बायबलचा दृष्टिकोन
तुम्ही जो विश्वास बाळगता त्यास काही हरकत आहे का?
“स्वतःला जे सत्य वाटते त्यावर एखाद्या मनुष्याला विश्वास ठेवण्यास आवडते”—फ्रान्सिस बेकन, १५६१-१६२६, इंग्रजी निबंधकार आणि मुत्सद्दी.
धार्मिक तत्त्वप्रणालीच्या बाबतीत अनेक लोकांना असे वाटते की एखादा जोपर्यंत प्रामाणिकपणे असा विश्वास करतो की ‘स्वर्गात कोणीतरी आहे’ आणि आपल्या साथीदारावर प्रीती करतो तेव्हा एखादा काय विश्वास करतो ही बाब वास्तविकपणे हरकत घेण्याची नाही. काही लोक परस्परविरोधी विश्वासांचे समर्थन करणाऱ्या धार्मिक गटांकडे दृष्टी लावतात आणि हे धार्मिक गट देव, त्याचा उद्देश तसेच त्याची उपासना कशी करावी याविषयी शिकवितात. एकच व्यक्ती तिला आवडणारे विविध शैलींचे कपडे परिधान करते त्याप्रमाणे विश्वासाच्या बाबतीत असणारी विविधता देखील केवळ बाह्यस्वरूपी आहे, या निष्कर्षासही हे गट येतात. अशा विविधतांचा ऊहापोह करणाऱ्या लोकांनी खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचा आत्मा पूर्णपणे गमावला आहे, असाही विचार कदाचित हे लोक करतील.
सर्वच धार्मिक शिकवणींच्या चर्चा योग्य नाहीत हे शास्त्रवचने मान्य करतात. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या त्याच्या पत्रांत ‘क्षुल्लक गोष्टींवर हिंसात्मक वादविवाद’ भडकावणाऱ्या लोकांचा उल्लेख केला. पौलाने त्यांचे वर्णन ‘वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे वेडे’ झालेले असे केले. (१ तीमथ्य ६:४, ५) “मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा,” अशी सूचना त्याने तीमथ्याला दिली आणि ‘शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी पडत नाही,’ असा मंडळीला बोध करण्यासही सांगितले. (२ तीमथ्य २:१४, २३) आपल्या दिवसांतील अनेक धार्मिक वादविवाद या वर्णनाशी जुळतात आणि अशा विवादांनी निरर्थकपणे वेळेचा अपव्यय होत असल्याचे सिद्ध केले आहे.
तर मग, धार्मिक विश्वासांबद्दलचे सर्व वादविवाद अर्थहीन आहेत, असा त्याचा अर्थ होतो का? केवळ काही कपडे आपल्या मापाचे नाहीत म्हणून कपडे परिधान करण्याचे आपण पूर्णपणे सोडून देत नाही, हो ना? केवळ काही तत्त्व-संबंधित प्रश्न विचार करण्याच्या योग्यतेचे नाहीत म्हणून धार्मिक विश्वासांचा संपूर्ण विषय क्षुल्लक समजून सोडून का द्यावा? तत्त्वप्रणालीची बाब विशेष विचारग्राह्य असण्यास हवी, असे पौलाला वाटले आणि ही गोष्ट वर उद्धृत केलेल्या त्याच्या शब्दांच्या संदर्भावरून स्पष्ट होते. खोट्या शिकवणींमुळे एखादी व्यक्ती विश्वासापासून परावृत्त होऊ शकते, याचा त्याने वारंवार इशारा दिला आणि तीमथ्याला असा सल्ला दिला, “तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की, अन्य शिक्षण देऊ नका.” (१ तीमथ्य १:३-७; ४:१; ६:३-५; २ तीमथ्य २:१४-१८, २३-२६; ४:३, ४) निश्चितच, पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोक जो विश्वास बाळगत होते त्यासाठी हा सल्ला महत्त्वाचा होता नाहीतर त्याला अशा प्रकारची जोरदार विधाने मांडण्याची काहीएक आवश्यकता नव्हती.
तर मग, तत्त्वप्रणालीवरील वादविवादांपासून अलिप्त राहण्याचा सल्ला का देण्यात आला आहे? याचे कारण म्हणजे पौलाच्या दिवसांमधील काही लोक—त्याच्याद्वारे त्यांचे वर्णन ‘मनबिघडलेले आणि सत्यास मुकलेले’ असे करण्यात आले आहे कारण हे लोक इतरांच्या विश्वासाचा नाश करण्याच्या उद्देशानेच तत्त्वप्रणालींच्या बाबतीत वादाचे विषय उभे करत होते. (१ तीमथ्य ६:५) पौलाने फक्त अशा प्रकारच्या भ्रष्ट लोकांद्वारे मांडण्यात आलेल्या वादविवादांवर धार्मिक विश्वासाची चर्चा करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला तीमथ्याला दिला.
विश्वासाचा वर्तणुकीवर परिणाम होतो का?
व्यक्तिगत गुणांमध्ये आणि वर्तणुकीमध्ये—आपण कोणत्या प्रकारचे लोक होतो यावर आपल्या धार्मिक विश्वासाचा मोठा परिणाम होतो का? असा प्रश्न काहीजण विचारतील. परिधान करणाऱ्याच्या आवडीनुसार कोट आणि पँट वेगवेगळ्या किंवा त्यांच्या रंगांमध्ये साम्य असणाऱ्या विभिन्न कपड्यांपासून शिवता येते; त्याचप्रमाणे हे लोक देखील कदाचित विश्वास आणि वर्तणुकीला परस्परात कोणताही संबंध नसलेल्या दोन वेगवेगळ्या गोष्टी समजतील. तथापि, बायबलमध्ये विश्वास आणि वर्तणूक केवळ एकाच ताग्यातून शिवल्या जाणाऱ्या सुटाप्रमाणे आहे.
आपण काय विश्वास बाळगतो आणि आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती बनतो या दोहोतील थेट संबंध बायबल प्रकट करते. चुकीच्या विश्वासांचा वर्तणुकीवर परिणाम होतो आणि याचे उदाहरण म्हणजे येशूच्या दिवसांतील ढोंगी परूशी होत. (मत्तय २३:१-३३; लूक १८:९-१४) त्याउलट, कलस्सैकर ३:१० बोध करते: “जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाने पूर्ण ज्ञानात [अचूक ज्ञानात, NW] नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.” याकडे लक्ष द्या की, ईश्वरी जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सामर्थ्याचा संबंध देवाचे अचूक ज्ञान संपादन करण्याशी लावण्यात आला आहे.
ग्रीक भाषेत “अचूक ज्ञान” ही संज्ञा भाषांतरीत करण्यात आली असून ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये ही संज्ञा २० वेळा आढळते आणि या संज्ञेचा अर्थ तंतोतंत, अचूक किंवा पूर्ण ज्ञानाला सूचित करतो. नथनिय कल्वरवेल हा ग्रीक विद्वान या संज्ञेचे वर्णन, “मला आधीच ठाऊक असणाऱ्या गोष्टीशी अधिक चांगल्या रीतीने परिचित होणे; मी दूरून पाहिलेल्या गोष्टीकडे अधिक बारकाईने पाहणे” असे करतो. रत्नपारखी मोलवान रत्नाचा दर्जा आणि किंमत ठरविण्यासाठी त्याची पारख करतो अगदी तसेच एखाद्या ख्रिस्ती मनुष्याने तो ज्या देवाची सेवा करतो त्याचे तंतोतंत, अचूक आणि पूर्ण ज्ञान संपादन करण्यासाठी देवाच्या वचनाचे परीक्षण केले पाहिजे. यामध्ये देवाचे व्यक्तिमत्त्व, त्याचे उद्देश, त्याचे दर्जे आणि “सुवचनांचा नमुना” तयार करणाऱ्या शिकवणींचा देखील समावेश होतो—‘स्वर्गात कोणीतरी आहे,’ असा केवळ विश्वास करण्यापासून हे फार वेगळे आहे.—२ तीमथ्य १:१३.
देवाला दुरूनच ओळखल्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे प्रतिफळ मिळते याचे एक उदाहरण रोमकरांस या प्रेरित पत्राच्या पहिल्या अध्यायात दिले आहे. तेथे काही लोकांचा उल्लेख करण्यात आला आहे, “देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी . . . देवाची [अचूक ज्ञानाची] जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत.” त्यांच्या चुकीच्या विश्वासामुळे झालेल्या परिणामांचे प्रेषित पौलाद्वारे कथन करण्यात आले आहेत: “देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनीति, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा ह्यांनी ते भरलेले असून, हेवा, खून, कलह, कुबुद्धि ह्यांनी पुरेपुर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बढाईखोर, कुकर्मकल्पक, मातापितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे ममताहीन, निर्दय असे होते.”—रोमकर १:२१, २८-३१.
हे निर्विवाद आहे की, त्या लोकांनी बाळगलेल्या विश्वासांचा ख्रिस्ती जीवन व्यतीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर थेटपणे परिणाम झाला. त्याचप्रमाणे आजही, विश्वास आणि वर्तणूक यांची तुलना एकाच आणि अखंड अशा ताग्यातून शिवलेल्या वस्त्राबरोबर केली जाऊ शकते. या कारणास्तव देवाची कृपापसंती मिळविण्याचा प्रयत्न करण्याकरता सर्व प्रामाणिक लोकांना त्यांचे धार्मिक विश्वास वास्तविकपणे खरे आणि देवाच्या वचनावर आधारित आहेत याची खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे. कारण “[देवाची] अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत [अचूक ज्ञानाप्रत] पोहंचावे.”—१ तीमथ्य २:४.
[२५ पानांवरील चित्र]
परूश्याच्या ढोंगीपणामुळे त्याचे विश्वास प्रकट झाले