प्रीती (अगापे)—काय नाही व काय आहे
“आपल्या . . . बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.”—२ पेत्र १:५, ७.
१. (अ) कोणत्या गुणाला पवित्र शास्त्र अग्रगण्य मानते? (ब) कोणत्या चार ग्रीक शब्दांचे भाषांतर अनेकदा “प्रीती” असे केले आहे आणि १ योहान ४:८ मध्ये कोणत्या गुणाचा उल्लेख केला आहे?
देवाचे वचन, पवित्र शास्त्र जर कोणत्या एका गुणाला किंवा सात्त्विकतेला प्राधान्य देत असेल तर ती आहे, प्रीती. ख्रिस्ती शास्त्रवचनांची मूळ भाषा ग्रीक यामध्ये, चार शब्द आहेत ज्यांचे भाषांतर अनेक वेळा “प्रीती” असे केले जाते. ज्या प्रीतीविषयी आता आपण पाहत आहोत ती लैंगिक आकर्षणावर आधारित असलेली इʹरोस (हा शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनात सापडत नाही), किंवा ती स्टॉर․गेʹ, रक्ताच्या नात्यावर आधारित असलेली; किंवा ज्याचा अर्थ हार्दिक मित्रत्त्वाची प्रीती असा होतो, जी परस्पर मतांवर आधारित आहे, ज्याविषयी मागील अंकात सविस्तर चर्चा केली आहे ती फि․लिʹया देखील नाही. उलटपक्षी, ज्याला समानार्थी असे म्हटले जाऊ शकते ती निस्वार्थ अ․गाʹपे, तत्त्वांवर आधारित असलेली प्रीती आहे, जिचा संदर्भ प्रेषित योहानाने असे म्हणत घेतला की: “देव प्रीती आहे.”—१ योहान ४:८.
२. प्रीती (अ․गाʹपे) विषयी काय योग्यपणे म्हटले आहे?
२ या प्रीतीच्या (अ․गाʹपे) संबंधाने, प्राध्यापक विल्यम बार्कले त्यांच्या न्यू टेस्टमेंट वर्डस् यात म्हणतात: “अ․गाʹपेचा संबंध मन यासोबत येतो. आमच्या हृदयात अचानक वाढू शकते अशी ती केवळ एक भावना नाही [फि․लिʹयाच्या बाबतीत होऊ शकते त्याप्रमाणे]; ते एक तत्त्व आहे ज्याच्या आधारे आम्ही जाणूनबुजून जगतो. अ․गाʹपेचा संबंध मुख्यत: इच्छा यासोबत येतो. ते जिंकणे, विजय मिळवणे आणि साध्य करणे होय. स्वाभाविकच कोणीही त्याच्या शत्रूंवर कधी प्रीती केली नाही. एखाद्याच्या शत्रूंवर प्रीती करणे म्हणजे आमच्या सर्व स्वाभाविक प्रवृत्त्या आणि भावनांवर विजय मिळवल्यासारखे आहे. अगापे ही . . . जे अप्रिय आहेत अशांवर प्रीती करण्याची शक्ती, आम्हाला जे लोक आवडत नाहीत त्यांच्यावर प्रीती करण्याची एक वास्तविकता आहे.”
३. येशू ख्रिस्त आणि पौलाने प्रीतीवर कशा रीतीने जोर दिला आहे?
३ होय, यहोवा देवाच्या शुद्ध भक्तीला इतर सर्व प्रकारच्या भक्तीपासून वेगळे करण्यातील एक गोष्ट म्हणजे ही भक्ती या प्रकारच्या प्रीतीवर जोर देणारी आहे. उचितपणे येशू ख्रिस्ताने दोन मोठ्या आज्ञा उद्धृत केल्या: “पहिली ही की, . . . तू आपला देव परमेश्वर [यहोवा, न्यूव.] ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, ‘जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही.” (मार्क १२:२९-३१) प्रेषित पौल १ करिंथकराच्या १३व्या अध्यायात प्रीतीवर त्याचप्रकारचा जोर देतो. प्रीती हा गुण प्रथम अत्यावश्यक आहे याची स्पष्टता केल्यानंतर, त्याने असे म्हणून समाप्ती केली की: “विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे.” (१ करिंथकर १३:१३) येशूने अगदी योग्यपणे म्हटले की प्रीती हे त्याच्या अनुयायांचे एक ओळखचिन्ह असेल.—योहान १३:३५.
प्रीती कशाप्रकारची नाही
४. पौल १ करिंथकर १३:४-८ मध्ये प्रीतीच्या किती नकारात्मक आणि सकारात्मक बाजूंचा उल्लेख करतो?
४ प्रीती काय आहे यापेक्षा प्रीती काय नाही हे बोलणे सोपे आहे असा एक मुद्दा मांडला होता. यात काही सत्य आहे, कारण प्रेषित पौल प्रीतीविषयीच्या त्याच्या १ करिंथकराच्या १३व्या अध्यायातील ४ ते ८ वचनात तो प्रीती काय नाही त्याविषयीच्या नऊ गोष्टी व प्रीती काय आहे त्याबद्दलच्या सात गोष्टी सांगतो.
५. “हेवा” याची व्याख्या कशी केली आहे, आणि शास्त्रवचनात सकारात्मक रीतीने त्याचा वापर कसा केला आहे?
५ प्रीती काय नाही याची पहिली गोष्ट प्रेषित पौल सांगतो की, “ती हेवा करीत नाही” ही आहे. हेव्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू असल्यामुळे याविषयी आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे. एक शब्दकोश “हेवा” याची व्याख्या “सहन न करता येणारी चुरस” आणि “एकनिष्ठ भक्ती अपेक्षिणारा” अशी करतो. यास्तव, मोशेने निर्गम ३४:१४ मध्ये स्पष्ट केले: “तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर [यहोवा, न्यूव.] ईर्ष्यावान देव आहे.” निर्गम २०:५ मध्ये यहोवा म्हणतो: “मी तुझा देव परमेश्वर [यहोवा, न्यूव.] ईर्ष्यावान देव आहे.” हाच विचार बाळगून प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्हाविषयीची माझी आस्था [हेवा, न्यूव.] ईश्वरप्रेरित आस्था [हेवा, न्यूव.] आहे.”—२ करिंथकर ११:२.
६. प्रीती हेवा का करीत नाही हे कोणत्या शास्त्रवचनीय उदाहरणावरून दिसते?
६ तथापि, “हेवा,” याचा सर्वसामान्यपणे, वाईट अर्थ असल्याच्या कारणामुळे गलतीकर ५:२० मध्ये त्याचा उल्लेख देहाच्या कर्माबरोबर केला आहे. होय, असा हेवा, स्वार्थ व द्वेष उत्पन्न करणारा आहे आणि द्वेष प्रीतीच्या उलट आहे. हेव्यामुळे काइनाने हाबेलचा वध करण्यापर्यंत द्वेष करावयाला त्याला भाग पाडले, आणि योसेफाच्या दहा भावांनी त्याला ठार मारून टाकण्यापर्यंत त्याचा द्वेष केला. अहाब राजाने नाबोथाच्या द्राक्षीच्या मळ्याबद्दल हेवा केला, पण प्रीती हेवा करण्याद्वारे इतरांची इच्छा नसताना त्यांची मालमत्ता किंवा फायदा घेत नाही.—१ राजे २१:१-१९.
७. (अ) बढाईमुळे यहोवा असंतुष्ट होतो हे कोणती घटना दाखवते? (ब) प्रीती अविचारीपणेसुद्धा बढाई का मारत नाही?
७ पौल आम्हाला पुढे सांगतो की “प्रीती बढाई मारीत नाही.” बढाई, प्रीतीची उणीव दर्शवते, कारण ती एखाद्याला इतरांच्यापेक्षा श्रेष्ठ समजावयाला प्रवृत्त करते. यहोवा बढाईखोरांविषयी संतुष्ट नसतो व हे नबुखदनेस्सर राजाने बढाई मारली तेव्हा त्याला कसे नमविले त्यावरून स्पष्टपणे दिसून येते. (दानीएल ४:३०-३५) स्वतः जे काही साध्य केले आहे किंवा मालमत्तेमुळे अधिक खूष होऊन, अनेकदा अविचारीपणाने बढाई मारली जाते. काही जणांचा, ख्रिस्ती सेवेत त्यांना यश मिळाल्यामुळे बढाई मारण्याकडे कल असतो. इतर जण, नवीन मोटारगाडी जवळजवळ ५०,००० डॉलरला खरेदी केल्याबद्दल लगेच त्यांच्या मित्रांना फोन करून सांगण्यासाठी त्यांच्या आंतरीक मनाने भाग पाडलेल्या वडिलाप्रमाणे आहेत. हे सर्वच प्रीतीचा अभाव असणारे आहे कारण ते बढाईखोराला ऐकणाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ करते.
८. (अ) जे फुगतात त्यांच्याविषयी यहोवाची मनोवृत्ती काय आहे? (ब) त्याप्रमाणे प्रीती का वागत नाही?
८ यानंतर आम्हाला सांगितले आहे की प्रीती “फुगत नाही.” जो फुगत असतो, किंवा गर्विष्ठ असतो तो प्रीतीचा अभाव ठेवून स्वतःला इतरांपेक्षा उच्च समजतो. अशी मनोवृत्ती मूर्खपणाची आहे कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” (याकोब ४:६) प्रीती ही उलट प्रकारे कार्य करते; ती इतरांना श्रेष्ठ मानते. पौलाने फिलिप्पैकर २:२, ३ मध्ये लिहिले: “तुम्ही समचित्त व्हा; म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” अशी मनोवृत्ती इतरांना सोयिस्कर बनविते, पण गर्विष्ठ व्यक्ती त्याच्या तट पाडण्यामुळे इतरांना गैरसोयीचे वाटायला लावतो.
९. प्रीती गैरशिस्तीने का वागत नाही?
९ पौल पुढे म्हणतो की प्रीती, “गैरशिस्त वागत नाही.” एक शब्दकोश “गैरशिस्त” याचे स्पष्टीकरण “स्थूलपणाने अयोग्य किंवा अपमानास्पद सवया किंवा वर्तन” असे करतो. जो गैरशिस्तीने (प्रीतीचा अभाव राखून) वागतो तो इतरांच्या भावनांची उपेक्षा करतो. पवित्र शास्त्राच्या अनेक आवृत्त्यात ग्रीक शब्दाचे भाषांतर “उद्धट” असे केले आहे. ज्याला योग्य आणि चांगले समजले जाते त्याला तुच्छ लेखण्यात येते. निश्चितच इतरांसाठी असलेल्या प्रेमळ विचारामुळे त्यांना दुःख देणाऱ्या आणि इतकेच नव्हे तर धक्का देणाऱ्या उद्धट आणि असभ्य गोष्टी टाळणे असा याचा अर्थ होईल.
प्रीती जे नाही अशा इतर गोष्टी
१०. कशारीतीने प्रीती स्वार्थ पाहत नाही?
१० पुढे आम्हाला सांगितले आहे की, आमची वैयक्तिक आणि इतरांची आस्था याचा प्रश्न असतो तेव्हा ती “स्वार्थ पाहत नाही.” प्रेषित इतर ठिकाणी असे म्हणतो: “कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही; तर तो त्याचे पालनपोषण करतो.” (इफिसकर ५:२९) आमच्या आस्थेबरोबर इतरांच्या आस्थेची चढाओढ होते व कोणतेही पवित्र शास्त्रीय तत्त्व यामध्ये गोवलेले नसल्यास, आम्ही अब्राहाम जसा लोटाबरोबर वागला त्याप्रमाणे करावे, प्रेमळपणे दुसऱ्या व्यक्तिला पहिला हक्क घेऊ द्यावा.—उत्पत्ती १३:८-११.
११. प्रीती चिडत नाही याचा काय अर्थ होतो?
११ प्रीती इतरांचे मन दुखवत नाही. यास्तव पौल आम्हाला प्रीती “चिडत नाही” याविषयी लिहितो. तिच्यावर कशाचाही परिणाम होतो अशी ती नाही. ती आत्मसंयम प्रदर्शित करते. विशेषपणे विवाहित जोडप्यांनी, जोराने बोलणे, उतावीळ होणे, रागाने आवाज वाढविण्याचे, किंवा एकदुसऱ्यांवर ओरडण्यापासून सांभाळण्यासाठी हा इशारा गंभीरतेने घेतला पाहिजे. काही वेळा सहजपणे चीड आणणाऱ्या परिस्थिती असतात, या कारणामुळे तीमथ्याला सल्ला देण्याची गरज पौलाला भासली: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील” होय, चीड न येणारा, “विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे.”—२ तीमथ्य २:२४, २५.
१२. (अ) कशाप्रकारे प्रीती अपकार स्मरत नाही? (ब) अपकाराला स्मरणात ठेवणे मूर्खपणाचे का आहे?
१२ प्रीती काय नाही हे पुढे सांगत असताना पौल सल्ला देतो: “प्रीती . . . अपकार स्मरत नाही.” त्याचा अर्थ हा नाही की प्रीती अपाय झाल्यावर त्याकडे लक्ष देत नाही. गंभीर अपाय झाल्यावर आम्ही गोष्टी कशा हाताळाव्यात ते येशूने दाखवले. (मत्तय १८:१५-१७) परंतु प्रीती आम्हाला सतत लगेच राग येण्याची, कटुताच्या भावना तशाच ठेवण्याची अनुमती देत नाही. अपकार स्मरत नाही याचा अर्थ क्षमाशील असले पाहिजे आणि शास्त्रवचनीय मार्गाने एखादी गोष्ट हाताळल्यानंतर क्षमा करून ती विसरली पाहिजे. होय, चुकीविषयी सतत विचार करण्याद्वारे तसेच झालेला अपाय स्मरणात ठेवण्याद्वारे तुम्ही स्वतःला यातना देऊ नका किंवा स्वतःला अत्यंत दुःखी होऊ देऊ नका!
१३. अनीतीत आनंद मानीत नाही याचा काय अर्थ होतो आणि प्रीती असे का करीत नाही?
१३ शिवाय, आम्हाला असे सांगितले आहे की, प्रीती “अनीतीत आनंद मानीत नाही.” जग अनीतीत आनंद मानीत असल्याचे, लोकप्रिय हिंसाचार आणि बीभत्स साहित्य, सिनेमा आणि दूरदर्शन कार्यक्रमांवरून दिसून येते. हे सर्वच आनंद स्वार्थी आहेत, देवाच्या धार्मिक तत्त्वांबद्दल किंवा इतरांच्या हितासाठी कोणतीही कदर नाही. हे सर्वच आनंद देहस्वभावासाठी पेरणी करतात आणि उचित समयी त्यांना देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल.—गलतीकर ६:८.
१४. प्रीती कधी अंतर देत नाही असे आत्मविश्वासाने का म्हटले जाऊ शकते?
१४ आता प्रीती करीत नसणारी शेवटची गोष्ट म्हणजे: “प्रीती कधी अंतर देत नाही.” प्रीती कधी अंतर देत नाही किंवा समाप्त होत नाही त्याचे एक कारण म्हणजे देव प्रीती आहे व तो “सनातन राजा” आहे हे होय. (१ तीमथ्य १:१७) रोमकर ८:३८, ३९ मध्ये यहोवाची प्रीती कधी समाप्त होणार नाही याची आम्हाला हमी दिली आहे: “माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.” तसेच प्रीती कधी अंतर देत नाही कारण ती कधी उणी पडत नाही. प्रीती एखाद्या प्रसंगाच्या कोणत्याही आव्हानांच्या आवश्यकतांना पूर्ण करण्यास समर्थ असते.
प्रीती काय आहे त्या गोष्टी
१५. प्रीतीच्या सकारात्मक बाजूंच्या यादीत पौल सहनशीलतेला प्रथम का मांडतो?
१५ प्रीती काय आहे, या सकारात्मक गोष्टी आता आपण पाहू या, पौल त्यांची सुरवात करतो: “प्रीती सहनशील आहे.” असे म्हटले गेले आहे की सहनशीलतेविना ख्रिस्ती संगतीसारखी कोणतीही गोष्ट नाही, व ती एकदुसऱ्यांचे धीराने सहन करणे होय. कारण आम्ही सर्वच अपरिपूर्ण आहोत, आणि आमच्या अपरिपूर्णता व चूका इतर लोकांसाठी परीक्षा आहेत. यामुळे प्रेषित पौल प्रीती काय आहे याविषयी हा दृष्टिकोन यादीत प्रथम मांडतो!
१६. एकाच कुटुंबातील सदस्य कोणत्या मार्गांद्वारे एकदुसऱ्यांसाठी कृपाळुपणा दाखवू शकतात?
१६ पौलाने म्हटले की प्रीती “कृपाळु आहे.” म्हणजे प्रीती साहाय्यकारी, विचारी व दुसऱ्यांच्या भावना विचारात घेणारी आहे. मोठ्या आणि लहान गोष्टीत कृपाळुपणा व्यक्त होतो. लुटारूंनी मारल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या मनुष्यावर, शेजाऱ्याला मदत करणारा शोमरोनी कृपाळुपणा प्रदर्शित करीत होता. (लूक १०:३०-३७) “कृपया” म्हणण्यात प्रीती आनंद घेते. “भाकर दे” असे म्हणणे आज्ञा दिल्यासारखे आहे. त्याच्याआधी “कृपया” शब्द लावल्यास ती विनंती केल्यासारखी होते. पतींनी १ पेत्र ३:७ मधील सल्ल्याकडे लक्ष दिल्यास ते कृपाळु होतील: “पतींनो, तसेच तुम्हीही आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहा, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणून तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.” स्त्रियांनी त्यांच्या पतींची ‘भीड राखली’ तर त्या कृपाळु असतील. (इफिसकर ५:३३) बापांनी इफिसकर ६:४ मधील सल्ल्याचा अवलंब केल्यास ते कृपाळु असतील: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; तर प्रभूच्या [यहोवा, न्यूव.] शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.”
१७. प्रीती सत्याबरोबर आनंद करते असे कोणते दोन मार्ग आहेत?
१७ प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही तर “सत्यासंबंधी आनंद मानते.” प्रीती आणि सत्य बरोबरीने असतात—देव प्रीती आहे आणि त्याचवेळी तो “सत्याचा देव” देखील आहे.” (स्तोत्रसंहिता ३१:५) सत्य विजय मिळवत असल्याचे आणि खोटेपणाला उघड करीत असल्याचे पाहून प्रीती आनंद करते; या कारणास्तव आज यहोवाच्या उपासकांमध्ये अधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे. तथापि, सत्य व अनीतीत तफावत असल्यामुळे, प्रीती धार्मिकतेबरोबर आनंद मानते असा याचा अर्थ होऊ शकतो. मोठी बाबेल पडण्याच्यावेळी यहोवाच्या उपासकांना आज्ञा दिल्याप्रमाणे धार्मिकतेच्या विजयामुळे प्रीती आनंद करते.—प्रकटीकरण १८:२०.
१८. कोणत्या अर्थाने प्रीती सर्व काही सहन करते?
१८ पौल हे देखील सांगतो की, प्रीती “सर्व काही सहन करते.” किंगडम इंटरलिनियर दाखवते की, प्रीती सर्व गोष्टींवर झाकण घालते. दुष्टाप्रमाणे ती एखाद्या बांधवाची “चहाडी” करण्यास प्रवृत्त होत नाही. (स्तोत्रसंहिता ५०:२०, नीतीसूत्रे १०:१२; १७:९) होय १ पेत्र ४:८ सारखाच विचार येथेही आहे: “प्रीती पापाची रास झाकून टाकते.” अर्थातच, यहोवा आणि ख्रिश्चन मंडळीविरूद्ध पाप झाल्यास ते झाकून ठेवण्यापासून निष्ठावंतपणा एखाद्याला दूर राखील.
१९. कोणत्या रीतीने प्रीती सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते?
१९ प्रीती “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते.” प्रीती नकारात्मक नव्हे तर सकारात्मक असते. प्रीती भोळसट आहे असा याचा अर्थ नाही. संवेदनात्मक गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणारी ती नाही. परंतु देवावर एखाद्याला विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा असली पाहिजे. यास्तव प्रीती ही संशयी, फाजील टीकाकुशल नाही, जे अगदी ठामपणे देव नाही असे म्हणतात त्या नास्तिकाप्रमाणे भरवसादायक गोष्टीचा ती प्रतिकार करीत नाही, किंवा ती आम्ही कोठून आलो आहोत, आम्ही येथे का आहोत, व भवितव्य कसे असेल हे जाणणे अशक्य आहे असे ठामपणे प्रतिपादणाऱ्या अज्ञेयवादी लोकांप्रमाणे देखील नाही. ह्या सर्व गोष्टींविषयी देवाचे वचन आम्हाला खात्री देते. प्रीती ही फाजील संशयखोर नसून भरवसादायक असते, यामुळे ती विश्वास ठेवण्यास तयार असते.
२०. प्रीतीचा संबंध आशेसोबत कशाप्रकारे आहे?
२० प्रेषित पौल आम्हाला पुढे याची हमी देतो की प्रीती, “सर्वांची आशा धरते.” प्रीती नकारात्मक नसून सकारात्मक असल्यामुळे देवाच्या वचनात अभिवचन दिलेल्या सर्व गोष्टींवर तिची दृढ आशा आहे. आम्हाला असे सांगितले आहे: “जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे आणि जो मळणी करतो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी.” (१ करिंथकर ९:१०) सर्वदा चांगल्याची आशा बाळगणारी प्रीती, जशी भरवसादायक आहे तसेच ती आशादायकही आहे.
२१. प्रीती धीर धरते याविषयी कोणती शास्त्रवचनीय हमी आहे?
२१ शेवटी, आम्हाला याची हमी दिली आहे की प्रीती “सर्वांसंबंधाने धीर धरते.” ती तसे करण्यास समर्थ असल्यामुळे, प्रेषित पौल १ करिंथकर १०:१३ मध्ये आम्हाला सांगतो की: “मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे.” शास्त्रवचनात, इब्रीयांस १२:२, ३ मध्ये आम्हाला आठवण करून दिली आहे की धीराने टिकून राहिलेल्या देवाच्या सेवकांची प्रामुख्याने येशू ख्रिस्ताचे, तसेच इतर अनेक उदाहरणे पाहण्यासाठी प्रीती आम्हाला प्रवृत्त करील.
२२. देवाची मुले या नात्याने, कोणत्या अग्रगण्य गुणाला आम्ही प्रदर्शित करण्याची सर्वदा आस्था बाळगली पाहिजे?
२२ खरोखरच, प्रीती (अ․गाʹपे) या अग्रगण्य असलेल्या गुणात, ती काय नाही व काय आहे या दोन्ही मध्ये आम्ही सर्व ख्रिश्चन यहोवाच्या साक्षीदारांनी वाढ करण्याची गरज आहे. देवाची मुले या नात्याने आम्ही देवाच्या आत्म्याच्या या फळाला प्रदर्शित करण्याची सर्वदा आस्था बाळगली पाहिजे. असे करणे देवाप्रमाणे करण्यासारखे आहे, कारण हे आठवणीत ठेवा की, “देव प्रीती आहे.”
तुम्हाला आठवते का?
▫ येशू ख्रिस्त आणि पौल प्रीतीची अग्रगण्यता कशी दाखवतात?
▫ कोणत्या अर्थाने प्रीती हेवा करीत नाही?
▫ प्रीती ‘सर्व काही सहन’ कशी करते?
▫ प्रीती कधी अंतर देत नाही असे का म्हटले जाऊ शकते?
▫ प्रीती सत्यासंबंधी कोणत्या दोन मार्गांनी आनंद मानते?
[२७ पानांवरील चौकट]
प्रीती (अगापे)
ती काय नाही ती काय आहे
१. ती हेवा करीत नाही १. सहनशील
२. बढाई मारीत नाही २. कृपाळु
३. फुगत नाही ३. सत्यासंबंधी आनंद करते
४. गैरशिस्तीने वागते ४. सर्व गोष्टी सहन करते
५. स्वार्थ पाहते ५. सर्व काही खरे मानते
६. चिडते ६. सर्वांची आशा धरते
७. अपकार स्मरणात ठेवते ७. सर्वांसंबंधाने धीर धरते
८. अनीतीत आनंद मानते
९. कधी अंतर देत नाही
[२४ पानांवरील चित्रं]
बढाई मारल्याबद्दल यहोवाने नबुखदनेस्सराला नमविले