गर्भपात—कोणत्या किमतीला?
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे दाने नर्सेसना “भयंकर स्वप्ने” पडली व त्यांना निद्रानाशाचा त्रास झाला अशी बातमी द डेली टेलिग्राफने दिली. का बरे? कारण २४ आठवड्यांच्या अर्भकाचा (तो मुलगा होता) गर्भपात करण्याच्या शस्त्रक्रियेत त्या सहभागी झाल्या होत्या. अनपेक्षितरित्या तो “थोडा वेळ” जगला.
अमेरिकेतील डेट्रॉईट येथे, आईच्या गर्भाशयात इंजेक्शन दिल्याने २९ आठवड्यांचा गर्भ मेला असेल अशा समजूतीने हॉस्पिटलच्या गर्भपात कक्षाच्या एका स्टीलच्या बादलीत फेकण्यात आला. पण तो जगला. ती मुलगी होती. तिचे रडणे ऐकू आले व अगदी वेळेवर तिला अतिदक्षता कक्षात नेण्यात आले.
गर्भपातांच्या वाढत्या संख्येबरोबरच जगू शकणाऱ्या गर्भांच्या पतनाची समस्याही वाढत आहे. प्रगत वैद्यकीय कौशल्यामुळे अपूर्ण वाढ झालेल्या अर्भकांची अधिक चांगली काळजी घेता येते. त्यामुळे थोड्याच वर्षापूर्वी अतिशय कठीण होते ते, २६ आठवड्यांची बालके जगणे शक्य झाले आहे. या कारणामुळे काही देशातील नर्सेसना, विवेकाच्या आधारे, गर्भपातात सहभागी होण्याचे नाकारण्याचा हक्क आहे.
पण डॉक्टरचे काय? त्यांची प्रतिक्रिया कशी आहे?
गर्भपाताचा धंदा
न्यूजवीक मासिकाच्या मुलाखतीत हृदगत सांगताना डॉ. फिलिप स्टबलफील्ड यांनी सांगितले की, “गर्भपात करवणारा असे लोकात ओळखले जाणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युच.” इतकेच नव्हे तर अमेरिकेमध्ये जनतेच्या दबावामुळे अनेक डॉक्टरांनी ते काम अगदी सोडून दिले आहे. बॉम्ब स्फोटाच्या अनेक घटनांनी गर्भपात चिकित्सालयांचा नाश केला आहे. डॉ. स्टबलफील्ड यांनी स्पष्ट केले की, “आमच्या सबंध देशभर ज्यांना वैद्यकीय मार्गदर्शक मिळत नाहीत अशी चिकित्सालये आहेत, कारण समाज काय करील याची डॉक्टरांना धास्ती असते.”
असे असूनही वाढत्या संख्येने गर्भपात होत आहेत. त्यातील एक कारण शोधण्यास सोपे आहे. ते म्हणजे फायद्याचा धंदा.
उदाहरणार्थ, पल्स या वैद्यकीय नियतकालिकातील बातमीनुसार फ्रान्समधील पॅरिस येथे आपल्या नवयौवन मुलीचा गुप्तपणे गर्भपात करून घेण्यासाठी पालकांनी १०० पौंडाइतकी (१,४०० डॉलर्स किंवा जवळपास २५,००० रुपये) किंमत दिली. तीच बातमी म्हणते की, लंडनमधील काही चिकित्सालये प्रत्येक गर्भपातासाठी २,००० पौंडापर्यंत आकार घेतात.
१९८२ मध्ये ब्रिटनच्या दोन सर्वात मोठ्या गर्भपात केंद्रांची मिळून मिळकत ४ कोटी ५० लाख पौंड (६ कोटी ३० लक्ष डॉलर्स, किंवा १ अब्ज १२ कोटी ५० लक्ष रुपये) एवढी होती. हा आकडा सांगताना ह्युमन कंसर्न या नियतकालिकाने टीका केलीः “गर्भपात हा किफायतशीर धंदा आहे.” जपानमध्ये कुटुंबनियोजनाची गोळी कायदेशीर करण्यास सरकारने नकार दिला आहे. लंडनच्या द संडे टाईम्सने बातमी दिली की, “गर्भपात करून अमाप पैसा करणाऱ्या डॉक्टरांनी सरकारवर आणलेल्या दबावामुळे ही मनाई आहे.” गर्भपातांच्या जगात पहाल तिकडे पैसा हेच मूळ कारण असल्याचे दिसून येते.
यात आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. अविवाहित मुलगी गरोदर राहण्यासारख्या धक्कादायक परिस्थितीला अचानक तोंड देण्याची वेळ आल्यावर त्यातून वाट काढण्यासाठी, विशेषतः सुरक्षितपणे, चटकन् व अतिशय गुप्ततेमध्ये गर्भपात करता आल्यास, अनेक पालक पडेल ती किंमत वाजवी समजतील.
असे असले तरी या सर्व प्रकाराबद्दल अनेक डॉक्टर अधिकाधिक नाखुश होत आहेत. ब्रिटनमधील गर्भपात-युगाच्या आरंभी डेली मेल या वृत्तपत्राने प्राध्यापक इआन मॉरीसचे हे बोल उद्धृत केले कीः “गर्भपाताविषयी मला आता जी माहिती कळालेली आहे ती जाणून जर मी माझ्या ध्येयाची सुरवात केली असती तर मग, मी स्त्रीरोगतज्ञ होणे कधीच पसंत केले नसते.” ते पुढे म्हणालेः “मला शस्त्रक्रियांचा तिटकारा वाटतो, ते माझ्या वैद्यकीय प्रशिक्षणाच्या अगदी विरुद्ध जाते. जीव वाचविणे हे माझ्या व्यवसायाचे उद्दिष्ट आहे, या विशेष प्रकारच्या मनुष्य हत्या घडवून आणणे हे नाही.” हे जहाल शब्द आहेत खरे, व प्रत्येक डॉक्टर याच्याशी सहमत होणार नाही. पण त्याविषयी काही डॉक्टरांना नैसर्गिकपणे वाटत असलेली किळस त्यातून व्यक्त होते.
गर्भपात—कोणी ठरवावे?
एखाद्या स्त्रीला गर्भपाताच्या वादाला तोंड देण्याची वेळ आली की, केवळ काही लोक, आणि कधी तर ती स्त्री सुद्धा पित्याच्या इच्छेविषयीचा जास्त विचार करते. गर्भपात करून घेण्याचा निर्णय बहुधा या स्त्रीने आपले जिवलग स्नेही व नातेवाईकांच्या आधाराने केलेला असतो. परंतु द न्यूयॉर्क टाईम्स मध्ये म्हटल्याप्रमाणे “पुरुष देखील दुःखाच्या व काही हरपल्याच्या भावनेतून जातात, आणि पालकत्वाविषयी होणारी दोलायमान मनःस्थिती तेही अनुभवतात.”
आपली इच्छा विचारात घेतली जावी तसेच गर्भपात करून घेण्याचे मातेने ठरवण्यापूर्वी आपल्याही विचारांना अधिक प्राधान्य दिले जावे असे काही पित्यांना तीव्रतेने वाटते. या समस्येची दहा वर्षे पाहणी केल्यानंतर समाजशास्त्रज्ञ आर्थर शोस्टॅक म्हणतातः “निर्णय लादण्याची नव्हे तर त्यात सहभागी होण्याची पुरुषांची इच्छा असते.” असा विचार नक्कीच अनाठायी नव्हे.
प्रतिक्रियेला तोंड देणे
परंतु, हा निर्णय घेताना, गर्भधारणेचा काळ अचानक संपविल्याने स्त्रीला तिच्या संपूर्ण तनमनाला बसणाऱ्या जबर धक्कयाला तोंड द्यावे लागत असते. हे पुरुषांच्या बाबतीत घडत नाही. त्यात काय गोवलेले आहे?
गर्भपात लवकर केल्यावरही स्त्रीला बहुतेक वेळा अशक्त व थकल्यासारखे वाटते. सामान्यतः हातापायात गोळे येतात, मळमळते व रक्तस्रावही होतो. गर्भपात बऱ्याच उशीरा करण्यात येतो तेव्हा आंतरस्रावाची पातळी उतरत असताना गर्भपाताची लक्षणे एक आठवडा किंवा अधिक काळही राहू शकतात. स्तनात ठणका व औदासिन्याची भावना यांनाही तोंड द्यावे लागते. होय गर्भपात करून घेणे क्लेशकारक असू शकतो व ते अनुभवणाऱ्या स्त्रीलाच कळते. त्याची निवड तितकीशी सोपी नसते.
याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भपाताचा भावनिक व मानसिक परिणाम उद्ध्वस्त करणारे असतात. शारीरिक प्रतिक्रिया तात्काळ व अपेक्षित असते, परंतु मानसिक व भावनिक जखमा उशीरा दृष्टोत्पत्तीस येतात व भरल्याच तर बऱ्याच काळाने बऱ्या होतात. लंडनच्या द टाईम्सचा वार्ताहर लिहितोः “गर्भपात करून घेतलेल्या रुग्णांशी वेळोवेळी व्यावसायिक संबंध येणाऱ्याच्या दृष्टीने सांगता, त्या घटनेनंतर अनेक वर्षांनीही त्या अनेकदा फारच अस्वस्थ असतात.” ही समस्या किती मोठी आहे?
“या छुप्या समस्येची व्याप्ती आधी वाटत होती त्यापेक्षा मोठी आहे असे आता वाटते,” असे विवेचन द संडे टाईम्सने मांडले. औदासिनपणा व भावनांची क्षुब्धता इतकी तीव्र असते की, “वैद्यकीय उपचाराच्या कारणासाठी गर्भपात करून घेणाऱ्या अविवाहित स्त्रियांमधील निम्यांना मानसोपचार तज्ञांच्या मदतीची गरज पडते.” हे अनुमान खरे असल्याचे लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये केलेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे. द टाईम्सनुसार या अभ्यासातून असे निदर्शनास येते की, “गर्भधारणा संपवण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांना दुःखाच्या तीव्र प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते.” तसेच आपले दुःख “तोंड देण्यास कठीण” असल्याचे त्यांना दिसून येते.
ही मानवी समस्या हाताळण्याचा जपानी लोकांचा आगळा मार्ग आहे. पाडून टाकलेल्या गर्भांची प्रतिके म्हणून प्लॅस्टिक, प्लास्टर वा दगडाच्या चिमुकल्या मूर्ती देव्हारांच्या आवारात ठेवण्यात येतात. तेथे बौद्ध धर्मानुसार, मुलांचा रक्षणकर्ता जिझो, याच्या हवाली ती करण्यात येतात. त्या देवाला प्रार्थना करताना पालक आपल्या लज्जा, दुःख व अपराधाच्या भावनांना वाट मोकळी करून देतात. परंतु अशी गरज भासणारे ते एकटेच नाहीत. खालील वैयक्तीक अनुभव पहा.
“मला लवकरच लाज वाटली”
एलनने २२ वर्षांची होईपर्यंत तीन वेळा गर्भपात करवला होता. तिला आठवतेः “गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यापर्यंत मुलाची रचना झालेली नसल्याने गर्भपात करण्यात चूक किंवा गुन्हा नाही असे मला सांगण्यात आले होते. पण तीन महिन्याचे वा त्याहून अधिक असल्यास मात्र नाही. त्यानंतर, अविवाहित मातांविषयी लोकांनी केलेली वाईट टीका ऐकू आली तेव्हा गर्भपात करून घेतल्याबद्दल मला आनंद वाटला. दोन वर्षानंतर मी त्याच गोष्टीची दोनदा पुनरावृत्ती केली. मुलांना जगात न आणण्याचा मार्ग मला सापडल्याने माझा आनंद अधिकाधिक वाढत गेला.”
यानंतर लवकरच एलनने नर्सच्या व्यवसायात प्रवेश केला. ती सुईणीचे काम करू लागली. तिला आठवतेः “बाळाचा जन्म पाहण्यात तसेच त्या जन्माने डॉक्टर, सुईणी व पालकांना होणाऱ्या हर्षाचा अनुभव घेणे फारच आनंददायक होते. परंतु लवकरच, तीन निष्पाप जीवांना खंडित केल्याबद्दल मला स्वतःची लाज वाटू लागली व मी अशांती व ओशाळण्याच्या भावनांशी झगडू लागले, आणि माझी मुले केवढी झाली असती याचा मी विचार करू लागले. ती मुले असतील की मुली, ती कशी दिसली असती याचाही विचार करू लागले. अशा परिस्थितीत असणे फार वाईट.”
जेनेट ही ३९ वर्षे वयाची माता, गर्भपात करून घेतल्यानंतरच्या तिच्या भावना सांगतेः “परिस्थितीला तोंड देण्याचा माझा एकमेव मार्ग म्हणजे, तो अनुभव मला कधी आलाच नाही, असे मी स्वतःला ठासून समजावले. मी तसे करणे शक्यच नाही अशी अनेक वर्षे मी स्वतःची समजूत करीत राहिले. ते एक भयानक स्वप्न होते.”
एकोणीस वर्षांची कॅरेन सांगतेः “माझ्या कृतीकडे दुर्लक्ष करण्याचा मी सर्वतोपरि प्रयत्न केला. पण एखादे बाळ अथवा गर्भवती स्त्री पाहिली की, मला रडू येई. मी अतिशय निराश झाले. मग, माझ्या स्तनातून दूध येऊन मला आठवण करून देऊ लागले. बाळांच्या रडण्याची भयानक स्वप्ने पडून मी जागी होऊ लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत असत. त्या सर्व गोष्टींमुळे मी खूपच कटु बनले.”
गर्भपाताला सोयीची साधी शस्त्रक्रिया समजणे, दिशाभूल होय. ते पाऊल घेतल्यावर त्यापासून परत फिरता येत नाही. तात्कालिक समस्या सुटतील, पण त्याचे परिणाम दूरवर व बराच काळ टिकणारे असतात. परंतु, गर्भपात करण्याचा सल्ला डॉक्टरांनीच दिला तर काय?
“तू गर्भपात केलाच पाहिजेस”
असा सरळ सल्ला सूला तिच्या डॉक्टरांनी दिला. पण का? सूला आधीच दोन लहान मुले होती. आणि आपण गर्भवती आहोत हे तिला कळले तेव्हाच त्यातील एकाला रुबेला किंवा सर्वसाधारणपणे जर्मन गोवर म्हणून ओळखला जाणारा रोग झाला. ती म्हणतेः “मला आधी तो कधीच झालेला नसल्याने त्याची मलाही लागण होईल अशी साशंक भीती वाटत होती.” आणि ती भीती खरीच ठरली. ती आजारी झाली.
वैद्यकीय अनुभवाने सिद्ध झाले आहे की, गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळात स्त्रीला रुबेलाची लागण झाल्यास वाढणाऱ्या गर्भामध्ये खेदजनक विकृती होऊ शकतात. ही गोष्ट मनात ठेवूनच डॉक्टरांनी तो सल्ला तिला दिला होता. तिला आठवतेः “त्यांनी मला स्पष्टच सांगितले की, बाळात विकृती असतील व त्याला सांभाळणे मला जमणार नाही. त्याच्या सल्ल्याकडे मी दुर्लक्ष केल्यास स्वतःवर पूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना मुक्त करण्याविषयी एका पत्रावर मला सही करावी असा आग्रह त्यांनी धरला.” सूने त्यावर सही केली. ती पुढे म्हणतेः “मी अपस्माराची रोगी असल्यामुळे त्यांना मजविषयी मनापासून काळजी होती असे म्हटलेच पाहिजे.”
सूच्या पतीला देखील मोठी चिंता वाटत होती व यामुळेच त्याने निर्णय तिच्यावर सोपविला. तिने बाळास जन्म देण्याची इच्छा दर्शविली. काही काळातच मुलाचा जन्म झाला. तात्काळ बाळाची परिक्षा करण्यात आली व थोड्याशा रक्ताभावाखेरीज तिच्यात काहीही उणे नव्हते. परंतु, मातेच्या शरीरात नसलेले, बाळाच्या शरीरातील प्रतिकारक घटक पाहून मात्र डॉक्टरांना मोठा अचंबा वाटला. कारण याचा अर्थ बाळावर रुबेलाचा परिणाम झाला होता.”
विकृतींसोबत सामना देणे
या उदाहरणात शेवट आनंदाचा असला तरी अनेक मुले, विशेष काळजी घेण्याची जरुर पडेल अशा विकृतींसह जन्माला येतात ही गोष्ट खरी आहे. विकृत मुलांचा जन्म टाळण्यात दयाळूपणा आहे असे म्हणणे सोपे आहे. परंतु, दुसऱ्याच्या जीवनाच्या गुणवत्तेची परिक्षा कोण करू शकतो? खरे पाहता, शक्य असेल तेवढा जीवनाचा आनंद उपभोगणारे व मानवजातीच्या भल्यास हातभार लावणारे, कमी-अधिक हालचाल करू शकणारे लोक प्रत्येक समाजात आहेतच ना?a
सूने देखील हाच दृष्टीकोण ठेवला, पण तिच्यापाशी शक्तीचा आणखी एक स्रोत होता—तिचा विश्वास. तिच्या डॉक्टरांनी जेव्हा प्रथम सांगितले की, बाळात विकृती येईल, तेव्हा तिने त्यांना सांगितले की तसे झाले तरी परिस्थितीला तोंड देण्यास देवाकडून मिळणाऱ्या बळावर तिची भिस्त होती. तसेच, एखाद्या अपंग मुलाची, देवाच्या राज्यसत्तेमध्ये “देवाच्या नव्या व्यवस्थीकरणात सर्व शारीरिक आजार बरे होण्याची अद्भुत आशा” हिरावून घेण्याचा तिला काहीच अधिकार नाही. (प्रकटीकरण २१:१-४) अशा विश्वासाची विशेष फळे मिळतात.
खडतर निवड
“जन्म? की गर्भपात?” अशी निवड करण्याची वेळ आल्यास तुम्ही काय निर्णय घ्याल?
सूने विचार केलाः “माझ्या बाळाने जन्माला घालण्याची मागणी केली नव्हती. मग, त्या चिमुकल्या जिवाला जीवन दिसण्यापूर्वीच त्याचा अंत करण्याचा मला काय अधिकार?”
तिचा प्रश्न साधा आहे. त्याचे उत्तर तुम्ही काय द्याल? (g87 4/8)
[तळटीपा]
a डाऊन सिंड्रोम बालकाच्या काळजीविषयी अवेक! मासिकाचा फेब्रुवारी ८, १९८६चा अंक पहा.
[पानांवरील चौकट]
निष्ठांमधील संघर्ष?
१९४८ च्या सप्टेंबरमध्ये जागतिक वैद्यकीय मंडळाच्या जिनेव्हा येथील सर्वसाधारण सभेत जिनेव्हाचा जाहीरनामा संमत करण्यात आला. तो प्राचीन हिप्पोक्रेटच्या शपथेवर आधारीत आहे. त्या जाहीरनाम्यातील काही अंश खाली दिला आहेः
“वैद्यकीय व्यवसायात एक सभासद या नात्याने दाखल होतानाः मी, मानवजातीच्या सेवेसाठी आपले जीवन वाहण्याची गंभीर शपथ घेतो. . . . मी सद्सद्विवेकाने व प्रतिष्ठेने आपला व्यवसाय करीन. . . . मी, मानवी जीवनाचा गर्भधारणेपासूनच सर्वोच्च आदर करीन, संकटातही मानवतावादी नियमांविरुद्ध मी आपले वैद्यकीय ज्ञान वापरणार नाही.”
या शपथेचा अर्थ डॉक्टर कसा लावतात? येथे दोन परस्पर विरोधी दृष्टीकोण दिले आहेत. त्यातील कोणाशी तुम्ही सहमत व्हाल?
डॉक्टर आय. एम.
“गर्भपात करतेवेळी मी बाहेर काढलेल्या शरीरघटकाकडे पाहिल्यास मला शिसारी आल्याशिवाय राहात नाही. दिसायला तो नुसता थुलथुलीत गोळा दिसतो, पण काही झाले तरी तो एक मानवी जीव आहे, ज्याचा मी नाश करीत असतो.”
डॉक्टर व्ही. ए.
“गर्भपात चुकीचा आहे असे मला कधीच वाटत नाही. कोणी आपल्या मातेवर पूर्णपणे अवलंबून असेपर्यंत तो किंवा ती एक वेगळी व्यक्ती नसते.”
[पानांवरील चौकट]
गर्भपाताची तंत्रे
मातेला गर्भपातापासून असलेल्या धोक्यांचा गर्भाच्या वयाशी थेट संबंध आहे. त्यांना कमी लेखू नये.
बहुधा पहिल्या तिमाहीत व्हॅक्युम पंपाने गर्भ बाहेर खेचून काढला जातो.b हे बहुतेकदा दवाखान्यात थोडक्या वेळात केले जाते. दुसऱ्या तिमाहीत आईच्या गर्भाशयातून गर्भ काढण्यासाठी त्याचे तुकडे करणे वा इंजेक्शने देऊन गर्भपात घडवून आणणे अशा पद्धती वापरल्या जातात. यासाठी सर्वसाधारणपणे हॉस्पिटलमध्ये थोडे दिवस राहावे लागते. तिसऱ्या तिमाहीत हिस्टेरोटोमी सारखी मोठी शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय होऊ शकतो.c
[तळटीपा]
b गर्भधारणेचा नऊ महिन्यांचा काळ काही वेळा वैद्यकीय दृष्ट्या तीन महिन्यांच्या तीन भागात विभागले जातो. त्यांना तिमाही म्हणतात.
c गर्भाशय कापून त्यातून वाढणाऱ्या बाळाला काढण्याच्या क्रियेला हिस्टेरोटोमी म्हणतात. संपूर्ण गर्भाशय काढण्याच्या क्रियेला हिस्टेरेक्टोमी म्हणतात. त्याच्याशी हिस्टेरोटोमीची गफलत करू नये.
[पानांवरील चित्र]
प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आता अपूर्ण वाढ झालेली अर्भके जगणे शक्य झाले आहे
[चित्राचे श्रेय]
Justitz/Zefa/H. Armstrong Roberts
[पानांवरील चित्र]
बालकाच्या पित्याच्या भावनांचा फारसा कोणी विचार करीत नसतो
[पानांवरील चित्र]
मानसिक व भावनिक दृष्ट्या गर्भपाताचे परिणाम उद्ध्वस्त करणारे असतात