वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ६/१५ पृ. १७-२१
  • “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपला शेजारी नेमका कोण आहे?
  • आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कसे दाखवू शकतो?
  • शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याचा एक उत्तम मार्ग
  • प्रेमाविषयीचे देवप्रेरित स्पष्टीकरण
  • आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम करत राहा
  • आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करण्याचा अर्थ काय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुम्ही “शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती” करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • माझा शेजारी कोण?
    सावध राहा! माहितीपत्रक ६-३ (gbr6-3)
  • तुम्ही कोणाकोणावर प्रेम करता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ६/१५ पृ. १७-२१
जखमी झालेल्या माणसाला चांगला शोमरोनी उतारशाळेत आणतो

“तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर”

“दुसरी [आज्ञा] ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.’”—मत्त. २२:३९.

तुमचे उत्तर काय असेल?

  • आपला शेजारी नेमका कोण आहे?

  • आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करू शकतो आणि आपण ते केले पाहिजे असे तुम्हाला का वाटते?

  • १ करिंथकर १३:४-८ या वचनांत प्रेमाच्या कोणत्या काही पैलूंबद्दल सांगितले आहे?

१, २. (क) येशूने नियमशास्त्रातील कोणत्या आज्ञेला दुसरी सर्वात मोठी आज्ञा म्हटले? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

एका परूश्‍याने येशूची परीक्षा घेण्याच्या हेतूने एकदा त्याला विचारले: “गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” मागील लेखात आपण पाहिले की येशूने या प्रश्‍नाचे काय उत्तर दिले. तो म्हणाला: “तू आपला देव परमेश्‍वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.” येशूने पुढे असे म्हटले: “दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.’”—मत्त. २२:३४-३९.

२ येशूने म्हटले की आपण आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम केले पाहिजे. तर मग, आपण स्वतःला विचारले पाहिजे: आपला शेजारी नेमका कोण आहे? आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कसे दाखवू शकतो?

आपला शेजारी नेमका कोण आहे?

३, ४. (क) “माझा शेजारी कोण?” या प्रश्‍नाच्या उत्तरात येशूने कोणता दाखला दिला? (ख) ज्या व्यक्‍तीला लुटारुंनी लुटले, मारले व अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिले, त्याला शोमरोन्याने कशी मदत केली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)

३ आपण कदाचित असे म्हणू की आपल्या घराजवळ राहणारा, आपला जवळचा व आपली मदत करणारा मित्रच आपला शेजारी आहे. (नीति. २७:१०) पण, जेव्हा स्वतःला नीतिमान समजणाऱ्‍या एका माणसाने येशूला विचारले की, “माझा शेजारी कोण?” तेव्हा येशूने त्याला जे सांगितले त्याकडे लक्ष द्या. येशूने एका चांगल्या शोमरोन्याचा दाखला देऊन त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. (लूक १०:२९-३७ वाचा.) एकदा एका व्यक्‍तीला लुटारुंनी लुटले, त्याला मारले व अर्धमेल्या अवस्थेत सोडून दिले. त्या व्यक्‍तीची अशी अवस्था पाहून तेथून जाणारे इस्राएली याजक आणि लेवी एका चांगल्या शेजाऱ्‍याप्रमाणे वागतील अशी आपण अपेक्षा करू. पण, आपण पाहतो की त्याला काहीच मदत न करता ते तेथून निघून गेले. त्याउलट, एका शोमरोन्याने त्या माणसाची मदत केली. शोमरोनी असे लोक होते जे मोशेच्या नियमशास्त्राचा आदर करायचे पण यहुदी लोक त्यांचा द्वेष करायचे.—योहा. ४:९.

४ त्या जखमी माणसाला बरे वाटावे म्हणून शोमरोन्याने त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षारस ओतला. त्याने त्याला एका उतारशाळेत नेले आणि तेथील रक्षकाला त्या माणसाची काळजी घेण्याकरता दोन रुपये दिले. त्या काळात दोन रुपये एका मजुराचे दोन दिवसांचे वेतन होते. (मत्त. २०:२) या दाखल्यावरून आपल्याला अगदी सहज कळते की त्या जखमी माणसाचा खरा शेजारी कोण होता. येशूचा हा दाखला आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर दया व प्रेम दाखवण्यास शिकवतो.

जपान आणि कॅनडा येथे विपत्तीनंतर मदतकार्य करत असताना यहोवाचे साक्षीदार

यहोवाचे सेवक शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्यास तत्पर असतात (परिच्छेद ५ पाहा)

५. काही वर्षांपूर्वी घडलेल्या एका नैसर्गिक विपत्तीत यहोवाच्या सेवकांनी आपल्या शेजाऱ्‍यांप्रती प्रेम कसे दाखवले?

५ आज आपल्याला शोमरोन्यासारखे दयाळू लोक क्वचितच बघायला मिळतात. खासकरून या “शेवटल्या काळी,” जेव्हा अनेक लोकांना एकमेकांप्रती प्रेम राहिलेले नाही. ते क्रूरपणे वागतात आणि चांगल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. (२ तीम. ३:१-३) सहसा जेव्हा नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, २०१२ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या शेवटास जेव्हा न्यूयॉर्क सिटीत सॅन्डी नावाचे वादळ आले तेव्हा काय घडले याकडे लक्ष द्या. शहराच्या ज्या भागाला सर्वात जोरदार फटका बसला होता तेथील लोकांना अगदी कडाक्याच्या थंडीत राहावे लागले. तेथे वीज आणि इतर गरजेच्या वस्तूही उपलब्ध नव्हत्या. आधीच इतक्या समस्येत असलेल्या या लोकांना लुटारुंनीही लुटले. पण, त्याच भागात यहोवाच्या साक्षीदारांनी एक कार्यक्रम राबवला ज्यामुळे त्यांना आपल्या बांधवांना आणि इतर लोकांना मदत करणे शक्य झाले. आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम असल्यामुळेच खरे ख्रिस्ती इतरांना मदत करतात. आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम करण्याचे इतर काही मार्ग कोणते आहेत?

आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कसे दाखवू शकतो?

६. आपल्या प्रचार कार्याचा आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याचा काय संबंध आहे?

६ लोकांना आध्यात्मिक मदत पुरवा. आपण जेव्हा “शास्त्रापासून मिळणाऱ्‍या उत्तेजनाच्या” व सांत्वनाच्या संदेशाकडे लोकांचे लक्ष वेधतो, तेव्हा आपण त्यांना मदत पुरवत असतो. (रोम. १५:४) प्रचार कार्याद्वारे जेव्हा आपण इतरांना बायबलचे सत्य सांगतो तेव्हा आपण त्यांच्याप्रती प्रेम दाखवत असतो. (मत्त. २४:१४) “आशेचा देव,” याच्याकडून मिळणारा राज्याचा संदेश इतरांना सांगण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला लाभला आहे!—रोम. १५:१३.

७. सुवर्ण नियम काय आहे, आणि त्यानुसार वागल्यामुळे आपल्याला कसा आशीर्वाद मिळतो?

७ सुवर्ण नियमाचे पालन करा. येशूने त्याच्या डोंगरावरील प्रवचनात या नियमाचा उल्लेख केला. तो म्हणाला: “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्टग्रंथ हेच होत.” (मत्त. ७:१२) आपण जेव्हा येशूच्या सल्ल्यानुसार वागतो तेव्हा आपण “नियमशास्त्र” (उत्पत्ती ते अनुवाद) आणि “संदेष्टग्रंथ” (इब्री शास्त्रवचनांतील भविष्यवाण्यांची पुस्तके) यात दिलेल्या तत्त्वांचे पालन करत असतो. या पुस्तकांतून कळते की जे लोक इतरांना प्रेम दाखवतात त्यांना देव आशीर्वाद देतो. उदाहरणार्थ, यहोवाने यशयाद्वारे असे म्हटले: “न्यायाचे पालन करा, धर्माचरण करा . . . जो मानव हे करतो . . . तो धन्य.” (यश. ५६:१, २) आपण आपल्या शेजाऱ्‍यांसोबत प्रेमळपणे व नीतीने वागतो तेव्हा आपल्याला देवाकडून आशीर्वाद मिळतात.

८. आपण आपल्या वैऱ्‍यांवर प्रेम का केले पाहिजे, आणि यामुळे काय होण्याची शक्यता आहे?

८ आपल्या वैऱ्‍यांवर प्रेम करा. येशूने असे म्हटले: “‘आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर’ व आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे.” (मत्त. ५:४३-४५) प्रेषित पौलानेही हीच गोष्ट स्पष्ट करत म्हटले: “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे.” (रोम. १२:२०; नीति. २५:२१) मोशेच्या नियमानुसार जर एखाद्याने पाहिले की त्याच्या वैऱ्‍याचा प्राणी भाराखाली दबलेला आहे तर त्याने त्याच्या वैऱ्‍याला, प्राण्याची सुटका करण्यास साहाय्य करायचे होते. (निर्ग. २३:५) अशा प्रकारे एकत्र मिळून काम केल्यास जुने वैरीसुद्धा मित्र बनू शकतात. ख्रिस्ती या नात्याने खरे प्रेम दाखवल्यामुळे बऱ्‍याच विरोधकांच्या मनात आपल्याप्रती असलेला द्वेष कमी झाला आहे. आपण जर आपल्या वैऱ्‍यांवर, अगदी कट्टर विरोधकांवरही प्रेम दाखवत राहिलो आणि त्यांपैकी जर काहींनी सत्य स्वीकारले तर आपल्याला नक्कीच खूप आनंद होईल!

९. आपल्या बांधवासोबत शांती प्रस्थापित करण्याविषयी येशूने काय सांगितले?

९ सर्वांसोबत शांतीने राहण्यास झटा. (इब्री १२:१४) यात आपल्या बांधवांचाही समावेश होतो. कारण येशूने असे म्हटले: “तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.” (मत्त. ५:२३, २४) आपण जर आपल्या बांधवावर प्रेम दाखवले आणि त्याच्यासोबत शांती प्रस्थापित करण्यासाठी लगेच पाऊल उचलले, तर देव आपल्याला नक्की आशीर्वाद देईल.

१०. आपण दोष दाखवणारे का असू नये?

१० दोष दाखवणारे बनू नका. येशूने असे म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.” (मत्त. ७:१-५) आपल्याही हातून कदाचित मोठमोठ्या चुका घडल्या असतील. तेव्हा, आपण इतरांचे लहानसहान दोष शोधत बसू नये, ही गोष्ट येशूने किती जोरदार शब्दांत स्पष्ट केली!

शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याचा एक उत्तम मार्ग

११, १२. आपण कोणत्या उत्तम मार्गाने आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवतो?

११ आपण आपल्या शेजाऱ्‍यांवर एका उत्तम मार्गाने प्रेम दाखवावे अशी आपली इच्छा आहे. येशूप्रमाणे आपणही राज्याची सुवार्ता लोकांना सांगतो. (लूक ८:१) येशूने त्याच्या अनुयायांना अशी आज्ञा दिली: “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.” (मत्त. २८:१९, २०) आपण जेव्हा ही आज्ञा पाळतो, तेव्हा आपण आपल्या शेजाऱ्‍याला नाशाकडे जाणाऱ्‍या रुंद व पसरट मार्गावरून फिरून जीवनाकडे नेणाऱ्‍या अरुंद मार्गावर येण्यास मदत करतो. (मत्त. ७:१३, १४) यहोवा अशा प्रयत्नांवर आशीर्वाद देतो यात काहीच शंका नाही.

१२ येशूप्रमाणे आज आपणही दीन लोकांना त्यांची आध्यात्मिक गरज ओळखण्यास मदत करतो. (मत्त. ५:३) जे लोक चांगला प्रतिसाद देतात त्यांची आध्यात्मिक गरज आपण देवाची सुवार्ता सांगून पुरवत असतो. (रोम. १:१) जे राज्याचा संदेश स्वीकारतात त्यांना येशू ख्रिस्ताद्वारे देवासोबत चांगला नातेसंबंध जोडणे शक्य होते. (२ करिंथ. ५:१८, १९) तर मग, सुवार्ता घोषित करण्याद्वारे आपण खरोखरच आपल्या शेजाऱ्‍यांवर एका महत्त्वपूर्ण मार्गाने प्रेम दाखवतो.

१३. राज्य प्रचारक या नात्याने सुवार्ता सांगण्याच्या कामात सहभागी होण्याबद्दल तुम्हाला काय वाटते?

१३ परिणामकारक पुनर्भेटी आणि बायबल अभ्यास यांच्या साहाय्याने देवाचे नीतिमान स्तर समजून घेण्यास लोकांना मदत करण्याचे समाधान आपल्याला मिळते. या मदतीमुळे बायबल विद्यार्थ्याच्या जीवनात बरेच बदल घडून येऊ शकतात. (१ करिंथ. ६:९-११) “सार्वकालिक जीवनासाठी” ज्यांची योग्य मनोवृत्ती आहे अशा लोकांना देव त्यांच्या जीवनात आवश्‍यक बदल करण्यास व त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत करतो. आपण जेव्हा ही गोष्ट पाहतो तेव्हा आपल्याला खरोखरच खूप आनंद होतो. (प्रे. कृत्ये १३:४८) देवाच्या या मदतीमुळे अनेकांच्या जीवनात, निराशेची जागा आनंदाने घेतली आहे आणि अवाजवी चिंतांची जागा स्वर्गीय पित्यावरील त्यांच्या भरवशाने घेतली आहे. नवीन लोक आध्यात्मिक प्रगती करतात हे पाहून आपल्याला किती आनंद होतो! राज्य प्रचारक या नात्याने शेजाऱ्‍यांवर एका उत्तम मार्गाने प्रेम दाखवणे हा खरोखरच एक आशीर्वाद आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

प्रेमाविषयीचे देवप्रेरित स्पष्टीकरण

१४. स्वतःच्या शब्दांत, १ करिंथकर १३:४-८ मधील प्रेम या गुणाचे काही पैलू सांगा.

१४ शेजाऱ्‍यांसोबत व्यवहार करताना आपण पौलाच्या शब्दांचे अनुकरण केले, तर आपल्याला अनेक समस्या टाळता येतील, आनंदी राहता येईल आणि देवाकडून अनेक आशीर्वादही आपल्याला मिळतील. (१ करिंथकर १३:४-८ वाचा.) पौलाने प्रेम या गुणाबद्दल काय सांगितले आणि शेजाऱ्‍यांसोबतच्या व्यवहारात आपण त्याचे शब्द कसे लागू करू शकतो यावर आपण थोडक्यात चर्चा करू या.

१५. (क) आपण सहनशील व दयाळू का असले पाहिजे? (ख) आपण हेवा करण्याचे आणि स्वतःची बढाई मारण्याचे का टाळले पाहिजे?

१५ “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे.” ज्या प्रकारे देवाने अपरिपूर्ण मानवांसोबत व्यवहार करताना सहनशीलता आणि दया दाखवली आहे त्याच प्रकारे जेव्हा इतर जण काही चुका करतात, अविचारीपणे किंवा अगदी कठोरपणे वागतात तेव्हा आपणही सहनशीलता आणि दया दाखवली पाहिजे. “प्रीती हेवा करत नाही.” तेव्हा, आपण जर खरे प्रेम दाखवले तर इतरांजवळ असलेल्या वस्तू किंवा मंडळीमध्ये त्यांना मिळालेले बहुमान आपल्याला मिळावेत अशी अपेक्षा आपण करणार नाही. इतकेच नाही, तर प्रेम असल्यास आपण गर्वाने फुगणार नाही किंवा स्वतःची बढाई मारणार नाही. कारण, “उन्मत दृष्टी व गर्विष्ठ हृदय आणि दुष्टांचा दीपही पाप आहेत.”—नीति. २१:४, पं.र.भा.

१६, १७. आपण १ करिंथकर १३:५, ६ नुसार कसे वागू शकतो?

१६ प्रेम आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यासोबत आदरपूर्वक वागण्यास प्रवृत्त करेल. आपण त्याच्याशी खोटे बोलणार नाही, त्याचे काही चोरणार नाही किंवा यहोवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन होईल अशा प्रकारे त्याच्यासोबत वागणार नाही. प्रेम असल्यास आपण फक्‍त स्वतःचेच हित पाहणार नाही तर इतरांचाही विचार करू.—फिलिप्पै. २:४.

१७ एखाद्या व्यक्‍तीत खरे प्रेम असल्यास ती लवकर चिडत नाही आणि कोणी तिच्याशी वाईट वागल्यास तिचे “अपकार स्मरत नाही.” म्हणजेच, खातेवहीत नोंद केली जाते त्या प्रकारे ती एखाद्याचे अपराध आठवणीत ठेवत नाही. (१ थेस्सलनी. ५:१५) आपण जर कोणाप्रती राग बाळगला तर आपण यहोवाला खूश करू शकत नाही. इतकेच नाही तर मनात राग बाळगल्यामुळे आपण स्वतःचे व इतरांचेही नुकसान करत असतो. (लेवी. १९:१८) प्रेम आपल्याला सत्याप्रती आनंदित होण्यास प्रवृत्त करते, पण खरे प्रेम “अनीतीत आनंद मानत नाही.” म्हणजे, कोणाचे वाईट झाल्यास, मग तो आपला द्वेष करणारा असला तरीही आपल्याला आनंद होत नाही.—नीतिसूत्रे २४:१७, १८ वाचा.

१८. १ करिंथकर १३:७, ८ या वचनांतून आपल्याला प्रेम या गुणाबद्दल काय शिकायला मिळते?

१८ पौलाने प्रेमाबद्दल पुढे काय स्पष्टीकरण दिले ते आपण पाहू या. त्याने म्हटले की प्रेम “सर्व काही सहन करते.” कोणी जर आपले मन दुखवले पण त्याबद्दल क्षमा मागितली तर प्रेम असल्यास आपण त्याला माफ करू. प्रेम देवाच्या वचनात दिलेले “सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते” आणि आध्यात्मिक अन्‍नाबद्दल कृतज्ञ असण्यास आपली मदत करते. प्रेम बायबलमध्ये देण्यात आलेल्या सर्व अभिवचनांची “आशा धरते” आणि इतरांनाही आपल्या आशेबद्दल सांगण्यास प्रवृत्त करते. (१ पेत्र ३:१५) तसेच, अडचणीत असतानाही पुढे काही चांगले होईल अशी आपण आशा धरतो व यासाठी प्रार्थनाही करतो. प्रेम “सर्वांसंबंधाने धीर धरते.” आपल्या विरुद्ध कोणी पाप केल्यास, आपली परीक्षा होत असल्यास किंवा इतर समस्यांना तोंड देतानाही प्रेमामुळे आपण धीर दाखवतो. इतकेच नाही तर प्रेम “कधी संपत नाही” (ईझी-टू-रीड व्हर्शन). प्रामाणिक अंतःकरणाचे लोक सदासर्वकाळ प्रेम दाखवत राहतील.

आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखे प्रेम करत राहा

१९, २०. शेजाऱ्‍याप्रती प्रेम दाखवत राहण्यासाठी शास्त्रवचनांतील कोणता सल्ला आपल्याला मदत करेल?

१९ बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करत राहणे शक्य होते. हे प्रेम आपण फक्‍त आपल्यासारखी पार्श्‍वभूमी असलेल्यांवरच नाही तर सर्वांवर दाखवतो. येशूने जे म्हटले होते ते आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. त्याने म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.” (मत्त. २२:३९) आपण आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करावे अशी अपेक्षा देव आणि ख्रिस्त दोघेही करतात. एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपल्या शेजाऱ्‍यासोबत कसे वागावे हे समजत नसल्यास आपण देवाला त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपली मदत करण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. असे केल्यास यहोवा आपल्याला अनेक आशीर्वाद देईल आणि प्रेमळपणे वागण्यास मदत करेल.—रोम. ८:२६, २७.

२० शेजाऱ्‍यांवर स्वतःसारखे प्रेम करण्याच्या नियमाला “राजमान्य नियम” म्हणण्यात आले आहे. (याको. २:८) मोशेच्या नियमशास्त्रातील काही आज्ञांचा उल्लेख केल्यानंतर पौलाने म्हटले: “दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती कर,’ या वचनात आहे. प्रीती शेजाऱ्‍यांचे काही वाईट करत नाही म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय.” (रोम. १३:८-१०) म्हणून आपण आपल्या शेजाऱ्‍यांप्रती प्रेम दाखवत राहिले पाहिजे.

२१, २२. आपण देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम का केले पाहिजे?

२१ शेजाऱ्‍यावर प्रेम का केले पाहिजे याबद्दल मनन करताना, येशूने त्याच्या पित्याबद्दल जे म्हटले त्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्याने म्हटले, की “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.” (मत्त. ५:४३-४५) आपला शेजारी नीतिमान असो वा अनीतिमान आपण त्याच्यावर प्रेम करत राहिले पाहिजे. आधी सांगितल्याप्रमाणे प्रेम दाखवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे शेजाऱ्‍यांना राज्याचा संदेश सांगणे. जे लोक सुवार्तेला चांगला प्रतिसाद देतात त्यांच्याकरता भविष्यात किती मोठे आशीर्वाद राखून ठेवले आहेत!

२२ यहोवावर अटीविना प्रेम करण्याची बरीच कारणे आपल्याजवळ आहेत. तसेच, शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवण्याचेही अनेक मार्ग आहेत. आपण जेव्हा देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यांवर प्रेम दाखवतो तेव्हा येशूने यासंबंधी जे म्हटले त्याप्रती आपण आदर दाखवत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे असे केल्याने आपण आपला स्वर्गातील पिता यहोवा याला आनंदित करत असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा