मुख्य विषय | बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा
बायबलमुळे माझं जीवन कसं सुधारू शकतं?
बायबल एक खास पुस्तक आहे. कारण यात आपल्या निर्माणकर्त्याने दिलेला सल्ला आहे. (२ तीमथ्य ३:१६) त्यात दिलेल्या संदेशाचा आपल्यावर मोठा प्रभाव पडू शकतो. बायबलमध्ये म्हटलं आहे: “कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . आहे.” (इब्री लोकांस ४:१२) बायबलमध्ये आपलं जीवन सुधारण्याची शक्ती आहे. ते दोन मार्गांनी आपल्याला मदत करतं. एक म्हणजे त्यामध्ये आपल्या रोजच्या जीवनासाठी मार्गदर्शन दिलं आहे आणि दुसरं म्हणजे त्याद्वारे आपण देवाला आणि त्याने आपल्याला कोणती अभिवचनं दिली आहेत, हे जाणू शकतो.—१ तीमथ्य ४:८; याकोब ४:८.
आपलं आजचं जीवन सुधारणं. बायबल आपल्याला वैयक्तिक जीवनात मदत करू शकतं. ते पुढील गोष्टींवर व्यावहारिक मदत देतं.
इतरांशी आपले नातेसंबंध.—इफिसकर ४:३१, ३२; ५:२२, २५, २८, ३३.
भावनिक आणि शारीरिक आरोग्य.—स्तोत्र ३७:८; नीतिसूत्रे १७:२२.
नैतिक मुल्यं.—१ करिंथकर ६:९, १०.
आर्थिक समृद्धी.—नीतिसूत्रे १०:४; २८:१९; इफिसकर ४:२८.a
आशिया खंडात राहणाऱ्या एका जोडप्याला, बायबलमध्ये दिलेला सल्ला किती मोलाचा आहे हे पटलं. नुकतंच लग्न झालेल्या अनेक जोडप्यांसारखंच, त्यांनादेखील एकमेकांशी जुळवून घेणं आणि संवाद साधणं कठीण होतं. पण त्यांनी जे बायबलमध्ये वाचलं ते लागू करायला सुरुवात केली. याचा काय परिणाम झाला? पती विन्सेंट म्हणतो: “मी जे बायबलमध्ये वाचलं, त्यामुळे मला आमच्या विवाहातल्या समस्या प्रेमळपणे सोडवण्यासाठी मदत मिळाली. बायबलनुसार वागल्याने आम्ही दोघं एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहोत.” त्याची पत्नी ऑनलू म्हणते: “बायबलमधली उदाहरणं वाचल्याने आम्हाला मदत झाली. माझ्या वैवाहिक जीवनात आणि आम्ही जी ध्येयं ठेवली आहेत त्याबद्दल मी आनंदी आणि समाधानी आहे.”
देवाला जवळून जाणणं. आपल्या विवाहाबद्दल तर विन्सेंट समाधानी आहेच, पण तो पुढे हेही म्हणतो: “बायबल वाचल्यामुळे मी यहोवाच्याb आणखी जवळ आलो आहे.” विन्सेंटने जे म्हटलं त्यातून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे बायबल आपल्याला देवाला जाणून घ्यायला मदत करते. असं केल्याने, त्याच्याकडून मिळालेल्या सल्ल्याने आपल्याला फायदा तर होतोच, पण तो आपला चांगला मित्र कसा होऊ शकतो हेही आपण जाणू शकतो. आपल्याला हेदेखील शिकायला मिळतं, की त्याने आपल्यासाठी एक सुंदर भविष्य ठेवलं आहे. तेव्हा आपण “खरे जीवन” जगू, जे सदासर्वकाळासाठी असेल. (१ तीमथ्य ६:१९) अशी आशा इतर कोणतंही दुसरं पुस्तक देऊ शकत नाही.
जर तुम्ही बायबल वाचन सुरू केलं आणि ते नियमितपणे चालू ठेवलं तर तुम्हालाही हे फायदे मिळू शकतात. म्हणजे आज तुमचं जीवन सुधारू शकतं आणि तुम्ही देवाला जवळून जाणू शकता. पण जसजसं तुम्ही बायबल वाचू लागाल, तसतसं तुमच्या मनात अनेक प्रश्नं येतील. जेव्हा असे प्रश्नं येतील तेव्हा तुम्ही पहिल्या शतकातल्या कुशी अधिकाऱ्याचं उदाहरण लक्षात ठेवू शकता. त्याच्या मनात बायबलबद्दल अनेक प्रश्नं होते. त्याला जेव्हा विचारलं गेलं, की जे तो वाचत होता ते त्याला समजत होतं का, तो म्हणाला: “कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?”c मग त्याने फिलिप्पाकडून लगेच मदत स्वीकारली, जो येशूच्या सुरुवातीच्या शिष्यांपैकी होता आणि बायबलचा कुशल शिक्षक होता. (प्रेषितांची कृत्ये ८:३०, ३१, ३४) त्याचप्रमाणे, जर तुम्हाला बायबलबद्दल आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही कृपया www.jw.org वर ऑनलाईन अर्ज भरा किंवा या नियतकालिकात जो जवळचा पत्ता असेल त्यावर संपर्क करा, अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या सभागृहालाही भेट देऊ शकता. मग आजच बायबलचं वाचन सुरू करा आणि ते तुम्हाला एका चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करेल.
आपण बायबलवर पूर्ण भरवसा ठेवू शकतो का? असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो? हा व्हिडिओ पाहा. तुम्ही jw.org/mr > प्रकाशने > व्हिडिओ वर जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता
a बायबलमध्ये दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांची आणखी उदाहरणं पाहण्यासाठी jw.org या आमच्या वेबसाईटवर BIBLE TEACHINGS > BIBLE QUESTIONS ANSWERED. इथं पाहा.
b बायबलमध्ये देवाचं नाव यहोवा असं दिलं आहे.
c याच अंकात दिलेला “हा फक्त छोटासा गैरसमज आहे का?” हा लेखदेखील पाहा.