गर्भपात—द्विधा जग
दर वर्षी जगभर किती गर्भपात, कायदेशीर वा बेकायदेशीर, होतात? ॲबॉर्शन हे पुस्तक म्हणते की, त्यांची संख्या “कमीत कमी प्रौढांच्या मृत्युच्या संख्येइतकी,” म्हणजे जवळपास ४ कोटी ५० लाख इतकी असावी. परंतु, इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरंट फेडरेशन याच्या अंदाजाप्रमाणे ती संख्या ५ कोटी ५० लक्ष इतकी मोठी असावी!
या व्यवहाराला, १९२० मध्ये कायदेशीर रुप देणारा रशिया हा पहिला देश होता. अलिकडच्या, पुष्टी न मिळालेल्या, बातमीनुसार तेथे दर वर्षी ५० लाख गर्भपात होतात. चीनमधील आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मते तेथे जवळपास ९० लाख गर्भपात, म्हणजे एकूण गर्भधारणांपैकी एक तृतीयांश, इतके होतात. जपानमध्ये २० लाखांहून अधिक तर अमेरिकेत १५ लाखांहून अधिक गर्भपात होतात. ब्रिटनमध्ये जवळपास २५ हजार होतात.
रोमन कॅथोलिक धर्म असलेल्या स्पेन व आयर्लंडमध्ये गर्भपात कायदेशीर झालेला नाही. तरीही दरवर्षी हजारो स्त्रिया गर्भपात करून घेतातच. कसा? बेकादेशीरपणे चालणारे दवाखाने असतात. पण जेथे ही प्रथा कायदेशीर आहे तेथे प्रवासाला जाण्याची सोपी युक्ती अनेक स्त्रिया करतात. या बाबतीत अनेक जण ब्रिटन पसंत करतात.
अर्थातच, गर्भाला शारीरिक वा मानसिक विकृती असण्याची शक्यता आहे, तसेच बलात्कार किंवा अगम्यगमनामुळे गर्भधारण झाली असल्याने हे सर्व गर्भपात होत नाहीत हे उघड आहे. ब्रिटनमधील उपलब्ध आकडेवारीनुसार या कारणास्तव जेमतेम २ टक्केच गर्भपात होतात. तर मग, इतके गर्भपात का होतात? याला दोन मुलभूत कारणे आहेत.
मुलभूत मुद्दे
पुरातन काळी लोकसंख्येला आळा घालण्याची समस्या नव्हती. जमाती व देश संख्येच्या विपुलतेला अनुकूल होते. तसेच आपल्या कुटुंबाचा आकार नियमित करण्याचे स्त्रियांना कारण नव्हते. व्यभिचाराच्या परिणामी गर्भपात होत असत व तेही बहुधा बेकायदेशीर असत.
उलटपक्षी, आज, गर्भपाताचे धोरण सरकार-पुरस्कृत असू शकेल. लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढण्याची भीती असलेल्या देशांमध्ये या मार्गाने जननाच्या वेगाला अटकाव करणे शक्य आहे.
अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये अशी भीती नसली तरी गर्भपातांची संख्या वाढत आहे. ते का बरे? कारण न्यूयॉर्क शहरातील रिलिजस कोअलिशन फॉर ॲबॉर्शन राइटस् प्रवक्त्याच्या स्त्रीने ठासून म्हटलेः “स्त्री-स्वातंत्र्यावर आपला विश्वास असल्यास, आपल्या नैतिक पसंतीचा स्त्रियांना हक्क आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.”
परंतु एकदा का गर्भधारणा झाली की, मातृत्वाची भूमिका धिक्कारण्याचा, आपल्या बाळाचा गर्भपात करण्याचा त्या स्त्रीला निर्विवाद हक्क आहे का? असा मार्ग स्वीकारार्ह आहे का? आज गर्भपाताच्या बाजूने व विरुद्ध चाललेल्या वादाचा हा केंद्रबिंदू आहे. याचे उत्तर काय?
ते, व्याख्या ज्या पद्धतीने केल्या जातात त्यावर अवलंबून आहे? जीवन म्हणजे काय? त्याचा आरंभ कधी होतो? न जन्मलेल्या मुलाला काही कायदेशीर हक्क आहेत का?
जीवनाचा आरंभ कधी होतो?
पूंबीजातील २३ जीवाणूंचा स्त्रीच्या अंडातील तेवढ्याच संख्येच्या जीवाणूंशी संयोग होतो तेव्हा एका मानवी जीवाची उत्पत्ती होते. उत्पत्तीच्या या वेळेपासून त्या व्यक्तीचे लिंग व इतर वैयक्तीक बारकावे कायमचे ठरतात. गर्भधारणेच्या नऊ महिन्याच्या काळात वाढीतच काय तो बदल होईल. डॉ. जॉन सी विल्के लिहितातः “तुम्हीच एकदा एक पेशी होतात असे म्हणणे जीवशास्त्रीय सत्य विधान आहे.” तर मग, गर्भधारणेच्या वेळी जीवन सुरु होते का? अनेकजण, होय असे उत्तर देतात. असा विचार करणाऱ्यांना कधीही केलेला गर्भपात म्हणजे खूनच वाटतो.
इतर अनेकांच्या मते, ‘मूळ गर्भधारणेनंतर २० आठवड्यांनी जीवनाची सुरवात होते.’ असा त्यांचा का दृष्टीकोन आहे? कारण या काळाच्या जवळपास मातेला गर्भाची हालचाल जाणवते. या काळाला “चाहूल” असेही म्हणतात. २० व्या आठवड्यापासून पुढे मुले जिवंत अशी जन्माला येऊ शकतात, व बहुधा गर्भधारणेच्या २४ व्या आठवड्यापर्यंत गर्भपात केला जातो. गर्भपातासाठी या काळाला सर्वसाधारणपणे अनुमोदन आहे. तर मग, बाळ कायदेशीररित्या जिवंत असल्याचे मानण्याची हीच वेळ का?
ब्रिटनमधील कायदा न जन्मलेल्या बाळाला मानवी व्यक्ती मानत नाही. अशा परिस्थितीत कायदेशीररित्या कोणत्याच गर्भपाताला खून म्हणता येणार नाही. परंतु मातेच्या शरीरातून बाहेर पडल्यावर, नाळ शाबूत असली तरीही, त्या बाळाला मारणे हा गुन्हा आहे. त्यावेळी बाळाला कायदेशीर हक्क असतात. या दृष्टीकोनानुसार कायदेशीरपणे जन्माच्या वेळी जीवन सुरु होते.
ब्रिटनच्या प्रधान रब्बींनी व्यक्त केल्याप्रमाणे यहुद्यांचा दृष्टीकोणही तसाच आहे. ते म्हणतात की, जन्माच्या क्षणापर्यंत जीवन सुरु होत नाही. ते पुढे म्हणतातः “न जन्मलेल्या मुलाच्या नाशाला आम्ही खून मानत नाही.” मग, गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाचे, गर्भाचे काय? मेरिटल रिलेशन्स, बर्थ कंट्रोल ॲण्ड ॲबॉर्शन इन ज्युईश लॉ या पुस्तकामध्ये न्यूयॉर्कचे रब्बी डेव्हीड एम. फेल्डमन यांनी म्हटलेः “गर्भ हा अज्ञात, भावी, संभाव्य, ‘देवाच्या गूजा’चा एक भाग आहे.”
विचारातील विरोध
यावरुन धार्मिक दृष्टीने गर्भपात स्वीकारण्याजोगा आहे असा विचार करणे सोपे आहे. परंतु अशा पद्धतीने सर्वच धर्म विचार करीत नाहीत. रोमन कॅथोलिक धर्माचा अधिकृत दृष्टीकोण पहा.
कोणत्याही वयाच्या गर्भाचे पतन करण्याला, १८६९ मध्ये ९वे पोप पायस यांनी धर्मबहिष्कृतीची शिक्षा ठरवली होती. १९५१ मध्ये १२ व्या पायस यांनी या तत्त्वाचा पुनरुच्चार करताना म्हटलेः “प्रत्येक मानवाला, मातेच्या गर्भातील बाळालाही, त्याच्या जीवनाचा हक्क थेट देवाकडून मिळतो, पालकांकडून नव्हे.” १९८५ मध्ये केनया येथे बोलताना दुसरे जॉन पॉल यांनी तर स्पष्टच सांगितलेः “संततीनियमन व गर्भपात अशा कृती चूक आहेत.”
तथापि, आज पुष्कळ कॅथालिकांचे म्हणणे आहे की, असे हे प्रतिपादन कालबाह्य असून ते सुधारले गेले पाहिजे. त्यामुळे आता, रोमन कॅथोलिकांमध्ये या वादाविषयी फूट आहे. याविषयीची काही सत्य विधाने बघा.
रोमन कॅथोलिकांचा पेच
जीवनाच्या वतीने कार्य करणाऱ्या अमेरिकन बिशपांच्या समितीचे अध्यक्ष कार्डिनल बर्नारडिन ठासून सांगतात की, गर्भपात ही नैतिक चूक असून याबद्दल चर्चची अधिकृत भूमिका सर्व रोमन कॅथोलिक लोकांवर बंधनकारक आहे. अमेरिकेतील नोत्र दाम विश्वविद्यालयातील नैतिक धर्मशास्त्राचे रोमन कॅथोलिक प्राध्यापक, जेम्स टी. बर्शल यांनी १९८२ मध्ये लिहिलेः “माझा मुद्दा सरळ आहे. गर्भपात ही मनुष्यहत्या, एका बालकाचा नाश होय.” परंतु चार वर्षानंतर त्याच विश्वविद्यालयातील धर्मशास्त्र शाखेचे अध्यक्ष पुरोहित रिचर्ड पी. मक्ब्रिएन यांनी गर्भपाताबद्दल आपल्या चर्चचा स्पष्ट सिद्धांत नसल्याचे सांगण्याची बरीच खटपट केली.a त्यांच्या दृष्टीकोणानुसार गर्भपाताला मान्यता देणाऱ्या कॅथोलिकांना, विश्वासघातकी समजले जात असले तरी त्यांना धर्मबहिष्कृत करता येत नाही.
चर्चच्या अधिकाऱ्यांच्या संदिग्धतेमुळे अनेक प्रसिद्ध कॅथोलिक गर्भपाताच्या वतीने उघड बोलतात. त्यामध्ये काही अमेरिकेतील पाळक आहेत. तसेच अनेक जोगिणीही त्यात सामील आहेत. त्यातील काही जोगिणींना, गर्भपाताविषयी वर्तमानपत्रातील एका वादग्रस्त जाहिरातीला पसंती दर्शविल्याबद्दल, त्यांच्या मठातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली गेली होती.
याशिवाय आता सामान्य कॅथोलिकांचा गर्भपाताच्या वतीने कार्यरत असलेला मातबर गट बनला आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. येथे भरलेल्या गर्भपात संबंधी संमेलनात NOW (नॅशनल आर्गनायझेशन फॉर विमेन) संस्थेच्या अध्यक्षा एलिनॉर सी. स्मील यांनी ठासून सांगितले की, “सामान्य कॅथोलिकांच्या प्रमुख विचारधारेशी मी सहमत आहे.” त्याच बरोबर, न्यूयॉर्क टाईम्समधील वृत्तानुसार, गर्भपात करण्याच्या हक्काला त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे रोमन कॅथोलिक चर्चमधून त्यांना बहिष्कृत केले जाईल, या मताची त्यांनी थट्टा उडवली.
आपल्या संस्थेतील लोकांच्या उलट-सुलट दृष्टीकोणांचा गुंता सोडवणे रोमच्या चर्चला दिवसेंदिवस कठीण जात आहे.
बेकायदेशीर गर्भपातातील धोके
कायदे करणे व हुकुम काढणे सोपे असते. परंतु सद्हेतूंनी प्रेरित असले तरी, गर्भपाताविषयींचे निर्णय अमलात आणणे, कोणत्याही अधिकाऱ्याला कठीण आहे. त्यात लोक, जवळून व व्यक्तीशः गुंतलेले आहेत. दबावाखाली लोक कसे वागतील ते सांगता येत नाही.
गर्भपाताला कायदेशीर मंजुरी देण्यामध्ये सरकारला प्रतिबंध करण्यात वा असलेला कायदा रद्द करण्यात एखादा गर्भपात-विरोधी गट यशस्वी झाल्यास काय? त्याने काही समस्या सुटतील का? “कधी-कधी जिवावर उदार होऊनही, (गर्भपात करुन घेण्यासाठी) स्त्री मार्ग काढील, व तिला रोखण्यासाठी राजकीय पुढारी वा कायदे काहीही करू शकणार नाहीत.” अशी टीका न्यूझीलंड येथील गर्भपाताला अनुकूल असलेल्या, लोकसभेच्या सदस्या मेरिलिन् वॉरिंग यांनी केली. हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. गर्भपाताचे समर्थक विचारतात, ‘या दोहोतील कोणते पसंत करावे?’
गर्भपात कायदेशीर असलेल्या ठिकाणी काही मृत्यु घडत असले तरी त्यावर कडक वैद्यकीय देखरेख असते. या उलट, बेकायदेशीर “गल्ली-बोळा”तील गर्भपात, अयोग्य लोकांकडून अस्वच्छ परिस्थितीमध्ये केले जात असल्याने मृत्युचे प्रमाण धक्कादायक असते. उदाहरणार्थ, अशा गर्भपातामुळे, बांगला देशामध्ये प्रत्येक वर्षी १२,००० स्त्रिया मरण पावतात असा अंदाज आहे.
या सर्व गोष्टींमध्ये आणखी एका मानवी घटकाकडे लक्ष दिले पाहिजे. गर्भपाताचा कारखाना चालविल्याप्रमाणे गर्भपात करण्याबद्दल डॉक्टर व नर्सेसना कसे वाटते? होऊ घातलेल्या माता व पित्याला, गर्भपात करवून घेण्याने कशा प्रकारची शारीरिक, मानसिक व भावनिक किंमत मोजावी लागते? याचा आपण आता विचार करणार आहोत. (g87 4/8)
[तळटीपा]
a “स्पष्ट सिद्धांत” याचा अर्थ पोपच्या बादशाही अधिकाराद्वारे रोमन कॅथोलिक चर्चने अचूक असा जाहीर केलेला सिद्धांत.
[पानांवरील चौकट]
पर्यायी नामाभिधान
गर्भपाताला पाठिंबा देणाऱ्यांना, पसंतीस अनुकूल म्हणवणे अधिक आवडते. तसेच, त्याला विरोध करणारे स्वतःला जीवनास अनुकूल म्हणतात. या लेखात गर्भपातास अनुकूल व गर्भपातास प्रतिकूल हे शब्द स्पष्टतेसाठी सातत्याने वापरले आहेत.
[पानांवरील चित्र]
अनेकजण म्हणतातः “आपल्या नैतिक पसंतीचा स्त्रियांना हक्क आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.”
[चित्राचे श्रेय]
H. Armstrong Roberts
[पानांवरील चित्र]
अनेक स्त्रिया उघडपणे गर्भपाताला प्रतिकूल आहेत
[चित्राचे श्रेय]
H. Armstrong Roberts