आपल्या शेजाऱ्याबरोबर शांती जोपासा
दुसऱ्यांसोबत शांतीने राहायचे आहे तर प्रथमतः तुम्ही स्वतःशीच शांतीसख्य जोडण्यास हवे. हे येशू ख्रिस्ताच्या या शब्दात अर्थध्वनित आहे की, “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखीच प्रीती कर.” (मत्तय २२:३९) शेजाऱ्यावर प्रेम व्यक्त करायचे आहे तर प्रथम स्वतःवर प्रीती व्यक्त केली पाहिजे. तुम्ही पूर्ण आहात असे नाही. ही गोष्ट तुम्हीही जाणता. तुम्हात काही कमतरता आहेत, तुम्ही चुका करता, तुम्हाला दोषी असल्याचे जाणवते. हे सर्व तुम्हास माहीत आहे. यासोबत तुम्हाला आपल्या चुकांबद्दल वाईट वाटत असते, आपल्या चुकांविषयी तुम्ही क्षमा मागू इच्छिता आणि भविष्यात अधिक चांगले राहण्याची इच्छा धरता हेही तुम्हास कळते. हे केल्यामुळेच तुम्हाला दोषी भावनाच्या ओझ्याखालून मोकळे झाल्याचे वाटायला लागते.
आमच्या अंतःकरणात ज्या गोष्टी भरुन गेल्या आहेत त्याकरवी आपण बोलतो व कृति आचरीत असतो. (मत्तय १२:३४, ३५) आमचे अंतःकरण दोषी भावनेने व आरोपांनी भरले आहे तर मग अशा या नकारात्मक भावना इतरांच्या बाबतीत निर्दयीपणाने व्यक्त होतात. दुसऱ्यावर प्रेम करायचे आहे तर स्वतःला सन्माननीय व आदरणीय असल्याची भावना वाटायला पाहिजे. आपल्याला आपलेच हसू आले पाहिजे. अशाप्रकारे आम्ही आपणाविषयीचे प्रेम राखून असलो तर मग इतरांबरोबर आपले नाते बिघडविले जातील असे कोणतेहि वादळ आपल्या अंतःकरणात हेलकावे खात नसणार. अशी ही अंतरिक सुरक्षा साधल्यावर आपल्याला इतरांकडून भिण्याचे काही कारण नसणार, उलट त्यांना दयावंत वागणूक देण्याची चालना आम्हाला नेहमी होत राहील. तद्वत, दुसऱ्यांबरोबर शांतीने राहण्यासाठी आपल्या अंतर्यामी शांतीने वास करणे जरुरीचे आहे.
तथापि, सध्याच्या आधुनिक जगातील धक्काबुकी व घाईगर्दीमुळे अंतरिक शांतीला बाधा निर्माण होऊन शेजारप्रेमाचा जिव्हाळा लोपत चालला आहे. लोकांची दशा, समोरासमोर असलेल्या दोन कासवाप्रमाणे झाली आहे, ज्यांनी आपल्या माना आत घेतल्या आहेत व ते आतूनच बाहेरील दृश्याची न्याहाळणी करीत आहेत आणि आपल्या माना बाहेर काढण्यास त्यांनी मोठी भीती वाटते. मोकळे मोकळे वाटणारे मित्रत्व संपून याची जागा भीती आणि एकटेपणा यांनी घेतली आहे. ही दशा पाहून वाईट वाटते, पण आम्ही ज्या काळात राहात आहोत त्याची कठीणता लक्षात घेता हे असे का घडत आहे ते आपल्याला समजू शकते.—२ तीमथ्य ३:१-५.
तरीही, कोणी मित्रत्व दाखविण्यास पुढे झालेच तर त्याला सुखावह असा प्रतिसाद मिळतोच. आपल्या घरावरुन जाणाऱ्या कोणा शेजाऱ्यासोबत बोलणे, आपल्या अंगणात काम करणाऱ्या कोणाशी दोन शब्द बोलणे आणि बागेत बसता बाकावर आपल्या शेजारी बसलेल्या इसमासोबत थोड्या गप्पा करणे—असे क्षण मोठा आनंद देतात. असे हे प्रसंग आनंदी राखण्याकरता आणि मानवी नातेसंबंधात शांती टिकवून ठेवण्यासाठी काही मार्गदर्शिका पुढे दिल्या आहेत, त्यांचा कृपया विचार करुन बघा.
चांगले ऐकणारे असा
आदराने वागा. तुमच्याशी जो बोलत आहे त्याच्याकडे बघा. तो बोलत असता तुम्ही इतरत्र बघत राहाल तर याकरवी तुम्ही त्याला अप्रत्यक्षरित्या हे सांगत असता की, ‘मला तुम्हामध्ये व तुमच्या बोलण्यात इतका रस वाटत नाही.’ अर्थात, असे वाटू द्यावे अशी तुमची इच्छा नसते. त्यामुळे तो जे बोलत आहे ते ऐका आणि योग्य तो प्रतिसाद देत राहा. सविस्तर माहिती विचारावयाची नसली किंवा विचारण्याजोगा योग्य प्रश्न नसला तर उगाच मध्ये बोलू नका. “ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.” (नीतीसूत्रे १८:१३) बोलणाऱ्या माणसाला, त्याचे विचार, त्याचे स्थान आणि त्याच्या भावना समजून घेण्यासाठी ऐका. तो जे बोलतो ते केवळ कानाने नाहीतर अंतःकरणापासून श्रवण करा. “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा आणि रागास मंद असावा.”—याकोब १:१९.
दळणवळण राखा, बोला
दळणवळण राखणे याचा अर्थ, “एखादी माहिती, विचार व भावना अशा पध्दतीने पोहचविणे की जी समाधानकारकपणे स्विकारली वा समजली जाऊ शकते.” आपल्या बोलण्यात स्पष्ट व प्रशस्त असा; वाचाळ वा घुटमळत बोलू नका. तुम्ही जे बोलत आहात ते दुसऱ्याला कळत आहे हे समजून घ्या. संभाषण करणे याचा अर्थ, “भाषणाद्वारे विचार व मतांची अदलाबदल करणे” असा आहे. संभाषण म्हणजे भाषणबाजी नव्हे, तर ती अदलाबदल आहे. एखादा मुद्दा सांगितल्यावर समोरील व्यक्तीकडून कोणता प्रतिसाद मिळतो ते बघा. जेव्हा कोणी काही अनुभव सांगत असतो वा काही माहिती देत असतो तेव्हा तुम्ही श्रोते बनता. संभाषणात तुमचाहि भाग असतो. तो द्या आणि इतरांनाही सहभाग घेण्याची मुभा द्या. लवचिक असा, नव्या कल्पनांना वाव द्या. अगोदरच निर्धारित केलेले दृष्टीकोण आणि ते तसेच असावेत हा अट्टाहास तुमचे डोळे लिंपितो, कान बहिरे करतो आणि अंतःकरणास जड बनवितो.—मत्तय १३:१५.
मित्रत्व राखणारे, प्रामाणिक आणि दखल घेणारे व्हा
भिऊ नका. इतरांप्रत जा. तुम्ही जे मित्रत्व दाखवाल तसेच मित्रत्व इतरांपासूनही प्रवर्तित होईल. भावना संसर्गित आहेत. इतरांना कसे वाटले पाहिजे असे तुम्हास वाटते तसेच स्वतःला वाटू द्या. इतरांकडून जी कृति अपेक्षित आहे तशीच कृति करा. आपल्याला जसे वागविले जावे असे तुम्हाला वाटते तसेच इतरांनाही वागवा. ज्याची कापणी व्हावी असे वाटते त्याचीच पेरणी करा. स्वतःला द्या. प्रामाणिक वागा. इतरांविषयीची खरी आस्था राखून त्यांची दखल घ्या आणि इतरांची सेवा करा.
इतरांकडे लक्ष द्या
बुथ टार्किंग्टन यांच्या एका कादंबरीत त्यांनी समोरच्या पटांगणात खिदळणाऱ्या मुलांची माहिती दिली. यापैकीच्या आर्वी या मुलाला दिसले की बाकीचे आपल्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा तो उड्या मारीत लांब पळत गेला व पळता पळता ओरडत राहिलाः “मला बघा! मला बघा!” अर्थात, प्रौढ अशी गोष्ट उघडपणे दाखवणार नाहीत, पण आपल्याकडेही कोणी लक्ष द्यावे असे यांनाही मनोमन वाटत असते. तान्ही बाळके व वयस्कर याच्या अभावी गुदमरतात. तेव्हा लोकांकडे पहा, त्यांचे ऐका आणि त्यांचे निरिक्षण करा! आपल्या शेजाऱ्यांबरोबर परिचित व्हा, मित्रत्व दाखवा. त्यांच्यापाशी ज्या गोष्टी आहेत, मग ते त्यांचे कुत्रे, बागेतील झुडुप वा नवा पेहराव असो, त्याविषयी कुतुहूल दाखवा. पण हे करताना वरपांगीपणा नको तर प्रांजळपणा व्यक्त होण्यास हवा.
टीका करण्याचे टाळा
ती व्यर्थ ठरते. ती स्वाभिमान दुखवते आणि इर्ष्या वाढविते. ती बाणासारखी लागते व लोकात सामना करण्याचा पवित्रा उभारते. तेव्हा ते आपले समर्थन करु लागतात आणि तुम्हाविरुध्द प्रतिकार उभारतात. टीकेमुळे तुम्ही कोणाला पायाखाली चिरडत असता. हे लक्षात घ्या की जेव्हा लोकांवर हल्ला होत असतो तेव्हा ते तर्कशुध्द बनण्यापेक्षा अधिक भावनाविवश होत असतात. टीकेविषयीही असेच त्यांना वाटते. त्यांचा धिक्कार करण्याऐवजी समजदारी दाखवा. प्रोत्साहनयुक्त शब्द तर खूपच आश्चर्याचे काम करुन दाखवितात. त्यांच्या चुकांकडे नजर रोखण्याऐवजी त्यांचे चांगले गुण बघा. “चुकांकडे दुर्लक्ष करणे हे माणसाला शोभा देते.”—नीतीसूत्रे १९:११, द न्यू इंग्लीश बायबल.
सूचना देणे
उबदार, मित्रत्व दाखविणारे व प्रेमळ बना. त्यांना पहिले आपले म्हणणे बोलू द्या व तेही सविस्तरपणे. त्याच्या बोलण्याकरवी त्याला तसे का वाटते वा त्याने ती कृति का आचरली हे ध्यानात आणा. तो व्यक्त करीत असलेल्या इच्छांच्या बाबतीत प्रांजळपणा दाखवा. त्याचा दृष्टीकोन लक्षात घ्या. त्याच्या वागणूकीमागील भावनात्मक कारण विचारात घ्या. तुमच्याही हातून चुका होत असतात आणि त्यांच्यासारखीच अपूर्णता आपल्याठायीही आहे हे त्यांना कळू द्या. मग, ‘अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा आणि आपण देखील परीक्षेत पडू नये याकरता स्वतःकडे लक्ष द्या.’ (गलतीकर ६:१) ज्याविषयीची चर्चा चालू आहे त्याच विषयावर आपला सल्ला केंद्रित ठेवा. या विशिष्ठाला तो जुळवून घ्या. त्याला मुद्दा समजण्यास मदत करा आणि कुशलतेने बोला. “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.” (कलस्सैकर ४:६) कुमक वाढवा आणि सुधारणेची प्रशंसा करा.
समभावना बाळगा व ती व्यक्त करा
याचा हा अर्थ होतो की तुम्ही स्वतःला इतरांच्या परिस्थितीत ठेवण्यास हवे. त्यांच्या गरजांची संवेदना राखा. त्याला वाटते तसे स्वतःला वाटू द्या. तुम्ही त्याच्या जागी असता तर आपल्याला कशी वागणूक मिळावी असे तुम्हास वाटले असते? तुम्ही या सर्व गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत कारण याकरवीच तुम्हाला तो सुवर्णनियम पाळता येईलः “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” (मत्तय ७:१२) हे सोपे नाही. काही प्रकरणात तुमच्या समभावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत—त्या केवळ अश्रूंनीच व्यक्त होतात. अशा प्रकारच्या समभावनेची शिफारस पौलाने केली होती व म्हणूनच त्याने हे म्हटलेः “आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.”—रोमकर १२:१५.
लाजरस मृत्यु पावल्यावर मरीया येशूकडे आली. तो अहवाल म्हणतोः “येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणालाः ‘तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?’ ते त्याला म्हणालेः ‘प्रभुजी, येऊन पाहा.’ येशू रडला.” (योहान ११:३३-३५) आपण काय करणार ते येशूला ठाऊक होते तरीही लोकांना शोकाकुल बघून त्याला राहावले नाही. त्याने समभावना अश्रूंनी व्यक्त केली.
वाईटाबद्दल वाईट करु नका
काहीजण सुवर्णनियमाचा असा विपर्यास करतात की, ‘जशास तसे करा.’ पण हे बरोबर नाही. तर वाईटाबद्दल वाईट करु नका तर उलट बऱ्याने वाईटाला जिंका. यहोवा देव आम्हाविषयी प्रीती व्यक्त करुन आमच्या प्रेमाला चालना देतो. “पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो.” (१ योहान ४:१९) हे अव्यवहारिक तत्व नव्हे; तर हा मानवी स्वभाव आहे. सौम्य शब्द रागाला घालवून देतात. दुसरा गाल पुढे करण्यामुळे आणखी हात उचलला जात नाही. भट्टीमध्ये तप्त असणारे निखारे जसे धातूला गाळतात त्याप्रमाणे तुम्ही वाईटाच्या मोबदल्यात चांगल्याने केलेली फेड विरोध्याचा राग शमवील आणि तो गाळला जाईल व तुमची सरशी होईल. पण तेच, जरी त्या विरोध्याने छळ चालूच ठेवला तरीही शांती स्थापन करता यावी यासाठी आपल्याला जे करता आले ते केले याचे समाधान राहील. तुम्ही आपल्याला, आपल्या सत्वाला जागला असे होईल. तुम्ही विरोध्याला तुम्हाला प्रतिस्पर्धी बनविण्यास वाव दिला नाही असे दिसून येईल.—रोमकर १२:१७-२१.
शक्यतो शांती जोपासण्याचा प्रयत्न करा
होय, “सर्वांबरोबर शांतीने राहा.” (इब्रीयांस १२:१४) ती आपोआप अस्तित्वात येत नाही. ती जतन करुन ठेवणे नेहमीच शक्य नसते. कधी कधी ती जोपासण्याचे सोडावे का असा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळेच, “रागीट मनुष्याशी मैत्री करु नको; कोपिष्ठांची संगति धरु नको.” (नीतीसूत्रे २२:२४) तथापि, “शक्य आहे तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१८.
आपल्या शेजाऱ्यासंबंधाने जी प्रीती दाखवावी असे येशूने म्हटले त्यासाठी असणारा ग्रीक शब्द अ.गा’पे हा आहे. प्रेषित पौलाने या अ.गा’पे गुणाविषयी दिलेली व्याख्या आपण आपल्या शेजाऱ्यासोबत शांतीने राहण्याकरता काय करावे याच्या मार्गदर्शिका देतात. तो म्हणतोः “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही; फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनीतीत आनंद मानीत नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिध्द असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.”—१ करिंथकर १३:४-८. (g86 1/22)
[पानांवरील चौकट]
पवित्र शास्त्रातील नीतीसूत्रे या पुस्तकात पुढील अध्याय व वचने यानुरुप मानवी नातेसंबंधाच्या अनुषंगाने आढळणारी मार्गदर्शक तत्वे
“मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.”—१५:१.
“ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.”—१६:२३.
“ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी जिवाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.”—१६:२४.
“जो इतरांच्या अपराधावर झाकण घालतो तो प्रेमाची वृध्दी करतो; पण जो गत गोष्टी घोकीत बसतो त्याला मित्र अंतरतात.”—१७:९.
“कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.”—१७:१४.
“जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो.”—१७:२७.
“विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.”—१९:११.
“भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे; पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो.”—२०:३.
“मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढतो.”—२०:५.
“तुझा व तुझ्या शेजाऱ्याचा वाद असला तर तो चालीव, पण इतरांच्या गुप्त गोष्टी बाहेर फोडू नको.”—२५:९.
“शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळ टाक, नाहीतर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.”—२५:१७.
“बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय? त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.”—२९:२०.