दोन पिढ्यातील अंतर तुम्हाला मिटवता येईल का?
आपल्या मुलांचा कल पाहता, जगातील पालक चिंतित झाले आहेत. वाढत्या वयाबरोबरच ती आई-वडिलांपासून दुरावतात. यामुळे दोन पिढ्यांत असे अंतर निर्माण होते जे मिटवण्यास कठीण किंवा काही बाबतीत अशक्य होते. बहुधा ही समस्या तुम्ही पाहिली असेल व त्याविषयी तुम्हाला काळजीही वाटत असेल.
हे असे अंतर का?
पालक व मुले यांचे एकमेकांशी जितके दळणवळण असावयास हवे तितके होत नाही या मताशी कदाचित तुम्ही सहमत व्हाल. पण असे का? जपानी सरकारने याविषयीचे जे निरिक्षण केले आहे ते सांगते की, मुले दूरदर्शन बघण्यात दिवसातील दोन तास खर्च करतात, पण तेच आई वडिलांशी बोलण्यास त्यांच्याकडे २५ ते ४० मिनिटेच असतात.
दुसरे एक कारण असे की, आर्थिक बोजामुळे चरितार्थासाठी अनेक कुटुंबामध्ये आई व वडील या दोघांना नोकरी करावी लागते. याचा अर्थ ते मुलांसोबत कमी वेळ देतात. परिणामी एकाच घरात राहून पालक व मुले एकमेकांना परकी होतात. काही वेळा बोलण्याचा प्रयत्न केला तरीही समजुतदारपणा नसल्यामुळे त्याला चुकीची दिशा मिळते. एका वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये निर्देशिल्याप्रमाणे अनेकदा पालक मुलांवर खेकसून म्हणतातः “मन लावून अभ्यास करा” किंवा “तुमचे टेबल आवरुन ठेवा.” पण फक्त असे केल्याने व्यक्तीची उन्नती होत नाही, तसेच पिढ्यांमधील अंतरही मिटत नाही.
हे अंतर कसे मिटवावे
“[बुजऱ्या नवयुवकांसाठी] उत्तम उपाय म्हणजे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे आई-वडील होय,” असा सल्ला अनेक त्रस्त युवकांना कॅनडातील एका गृहस्थाने दिला. पवित्र शास्त्र देखील असा सल्ला देतेः मनुष्य “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” (याकोब १:१९) अनेकदा आई किंवा वडील “गप्प बस!” किंवा “तू मला त्रास देत आहेस,” या शब्दात मुलाचे बोलणे मध्येच तोडण्याची चूक करतात. बोलण्याचा प्रयत्न केल्यावर दर वेळी आपण हिणवले जाऊ असे मुलाला वाटू लागल्यास कालांतराने तो आपल्या पालकांकडे येणार नाही, व त्यामुळे नक्कीच दळणवळणात अंतर निर्माण होईल.
उलटपक्षी, घराची दुरुस्ती, खोलीची सजावट, घराच्या दुर्लक्षित भागाला रंग लावणे, अंगणात रोपे लावणे या सारख्या कामाच्या योजना आखून सर्व कुटुंबाला मिळून त्या पार पाडता येतील. एखादे मोठे काम निघेपर्यंत थांबण्याची मुळीच गरज नाही. बहुधा आईबरोबर स्वयंपाक करणे किंवा वडीलांबरोबर एखादे मोडके उपकरण दुरुस्त करणे यांसारखे लहानसे कामही असेल. जे कराल त्यात पालक व मुले मिळून गुंततात याला महत्त्व आहे. यामुळे संवादाला अनुकूल वातावरण निर्माण होते. पण आपल्या मुलांच्या कामावर अतिशय टिका करण्यापासून किंवा त्यांच्याकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा ठेवण्यापासून सावध राहा.
आपल्या वयाच्या मित्रांबरोबर खेळावेसे मुलांना खचित वाटणार. पण पिढी-अंतर मिटविण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी याबाबतीत मुलांना काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. तसेच पालकांनाही आपला काही वेळ मुलांसाठी द्यावा लागेल. यासाठी थोडा त्यागही करावा लागेल, पण मुलांना देता येणाऱ्या भौतिक गोष्टींपेक्षा त्याला जास्त महत्त्व आहे.
मदत कोठून मिळू शकेल?
मुलाच्या बालपणाचे सुरवातीचे दिवस जवळपास पूर्णतः पालकांबरोबरच जात असल्याने ही किंमती पायाभूत वर्षे तुम्ही नक्कीच वाया जाऊ देऊ नयेत.
परंतु आपल्या मुलांना काय व कसे शिकवावे याबद्दल तुम्ही गोंधळून जाण्याचा संभव आहे. पवित्र शास्त्र हा मानवजातीला माहीत असलेला शिक्षणाचा सर्वोत्तम स्रोत असल्याचे अनेक पालकांना आढळले आहे. पवित्र शास्त्राचा उपयोग करून उच्च नीतीमत्ता, मेहनत, संयम, अधिकाराविषयी आदर व असे इतर अनेक उत्तम गुण जोपासण्यास तुम्ही आपल्या मुलाला मदत करू शकता. आज जगभर, आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी पवित्र शास्त्राचा उपयोग करणाऱ्या लाखो पालकांना नीतीसूत्रे २२:६ मधील सत्य समजले आहेः “मुलाच्या स्थितीस अनुरुप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”
परंतु पालक आपल्या लहान मुलांना पवित्र शास्त्राशी ओळख कशी करून देऊ शकतील? मुले लहान असताना पवित्र शास्त्रासारख्या गोष्टी त्यांच्यासह वाचणे सोपे असते. कालांतराने मुले मोकळेपणाने बोलू लागली म्हणजे त्यामुळे परस्पर निष्ठा व विश्वास वाढेल. या कारणास्तव अशा रितीने घालवलेला वेळ खूपच लाभदायक होईल.
मुलांना गोष्टी आवडतात. पवित्र शास्त्रात अनेक गोष्टी आहेत. पालक व मुलांना मदत करील असे माय बुक ऑफ बायबल स्टोरिज् हे उत्तम प्रकाशन आहे. वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क यांनी ते प्रकाशित केले आहे. यहोवाच्या साक्षीदारांकडून वितरण केले जाणारे आणखी एक उत्तम शैक्षणिक साधन म्हणजे थोर शिक्षकाचे ऐका हे पुस्तक होय. लहान मुलांसह वाचता येतील अशी आयुष्यात साहाय्य करणारी महत्त्वाची तत्त्वे शिकवणारी ४६ लहान प्रकरणे त्यात आहेत. त्यातील काही अशी आहेतः “आज्ञांकितपणा तुमचे रक्षण करतो,” “ज्यांनी सत्य सांगितले नाही अशा दोन व्यक्ती,” “देणे ह्यात अधिक आनंद आहे.” या विषयांच्या चर्चेने तुम्हाला तसेच तुमच्या मुलांना पवित्र शास्त्राची शिकवण अधिक चांगल्या रितीने समजण्यास मदत होईल.
कदाचित तुमची मुले कौमार्यावस्थेत असतील. तसे असल्यास पालक या नात्याने आपल्या मुलांशी बोलण्यास युवर युथ—गेटिंग द बेस्ट आऊट ऑफ इट हे एक उत्तम साधन होऊ शकेल. हे पुस्तक नवयौवनांच्या समस्या वास्तवतेने हाताळते. त्यातील काही प्रकरणे पहाः “प्रौढत्वात पदार्पण,” “स्त्रीत्वात प्रवेश,” “तुम्हाला कशा प्रकारचे स्नेही हवेत?” आणि “जीवनातून तुम्हाला काय हवे?”
असली पुस्तके वाचणे हा सर्वतोपरि उपाय आहे असे आमचे म्हणणे नाही. परंतु योग्य दिशेने पावले टाकण्याची ती सुरवात आहे. तसे केल्याने आपल्या हातून योग्य तो प्रयत्न होत असल्याची पालक खात्री बाळगू शकतात. (इफिसकर ६:४) परिणामी पालक व मुले या दोघांनाही उज्वल भवितव्य तसेच ऐक्यता असलेला परिवार, असे फळ लाभेल. आपल्या घरात असा उपक्रम सुरु करण्यात यहोवाचे साक्षीदार तुम्हाला आनंदाने मदत करतील.—योहान १७:३. (g86 7/22)