पैसा—त्याचा आरंभ व उपयोग
त्याची किंमत फक्त २४ डॉलर पडली. पण आज आपण ओळखतो तशा पैशात ती दिली गेली नाही. आता लाख मोलाच्या, न्यूयॉर्क येथील मॅनहॅटन बेटाची ती खरेदी होती. १६२६ मध्ये त्यावेळच्या डच वसाहतवाल्यांनी तद्देशीय इंडियन लोकांकडून मणी, किरकोळ दागिने व कापड देऊन ते विकत घेतले.
आजतागायत इतिहासात पैसा हा वेगवेगळ्या स्वरुपात येत आहे. बहुतेक सर्व उपयुक्त जिनसा—कातडी, धान्य, शिंपले, तंबाखू, मीठ, गुरे, दगड, पिसे, कोकोच्या बिया—पैसा म्हणून वापरले गेले आहेत. इंग्रजी भाषेतील “सॅलरी” (पगार) हा शब्द लॅटिन भाषेतील सॅलॅरिअम (मीठ) या शब्दावरुन आलेला आहे. तसेच “पिक्युनिअरि” (आर्थिक) हा शब्द गुरांसाठी या अर्थी वापरण्यात आलेल्या पीकस या लॅटिन शब्दावरुन आलेला आहे. पुरातन रोममध्ये वेगवेगळ्या काळात मीठ व गुरे यांचा पैसा म्हणून वापर करण्यात येत होता.
परंतु व्यापार व उद्योगधंद्याची भरभराट होण्यासाठी पैसा सोयीच्या व सर्वमान्य स्वरुपात तसेच सर्वत्र एकाच किंमतीचा असणे आवश्यक होते. उदाहरणार्थ, आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कवड्या चलन म्हणून स्विकारल्या जात. त्या दुर्मिळ व किंमती समजल्या जात. त्या वजनाला हलक्या व नकली बनवणे अशक्य होत्या—पैशाला या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु भारताशी व्यापार करण्यासाठी त्या निरुपयोगी होत्या कारण तेथील समुद्रकिनाऱ्यावर त्या अगणित आहेत.
हळूहळू सोने व चांदी यासारखे मौल्यवान धातू इतर गोष्टींऐवजी चलनात येऊ लागले. ते टिकाऊ, सर्वमान्य, इतरांच्या तुलनेत दुर्लभ (त्यामुळे त्याच्या वजनाच्या प्रत्येक एकेकास मोठी व स्थिर किंमत मिळत असे) तसेच ने-आण करण्यास व विभागण्यास सोपे होते. परंतु व्यवहार योग्य झाला असल्याची व एकाही पक्षाची फसवणूक झाली नसल्याची खात्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना चांगला तराजू बाळगावा लागत असे. कालांतराने छापलेली नाणी वापरात आली, त्यामुळे तराजूची गरज उरली नाही.
आज आपली नाणी कडांनी रेघा असलेली व काळजीपूर्वक सजवलेली का असतात याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला आहे का? कारण सुरवातीची नाणी अगदी वर्तुळाकार नसत व दुसऱ्यांना देण्यापूर्वी त्यातून तुकडा मोडणे किंवा घासून काढणे शक्य असे. अशा रितीने प्रत्येक नाण्यातून थोडासा मौल्यवान धातू काढून घेऊन एखादा धाडसी माणूस धनसंचय करु शकत असे. अशा प्रकारच्या फसवाफसवीला आळा घालण्यासाठी रेघांच्या कडा करण्यात येऊ लागल्या. त्यामुळे वरील प्रकारच्या लबाड्या उघडकीस आणणे सोपे झाले.
हुंडीपत्र व कोषागाराच्या पावतीच्या स्वरुपात कागदी चलन इ.स.पूर्वीच्या नवव्या शतकात चीनमध्ये तसेच रोमन लोकांच्या काळी होते. आधुनिक नोटा मात्र युरोपमध्ये प्रचलित झाल्या होत्या. लंडनमधील सोनार त्यांच्या सुरक्षित तळघरांचा उपयोग इतरांच्या मौल्यवान चिजा व सोने ठेवण्यासाठी करू लागले. ठेव म्हणून दिलेल्या प्रत्येक वस्तुसाठी एक पावती दिली जाई. जसा सोनाराच्या सचोटीवर विश्वास वाढू लागला तशा त्या पावत्यांचीच अदलाबदल होऊन वस्तु हलवण्यापेक्षा पावत्यांचा पैशाप्रमाणे उपयोग होऊ लागला. तसेच आपल्या आधुनिक चेकची सुरवात, एखाद्या विशिष्ट नावाच्या व्यक्तीला काही वजनाचे सोने देण्यासाठी सोनाराला देण्याच्या, स्वाक्षरी केलेल्या आज्ञापत्रांनी झाली.
सबळ पाठिंबा व विश्वास असेपर्यंत,—विशेषतः मोठ्या रकमांसाठी—कागदी चलन वापरण्यासाठी अधिक सोयीचे व हाताळण्यास कमी जोखमीचे होते. निरक्षरांच्या सोयीसाठी चित्रमय नोटाही करीत असत. आता कागदी चलन, व्यवहार नोंदणीची (जमा-खर्च) पद्धत आणि इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण (ट्रान्सफर) याचा जागतिक व्यापाराच्या व्यवहारात वरचष्मा आहे.
तर आता, तुम्ही कोणती गोष्ट दररोज वापरणे व बाळगणे पसंत करालः प्राणी, दगड, शिंपले, धान्य, धातू की कागदी नोटा? (g87 2/8)