गर्भपात—कोण बरोबर आहे?
तुमचे बाळ जगण्याची शक्यता ०.१ टक्के असल्याचे दोन प्रख्यात विशेषज्ञ तुम्हाला सांगतात. ते जिवंत जन्मल्यास त्यात गंभीर विकृती असतील व थोडक्याच दिवसात ते मरण्याची शक्यता आहे. तुम्ही काय कराल? बाळाला जन्म देण्याची संधी घ्याल? की गर्भपात करून घ्याल?
अशी परिस्थिती असंभवनीय आहे असे तुम्हाला वाटेल. पण तसे होऊ शकते व इंग्लंडमधील लंडनमध्ये झाले देखील. सुदैवाने गर्भपात न करण्याच्या पालकांच्या निर्णयाला इस्पितळाने पाठिंबा दिला. बाळाच्या वडीलांनी सांगितले की, “गर्भपात करून घ्यावा असे आम्हाला कधीही सांगण्यात आले नाही.” आता, कोणत्याही असामान्य शारीरिक व्यंगाशिवाय जन्मलेला लहान मुलगा त्यांना आहे.
एक वैद्यकीय सल्लागार म्हणालाः “आम्हाला झालेला आनंद उघड आहे.” ते पुढे म्हणालेः “कठीण गोष्ट अशी की जीवशास्त्रात कोणत्याही गोष्टीची १०० टक्के खात्री देता येत नाही.” खरे. पण डॉक्टरचा (वा पालकाचा) चुकीचा निर्णय हा आजच्या, गर्भपाताच्या पेचाचा एक पैलू होय.
परस्पर विरोधी कारणे
गर्भपाताला अनुकूल व विरोधी असे वैद्यकीय व नैतिक मुद्दे भावनांनी अतिशय भारलेले आहेत. दोन्ही बाजूंचे दबाव टाकणारे गट, आपली बाजू ऐकली जावी व समजावून घेतली जावी म्हणून प्रामाणिकपणे आवाज उठवतात, व अनेकदा वादंग माजते. कोण बरोबर आहे?
आधी उल्लेखलेल्या पालकांनी योग्य निर्णय घेतला हे उघड आहे. परंतु डॉक्टरांचे निदान बरोबर ठरले असते तर? तशा परिस्थितीत त्या स्त्रीने गर्भपात करून घेणे योग्य झाले असते का?
त्या प्रश्नाचे उत्तर देणे तुम्हाला कठीण वा अशक्य वाटत असल्यास, तसे वाटणारे तुम्ही एकटे नाही. असे असले तरीही मदतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे असल्याचे आपण पाहणारच आहोत. त्याच्या आधी या गर्भपाताच्या जगभरातील व्यापाकडे लक्ष द्या. (g87 4/1)