आशियातील प्राण्यांच्या भव्य जत्रेतील एक दिवस
सुंदररीतीने सजविलेल्या हत्तींवर महाराजे स्वार होऊन जात असताना किंवा एक गरीब शेतकरी मोठमोठी शिंगे असलेल्या बैलांच्या बैलगाडीतून जात असतानाच्या दृश्यांचे फोटो अनेक वेळा येथे भारतात काढले जातात. परंतु इतके प्रचंड आणि मोलवान प्राणी कोठे मिळतात बरे?
ते कळण्यासाठी, आमच्यासोबत भारताच्या ईशान्येकडील बिहार प्रांतातील सोनेपूर येथे चला. तेथे, तुम्ही पूर्वी कधीही न पाहिलेल्या जत्रेला आपण भेट देऊ शकतो. आशियामधील, कदाचित संपूर्ण जगातीलही ती सर्वात भव्य जत्रा आहे असे कळवले जाते. ही जत्रा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान दोन आठवड्यांसाठी असते.
मोहित करणारी घटना
किती मोठा तो लोकसमूह! स्त्रिया भडक साड्या आणि भरपूर दागदागिन्यांनी शृंगारलेल्या आहेत. विशेषकरून विवाहीत स्त्रियांनी त्यांच्या भांगेत कुंकू लावलेला अगदी उठून दिसतोय. त्यांच्यातील अनेकींच्या हातात एक बाळ आहे, व त्या त्यांच्या नवऱ्याबरोबर चालत राहण्यासाठी घाई करत असताना आणखी एक किंवा दोन मुले त्यांच्या साडीला घट्ट पकडून धावतात.
इतक्या अफाट गर्दीत, मुले हरवून जात नसतील का याचा विचार आमच्या मनात आला. वास्तविक पाहता, पुष्कळ हरवली जातात. आम्हाला असे कळले की, केवळ एका आठवड्यात, ५० मुले हरवली होती, व त्यातील केवळ १७ मुले सापडली. हरवलेल्या मुलांचे काय होते याचा विचार करताना आमचा थरकाप होतो, कारण आम्ही असे ऐकले आहे की क्रूर लोक पुष्कळदा त्यांना पळवून नेतात व त्यांना भीक मागायला आणि अनैतिक कामे करण्यास जबरदस्ती करतात.
रस्त्याच्या कडेला असणारी छोटी छोटी दुकाने ह्या गर्दीत आणखी भर घालतात परंतु ती पाहणे मनोरंजक वाटते. एका दुकानात, एक नाणे दिल्यावर, एक छोटा पक्षी त्याच्या पिंजऱ्यातून बाहेर येतो व एक कार्ड उचलतो. तेथे उभा असलेला माणूस, त्या कार्डातून एखाद्याचे भविष्य सांगतो. झट की पट दाढी करायची आहे का? फक्त न्हाव्यासमोर जाऊन पाय दुमडून बसा, आणि त्याचा लांब, धारदार वस्तरा साबणाचा फेंस लावलेल्या तुमच्या तोंडावरून काहीही इजा न करता फिरविला जाईल. अवघ्या तीन मिनिटांत, तुमची दाढी केली जाते जी कदाचित आधुनिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या पद्धतीसारखीच आहे.
दुकानांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या कलात्मक बांगड्या पाहावयास मिळतात, त्यांच्या साडीच्या रंगानुसार जुळवून घालण्यास भारतीय स्त्रियांना फार आवडते. अनुभवी व्यापारी, हाताचे योग्य माप आणि शोभेल अशी बांगडी मिळूपर्यंत गिऱ्हाईकाच्या हातावर ती फार सहजतेने काढून पुन्हा घालतो. काचेच्या, धातूच्या किंवा प्लास्टिकच्या बनवलेल्या बांगड्या, एक विशिष्ट भारतीय स्त्री प्रत्येक हातावर एक डझन किंवा त्यापेक्षा अधिक घालते.
दुकानांमध्ये प्राण्यांसाठी देखील दागिने विकले जातात. काही झाले तरी, ही प्राण्यांची जत्रा आहे. अनेक वस्तू फार लवकर विकल्या जातात कारण गावकऱ्यांना त्यांच्या प्राण्यांना सजवण्याची फार हौस असते. ह्या सजवण्यामध्ये प्राण्यांच्या गळ्यात घालण्यासाठी मणी तसेच रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या आकाराच्या घंटा यांचाही समावेश असतो.
कोण तो बाहेर ओरडत आहे? अरे तो तर एक भिकारी आहे! सुरकुत्या पडलेला आणि मातीने माखलेला, रस्त्यावरून रांगत, भीक मागायचे भांडे पुढे सरकवत तो जात आहे. गर्दी लक्षात घेता, त्याला कोणी तुडवत नाही ही आश्चर्याचीच गोष्ट आहे! जत्रेत, लोक भिकाऱ्यांबद्दल फार उदारता दाखवतात, म्हणूनच ह्या माणसाचे अर्धे भांडे आधीच नाण्यांनी भरले आहे. मंदिराजवळ शंभरापेक्षा अधिक भिकारी—यामध्ये पांगळे, अंधळे, आणि महारोगी, भिक्षा मागण्यासाठी बसले आहेत. काहीजण त्यांच्या नशिबाला दोष देत आहेत, इतर दैवतांच्या नावाचा धावा करतात, आणि काही भीक देणाऱ्यांना आशीर्वाद देतात.
जत्रेसाठी पुष्कळ जातीचे प्राणी देखील येतात. हत्तींना रंगवले व भडकपणे सजवले जाते. प्रत्येक हत्तीवर एक माहूत असतो जो एका काठीने हत्तीच्या कानामागून अधूनमधून टोचणी देऊन, त्याला पुढे जाण्याची किंवा थांबण्याची आज्ञा देत असतो. म्हशी त्यांचे डोके वर करून, इतक्या हळू चालतात की त्यांच्यामागे वाहतूक थांबून आहे हे त्या पूर्णपणे विसरून जातात.
रस्त्यात आम्ही पुष्कळ गाई आणि काही उंट देखील पाहतो. पुष्कळ माकडे देखील पाहावयास मिळतात ज्यामध्ये बहुतेककरून लंगूर जातीचे आहेत. त्यांच्या भुवया अगदी दाट असतात आणि त्यांची दाढी झुबकेदार असते. यासोबतच, सुशोभित मोर, आणि पोपटांपासून लांब शेपूट असलेले पोपट व कबुतरांपर्यंत, पिसे असलेले प्राणी पाहावयास मिळतात. हे सर्व, जत्रेला, दूरच्या आणि जवळच्या ठिकाणाहून आले आहेत.
काही खास आकर्षणे
पंजाबातून येणाऱ्या उल्लेखनीय गाई खास आकर्षणातील आहेत. काही गाया दिवसातून दोन वेळा २५ लिटर दूध देतात. खरोखरच ते सुंदर प्राणी आहेत! अनेक लोक त्यांना केवळ पाहण्यासाठी येतात, परंतु इतरजण विकत घेणारे असतात. जेव्हा विक्री होत असते तेव्हा, स्थानिक दैवताची स्तुती करत मालक मोठ्याने ओरडतो, “बोलो हरीहरनाथ की”, आणि जमलेला समूह, “जय” असे त्याला एकमतात प्रत्युत्तर देतात. एका भारतीय गाईची किंमत सरासरीने ३,००० ते ५,००० रूपये इतकी होते, परंतु ज्या गाईंना बक्षिसे मिळाली आहेत अशा विदेशी जातींच्या गाई २०,००० ते ४०,००० रूपयांपर्यंत विकल्या जातात.a
ह्या वर्षी बाजारामध्ये विक्रीसाठी केवळ १५ उंट आहेत. ह्या “वाळवंटातील जहाजां”ची प्रत्येकी ५,००० रूपये किंमत आहे. ते फार वेळपर्यंत काम करू शकतात आणि उष्णता, थंडी व तहान आणि भूक सहन करू शकतात. दोन चाकांच्या मालवाहतुकीच्या गाड्यांना ओढण्यासाठी व नांगरण्यासाठी तसेच पाणचक्की फिरवण्यासाठी देखील उंटांचा उपयोग केला जातो, हे काम सामान्यपणे बैल करत असतात.
सर्वात प्रचलित प्राणी बैल आहेत. शेतकऱ्याचा माल आणि त्याच्या कुटुंबाला शहराकडे ओढत नेणाऱ्या त्याच्या नेहमी तयार असलेल्या बैलगाडीला न पाहता भारतीय रस्त्यावरून प्रवास करणे अशक्य आहे. एका धाडशी विक्रेत्याने त्याच्या बैलगाडीवर असे नाव लिहिले आहे जे म्हणते “सुपरस्टार बैल.” आणि ते खरोखरच सुपरस्टार दिसतात! जर कोणाचीही त्याला फसवण्याची किंवा चोरी करण्याची कल्पना आली, तर त्याच्याकडे दोन सजवलेल्या बंदुका तयार आहेत. एका सुपरस्टार बैलाची किंमत ३५,००० रूपये आहे.
नंतर घोड्यांचे खिंकाळणे आमचे लक्ष आकर्षित करतात, आणि ते खरेच किती सुंदर प्राणी आहेत! काही घोडे पोलिस किंवा लष्कराच्या वापरासाठी आहेत, तर काही शर्यतीसाठी आहेत. रपेट करण्यासाठी व चार चाकी गाडी वाहण्यासाठी तट्टू देखील उपलब्ध आहेत. एका दुकानात वाद्य वाजवणारी मंडळी वाद्य वाजवत आहे, एक प्रशिक्षित घोडा आनंदाने, त्या संगीताच्या तालावर नाचत आहे.
हत्तींचा चीत्कार ऐकू येत असलेल्या दिशेने आम्ही पुढे जातो. तेथे आमराईच्या मध्ये, २५० हत्ती आहेत. किती ते विशाल प्राणी! ते भारत आणि नेपाळच्या सर्व ठिकाणांहून आले आहेत. बहुदा ह्या मोठ्या जमावामुळे तसेच त्यांच्या जातीच्या इतर आणखी किती तरी हत्तींना पाहिल्यामुळे ते अस्वस्थ दिसत आहेत.
येथे आम्ही रानटीपणे चीत्कारत असलेला २५ वर्षांचा नर हत्ती, हरीहर प्रसाद, याला भेटतो. त्याचा मालक, गंगाबक्स सिंग, याने नुकतेच त्याला ७०,००० रूपयाला विकले आहे. एका चांगल्या हत्तीची सध्याची बाजारातली किंमत १,३०,००० इतकी आहे आणि त्यामानाने ही किंमत फारच कमी आहे. परंतु हरीहरला सांभाळणे जरा कठीणच आहे.
हरीहरला ह्या जत्रेला येण्यासाठी २२ दिवसांसाठी चालावे लागले, आणि आता त्याच्या मालकाला त्याला सोडून जाताना वाईट वाटत आहे. पण व्यापार म्हणजे व्यापार आहे, तेव्हा मानसिक बंधनाला तोडले पाहिजे. हरीहरला देखील त्याच्या जुन्या माहूताला (शिकवणारा) सोडण्यास वाईट वाटत आहे की नाही याविषयी आम्हाला आश्चर्य वाटत होते. जेव्हा त्याच्या नव्या माहूताने त्याला हाताळण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरीहरने त्याचे दोरखंड तोडून टाकले, म्हणून आता त्याला साखळ्यांनी बांधले आहे.
हरीहरला शांत करण्यासाठी व त्याच्यावर सुरळीत स्थित्यंतराचा परिणाम होण्यासाठी, त्याचा जुना माहूत त्याच्याबरोबर त्याच्या नव्या घरी प्रवास करील. तेथे, नवा माहूत जोपर्यंत हरीहरशी आणि त्याच्या सवयींशी परिचित होईल तोपर्यंत त्याला हाताळणारे दोघे माहूत सोबत काम करतील. आम्हाला असे कळले की नवा मालक हरीहरला अधिक काळापर्यंत ठेवू इच्छित नाही. यास्तव पुढच्या वर्षी त्याला पुन्हा सोनेपूरला आणले जाईल व विकले जाईल.
कदाचित असे होईल की राजस्थान मधील लोक हरीहरला कोणत्यातरी दूरगावच्या मंदिराचे काम करण्यासाठी विकत घेतील. मग त्याला तेथे पूर्णपणे सजवले जाईल व मंदिराचा रथ ओढण्यासाठी त्याचा वापर केला जाईल. किंवा त्याला बंगालच्या महासागराकडे नेणाऱ्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दाट जंगलात लाकडांची ने-आण करावी लागेल.
प्रदीर्घ इतिहास असलेली जत्रा
सोनेपूर येथील ह्या प्राण्यांच्या जत्रेची सुरवात नक्की कधी आणि कशी झाली त्याबद्दल कोणालाही अचूक माहीत नसले तरी, असे दिसते की तो मोगल सम्राट आलमगिर (१६५८-१७०७) यांच्या कारकीर्दीच्या दरम्यान प्रामुख्याने चालू झाला. स्थानिक जमीनदार, राजेश्वर प्रसाद सिंग म्हणतात की त्यांचा परिवार घोड्यांचा बाजार करण्यासाठी जत्रेची जमीन १८८७ पासून भाड्याने देत आले आहेत. एकोणीसाव्या शतकापासून पुढे, निळीच्या झाडाची लागवड करणारे ब्रिटिश राज्याचे लोक, मेळाव्याच्या दरम्यान येथे घोड्यावरून खेळण्याच्या चेंडूच्या खेळासाठी, घोड्यांच्या शर्यती, आणि नृत्य यासाठी एकत्र येत होते.
पूर्वीच्या दिवसांमध्ये ह्या जत्रेला येणारे महाराज त्यांच्या अफाट सेवकांबरोबर येत असत व खास तंबूंमध्ये राहत असत तेव्हा जत्रेच्या वैभवात आणखी भर पडत होती. तरीही, प्राण्यांसाठी मागणी जोपर्यंत चालू राहील, तोपर्यंत सोनेपूरची जत्रा निरंतर भरत राहील. सर्व प्रकारचे प्राणी जेथे मुख्य आकर्षण होते तेथे, त्या प्रचंड वेगळ्या जत्रेत काही वेळ घालविल्यामुळे आम्हाला आनंद झाला. (g92 10/22)
[तळटीपा]
a एक हजार रूपये ६० यु.एस. डॉलर्सच्या तुल्य आहेत.
[१३ पानांवरील चित्र]
पाहणाऱ्यांसाठी सजवलेल्या घोड्यांचे प्रदर्शन
[१४ पानांवरील चित्र]
हरीहर प्रसादला विकल्यानंतर