सुसज्ज. त्याच्याशी सुपरिचित झाल्याने, प्राणी राज्यातील अतिशय अनिष्टकारक समजल्या जाणाऱ्या सदस्याची प्रशंसा करण्यास आपल्याला मदत मिळू शकते.
[१५ पानांवरील चौकट]
नागपूजा आणि अंधविश्वास
नागपूजा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. पुराणवस्तूशास्त्रज्ञांनी उत्खनन केलेल्या मोहें-जो-दडो या अतिप्राचीन संस्कृतीमध्ये शिक्क्यांवर नागाचे चित्र आढळून आले आहे. सा. यु. पू. तिसऱ्या सहस्त्रावधीपासून आजपर्यंत भारतातील लाखोंनी नागांची अंधविश्वासात्मक भक्तिभावाने पूजा केली आहे. मनोरंजक गोष्ट अशी की, नागाच्या पुष्कळशा गोष्टी प्रत्यक्षात घडलेल्या ऐतिहासिक घटनांच्या आधारे बनवलेल्या विपर्यस्त कथा म्हणून ओळखल्या जाऊ शकतात.
विश्वामध्ये मुळीच प्रकाश नव्हता अशा काळाबद्दल एक निर्मिती “कथा” सांगते. अंधकारातील विश्वाच्या पाण्यातून प्रथम विष्णू या तेजोमय देवतेची त्यानंतर, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांची निर्मिती झाली. उर्वरित भागातून शेष (याचा अर्थ उर्वरित भाग) नावाच्या प्रचंड नागाची निर्मिती करण्यात आली. कथांनुसार, शेषाला ५ ते १,००० डोकी आहेत आणि चित्रांमध्ये विष्णू वेटोळा घातलेल्या शेषावर शयन करत असल्याचे आणि शेषाच्या अनेक फणांनी त्याचे संरक्षण केले असल्याचे दाखवले आहे. शेष जांभई देतो तेव्हा भूकंप होतात आणि त्याच्या तोंडातून निघणारा अग्नी अथवा त्याच्या विषाने युगाच्या समाप्तीला जगाचा नाश होतो असे मानण्यात येते.
हिंदू पौराणिक कथा, नागलोक किंवा पाताळलोक या भूलोकात राहणाऱ्या नागा नावाच्या नागजातीचेही वर्णन करतात. वानर देवता, हनुमान असा दावा करतो की, “परिपूर्ण युगात” सर्व लोक संतांसारखे होते आणि एकच धर्म होता तसेच कोणतेही राक्षस अथवा नागा नव्हते. सर्प भूमिगत धनाचे संरक्षक बनले आणि त्यांच्याकडे पुष्कळ ज्ञान आणि चमत्कारिक शक्ती होत्या. काहीवेळा वासुकी म्हटलेल्या शेषाचा, देवता, अमृत तयार करण्यासाठी दूधाच्या समुद्राचे मंथन करण्यास उपयोग करत असत; ते अमरत्व देणारे पेय होते. नागांचे आधिपत्य असलेल्या पाताळाला सर्वात इष्ट स्थान असल्याचे वर्णन केले आहे; जे योद्धे युद्धात मरतात त्यांना तेथे अकल्पनीय सुख देण्याचे वचन दिले जाते.
तथापि, सर्वच कथात्मक नागांना सौम्य समजले जात नाही. एक “कथा” विष्णूचा अवतार कृष्ण आणि कालिया हा मोठा, अतिशय विषारी राक्षसी नाग यांमधील सामन्याचे कथन करते. प्रतिमांमध्ये विजयी कृष्णाचा पाय त्या मोठ्या सर्पाच्या डोक्यावर असल्याचे दाखवले जाते.
मनसा किंवा दुर्गमा, नागांची राणी हिची पूजा स्त्रिया त्यांच्या मुलांना सर्पदंशापासून संरक्षण मिळावे म्हणून करतात. नागपंचमीच्या दिवशी सर्पभक्त नागांच्या प्रतिमांवर किंवा सापांच्या बिळांमध्ये दूध तसेच रक्तही ओततात. बालकाची गर्भधारणा होण्याची आशा असणाऱ्या स्त्रिया दगड किंवा चांदीच्या नागाच्या प्रतिमांची पूजा करतात आणि मंदिरात त्या वाहतात.
चित्रपटांमधील नाग
भारतात केल्या जाणाऱ्या चित्रपटांचा, पौराणिक कथांमधील नाग हा एक लोकप्रिय विषय आहे—१९२८ पासून ४० पेक्षा अधिक चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. बहुधा नागाला भलेपणाचा रक्षणकर्ता, त्याच्या भक्तांचा साहाय्यकर्ता आणि दुष्टांचा नाश करणारा असे दाखवले जाते. इच्छाधारी नागांची कथा अतिशय प्रसिद्ध आहे ज्यांच्याकडे मानवी रूप धारण करण्याची शक्ती असते. त्यांचा एकच एकनिष्ठ सोबती असल्याचे म्हटले जाते. त्याच्या सोबत्याला ठार मारल्यास, त्या नागाला मृत सापाच्या डोळ्यांमध्ये खुनी व्यक्तीची प्रतिमा दिसते आणि मग तो बदला घेण्यासाठी जातो. हेच अनेक चित्रपटांचा रोचक आधार बनते. या कथात सर्पनृत्ये अधिक असतात; गारूड्यांच्या संगीताप्रमाणे संगीत असून, नर्तक सापाची हालचाल अनुसरतात आणि जमिनीवरही सरपटतात.
शक्ती हा माहितीपट, भारतातील राजस्थान येथील एका सणात चित्रित करण्यात आला होता, येथे प्रत्येक ऑगस्टमध्ये लाखो सर्प उपासक वाळवंटात भेटतात. होरपळून टाकणाऱ्या उन्हात व ५० डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक असलेल्या तापमानात ते लोखंडी दंडांनी स्वतःवर मारा करतात आणि सर्प-देवता गोगा याच्या मंदिराला तापलेल्या वाळूवरून दोन पेक्षा अधिक किलोमीटरपर्यंत त्यांच्या पोटांवर रांगत जातात. सा. यु. दहाव्या शतकातील ऐतिहासिक राजा, गोगा याने मुस्लिम हल्लेखोरांना, सर्पांनी व्यापलेल्या भागात नेले जेथे सर्पांच्या दंशाने त्या सैन्याचा नाश झाला व अशाप्रकारे त्याने आपल्या लोकांचा बचाव केला, असे म्हटले जाते.
[१६ पानांवरील चौकट]
नागामुळे वाचले
भारताच्या सस्तूर गावातील दोन कुटुंबांकडे नागाचे आभार मानण्याचे कारण आहे. सप्टेंबर ३०, १९९३ रोजी, पहाटे ३.५० वाजता त्यांच्या घरातून नाग निघाला व त्याच्या मोठ्या फुत्काऱ्याने ते जागे झाले. त्यास मारण्यासाठी ते त्याचा पाठलाग करीत शेतात गेले. पहाटे ४.०० वाजता मध्य भारतात भीषण भूकंप झाल्याने त्यांचे गाव भुईसपाट होऊन जवळजवळ सर्वच जण त्यात मरण पावले. नागाच्या आगाऊ इशारा देणाऱ्या व्यवस्थेमुळे—ही दोन कुटुंबे वाचली!
[१२, १३ पानांवरील चित्रं]
आशियातील नागाचे मागून आणि समोरून काढलेले चित्र
आतील चौकटीतील चित्र: उष्ण खडकावर ऊन खात असताना एक काळा नाग त्याची फणा काढतो
[चित्राचे श्रेय]
Pictures on pages 12 to 16: A. N. Jagannatha Rao, Trustee, Madras Snake Park Trust
[१४ पानांवरील चित्रं]
काळ्या नागाचे समोरचे आणि मागचे चित्र