तुम्ही एक स्नेही पालक आहात का?
तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता का? तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो का? प्रत्येक जण खास, अतुलनीय, त्याची उणीव कशानेही भरून काढता येणार नाही अशी व्यक्ती आहे असे तुम्हाला वाटते का? अनेक पालकांना तसे वाटते. परंतु तुम्हाला असे वाटते ते तुम्ही तुमच्या मुलांना कधी सांगता का? त्यांनी काही तरी चांगले काम केले तेव्हा खासकरून, तुम्ही त्यांची स्तुती करता का? त्यांच्यासोबत निवांतपणे खेळून, सांत्वनदायी स्पर्श करून, प्रेमळपणे त्यांना कवटाळून अशा इतर मार्गांनी स्नेहभाव व्यक्त करता का?
काहीजण असा आक्षेप घेऊ शकतात की, “माझी ही पद्धत नाही, मी माझ्या भावना हव्या तितक्या मोकळ्या मनाने व्यक्त करू शकत नाही.” हे बरोबर आहे की, सर्वचजण दर्शक स्वभावाचे नसतात. तरीपण, तुमच्या मुलांना स्नेहभाव दाखवणे हे तुम्ही जाणण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असू शकते.
शास्त्रज्ञांच्या एक गटाने १९५१ मध्ये केलेल्या शिशुवर्गातील ४०० मुलांच्या अभ्यासाचा मागोवा घेतला. चौऱ्याण्णव पुरुष आणि स्त्रियांमधून त्यांना काही प्रभावी नमुने पाहावयास मिळाले. द न्यू यॉर्क टाईम्स मध्ये म्हटल्याप्रमाणे, ज्या मुलांचे पालक उत्साही व प्रेमळ होते, त्या मुलांचे त्यांच्या प्रौढ जीवनात बरे चालले होते. मूलतः त्यांना यशस्वी विवाह, मुलांचे चांगले संगोपन, कामातील आनंद, तसेच घनिष्ठ मित्रत्व लाभले. ह्या अभ्यासाचे नेतृत्त्व करणाऱ्या डॉ. कॅरल फ्रान्ज यांनी ह्या वृत्तपत्राला असे सांगितले की त्यांनी त्यांची “मानसिक स्थिती योग्य असल्याची, स्वतःविषयी आणि त्यांच्या जीवनाविषयीच्या उत्साहाची आणि समाधानाची जाणीव प्रकट केली.”
याच्या विपरीत, फ्रान्ज यांना असे दिसून आले की “ज्या मुलांचे पालक भावनाशून्य, झिडकारणारे होते, त्या मुलांना पुढील जीवनातील, प्रत्येक मार्गात—कामात, सामाजिक सुव्यवस्थेत, आणि मानसिक योग्यतेत, फार कठीण काळाचा सामना करावा लागला.” वस्तुतः, त्या अभ्यासाने असे सुचविले की पालकांचा घटस्फोट, दारू पिण्याचे व्यसन किंवा गरिबीचे परिणाम यापेक्षा अधिक, पालकांच्या प्रेमळपणाची उणीव मुलांच्या पुढील जीवनाचे नुकसान करू शकते.
पवित्र शास्त्राच्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना याचे आश्चर्य वाटू नये. येशूने मुलांना कसे वागवले त्याबद्दल त्यांना चांगले माहीत आहे. त्याने त्यांना बहुमूल्य मानले, स्वतःजवळ त्यांना घेतले, व त्यांच्याबद्दल असलेले प्रेम प्रकट केले. (मार्क १०:१३-१६; लूक ९:४६-४८; १८:१५-१७) हे निश्चित, की तो ह्या बाबतीत जो पितृहीनांचा पिता आहे—त्या त्याच्या स्वर्गीय पित्याचे अनुकरण करत होता. (स्तोत्रसंहिता ६८:५) यहोवा हा परिपूर्ण पालक आहे; जे त्याच्यावर प्रीती करतात अशा अपूर्ण मानवी पालकांमध्ये काही उणीव असल्यास तो ती प्रेमळपणे भरून काढू शकतो.—२ करिंथकर ६:१८. (g92 10/22)