२२-२८ जून, २०२६
गीत ९० एकमेकांना प्रोत्साहन देऊ या!
सांत्वन देणाऱ्या देवाकडून शिका
“देवाकडून मिळणाऱ्या या सांत्वनाद्वारे आपल्यालाही इतरांचं . . . सांत्वन करता यावं.”—२ करिंथ. १:४.
या लेखात:
यहोवा आपलं सांत्वन कसं करतो आणि इतरांनी त्याच्यासारखं सांत्वन कसं केलं, तसंच आपणही एकमेकांचं सांत्वन कसं करू शकतो ते पाहा.
१. आपण इतरांचं सांत्वन का केलं पाहिजे?
आपल्या सगळ्यांनाच “वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमुळे दुःख” सोसावं लागतं. त्यामुळे आपल्याला सांत्वनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. (१ पेत्र १:६) आपल्याला इतरांकडून सांत्वन मिळतं तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. तसंच आपण इतरांना लगेच सांत्वन देतो तेव्हा त्यांनाही त्याचा फायदा होतो. (मत्त. ७:१२) यहोवा “सगळ्या प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे.” एकमेकांना सांत्वन देण्याच्या बाबतीत आपण यहोवासारखं वागू शकतो. (२ करिंथ. १:३, ४; १ थेस्सलनी. ४:१८) आपण फक्त सांत्वन द्यायचं म्हणून देत नाही, तर आपलं भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांना सांत्वन देतो. तर चला, या लेखात आपण तीन गोष्टींवर चर्चा करू या. (१) बायबलमध्ये सांत्वन या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय, (२) आपण इतरांचं सांत्वन कसं करू शकतो, आणि (३) आपल्याला सांत्वनाची गरज असते तेव्हा आपण काय करू शकतो.
बायबलमध्ये सांत्वन या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय
२. बायबलमध्ये “सांत्वन” या शब्दासाठी वापरलेल्या शब्दाचा काय अर्थ होतो?
२ बायबलमध्ये “सांत्वन” यासाठी वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचं भाषांतर, वचनाच्या मागच्या पुढच्या संदर्भाचा विचार करून केला गेलाय. बऱ्याच वेळेस त्याचा अर्थ एखाद्याला “प्रोत्साहन देणं” असा होतो. (रोम. १२:८) या शब्दाचा शाब्दिक अर्थ “मदतीसाठी एखाद्याला बोलावणं” असासुद्धा होतो. हे समजायला समस्येत असलेल्या एका व्यक्तीचा विचार करा. त्याला दुःखात पाहून त्याची मदत करायला त्याचा मित्र लगेच धावून येतो. त्या मित्राने सांत्वन देण्यासाठी कोणत्याही प्रकारे मदत केली, तर त्या व्यक्तीला बळ मिळतं आणि त्याचा विश्वास मजबूत होतो.
३. बर्णबाने इतरांना सांत्वन देण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण कसं मांडलं? (चित्रसुद्धा पाहा.)
३ बायबलमधल्या एका उदाहरणाचा विचार करा. पहिल्या शतकात योसेफ नावाचा एक व्यक्ती होता. तो इतरांना खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन आणि सांत्वन देऊ शकत होता. म्हणून प्रेषितांनी त्याचं नाव बदलून बर्णबा ठेवलं. त्याचा अर्थ “सांत्वनाचा मुलगा” होतो. (प्रे. कार्यं ४:३६) बायबलमध्ये यानंतर त्याचा कधीच योसेफ या नावाने उल्लेख करण्यात आलेला नाही. तो अगदी त्याच्या नावाप्रमाणे जगला. भाऊबहिणींना जेव्हाजेव्हा मदतीची गरज असायची तेव्हातेव्हा तो त्यांच्या मदतीला धावून जायचा. नुकताच ख्रिस्ती बनलेला शौल यरुशलेमला आला तेव्हा त्याला प्रेषितांना भेटायचं होतं. पण तो आधी ख्रिश्चनांचा छळ करायचा. त्यामुळे प्रेषितांना त्याची भीती वाटत होती. पण बर्णबा मात्र घाबरला नाही. त्याने शौलवर पूर्ण भरवसा असल्याचं दाखवलं आणि प्रेषितांसोबत त्याची भेट घालून दिली.—प्रे. कार्यं ९:२६-२८.
बर्णबा त्याच्या नावाला जागला (परिच्छेद ३ पाहा)
आपण इतरांचं सांत्वन कसं करू शकतो
४. सांत्वन द्यायचा एक चांगला मार्ग कोणता आहे? (रोमकर १:११, १२)
४ शक्य असेल तर त्यांना भेटा. यहोवा त्याच्या सेवकांचा वापर करून इतरांना सांत्वन देतो. त्याने एका स्वर्गदूताचा वापर करून निराश झालेल्या एलीया संदेष्ट्याला सांत्वन दिलं. (१ राजे १९:४-७) प्रेषित पौललासुद्धा या गोष्टीची जाणीव होती, की भाऊबहिणींना भेटून सांत्वन दिल्यामुळे त्यांना त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. (रोमकर १:११, १२ वाचा.) जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटायला जाता, तेव्हा लगेच तिथून निघायची घाई करू नका. त्याला सांत्वन द्यायला पुरेसा वेळ द्या. (१ करिंथ. १६:७) पण तुम्हाला एखाद्याला भेटणं शक्य नसेल, तर तुम्ही त्याला कॉल करू शकता, पत्र लिहू शकता, एखादं कार्ड पाठवू शकता किंवा फोनवरून एखादा मेसेजही पाठवू शकता. खरंतर यहोवा तुमचा वापर करून एखाद्याला सांत्वन देऊ शकतो. मग तुम्ही त्याला तसं करू द्याल का?
५. सांत्वन देताना आपल्याला कदाचित काय करणं कठीण जाऊ शकतं?
५ जसजसा अंत जवळ येतोय, तसतशी परिस्थिती आणखीनच वाईट होत चालली आहे. त्यामुळे भाऊबहिणींना प्रत्यक्ष भेटून सांत्वन देणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. पौल जेव्हा रोममध्ये कैदेत होता, तेव्हा त्याला सांत्वन देण्यासाठी अनेसिफर तिथे गेला. तिथे गेल्यामुळे आपल्याला कैद केलं जाईल किंवा आपला जीव जाईल याची त्याने पर्वा केली नाही. (२ तीम. १:१६-१८) आजसुद्धा रशियातल्या भाऊबहिणींनी अनेसिफरसारखीच मनोवृत्ती दाखवली आहे. कैदेत असलेल्या भाऊबहिणींना सुनावणीसाठी न्यायालयात आणलं जातं, तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्यायला इतर भाऊबहीण तिथे जातात. असं केल्यामुळे खरंतर त्यांनाही अटक होऊ शकते, पण तरी ते त्यांना पाठिंबा द्यायला तिथे जातात. तुमच्यावरही भाऊबहिणींना अशाच प्रकारे सांत्वन द्यायची वेळ येऊ शकते. मग त्यासाठी तुम्ही आजच तयारी कशी करू शकता? आजच्या आणि जुन्या काळातल्या देवाच्या लोकांनी एकमेकांना कसं सांत्वन दिलं आणि छळ होत असतानाही ते आनंदी कसे राहिले याबद्दल अभ्यास केल्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते.
६. आपण इतरांना यहोवासारखं सांत्वन कसं देऊ शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
६ त्यांचं धीराने ऐकून घ्या. एलीया संदेष्ट्याला आपला जीव धोक्यात असल्याचं जाणवलं, तेव्हा त्याने यहोवाला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्याला नेमकं कसं वाटतंय या गोष्टीची यहोवाला पूर्ण जाणीव होती, तरी यहोवाने त्याचं बोलणं ऐकून घेतलं. एलीया एकच गोष्ट वारंवार सांगत होता तरी यहोवा त्याच्याशी धीराने वागला. (१ राजे १९:९, १०, १४) यहोवा हबक्कूशीही असंच वागला. हबक्कूकने त्याच्या चिंता आणि शंका यहोवासमोर मांडल्या तेव्हा यहोवाने त्याचं धीराने ऐकून घेतलं. (हब. १:२, ३) आजही आपल्याला कशाची गरज आहे हे यहोवाला माहीत असतं. तरीसुद्धा तो आपल्या प्रार्थना लक्ष देऊन ऐकतो. मग आपणसुद्धा यहोवासारखं कसं वागू शकतो? आपले भाऊबहीण आपल्याला त्यांच्या चिंता सांगतात तेव्हा आपण त्यांचं लक्ष देऊन ऐकू शकतो. ते वारंवार एकच गोष्ट बोलत असले किंवा रागात काही चुकीचं बोलले तरी आपण त्यांच्याशी धीराने वागू शकतो. असं केल्यामुळे आपण त्यांचा आदर करत असल्याचंही दाखवतो.—याको. १:१९; उप. ७:९.
भाऊबहीण तुमच्याशी बोलत असताना त्यांचं लक्षपूर्वक ऐकून यहोवासारखं वागा (परिच्छेद ६ पाहा)
७. समोरच्याला कशाची गरज आहे हे आपण कसं ओळखू शकतो?
७ समोरच्याची गरज ओळखा. आपण यहोवासारखं कोणाचंही मन ओळखू शकत नाही. त्यामुळे समोरच्याला कशाची गरज आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्याचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आपल्यावर त्याच्यासारखीच समस्या आली तर आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडू शकते हे आपल्याला कदाचित माहीत असेल. आणि त्यालाही त्याच गोष्टीची गरज असेल असा आपण विचार करू. पण लक्षात असू द्या, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. म्हणून थोडा वेळ घ्या, लक्ष देऊन ऐका आणि त्याला नेमकी कशाची गरज आहे हे जाणून घ्यायला त्याला प्रश्न विचारा.—नीति. २०:५.
८. येशूने मार्था आणि मरीयाला कशा प्रकारे सांत्वन दिलं? (चित्रंसुद्धा पाहा.)
८ लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशूने मार्था आणि मरीयाला कशा प्रकारे सांत्वन दिलं याचा विचार करा. त्या दोघींवरही एकच संकट कोसळलं होतं. पण तरी येशूने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सांत्वन दिलं. मार्था येशूशी बोलली तेव्हा येशूने तिला पुनरुत्थानाबद्दल सांगितलं आणि यावरचा तिचा विश्वास मजबूत करायला तिला मदत केली. पण जेव्हा मरीया त्याच्याकडे रडत आली, तेव्हा त्याने तिला पुनरुत्थानाबद्दल सांगितल्याचं आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळत नाही. उलट, तो तिच्यासोबत रडला आणि लाजरला कुठे ठेवलंय असं त्याने तिला विचारलं. (योहान ११:२०-३५) यातून आपण काय शिकतो? प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला एकाच प्रकारे सांत्वन देण्याऐवजी त्याची गरज ओळखून त्याला सांत्वन द्या.
इतरांना सांत्वन देत असताना त्यांना नेमकी कशाची गरज आहे हे ओळखा (परिच्छेद ८ पाहा) a
९. आपण इतरांना बायबलमधून सांत्वन कसं देऊ शकतो? (रोमकर १५:४, ५)
९ बायबलचा वापर करा. एखाद्याला सांत्वन द्यायला तुम्ही शास्त्रवचनांचा वापर करता, तेव्हा तुम्ही त्याची आशा पक्की करायला त्याला मदत करत असता. (रोमकर १५:४, ५ वाचा.) या आशेमुळे त्याला सांत्वन आणि प्रोत्साहन मिळू शकतं. (यश. ४०:३१) मग तुम्ही अशी वचनं कशी शोधाल? काही जण अशा वचनांची एक यादी करून ठेवतात. ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं या पुस्तकातल्या “सांत्वन” या विषयाखालीसुद्धा तुम्हाला अशी वचनं सापडू शकतात. प्रोत्साहन देण्यासाठी वचनांचा चांगल्या प्रकारे वापर करता यावा, म्हणून तुम्ही यहोवाला मदत मागू शकता. यहोवा त्याची पवित्र शक्ती देऊन गरजेच्या वेळी ती वचनं आठवायला तुम्हाला मदत करू शकतो.—योहान १४:२६.
१०. सांत्वन देताना आपण प्रेमाने का बोललं पाहिजे?
१० प्रेमळपणे बोला. इतरांना सांत्वन देण्यात, समस्येकडे बघायाचा त्यांचा दृष्टिकोन बदलायाला मदत करणंसुद्धा सामील आहे. त्यामुळे विचार करून बोला. कारण आपला उद्देश त्यांना सांत्वन द्यायचा आहे, त्यांना दुखवायचा नाही. (नीति. १२:१८) यहोवानेही एलीयासोबत बोलताना असंच केलं. एलीयाला असं वाटत होतं, की त्याच्या कामाची कोणालाच किंमत नाही आणि इस्राएलमधले सगळे यहोवाला सोडून गेले आहेत. पण यहोवाने थेटपणे त्याची चूक दाखवून देण्याऐवजी प्रेमाने त्याचा दृष्टिकोन बदलायला मदत केली. (१ राजे १९:१५-१८) आपणही असंच करू शकतो. मंडळीत भाषण देताना किंवा उत्तरं देताना आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा विश्वास मजबूत होईल अशा प्रकारे आपण बोललं पाहिजे.
११. समस्येत असलेल्यांना कशाची गरज असते? (१ योहान ३:१८)
११ व्यावहारिक मदत करा. समस्येत असलेल्यांना सांत्वनासाठी शब्दांपेक्षा व्यावहारिक मदतीची जास्त गरज असते. (१ योहान ३:१८ वाचा.) याबाबतीत बर्णबाने एक चांगलं उदाहरण मांडलं. त्याने त्याच्याकडची काही जमीन विकली आणि मिळालेल्या पैशांतून गरजू भाऊबहिणींना मदत केली. (प्रे. कार्यं ४:३६, ३७) आज आपले भाऊबहीणही गरजू भाऊबहिणींची व्यावहारिक मार्गांनी मदत करतात. पोलंडमध्ये राहणाऱ्या गॅब्रीएलाचं घर पुरात उध्वस्त झालं होतं. ती म्हणते: “मी आणि माझे आईवडील खूप घाबरून गेलो होतो. आम्हाला खूप चिंता वाटत होती. काय करायचं काहीच सूचत नव्हतं. पण जवळच्या मंडळीतल्या भावांनी येऊन आमच्या घराची एका दिवसात दुरुस्ती करून दिली. या अनुभवामुळे यहोवा त्याच्या लोकांचा वापर करून आपल्याला सांत्वन देतो यावरचा माझा भरवसा आणखी वाढला.”
१२. आपण समस्यांचा धीराने सामना केल्यामुळे इतर भाऊबहिणींना कशी मदत होऊ शकते?
१२ समस्यांचा धीराने सामना करा. थेस्सलनीकामधले भाऊबहीण छळाचा सामना करत असतानाही यहोवाला विश्वासू राहिले. पौलने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याला खूप प्रोत्साहन मिळालं. (१ थेस्सलनी. ३:५-८) यामुळे पौललाही इतरांना सांत्वन द्यायची प्रेरणा मिळाली. त्याला कळलं, की त्याने जर धीराने समस्यांचा सामना केला, तर इतर भाऊबहिणींनाही सांत्वन मिळेल; मग तो त्यांना कधी भेटला नसला तरीही. (कलस्सै. २:१, २) अगदी तसंच, समस्यांचा धीराने सामना करायला यहोवा आपल्याला कशी मदत करतो, हे आपले भाऊबहीण बघतात तेव्हा त्यांनाही प्रोत्साहन मिळतं.
१३. इतरांना सांत्वन देताना आपण काय करणं गरजेचंय?
१३ धीर धरा. निराश झालेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपण बरीच मेहनत घेतो. पण कदाचित त्यांना लगेच सांत्वन मिळणार नाही. म्हणूनच, बायबल म्हणतं: ‘एकमेकांना प्रोत्साहन देत राहा.’ या वचनावरून कळतं, की आपण ते सतत केलं पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:११) त्यामुळे धीर धरा आणि सांत्वन देत राहा. (१ थेस्सलनी. ५:१४) पण, कधीकधी आपल्यालाही सांत्वनाची गरज असते. मग अशा वेळी आपण काय करू शकतो?
तुम्हाला सांत्वनाची गरज असते तेव्हा
१४-१५. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता सतावते तेव्हा तुम्ही काय करू शकता?
१४ यहोवाला प्रार्थना करा. तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता सतावते तेव्हा सांत्वनासाठी यहोवाला प्रार्थना करा. (स्तो. ९४:१९) तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे त्याला सांगा. (स्तो. ६२:८) हे खरंय, की यहोवाला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगण्याआधीच माहीत असतात. पण तरी तुम्ही मनापासून त्याला प्रार्थना करता, तेव्हा तुमचा त्याच्यावर विश्वास असल्याचं तुम्ही दाखवता. कदाचित तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. पण तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल याची तुम्ही खातरी ठेवू शकता. (मार्क ११:२४) फिलिप्पैकर ४:६, ७ मध्ये असं सांगितलंय: “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा. म्हणजे, सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करेल.”
१५ इतरांची मदत घ्या. तुम्हाला नेमकं कसं वाटतंय याबद्दल तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला किंवा वडिलांना सांगा. भाऊबहिणींना तुम्हाला मदत करायची इच्छा असते. पण जर तुम्हाला नेमकं कसं वाटतंय हे तुम्ही त्यांना सांगितलंच नाही तर त्यांना कसं कळेल? म्हणून मनातलं सगळं काही त्यांना सांगा. (नीति. १४:१०) शिवाय, त्यांना तुमचं ऐकून घ्यायला सांगा. तसंच, त्यांना ज्या वचनातून किंवा लेखातून सांत्वन मिळतं तो तुम्हाला दाखवायला सांगा.
१६. भाऊबहीण तुम्हाला सांत्वन द्यायचा प्रयत्न करतात तेव्हा काय होऊ शकतं आणि तुम्ही काय लक्षात ठेवू शकता?
१६ धीर धरा आणि माफ करायला तयार असा. भाऊबहीण तुम्हाला सांत्वन देतील तेव्हा तेही चुकू शकतात. कदाचित त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे तुम्हाला आणखी वाईट वाटेल. पण लगेच निराश होऊ नका. (१ करिंथ. १३:४, ७) याकोब ३:२ मधले शब्द नेहमी लक्षात ठेवा. तिथे असं म्हटलंय: “जर कोणी बोलण्यात चुकत नसेल, तर तो माणूस परिपूर्ण आहे.” भाऊबहिणींना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे हे विसरू नका. आणि हेसुद्धा लक्षात ठेवा, की त्यांचं “मन तर उत्सुक आहे, पण शरीर दुर्बळ आहे.”—मत्त. २६:४१.
१७. आपण काय करायचा निश्चय केला पाहिजे?
१७ आपल्या सर्वांनाच सांत्वनाची आणि प्रोत्साहनाची गरज असते. आणि ही गरज दिवसेंदिवस वाढतच जाईल. कारण आपण जसजसं अंताच्या जवळ जातोय, तसतसं देवाचे शत्रू आपला आणखी विरोध करतील. तर चला, आपण एकमेकांना सांत्वन देत राहायचा निश्चय करू या.
गीत १३० क्षमा करत राहा
a चित्राचं वर्णन: एक वडील एका भावाला सांत्वन देत आहेत. नुकताच त्याच्या बायकोचा मृत्यू झालाय. नंतर तेच वडील एका वयस्कर भावाला भेटायला जातात. त्यांच्या बायकोचा मृत्यू होऊन बरीच वर्षं झाली आहेत. आणि ते दोघे तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत.