वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w09 १२/१५ पृ. ११-१५
  • तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ती गुण प्रदर्शित करणे
  • बोलण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडणे
  • आचरणाच्या व शुद्धतेच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडणे
  • प्रेम व विश्‍वास आवश्‍यक
  • प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून मनस्वी प्रयत्न करा
  • तरुणांनो—तुमची प्रगती सर्वांस दिसू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • तीमथ्य—“विश्‍वासू पुत्र”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुमची प्रगती सर्वांस दिसून येऊ द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सत्याचे वचन नीट सांगण्यास आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
w09 १२/१५ पृ. ११-१५

तुमची प्रगती सर्वांना दिसून येऊ द्या

“तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यांत गढून जा.”—१ तीम. ४:१५.

१, २. तीमथ्याच्या बालपणाविषयी आणि तो वीसेक वर्षांचा असताना त्याच्या जीवनात जो बदल घडून आला त्याविषयी काय सांगता येईल?

आज जेथे टर्की हा देश वसलेला आहे तेथे एके काळी गलतिया नावाचा रोमी प्रांत होता. येथेच तीमथ्य लहानाचा मोठा झाला. या ठिकाणी, येशूच्या मृत्यूनंतरच्या दशकांत अनेक ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना झाली होती. याच काळादरम्यान कधीतरी लहान तीमथ्य, त्याची आई आणि आजी यांनी ख्रिस्ती विश्‍वासाचा स्वीकार केला व त्या भागातील एका मंडळीचे ते आवेशी सदस्य बनले. (२ तीम. १:५; ३:१४, १५) या ओळखीच्या परिसरात, ख्रिस्ती या नात्याने तीमथ्याचे बालपण आनंदात गेले असावे. पण, अचानक घटनांनी एक वेगळेच वळण घेतले.

२ प्रेषित पौलाने या ठिकाणी दुसऱ्‍यांदा भेट दिली तेव्हाची ही गोष्ट आहे. त्या वेळी तीमथ्य वीसेक वर्षांचा असावा. पौलाने—कदाचित लुस्त्र शहराला—भेट दिली त्यावेळी, “लुस्त्रातले व इकुन्यातले बंधु [तीमथ्याला] नावाजीत” असल्याचे त्याच्या लक्षात आले. (प्रे. कृत्ये १६:२) कदाचित, तीमथ्याच्या वागणुकीवरून त्याच्या वयाच्या मानाने तो खूप समंजस व प्रौढ असल्याचे त्यांना दिसून आले असावे. मग, पवित्र आत्म्याच्या निर्देशनानुसार, पौलाने व वडीलवर्गाने तीमथ्यावर हात ठेवले, अर्थात मंडळीतील एका खास कार्यासाठी त्याची निवड केली.—१ तीम. ४:१४; २ तीम. १:६.

३. तीमथ्याला सेवेचा कोणता खास विशेषाधिकार लाभला?

३ तीमथ्याला प्रेषित पौलाचा प्रवासी सोबती बनण्याचे खास निमंत्रण देण्यात आले! (प्रे.  कृत्ये १६:३) या अनपेक्षित निमंत्रणामुळे त्याला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! पुढील वर्षांत तीमथ्याला प्रेषितांच्या व वडील जनांच्या वतीने निरनिराळी कार्ये पार पाडण्यासाठी पौलासोबत व काही वेळा इतरांसोबत प्रवास करण्याची सुसंधी लाभली. पौल आणि तीमथ्य या दोघांनी मिळून केलेल्या प्रवासी कार्यामुळे बांधवांच्या आध्यात्मिक उन्‍नतीला बराच हातभार लागला. (प्रेषितांची कृत्ये १६:४, ५ वाचा.) तीमथ्याच्या आध्यात्मिक प्रगतीमुळे त्याने बांधवांमध्ये चांगले नाव कमावले. त्याच्यासोबत जवळजवळ दहा वर्षे सेवा केल्यानंतर, प्रेषित पौलाने फिलिप्पैकरांना असे लिहिले: “तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा [तीमथ्याशिवाय] दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही; . . . त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की, जसा मुलगा बापाची सेवा करितो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे.”—फिलिप्पै. २:२०-२२.

४. (क) तीमथ्यावर कोणती महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती? (ख) १ तीमथ्य ४:१५ या वचनात पौलाने तीमथ्याला जो सल्ला दिला त्यावरून कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

४ पौलाने फिलिप्पैकरांना लिहिले त्याच सुमारास त्याने तीमथ्यावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली. ती म्हणजे, मंडळीत वडिलांची व सेवा सेवकांची नेमणूक करण्याची जबाबदारी. (१ तीम. ३:१; ५:२२) यावरून, तीमथ्य एक जबाबदार व भरवशालायक पर्यवेक्षक बनला होता हे दिसून येते. असे असले तरी त्याच पत्रात पौलाने तीमथ्याला, ‘त्याची प्रगती सर्वांस दिसून यावी’ याकरता प्रयत्नशील असण्याचा सल्ला दिला. (१ तीम. ४:१५) पण, तीमथ्याने आधीच उल्लेखनीय आध्यात्मिक प्रगती केली नव्हती का? मग, पौलाच्या वरील सल्ल्याचा काय अर्थ होता, आणि तो सल्ला आपल्याकरताही लाभदायक कसा ठरू शकतो?

ख्रिस्ती गुण प्रदर्शित करणे

५, ६. इफिसस मंडळीची आध्यात्मिक शुद्धता कशामुळे धोक्यात आली होती आणि तीमथ्याला मंडळीचे संरक्षण करणे कसे शक्य होणार होते?

५ आपण आधी १ तीमथ्य ४:१५ या वचनाच्या मागच्या पुढच्या संदर्भाचे परीक्षण करू या. (१ तीमथ्य ४:११-१६ वाचा.) हे शब्द लिहिण्याच्या आधी पौल मासेदोनियाला गेला होता, पण त्याने तीमथ्याला मात्र इफिससमध्येच राहण्यास सांगितले. का? कारण इफिसस मंडळीतील काही जण खोट्या शिकवणी पुढे आणून मंडळीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आध्यात्मिक रीत्या मंडळीचे संरक्षण करण्याची जबाबदारी तीमथ्यावर सोपवण्यात आली. तो हे कसे साध्य करणार होता? काही अंशी, इतरांसमोर उत्तम आदर्श मांडून त्याला असे करणे शक्य होणार होते.

६ पौलाने तीमथ्याला लिहिले: “भाषण, वर्तन, प्रीति, विश्‍वास व शुद्धता ह्‍यांविषयी विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचा कित्ता हो.” त्याने पुढे असेही म्हटले: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यांत गढून जा.” (१ तीम. ४:१२, १५) या ठिकाणी पौल कोणत्याही अधिकारपदाच्या संबंधात नव्हे, तर ख्रिस्ती गुणांच्या संबंधात प्रगती करण्याविषयी तीमथ्याला सल्ला देत होता. अशाच प्रकारची प्रगती करण्याचा प्रत्येक ख्रिश्‍चनाने प्रयत्न केला पाहिजे.

७. मंडळीतील सर्वांकडून कोणती अपेक्षा केली जाते?

७ तीमथ्याच्या काळाप्रमाणेच आजही मंडळीत जबाबदारीची निरनिराळी पदे आहेत. काही बांधव मंडळीत वडील किंवा सेवा सेवक या नात्याने सेवा करतात. इतर काही जण पायनियर सेवा करतात. तर प्रवासी कार्य, बेथेल सेवा किंवा मिशनरी कार्य करणारेही काही आहेत. ख्रिस्ती वडील निरनिराळ्या शैक्षणिक कार्यक्रमांत सहभाग घेतात. उदाहरणार्थ, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये. असे असले तरी सर्वच ख्रिस्ती—मग ते पुरुष असोत, स्त्रिया असोत किंवा लहान मुले असोत—आध्यात्मिक प्रगती करत असल्याचे दाखवू शकतात. (मत्त. ५:१६) किंबहुना तीमथ्याप्रमाणेच, खास जबाबदाऱ्‍या सांभाळणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देखील आपल्या जीवनात ख्रिस्ती गुण प्रदर्शित करावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते.

बोलण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडणे

८. आपल्या बोलण्याचा आपल्या उपासनेवर कितपत प्रभाव पडू शकतो?

८ इतर गोष्टींसोबतच तीमथ्याने बोलण्याच्या बाबतीतही उत्तम उदाहरण मांडायचे होते. आपण याबाबतीत प्रगती करत असल्याचे कसे दाखवू शकतो? आपण जे बोलतो त्यावरून आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत याचा इतरांना अंदाज येतो. म्हणूनच येशूने म्हटले: “अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” (मत्त. १२:३४) आपल्या बोलण्याचा आपल्या उपासनेवर किती प्रभाव पडू शकतो याची येशूचा भाऊ याकोब यालाही जाणीव होती. त्याने लिहिले: “आपण धर्माचरण करणारे आहो, असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल, आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे.”—याको. १:२६.

९. बोलण्याच्या बाबतीत आपण उत्तम आदर्श कसा मांडू शकतो?

९ आपल्या बोलण्यावरून आपण आध्यात्मिक रीत्या कितपत प्रगती केली आहे हे मंडळीतील बांधवांना दिसून येईल. तेव्हा, प्रौढ ख्रिस्ती या नात्याने आपण असभ्य, निराशावादी, टीकात्मक किंवा इतरांना दुखावणारे शब्द आपल्या तोंडातून काढण्याऐवजी, इतरांना सांत्वन, दिलासा व प्रोत्साहन मिळेल अशाच प्रकारे नेहमी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. १२:१८; इफिस. ४:२९; १ तीम. ६:३-५, २०) आपण देवाच्या उच्च नैतिक दर्जांचे समर्थन केल्यास आणि या दर्जांनुसार जगण्यास आपण उत्सुक आहोत हे आपल्या बोलण्यातून व्यक्‍त केल्यास यहोवासोबत आपला निकटचा नातेसंबंध आहे हे दिसून येईल. (रोम. १:१५, १६) आपल्याला मिळालेल्या भाषेच्या देणगीचा आपण कसा उपयोग करतो हे योग्य मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या नक्कीच लक्षात येईल आणि त्यांनाही आपल्या या चांगल्या उदाहरणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळेल.—फिलिप्पै. ४:८, ९.

आचरणाच्या व शुद्धतेच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडणे

१०. आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी निष्कपट विश्‍वासाची आवश्‍यकता का आहे?

१० उत्तम आदर्श असण्यासाठी इतरांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे बोलणेच पुरेसे नाही. आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलत असू, पण प्रत्यक्षात जर आपण तसे वागलो नाही तर आपण ढोंगी असल्याचे त्यावरून दिसून येईल. परूशांचा ढोंगीपणा व त्यांच्या या वृत्तीचे घातक परिणाम पौलाने जवळून पाहिले होते. म्हणूनच त्याने अनेकदा तीमथ्याला अशा कपटी व दिखाऊ वृत्तीपासून दूर राहण्यास सांगितले. (१ तीम. १:५; ४:१, २) याचा अर्थ, तीमथ्य ढोंगी होता असे नाही. उलट, पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात म्हटले: “तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्‍वासाची मला आठवण [होते].” (२ तीम. १:४) तीमथ्य मुळात प्रामाणिक असला तरीसुद्धा त्याने आपल्या ख्रिस्ती विश्‍वासाचा अस्सलपणा प्रदर्शित करणे आवश्‍यक होते. आचरणाच्या बाबतीत त्याने इतरांसमोर उत्तम उदाहरण मांडायचे होते.

११. पौलाने धनदौलतीविषयी तीमथ्याला कोणता सल्ला दिला?

११ पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या दोन्ही पत्रांत आचरणासंबंधी आणखीनही काही गोष्टींवर सल्ला दिला. उदाहरणार्थ, तीमथ्याने धनदौलतीचा लोभ धरण्यापासून स्वतःला आवरायचे होते. पौलाने म्हटले: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीम. ६:१०) पैशाचा लोभ आध्यात्मिक कमजोरीचे लक्षण आहे. या उलट, जे ख्रिस्ती “अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त” असून साधेसुधे जीवन जगतात ते आध्यात्मिक रीत्या प्रौढ असल्याचे दाखवतात.—१ तीम. ६:६-८; फिलिप्पै. ४:११-१३.

१२. आपण दैनंदिन जीवनात आपली प्रगती कशी प्रदर्शित करू शकतो?

१२ ख्रिस्ती स्त्रियांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे” हे किती महत्त्वाचे आहे याचाही पौलाने आपल्या पत्रात उल्लेख केला. (१ तीम. २:९) पेहरावाच्या बाबतीत तसेच वैयक्‍तिक आवडीनिवडींच्या बाबतीत स्त्रिया शालीन व मर्यादशील असतात तेव्हा त्या इतरांसाठी एक उत्तम आदर्श मांडतात. (१ तीम. ३:११) हेच तत्त्व ख्रिस्ती पुरुषांनाही लागू होते. मंडळीत देखरेख करणाऱ्‍या बांधवांनी “नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य” असावे असा बोध पौलाने त्यांना केला. (१ तीम. ३:२) दैनंदिन जीवनात आपण असे गुण प्रदर्शित करतो तेव्हा नक्कीच आपली प्रगती सर्वांना दिसून येईल.

१३. तीमथ्याप्रमाणे नैतिक शुद्धतेच्या बाबतीत आपणही चांगले उदाहरण कसे मांडू शकतो?

१३ नैतिक शुद्धतेच्या बाबतीतही तीमथ्याने एक उत्तम आदर्श मांडायचा होता. पौलाने शुद्धता असा शब्दप्रयोग केला तेव्हा तो आचरणाच्या एका विशिष्ट पैलूबद्दल अर्थात लैंगिक शुद्धतेविषयी बोलत होता. खासकरून स्त्रियांशी व्यवहार करताना कोणालाही बोट दाखवता येणार नाही अशा प्रकारे तीमथ्याने वागायचे होते. त्याने ‘वडील स्त्रियांस मातांसमान, तरुण स्त्रियांस पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानायचे’ होते. (१ तीम. ४:१२; ५:२) अनैतिक कृत्ये मग ती गुप्तपणे केलेली असली, तरीसुद्धा यहोवापासून लपून राहू शकत नाहीत. आणि आज ना उद्या ती इतरांसमोरही नक्कीच उघड होतील. पण, त्याच वेळी एखाद्या ख्रिश्‍चनाने केलेली चांगली कार्येही लपून राहू शकत नाहीत. (१ तीम. ५:२४, २५) मंडळीतील प्रत्येक सदस्याला आचरणाच्या आणि नैतिक शुद्धतेच्या बाबतीत आपली आध्यात्मिक उन्‍नती प्रकट करण्याची संधी आहे.

प्रेम व विश्‍वास आवश्‍यक

१४. ख्रिश्‍चनांचे आपसात प्रेम असावे यावर शास्त्रवचने कशी भर देतात?

१४ प्रेम हा खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचा एक प्रमुख पैलू आहे. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहा. १३:३५) आपल्याला ही प्रीती कशी प्रदर्शित करता येईल? देवाचे वचन आपल्याला विनवणी करते, की आपण ‘एकमेकांना प्रीतीने वागवून घ्यावे,’ ‘एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हावे, एकमेकांना क्षमा करावी’ तसेच आतिथ्यशील असावे. (इफिस. ४:२, ३२; इब्री १३:१, २) प्रेषित पौलाने लिहिले: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.”—रोम. १२:१०.

१५. सर्व ख्रिश्‍चनांनी आणि खासकरून ख्रिस्ती पर्यवेक्षकांनी प्रेम दाखवणे का अत्यावश्‍यक आहे?

१५ तीमथ्य कठोरपणे किंवा अपमानास्पद रीतीने वागला असता, तर एक शिक्षक व पर्यवेक्षक या नात्याने त्याने केलेले चांगले कार्य व्यर्थ ठरले असते. (१ करिंथकर १३:१-३ वाचा.) पण, तीमथ्य अशा रीतीने वागला नाही. उलट, बांधवांप्रती त्याचे प्रेमळ शब्द तसेच त्याने केलेले आदरातिथ्य व इतर चांगल्या गोष्टी यांतून तो आध्यात्मिक रीत्या प्रौढ असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्याअर्थी, ज्या गुणांच्या बाबतीत तीमथ्याने इतरांकरता चांगले उदाहरण मांडावे असे पौलाने आपल्या पत्रात सांगितले, त्या गुणांमध्ये त्याने प्रेमाचा विशेष उल्लेख केला हे योग्यच होते.

१६. तीमथ्याला अढळ विश्‍वास बाळगण्याची गरज का होती?

१६ इफिससमध्ये असताना तीमथ्याच्या विश्‍वासाची परीक्षा झाली. या मंडळीतील काही जण खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाच्या विरोधात असलेले सिद्धान्त पुढे आणण्याचा प्रयत्न करत होते. इतर काही जण खोट्या ‘कहाण्या’ पसरवत होते, तर आणखी काही जण अशा कल्पनांवर संशोधन करत होते ज्यांचा आध्यात्मिक रीत्या मंडळीला काहीच फायदा नव्हता. (१ तीमथ्य १:३, ४ वाचा.) पौलाने अशा व्यक्‍तींचे वर्णन ‘गर्वाने फुगलेले, ज्यांना काही कळत नाही, वादविवाद व शब्दयुद्ध यांमुळे वेडे बनलेले’ असे केले. (१ तीम. ६:३, ४) ख्रिस्ती मंडळीत शिरकाव करू पाहणाऱ्‍या या अपायकारक विचारांबद्दल केवळ जिज्ञासेपोटी माहिती घेण्याची जोखीम तीमथ्य पत्करू शकत होता का? मुळीच नाही. कारण पौलाने तीमथ्याला ‘विश्‍वासासंबंधीचे सुयुद्ध करण्यास’ तसेच, ‘अधर्माच्या रिकाम्या वटवटींपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहण्यास’ आर्जवले. (१ तीम. ६:१२, २०, २१) पौलाने दिलेल्या या उपयुक्‍त सल्ल्याचे तीमथ्याने पालन केले याबद्दल कोणतीच शंका नाही.—१ करिंथ. १०:१२.

१७. आज आपल्या विश्‍वासाची कशा प्रकारे परीक्षा होऊ शकते?

१७ लक्ष देण्याजोगी गोष्ट म्हणजे, “पुढील काळी विश्‍वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; ते फुसलाविणाऱ्‍या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील” असे तीमथ्याला सांगण्यात आले होते. (१ तीम. ४:१, २) आज जबाबदारीचे पद सांभाळणाऱ्‍या बांधवांसहित मंडळीच्या प्रत्येक सदस्याने तीमथ्यासारखा दृढ व अढळ विश्‍वास दाखवण्याची गरज आहे. धर्मत्यागाचा प्रतिकार करण्यात खंबीर व निर्णायक भूमिका घेतल्याने आपलीही आध्यात्मिक प्रगती सर्वांना दिसून येईल व विश्‍वासाच्या बाबतीत एक उल्लेखनीय उदाहरण आपल्याला मांडता येईल.

प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून मनस्वी प्रयत्न करा

१८, १९. (क) तुमची प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तुम्ही काय करू शकता? (ख) पुढील लेखात कशाबद्दल चर्चा केली जाईल?

१८ आतापर्यंतच्या आपल्या चर्चेवरून स्पष्ट झाले आहे, की एका खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या आध्यात्मिक प्रगतीचे मोजमाप तिच्या स्वरूपावरून, क्षमतांवरून किंवा पदावरून करता येत नाही. तसेच, एखादी व्यक्‍ती किती वर्षांपासून मंडळीत सेवा करत आहे यावरूनही तिची प्रगती मोजता येत नाही. तर आपले विचार, बोलणे आणि आचरण यांबाबतीत यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्याने आपण खऱ्‍या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करत आहोत हे दिसून येते. (रोम. १६:१९) एकमेकांवर प्रेम करण्याबद्दल व दृढ विश्‍वास विकसित करण्याबद्दल दिलेल्या आज्ञेचे आपण मनापासून पालन केले पाहिजे. होय, आपली आध्यात्मिक प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून आपण पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या शब्दांवर मनन करू या व त्यांत गढून जाऊ या.

१९ आपण आध्यात्मिक प्रगती करत आहोत व प्रौढ आहोत हे दाखवून देणारा आणखी एक गुण म्हणजे आनंद, जो आत्म्याच्या फळाचा एक भाग आहे. (गलती. ५:२२, २३) जीवनात कठीण समस्या येतात तेव्हाही आपण कसे आनंदी होऊ शकतो व हा आनंद कसा टिकवून ठेवू शकतो याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

तुमचे उत्तर काय असेल?

• आपल्या बोलण्यातून इतरांना आपल्याबद्दल काय समजून येऊ शकते?

• आपले आचरण व शुद्धता यांतून आपली प्रगती कशा प्रकारे दिसून येते?

• प्रेम आणि विश्‍वास प्रदर्शित करण्यात ख्रिश्‍चनांनी अनुकरणीय का असले पाहिजे?

[११ पानांवरील चित्र]

तीमथ्याने लहान वयातच ख्रिस्ती प्रौढता प्रदर्शित केली

[१३ पानांवरील चित्रे]

तुमची प्रगती इतरांना दिसून येत आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा