वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g95 ७/८ पृ. २१-२३
  • देवाच्या काळजीचा मला कसा लाभ झाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या काळजीचा मला कसा लाभ झाला
  • सावध राहा!—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भवितव्यासाठी आशा
  • अडथळ्यांवर मात करणे
  • शुश्रूषागृहांच्या फेऱ्‍या मारणे
  • प्रेमळ काळजीची प्राप्तकर्ती
  • अधिकच वाईट होत असलेल्या परिस्थितीला तोंड देणे
  • सोडून न देणे
  • प्रेमळ-दया दाखवणारा माझा यहोवा देव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • ‘खाली पडलो, तरी नाश झाला नाही’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • मी शारीरिक कमजोरीतून बळ मिळवण्याचा प्रयत्न करते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • आतापर्यंत यहोवानेच सांभाळले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९५
g95 ७/८ पृ. २१-२३

देवाच्या काळजीचा मला कसा लाभ झाला

मी मे १८, १९६३ या दिवशी सकाळी नेहमीपेक्षा मोठ्या आनंदाने उठले होते. सुंदर आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या त्या दिवसाची ती सुरवात होती. तो दिवस माझ्यासाठी इतका महत्त्वपूर्ण का होता हे तुम्हाला सांगण्यापूर्वी मला माझ्या स्वतःबद्दल काही सांगायचे आहे.

माझा जन्म अमेरिका, पेन्सिल्व्हानिया, फिलाडेल्फिया येथे मे २०, १९३२ रोजी झाला. आमच्या कुटुंबात चार मुली होत्या आणि मी सर्वात धाकटी होते. मी दोन वर्षांची असताना आईचा देहान्त झाला आणि मी पाच वर्षांची होते तेव्हा बाबांनी पुनर्विवाह केला. काही काळानंतर आमच्या कुटुंबामध्ये आणखी सहा भाऊ आणि बहिणींची भर पडली. आम्ही सर्व बॅप्टिस्ट पंथाचे होतो आणि एकदा तर मी सन्डे-स्कूलची शिक्षिका होण्याचा विचार देखील केला होता.

मी संधिवात घेऊनच जन्माला आल्यामुळे माझे बालपण फारच दुःखात गेले. उत्तरोत्तर माझी अवस्था अधिकच वाईट होत जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा मी नऊ वर्षांची होते. दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी केलेले भाकीत सत्य ठरले. मी १४ वर्षांची होईपर्यंत मला चालणे अशक्य झाले. अखेरीस, माझे हात, पावले आणि पाय पूर्णपणे निर्बल झाले आणि माझी कंबर निकामी झाली. माझी बोटे विकृत झाल्यामुळे लिखाणकाम करणे किंवा एखादी वस्तू उचलणे माझ्यासाठी कठीण होऊन बसले. माझ्या या अवस्थेमुळे मला नगरपालिकेची शाळा सोडावी लागली.

मला वयाच्या १४ व्या वर्षी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील परिचारिकांनी त्यांच्या कामात त्यांना थोडीफार मदत करण्यासाठी मला अनुमती दिल्यामुळे मला आनंद झाला. हे काम करण्यास मला आवडत असे. त्यानंतर मला स्वतः होऊन बसता देखील येत नव्हते अशा थरास माझी अवस्था येऊन पोहंचली. डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितले की, माझ्यासाठी ते आता काहीच करू शकत नाहीत त्यामुळे इस्पितळात तीन महिने घालविल्यानंतर मला घरी पाठविण्यात आले.

त्यानंतरची दोन वर्षे म्हणजे मी १६ वर्षांची होईपर्यंत अंथरुणावर पडण्याशिवाय जास्त काही केले नाही. मला घरीच शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली; परंतु त्यानंतर माझी प्रकृती आणखीनच बिघडली. माझ्या उजव्या पायाच्या घोट्यावर क्षत पसरल्यामुळे त्याचप्रमाणे संधिवाताचा ज्वर असल्यामुळे मला पुन्हा एकदा इस्पितळात दाखल व्हावे लागले. त्या ठिकाणी मी १७ वर्षांची झाले. पुन्हा एकदा मी इस्पितळात तीन महिन्याकरता होते. घरी शिक्षण घेण्याच्या लायक मी राहिले नव्हते.

मी २० वर्षांची होत आले तेव्हा माझी स्थिती अतिशय दयनीय झाली त्यामुळे माझा बहुतांश वेळ रडण्यात गेला. माझा देवावर विश्‍वास होता आणि त्याने मला मदत करावी याकरता त्याच्याकडे मी अनेकदा प्रार्थना केली.

भवितव्यासाठी आशा

पायाच्या घोट्यावरील पुढील उपचारासाठी फिलाडेल्फिया जनरल हॉस्पिटलमध्ये मी दाखल झाले होते. तेव्हा माझ्या खोलीमध्ये मरीयम केलूम नामक एक तरुण मुलगी होती. आमच्या दोघींची मैत्री झाली. कॅथरीन माईल्स ही मरीयमची बहीण इस्पितळात येत असे आणि मला बायबलमधील माहिती सांगत असे. मला इस्पितळातून घरी सोडल्यानंतर यहोवाची साक्षीदार असणाऱ्‍या कॅथरीन बरोबर मी नेहमीच माझ्या परीने संपर्क साधला.

माझ्या सावत्र आईचे माझ्यावर प्रेम नव्हते, ही खेदाची गोष्ट होती. मी २५ वर्षांची असताना माझ्या एका थोरल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेले आणि असे झाले की कॅथरीन देखील शेजारील घरात राहण्याकरता आली. मी तिला बोलावले आणि तिने लेट गॉड बी ट्रू या पुस्तकाच्या साहाय्याने माझा बायबल अभ्यास घेण्यास सुरवात केली. मी कायमचीच अशी अधू राहणार नाही आणि एके दिवशी सर्व अधर्म पूर्णपणे काढून टाकला जाईल, हे शिकणे किती आनंदविणारे होते! (नीतिसूत्रे २:२१, २२; यशया ३५:५, ६) पुनरुत्थानाची आशा आणि माझ्या आईला पुन्हा पाहण्याची संभाव्यता याबरोबर इतर सत्य देखील मला अपीलकारक वाटले.—प्रेषितांची कृत्ये २४:१५.

त्यानंतर लगेचच मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्यास सुरवात केली. कॅथरीनचा पती मला त्याच्या गाडीत उचलून बसवत असे आणि राज्य सभागृहात नेत असे. मी सभांना गेल्यानंतर माझ्या प्रीत्यर्थ दाखविण्यात आलेल्या प्रेमामुळे मला फारच उत्तेजन मिळाले.

अडथळ्यांवर मात करणे

दुःखाची गोष्ट म्हणजे, माझी बहीण आणि तिचा पती एकमेकांपासून विभक्‍त झाले त्यामुळे मला पुन्हा एकदा माझे वडील आणि माझी सावत्र आई यांच्यासोबत राहणे भाग पडले. माझ्या सावत्र आईचा यहोवाच्या साक्षीदारांना कडा विरोध असल्यामुळे मला १९५८ ते १९६३ पर्यंत बायबलचा गुप्तपणे अभ्यास करावा लागला. कोणाही यहोवाच्या साक्षीदाराला घरात घेण्यासाठी ती परवानगी देत नसे. माझा अभ्यास वेगवेगळ्या व्यक्‍तींद्वारे दूरध्वनीवरून किंवा मी इस्पितळात असताना घेण्यात येत असे.

दुसरा अडथळा म्हणजे, काहीवेळा माझी सावत्र आई मला जेवण भरविण्यास आणि मला अंघोळ घालण्यास तयार नसे. एकदा तर तिने आठ महिने माझे केस धुतले नाहीत. आलेले टपाल पहिल्यांदा वाचल्याखेरीज ते वाचण्याकरता मला ती अनुमती देत नसे. तथापि, माझ्या भावाने त्याच्या घरच्या पत्त्यावर माझे टपाल पाठविण्यास मला परवानगी दिली. यावरून यहोवाची काळजी स्पष्ट दिसत होती. पॅट स्मिथ या ख्रिस्ती बहिणीबरोबर मी पत्रव्यवहार करत होते आणि या योजनेमुळे तिला माझ्याशी संपर्क साधण्यास व मला शास्त्रवचनीय उत्तेजन देण्यास शक्य झाले. माझा भाऊ तिची पत्रे मला चोरून पोहंचवत असे आणि त्या पत्रांच्या उत्तरात लिहिलेली माझी पत्रे तो तिला चोरून पाठवत असे.

सन १९६३ मध्ये मला इस्पितळात दाखल व्हावे लागले आणि तेथे पॅट स्मिथने माझा अभ्यास पुढे चालू ठेवला. एके दिवशी तिने मला विचारले: “आमच्या विभागीय संमेलनामध्ये तुला बाप्तिस्मा घेण्यास आवडेल का?”

“होय!” मी उत्तर दिले.

मी रुग्णालयातील पुनर्वसन दालनामध्ये होते आणि एका दिवसाकरता बाहेर जाण्याची लेखी परवानगी घेणे मला शक्य होते. पॅट विभागीय संमेलनाच्या दिवशी इतर साक्षीदारांबरोबर मला घेण्याकरता आली. माझा बाप्तिस्मा करण्यासाठी बांधवांना मला एक विभाजनावर उचलून पाण्यात बुडवावे लागले. आता मी यहोवाच्या सेवकांपैकी एक झाले होते! तो दिवस मे १८, १९६३ होता आणि तो मी केव्हाही विसरणार नाही.

शुश्रूषागृहांच्या फेऱ्‍या मारणे

नोव्हेंबरमध्ये मला रुग्णालय सोडायचे होते. घरी परतण्याची माझी इच्छा नव्हती कारण त्या ठिकाणी यहोवासाठी असलेली माझी सेवा मर्यादित होईल, हे मला ठाऊक होते. त्यामुळे मी शुश्रूषागृहात जाण्याची व्यवस्था केली. साक्षीदारांना घरोघरच्या सेवाकार्यात संपर्क साधण्यास कठीण वाटणाऱ्‍या लोकांना पत्रे लिहिण्याद्वारे सेवाकार्यात सहभाग घेण्यास मी आरंभ केला. त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील मृत्युलेख मी वाचत असे आणि अलीकडेच मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना बायबलमधून काही सांत्वनपर शास्त्रवचने लिहित असे.

त्यानंतर, मे १९६४ मध्ये न्यूयॉर्क शहरात असणारी माझी थोरली बहीण आणि तिचा पती यांच्याकडे मी राहण्याकरता गेले. त्याने माझ्यासाठी पहिली व्हीलचेअर आणली आणि मी सभांना उपस्थित होऊ लागले. न्यूयॉर्क शहरामध्ये असताना ईश्‍वरशासित सेवा प्रशालेतील माझे पहिले भाषण हे किती आनंदविणारे होते!

सन १९६५ च्या आरंभाला फिलाडेल्फियामधील काही स्नेह्‍यांनी दोन आठवडे त्यांच्यासोबत राहण्याकरता मला सांगितले. मी फिलाडेल्फिया येथे राहत असताना माझ्या बहिणीने मला लिहिले, माझ्याकडे तू पुन्हा येऊ नकोस आणि सध्या आहेस तेथेच तू राहा. पुन्हा एकदा शुश्रूषागृहात जाण्याची मी व्यवस्था केली. तेथे राहत असताना मी सभांना उपस्थित होण्याचे आणि पत्रांद्वारे लोकांना साक्ष देण्याचे कायम ठेवले. तो अशा प्रकारचा काळ होता जेव्हा मी साहाय्यक पायनियर कार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या कार्यात भाग घेण्याद्वारे माझे सेवाकार्य विस्तृत करू शकत होते.

प्रेमळ काळजीची प्राप्तकर्ती

यहोवाच्या साक्षीदारांच्या फिलाडेल्फिया पश्‍चिम मंडळीने मला दिलेले सहकार्य हा यहोवाच्या काळजीचा पुढील पुरावा होता. मला सभांना नेण्याखेरीज त्यांनी मला लेखनसाहित्य आणि सेवाकार्यासाठी आवश्‍यक असणाऱ्‍या इतर वस्तू पुरवल्या.

माझ्याकरता, सन १९७० मध्ये मॉड वॉशिंग्टन या निवृत्ती प्राप्त परिचारिका असलेल्या ख्रिस्ती बहिणीसह राहण्यासाठी योजना करण्यात आल्या आणि तेव्हा यहोवा काळजी घेत असल्याचा आणखी एक पुरावा स्पष्ट झाला. तिचे वय सत्तर होण्याच्या बेतात होते तरी देखील तिने माझी काळजी घेण्याची स्वेच्छा प्रकट केली आणि तिने माझी काळजी तिला घेता येईल तोपर्यंत म्हणजे पुढील दोन वर्षांपर्यंत घेतली.

मॉडसह राहत असताना फिलाडेल्फियामधील रिज मंडळीतील बांधवांनी मला सभांना उपस्थित होता यावे म्हणून खास परिश्रम घेतले. त्यासाठी मला उचलून घेऊन त्यांना एका सप्ताहात तीन जिन्यांच्या पायऱ्‍या तीन वेळा चढाव्या लागत होत्या. सभांना उपस्थित होता यावे म्हणून मला अगदी प्रामाणिकपणे मदत करणाऱ्‍या सर्वांची मी किती ऋणी आहे!

सन १९७२ मध्ये भगिनी वॉशिंग्टन यांना माझी काळजी घेणे अशक्य झाले तेव्हा मी स्वतःचे एक घर घेण्याचा निर्णय घेतला. रिज मंडळीतील ख्रिस्ती भगिनींची निःस्वार्थ मदत आणि प्रेम याशिवाय ही व्यवस्था करता येणे शक्य झाले नसते. मला जेवण भरविणे, अंघोळ घालणे आणि माझ्या व्यक्‍तिगत गरजांची काळजी घेणे वगैरे सर्व गोष्टींसाठी त्यांनी व्यवस्था केल्या. बाजारहाट करण्याद्वारे आणि बाकीच्या आवश्‍यक गोष्टींची काळजी घेण्याद्वारे इतरांनी मला मदत केली.

भगिनी प्रत्येक दिवशी सकाळी अगदी लवकरच येऊन मला भरवित असत आणि माझे कपडे बदलत. मला व्हीलचेअरवर बसविल्यानंतर त्या भगिनी मला खिडकीच्या शेजारील लहानश्‍या कोपऱ्‍यातील माझ्या मेजापर्यंत व्हीलचेअरवरून नेत. तेथे मी बसत असे आणि दूरध्वनीच्या साहाय्याने त्याचप्रमाणे पत्र लिहिण्याद्वारे सेवाकार्यात मग्न होत असे. माझ्या घरातील या जागेला मी परादीस कोपरा असे म्हणत असे कारण या ठिकाणी मी अनेक ईश्‍वरशासित चित्रे सजविली होती. संपूर्ण दिवस म्हणजे रात्री मला झोपविण्याकरता कोणी येईपर्यंत मी सेवाकार्य करत असे.

सन १९७४ मध्ये माझ्या प्रकृतीमुळे मला इस्पितळात दाखल व्हावे लागले. तेथे असताना डॉक्टरांनी रक्‍त घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सुमारे एका आठवड्यानंतर माझ्या प्रकृतीमध्ये सुधार झाल्यानंतर दोन डॉक्टर मला भेटण्याकरता आले. “अहो, मी तर तुम्हा दोघांना ओळखते,” मी त्यांना म्हटले, “तुम्हीच तर मला रक्‍त घेण्याकरता सांगत होता.”

“होय,” त्यांनी उत्तर दिले, “परंतु त्याचा काही उपयोग होणार नाही, हे आम्हाला ठाऊक होते.” त्यामुळे मला बायबलचे पुनरुत्थानाबद्दल असणारे अभिवचन आणि परादीसमय पृथ्वी याविषयी डॉक्टरांना साक्ष देण्याची संधी मिळाली.—स्तोत्र ३७:२९; योहान ५:२८, २९.

आरंभीची दहा वर्षे मी एकटी राहत असतानाही ख्रिस्ती सभांना उपस्थित होत असे. आजारी असल्याखेरीज मी सभांना कधीही चुकविले नाही. हवामान फारच खराब असल्यास स्नेही माझे पाय कोरडे राहावे म्हणून ब्लँकेटमध्ये गुंडाळत. अधुनमधून प्रवासी पर्यवेक्षक मला भेटण्याकरता येत असत. त्यांच्या भेटींच्या दरम्यान बायबल अभ्यास संचालित करताना ते मला “सोबत” देत आणि हा बायबल अभ्यास मी दूरध्वनीच्या साहाय्याने संचालित करत असे. माझ्याकरता हे क्षण फारच आनंदाचे होते.

अधिकच वाईट होत असलेल्या परिस्थितीला तोंड देणे

सन १९८२ मध्ये तर मला बिछान्यातून बाहेर येणे देखील मुश्‍कील झाले. मी मागील १७ वर्षांपासून अविरतपणे सभांना उपस्थित राहत होते आणि पायनियर देखील होते; परंतु सध्या मला तसे करता येत नाही. या परिस्थितींमुळे फारच खेदीत होऊन मी अनेकदा रडत असे. तथापि, यहोवाच्या काळजीचा पुरावा प्रकट झाला—ख्रिस्ती वडिलांनी मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची व्यवस्था माझ्या छोट्या घरामध्ये केली. या तरतुदीबद्दल मी अजूनही किती कृतज्ञ आहे!

मी अंथरुणाला खिळले असल्यामुळे मला माझ्या मेजापर्यंत पोहंचता येत नव्हते त्यामुळे छातीवर कागद ठेवून झोपूनच लिहिण्याचा सराव करण्यास मी सुरवात केली. सुरवातीला माझे अक्षर सुवाच्य येत नव्हते परंतु पुष्कळ सराव केल्यानंतर वाचता येईल असे लिहिण्यास मला शक्य झाले. मला पुन्हा एकदा काही काळापर्यंत पत्रांद्वारे साक्ष देण्यास शक्य झाल्यामुळे फारच आनंद झाला होता. खेदाची गोष्ट म्हणजे, पुढे माझी प्रकृती आणखीनच खालावत गेली आणि त्यामुळे मी आता सेवाकार्याच्या या क्षेत्रातही सहभाग घेऊ शकत नाही.

सन १९८२ पासून मला शारीरिक रीत्या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित होता येत नाही; तरी देखील अधिवेशनाच्या काळातील उत्साह प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करते. एखादी ख्रिस्ती भगिनी माझ्याकरता लेपल कार्ड आणते आणि ती ते माझ्या गाऊनला लावते. त्याचप्रमाणे फिलाडेल्फिया येथील व्हेटरन्स स्टेडियमवर चालू असणारा बेसबॉल खेळ मी दूरदर्शनवरून पाहते आणि तेथील आपल्या अधिवेशनांच्या दरम्यान या स्टेडियममध्ये मी कोठे बसत असे याचा विचार करते. सामान्यपणे, कोणीतरी अधिवेशनाचा कार्यक्रम ध्वनिमुद्रित करतात त्यामुळे तो संपूर्ण कार्यक्रम मी ऐकू शकते.

सोडून न देणे

मी पूर्वीप्रमाणे सेवाकार्य करू शकत नाही तरी देखील बायबल सत्यांबद्दल लोकांशी बोलण्यास मी जागृत असते. पायनियर होणे आणि अनेक आस्थेवाईकांना बायबल अभ्यास करण्यात मदत करणे हे आनंददायक आहे. मागील २२ वर्षे एकटी राहून हे कार्य करणे ही काही सोपी गोष्ट नाही, कोणत्याही व्यत्ययाशिवाय यहोवाची सेवा करण्याच्या स्वातंत्र्याचा मी आस्वाद घेतला आहे आणि मी पालकांच्या घरी राहिले असते तर मला हे करता आले नसते.

स्वतःच्या व्यक्‍तित्त्वाशी जुळवून घेण्याकरता मला कठीण परिश्रम करण्याची गरज असल्याचे देखील माझ्या निदर्शनास आले. काहीवेळा तर, मला स्वेच्छेने मदत करणाऱ्‍यांना मार्गदर्शन देताना मी त्यांच्याबरोबर नेहमीच कृपायुक्‍त भाषेत बोलले नाही. (कलस्सैकर ४:६) या क्षेत्रात सुधार घडवून आणण्यासाठी मला मदत करावी म्हणून मी यहोवाला सतत प्रार्थना करते. अनेक वर्षे माझ्यावर सहनशीलतेने प्रेम करणाऱ्‍यांनी दाखविलेला धीर आणि क्षमाशीलतेचा आत्मा याकरता मी त्यांची खरोखरच ऋणी आहे. त्यांचे प्रेमळ सहकार्य आशीर्वाद आहे आणि त्यासाठी मी त्यांचे आणि यहोवाचे आभार मानते.

मी मागील अनेक वर्षांपासून शारीरिक रीत्या सभांना उपस्थित राहू शकले नाही—या संपूर्ण काळात केवळ एकदा इस्पितळात गेल्याखेरीज मी घराच्या बाहेर पडलेच नाही तरीही—मी अजूनही हर्षित आणि आनंदी आहे. मी अनेकदा निराश होते, हे मी मान्य करते तरी सुद्धा निराशेतून बाहेर पडण्याकरता यहोवा मला मदत करतो. आता राज्य सभागृहातील टेलिफोन हुकच्या साहाय्याने सभांचे कार्यक्रम ऐकण्यात मला आनंद मिळतो. प्रार्थना आणि भरवसा याद्वारे यहोवावर विसंबून राहिल्याने मला एकटे असल्याचे कधीही वाटले नाही. होय, मी खरोखरच असे म्हणू शकते, यहोवाच्या काळजीचा मला लाभ झाला आहे.—सिलेस्ट जोन्स यांच्याद्वारे निवेदित.

[२३ पानांवरील चित्र]

हेच ते ठिकाण जेथे मी सेवाकार्य करत असे; यास मी परादीस कोपरा म्हणत असे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा