वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gbr8-1 पृ. २७-२८
  • मुके दगड बोलतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मुके दगड बोलतात
  • सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रमुख देवालय
  • उत्खनन स्थळाला भेट
  • रक्‍तपिपासू धर्म
  • तुलना—पुरातन व आधुनिक
  • ॲझटेक लोकांचे नव्या धर्मांशी जुळवून घेणे
  • खरे स्वातंत्र्य—कोणत्या उगमापासून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
सावध राहा! माहितीपत्रक ८-१ (gbr8-1)
gbr8-1 पृ. २७-२८

मुके दगड बोलतात

“अवेक!”च्या मेक्सिकोतील वार्ताहराकडून

फेब्रुवारी २१, १९७८ ला मेक्सिको महानगराच्या बाजारभागात खंदक खणत असताना शहराच्या विद्युत कंपनीच्या काही कामगारांना दगडी शिल्पाचा एक तुकडा सापडला. त्यामुळे पुढे मेक्सिकोच्या इतिहासातील, पुराणतत्वाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा शोध लागला.

टेनोक्‍तीतलान या ॲझटेक शहराचे प्रमुख देऊळ ज्या परिसरात उभे होते तेथे हे शिल्प सापडले. आज त्या देवळाचे भग्नावशेष उत्खनन करून काढले आहेत व भेट देणाऱ्‍या लोकांसाठी ते खुले आहेत. त्यातील भेट देणारे काही नुसते वरवर जिज्ञासा दाखवणारे असतात. पण, पुरातन मेक्सिको साम्राज्य स्थापन करणाऱ्‍या ॲझटेक लोकांबद्दल हे अवशेष आपल्याला काय सांगू शकतील हे जाणून घेण्याची उत्कंठा इतर लोकांठायी दिसून येते. कारण मूक दगडांपाशी सांगण्यासारखी एक चित्तवेधक कहाणी आहे.

प्रमुख देवालय

उत्खनन स्थळापासून जवळच झोकॅलो भुयारी रेल्वेचे स्टेशन आहे. येथे, प्रमुख देवालय जसे असावे अशी कल्पना आहे त्याचा प्रमाणबद्ध नमुना तुम्हाला पाहता येतो. ते पिरॅमिडच्या आकाराचे असून त्याच्या माथ्यावर दोन उंच इमारती होत्या. ॲझटेक लोकांच्या उपासनेचे प्रमुख केंद्र या दृष्टीने ते टेनोक्‍तीतलानच्या केंद्रीय चौकात उभे असून सभोवती इतर देवालये होती. ॲझटेक लोकांच्या उपासनेच्या मुख्य मूर्ती—युद्धदेवता, हुइत्झिलोपोक्‍तली व वर्षादेवता त्लालोक—येथे असत.

स्पॅनिश लोकांचे आगमन झाले तेव्हा अनेक तळी असलेल्या दरीतील टेनोक्‍तीतलान हे एक बेट होते. त्यात रस्त्यांना समांतर कालवे होते व त्यातून चलुपाज्‌ या छोट्या नौकामधून वस्तुंची ने-आण होत असे. क्वाटेमॉक या त्यांच्या पुस्तकात सॅल्व्हॅडोर टोस्कॅनो यांनी आपल्यासाठी त्याचे वर्णन केले आहेः “प्रमुख देवालयाच्या प्रचंड चौकाने बेटाचे केंद्र व्यापले आहे, व कोर्टेस म्हणतो की, ‘कोणत्याही मानवी भाषेत त्याची भव्यता व अद्वितीयता यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. ते इतके भव्य आहे की, त्याच्या आवारात ५०० लोकांसाठी घरे बांधता येतील. त्या चौकात उपासनेसाठी अनेक पिरॅमिडस्‌, चेंडूच्या खेळासाठी जागा, याजकांची घरे, कवट्यांचे चबुतरे (त्झोम्पॅन्टलिस), दगडातून खोदलेली देवालये व सुगंधी देवदार यांचा समावेश होता. या सर्वांशिवाय, ३० मीटर [१०० फूट] उंच ११६ पायऱ्‍या असलेले युद्धाची सूर्यदेवता हुईत्झिलोपोक्‍तलीचे पिरॅमिडच्या आकाराचे देवालय होते. त्यावरुन संपूर्ण बेटाचे दृश्‍य दिसे.”

उत्खनन स्थळाला भेट

ही माहिती लक्षात ठेवून, संपूर्ण परिसराचे दृश्‍य नीट पाहण्यासाठी, उत्खनन स्थळापाशी नेणाऱ्‍या कठड्याकडे आता आपण जाऊ या. तुम्हाला काय दिसते बरे? प्रथमतः नुसते अनेक अवशेष दिसतात! काही जुजबी डागडुजीव्यतिरिक्‍त ही जागा जशी सापडली तशीच ठेवण्यात आली आहे. परंतु जवळून पाहिल्यास काही चित्तवेधक माहिती मिळते.

उदाहरणार्थ, उत्खनन स्थळाच्या मध्यभागी हुइत्झिलोपोक्‍तली व त्लालोक यांच्या उपासनेची जागा तुम्हाला दिसते. विशेष म्हणजे कोर्टेसने वर्णन केलेली वास्तु यापेक्षा बरीच मोठी होती. ॲझटेक लोकांची संस्कृती व विशेषतः त्यांच्या (म्हणजे, स्पॅनिश लोकांच्या) दृष्टीने रक्‍तपिपासू असलेला धर्म यांचा समूळ नाश करण्याची स्पॅनिश लोकांची इच्छा होती. या कारणास्तव, १५२१ मध्ये ते शहर जिंकल्यावर नुसते दगड-धोंडे उरेपर्यंत त्यांनी पद्धतशीर रितीने त्या देवालयाचा नाश केला. मग, त्यांनी त्या जागेवर स्वतःच्या दोन इमारती उभारल्या.

त्यांनी तोडलेले देवालय हे बांधकामाच्या श्रृंखलेतील शेवटची वास्तु होते हे मात्र त्या स्पॅनिश लोकांना माहीत नव्हते. मूळ इमारतीचा सात वेळा विस्तार करण्यात आला होता. प्रत्येक विस्तार आधीच्या विस्तारावर बांधला होता. यामुळे आधीच्या देवालयांचे काही भाग स्पॅनिश लोकांनी केलेल्या नाशातून वाचले. आपल्याला दिसणाऱ्‍या उपासनेच्या दोन जागा या, दुसऱ्‍या विस्ताराचे भाग आहेत.

रक्‍तपिपासू धर्म

उपासनेच्या या जागी नरबळी दिले जात, आणि या बळींमुळे ॲझटेकांच्या धर्मावर रक्‍तपिपासू असा शिक्का बसला आहे. परंतु त्या धर्माची आजच्या धर्मांशी तुलना करताना डॉमिनिक व्हेरत यांची टीका लक्ष देण्यासारखी आहेः “नरबळीची प्रस्थापित भयावह प्रथा चालवणाऱ्‍या ॲझटेक संस्कृतीला अनेक समर्थक होते. पण तरीही, होली इन्क्विझिशन (चौकशीसत्रे) व हिटलरशाहीचा विसर पडलेल्या तिच्या शत्रूंमध्ये तिने (संस्कृतीने) तिटकारा उत्पन्‍न होतो.”

तरीही, डुइत्झिलोपोक्‍तलीच्या लहानशा देवळापुढील बळीच्या दगडाकडे पाहताना अंगावर काटा येतोच. हृदय उपटून देवांना अर्पण करण्यासाठी, बळी जाणाऱ्‍या व्यक्‍तीला याच दगडाच्या सपाट पृष्ठभागावर उताणे झोपवीत असत.

दुसरा एक दगड म्हणजेच कोयोलक्झाःकी देवीची मूर्ति, ॲझटेक उपासनेचा दुसरा पैलू दर्शविते. जिला मारुन हुइत्झिलोपोक्‍तलीने तुकडे केले अशी कोयोलक्झाःकी ही त्याची बहीण होती असे मानले जात होते. या कारणास्तव हे सपाट शिल्प तिचे धडापासून शीर वेगळे केलेले शरीर दर्शवते. सत्कृतदर्शनी तुकडे केलेल्या देवीची उपासना करण्यात ॲझटेक लोकांना काही गैर वाटत नव्हते.

तुलना—पुरातन व आधुनिक

नरबळी देणे हा खोट्या उपासनेचा भाग आहे याची पवित्र शास्त्राच्या वाचकांना जाणीव आहे. कनानी लोक व कधी कधी धर्मत्यागी इस्राएल लोकही भुतांना आपल्या मुलांचा बळी देत. (२ राजे २३:१०; यिर्मया ३२:३५) ॲझटेक लोक सुद्धा बालबळींची प्रथा पाळत. एल टेम्प्लो मेयर पुस्तकात याविषयी म्हटले आहेः “वर्षादेवतेच्या चिन्हांसह यात [खड्डयात] बळी दिलेल्या मुलांचे सांगाडे सापडले. दुष्काळामुळे दिलेले हे विशेष अर्पण तर नसेल?”

पृष्ठ २१९ वर याच पुस्तकात पुढे म्हटले आहेः “मोनार्किया इंडियाना (इंडियन राजसत्ताक पद्धती) या पुस्तकात फ्रे जुआन डे टोरक्वेमाडा आपल्याला याविषयी काही सांगतातः फुले व पिसांनी भरपूर सजवलेल्या, पुजारी व सेवकांनी वाहिलेल्या, उचलून नेण्यासारखा पाटावर अथवा पालखीतून, भरजरी कपडे घालून त्या मुलांना बळी देण्याच्या जागी नेण्यात येत असे. त्यांच्यापुढे इतर लोक वाद्ये वाजवीत, गात नाचत जात असत. अशा रितीने, बळी देऊन भूतांना अर्पण करण्याच्या जागी त्यांना नेण्यात येत असे.”

ॲझटेक लोकांचा धर्म व जुन्या जगातील इतर धर्मांतील सारखेपणा दाखवताना असे सांगण्यात येते की, त्लालोक देव हा प्रजनन देवताही होता. महत्त्वाच्या वेदींमधील एक त्याला अर्पण केलेली आहे. तसेच देवळांमध्ये दोन मोठ्या सापांच्या मूर्ती आहेत. साप हे प्रजननाचे चिन्ह होते. याप्रमाणेच जुन्या जगातल्या अनेक पुरातन मूर्तिपूजक धर्मांमध्ये एक प्रजननाचा देव असे, व साप हे सर्वत्र मानलेले धार्मिक चिन्ह होते. तसेच विशेष गोष्ट अशी की, हुइत्झिलोपोक्‍तली हा कोटलीकपासून जन्मला असे मानले जाई, व पुढे ही माता देवी “सर्व देवांची माता” म्हटली गेली.

ॲझटेक लोकांचे नव्या धर्मांशी जुळवून घेणे

ॲझटेक धर्माला मेक्सिकोमधून मुळासह उपटण्याचा स्पॅनिश लोकांनी अनेकदा हिंसक प्रयत्न केला. अनेक वेळा ॲझटेक देवालयांवर, त्यांचेच दगड आपल्या बांधकामासाठी वापरुन, त्यांनी आपली चर्चेस उभारली. ॲझटेक मूर्तींच्या तुकड्यांचाही कधी कधी बांधकामात उपयोग केला गेला.

परंतु नव्या धर्माची सवय होणे ॲझटेक लोकांना कठीण नव्हते. त्यांच्या दगडांच्या मूर्तींच्या जागी लाकूड व चिनीमातीच्या मूर्ती आल्या. या नव्या मूर्ती अधिक मानव-सदृश होत्या, पण तरीही त्या मूर्तीच होत्या. तसेच जुन्या धर्मातील अनेक कल्पना मेक्सिकोच्या संस्कृतीच्या भाग बनल्या. उदाहरणार्थ, नोव्हेंबरच्या सुरवातीस साजरा केला जाणारा मृतांचा पंथ अजूनही होता. मेक्सिकोच्या प्राचीन रहिवाश्‍यांप्रमाणे नव्या धर्माला मानणाऱ्‍या लोकांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्‍वास होता. म्हणजेच, कोर्टेस प्रसार करीत असलेल्या व नाश करीत असलेल्या धर्मांमध्ये अनेक बाबतीत साम्य होते.

आज खुल्या असलेल्या या प्रमुख देवळाचे अवशेष, कायम नाहीशा झालेल्या साम्राज्याला व संस्कृतीला समर्थपणे जागृत करतात. क्रूर धार्मिक रिवाज, आता भजले न जाणारे देव वेगळ्या नावाने वेगळ्या धर्मात असले तरी अजून जपलेल्या प्रथा, यांची ते आपल्याला आठवण करून देतात. तसेच, जुन्या व नव्या जगातील खोट्या धर्मातील विलक्षण सारखेपणाचीही आठवण ते करून देतात. (g87 2/8)

[२७ पानांवरील चित्र]

कोटलिक देवता

[चित्राचे श्रेय]

Nat’l Institute of Anthropology and History, Mexico

[२८ पानांवरील चित्र]

कायोलक्झाःकी देवता

[चित्राचे श्रेय]

Nat’l Institute of Anthropology and History, Mexico

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा