मुख्य विषय | बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा
बायबल वाचनाची आवड कशी निर्माण कराल?
तुम्हाला बायबल वाचन कसं वाटतं? बोरींग? की तजेला देणारं? तुम्ही वाचन कसं करता यावर बरंच काही अवलंबून आहे. तुम्ही आवडीने आणि आनंदाने कसं वाचू शकाल यासाठी पुढे काही सल्ले दिल्या आहेत.
आधुनिक आणि भरवशालायक भाषांतर निवडा. जर तुम्ही असं भाषांतर निवडाल ज्यात जुने आणि समजायला कठीण शब्द असतील, तर ते वाचायला तुम्हाला आवडणार नाही. असं भाषांतर निवडा जे वाचायला सोपं आणि हृदयाला स्पर्श करणारं असेल. पण हेही लक्षात असू द्या की, भाषांतर अचूक आणि काळजीपूर्वक रितीने केलं असलं पाहिजे.a
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. आज बायबल फक्त पुस्तकाच्या स्वरूपातच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक स्वरूपातदेखील उपलब्ध आहे. काही बायबल ऑनलाईन वाचली जाऊ शकतात, तर काही कम्प्यूटर, टॅब आणि मोबाईलवर डाऊनलोड करून वाचली जाऊ शकतात. काही इलेक्ट्रॉनिक आवृत्त्यांमध्ये अशी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे तुम्ही बायबलमध्ये एकाच विषयावरची सर्व वचनं पाहू शकता किंवा एकाचवेळी बायबलची वेगवेगळी भाषांतरं पडताळून पाहू शकता. जर तुम्हाला वाचन करण्याऐवजी, ऐकण्याची आवड असेल, तर काही भाषांमध्ये बायबल ऑडियो स्वरूपातही उपलब्ध आहे. अनेक लोक प्रवास करताना, घरातली कामं करताना बायबल ऐकण्याचा आनंद घेतात. यांपैकी एक पद्धत तुम्ही वापरून पाहू शकता का?
बायबल अभ्यासासाठी असलेल्या साधनांचा वापर करा. बायबल अभ्यासाची साधनं वापरल्याने, तुम्हाला वाचनातून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. जसं की, बायबलमध्ये उल्लेख केलेल्या ठिकाणांचे नकाशे. वाचन करत असताना जेव्हा ठिकाणांचा उल्लेख येतो, तेव्हा यांच्या मदतीने बायबल काळातल्या घटना कुठे घडल्या हे तुम्हाला समजू शकेल. नियतकालिकांतील किंवा jw.org वरील “बायबल टिचींग्स” या विभागातील लेखांमुळे, तुम्ही बायबलमधल्या अनेक भागांचा अर्थ समजू शकता.
वेगवेगळ्या पद्धतीने वाचन करा. जर बायबल सुरुवातीच्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचणं तुम्हाला अवघड वाटत असेल, तर आवड वाढवण्यासाठी अशा भागापासून सुरुवात करा, जो तुम्हाला जास्त आवडतो. जर तुम्हाला बायबलमधल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही एक-एक करून त्या व्यक्तींचे अहवाल वाचू शकता. बायबल वाचनाची एक पद्धत “बायबलबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी त्यातील व्यक्तींविषयी जाणून घ्या” या चौकटीत देण्यात आली आहे. किंवा तुम्ही विषयानुसार अथवा घटना घडल्या त्या क्रमानुसार देखील वाचन करू शकता. यांपैकी तुम्ही एखादी पद्धत वापरून बघू शकता का?
a न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स हे भाषांतर अनेकांना अचूक, भरवशालायक आणि वाचण्यासाठी सोपं असल्याचं जाणवलं आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेलं हे बायबल भाषांतर १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही jw.org या वेबसाईटवरून किंवा JW लायब्ररी ॲपवरून हे डाऊनलोड करू शकता किंवा यहोवाचे साक्षीदार तुम्हाला याची छापील प्रत घरी आणून देतील.