२९ जून–५ जुलै, २०२६
गीत १३१ “देवाने जे जोडलंय”
तुमच्या जोडीदारासोबतची तुमची मैत्री घट्ट करा
“असाही एक मित्र असतो, जो भावापेक्षा जास्त जीव लावतो.”—नीति. १८:२४.
या लेखात:
पती-पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असले आणि त्यांचं यहोवावर प्रेम असलं तर त्यांचा विवाह आनंदी कसा होऊ शकतो, ते पाहा.
१. खरे मित्र यहोवाकडून मिळालेली भेट का आहे?
खरे मित्र यहोवाकडून मिळालेली एक भेट आहे. (याको. १:१७) त्यांचं यहोवावर प्रेम असतं आणि आपल्यावरही ते मनापासून प्रेम करतात. आपण आनंदी असतो, तेव्हा ते आपल्या आनंदात सहभागी होतात. आपण दुःखी असतो, तेव्हा ते आपलं सांत्वन करतात आणि आपल्याला गरज असते तेव्हा प्रामाणिकपणे सल्लाही देतात. ते नेहमी आपल्या मदतीला धावून येतात. खरंच, खऱ्या मित्रांमुळे “मनाला आनंद होतो.”—नीति. २७:९.
२. पती-पत्नींनी एकमेकांसोबतची मैत्री घट्ट करत राहणं का गरजेचंय? (मत्तय १९:६)
२ पती-पत्नींनी एकमेकांचे चांगले मित्र असणं खूप गरजेचंय. त्यांनी त्यांची मैत्री हलक्यात घेऊ नये, तर ती घट्ट करायला नेहमी मेहनत घेत राहावी. जर त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, तर त्यांना हळहळू एकटं वाटू शकतं, त्यांची चिडचिड होऊ शकते आणि एकमेकांचा रागही येऊ शकतो. पण जर ते त्यांचं मैत्रीचं नातं फुलवायला मेहनत घेत राहिले, तर त्यांचं नातं इतर कोणत्याही नात्यापेक्षा जास्त घट्ट बनेल. (मत्तय १९:६ वाचा.) म्हणूनच पती-पत्नी एकमेकांसोबतची मैत्री घट्ट कशी करू शकतात याबद्दल या लेखात आपण चर्चा करू. पण त्याआधी आपण पाहू, की अविवाहित भाऊबहीण एक चांगला जोडीदार कसा निवडू शकतात; असा जोडीदार जो आयुष्यभर त्यांचा चांगला मित्र बनून राहिल.
आयुष्यभर चांगला मित्र बनून राहिल असा जोडीदार निवडा
३-४. चांगला जोडीदार निवडायला कशामुळे मदत होऊ शकते? (नीतिवचनं १८:२२)
३ कोणताही मोठा निर्णय घेण्याआधी, तो निर्णय घेतल्यामुळे होणाऱ्या फायद्यांचा, धोक्यांचा आणि परिणामांचा विचार करणं खूप गरजेचंय. कारण या निर्णयांमुळे आपलं पूर्ण आयुष्यच बदलू शकतं. त्यामुळे विचार करून निर्णय घेणं खूप महत्त्वाचंय.
४ जोडीदार निवडणं हा आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे. यहोवाने विवाहाची व्यवस्था केल्यामुळे, चांगला जोडीदार निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन फक्त तोच देऊ शकतो. प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळावा असंच त्याला वाटतं. आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे, हे फक्त त्यालाच माहीत आहे. (नीतिवचनं १८:२२ वाचा; यश. ४८:१७, १८) म्हणून जर आपण त्याच्या वचनातल्या तत्वांचा वापर करून निर्णय घेतला, तर आपल्याला योग्य जोडीदार निवडायला मदत होऊ शकते.
५. जोडीदार निवडताना बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीचाच विचार करणं का गरजेचंय?
५ बाप्तिस्मा झाल्यावर आपण यहोवाचे मित्र बनतो. (स्तो. २५:१४) म्हणून जर तुम्ही लग्न करायचा विचार करत असाल, तर तुमच्या जोडीदारानेही यहोवाचा मित्र असणं खूप गरजेचंय. (१ करिंथ. ७:३९) जर तुम्ही असा जोडीदार निवडला, तर यहोवाच्या नैतिक स्तरांबद्दल कदर असल्याचं तुम्ही दाखवाल. तसंच, तुमचा जोडीदार यहोवाकडून भेट असल्याचंही तुम्ही समजाल. (नीति. १९:१४) इतकंच काय, तर विश्वासात नसलेल्या व्यक्तीसोबत “असमान जुवाखाली” लादले गेल्यामुळे येणाऱ्या समस्यांपासूनही तुम्ही वाचू शकाल. (२ करिंथ. ६:१४) जरा विचार करा: साक्षीदारांमध्ये हवा तसा जोडीदार मिळत नसल्यामुळे सत्यात नसलेल्या व्यक्तीशी डेटींग करणं आणि तो पुढे सत्यात येईल अशी आशा ठेवणं किती धोक्याचं आहे.
६-७. डेटींग करताना तुम्ही स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकता?
६ हे खरंय, की बाप्तिस्मा झालेली प्रत्येक व्यक्ती लग्नासाठी योग्य जोडीदार असते असं नाही. म्हणून जोडीदार निवडताना स्वतःला काही प्रश्न विचारा.a जसं की: ‘तो त्याच्या घरच्यांशी कसं वागतो? तो इतरांची पर्वा करतो का? तो इतरांचा आदर करतो का? त्याचे मित्र कसे आहेत? तो मतभेद कसे सोडवतो? तो स्वतःच्याच मतांवर अडून राहतो का? की बायबलचं तत्त्व मोडत नसेल, तर तडजोड करायला तयार असतो? पैशांबद्दल त्याचा दृष्टिकोन कसा आहे?’
७ तुम्ही आणखी काही प्रश्नांचा विचार करू शकता. जसं की: ‘त्याचं यहोवावर मनापासून प्रेम आहे का? “नवीन व्यक्तिमत्त्व” घालायला तो मेहनत घेत आहे का? यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करायला तो मला मदत करेल का? यहोवाच्या सेवेत आमची ध्येयं सारखी आहेत का? तो माझा सगळ्यात जवळचा मित्र बनेल असं मला वाटतं का?’ (कलस्सै. ३:९, १०) जर तुम्ही एक बहीण असाल तर तुम्ही विचार करू शकता, की तो मुलगा तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आणि एक चांगला मस्तक बनेल का? (१ करिंथ. ११:३) जर तुम्ही एक भाऊ असाल तर तुम्ही विचार करू शकता, की तुमच्यात कमतरता असूनही ती मुलगी तुमच्या अधीन राहिल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला वेळ लागू शकतो. म्हणून डेटींग करताना एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखून घ्यायचा प्रयत्न करा.
८-९. डेटींग करताना योग्य निर्णय घ्यायला कशामुळे मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
८ तुम्ही ज्याच्यासोबत डेटींग करत आहात तो नेमका कसा आहे हे जाणून घेणंही गरजेचंय. यासाठी इतर जण त्याच्याबद्दल काय विचार करतात याची तुम्हाला चौकशी करावी लागेल. लोकांमध्ये त्याचं नावं कसं आहे, त्याचे गुण कसे आहेत याचीही तुम्हाला खातरी करावी लागेल. उदाहरणार्थ, तो नम्र आहे का? तो इतरांशी प्रेमाने आणि समजूतदारपणे वागतो का? फ्रेंच गायानामधल्या साराने डॅनिएल नावाच्या भावासोबत लग्न केलं. ती म्हणते: “मी डॅनिएलच्या पायनियर पार्टनरकडे, त्याच्या मंडळीतल्या वडिलांकडे, आमच्या मित्रांकडे आणि त्याच्या मंडळीतल्या बहिणींकडे त्याच्याबद्दल चौकशी केली.” यासोबतच, तुम्ही ज्याच्यासोबत डेटींग करत आहात त्याला विचारा, की त्याच्या जीवनात आता किंवा आधी असं काही घडलंय का जे तुम्हाला माहीत असणं गरजेचंय. या गोष्टींबद्दल जर तुम्हाला आधीच माहीत असेल, तर तुम्हाला पुढे बऱ्याच समस्या टाळता येतील.
९ डेटींग करत असताना तुम्हाला त्याच्या काही गोष्टी खटकल्या, किंवा प्रौढ भाऊबहिणींनी त्याच्या कमतरतांबद्दल तुम्हाला काही सांगितलं, तर अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या सगळ्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केल्यावर त्याच्यासोबत डेटींग सुरू ठेवावं की नाही हे तुम्हाला ठरवता येईल.b तर आता आपण पाहू, की लग्न झालेली जोडपी त्यांची मैत्री घट्ट कशी करू शकतात.
डेटींग करताना समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा (परिच्छेद ८-९ पाहा)
एकमेकांसोबत वेळ घालवा—मैत्री घट्ट करा
१०. पती-पत्नींनी एकमेकांसाठी वेळ काढणं का गरजेचंय?
१० पती-पत्नी कितीही व्यस्त असले, तरी त्यांचं नातं घट्ट करायला त्यांनी ऐकमेकांसाठी वेळ काढणं खूप गरजेचंय. असं केल्यामुळे त्यांना दिवसभरातल्या गोष्टी एकमेकांना सांगता येतात. तसंच त्यांच्या मनात काय आहे, ते कसला विचार करत आहेत हेही एकमेकांना सांगता येतं. शिवाय, यामुळे त्यांना एकमेकांवर असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त करायची आणि सोबत मिळून करमणूक करायचीही संधी मिळते.
११. पती-पत्नीच्या नात्याला कशामुळे तडा जाऊ शकतो?
११ काही जणांनी नोकरीसाठी दुसऱ्या देशात जायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे त्यांना बराच काळ त्यांच्या कुटुंबापासून लांब राहावं लागतं. असं केल्यामुळे त्यांना पैसा तर कमवता येतो, पण त्यांच्या जोडीदारासोबतच्या त्यांच्या नात्याला मात्र तडा जाऊ शकतो. हे खरंय, की पती-पत्नीला काही कारणांमुळे थोड्या वेळासाठी वेगळं राहावं लागू शकतं. पण जे पती-पत्नी एकमेकांचे चांगले मित्र असतात, ते नेहमी सोबत राहायचा प्रयत्न करतात.
१२-१३. (क) काही जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवायला काय करतात? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) तुमच्यासाठी तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती महत्त्वाचं असलं पाहिजे? (“माझा जोडीदार माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे?” ही चौकट पाहा.)
१२ काही जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवायला काय करतात याचा विचार करा. गुआममध्ये राहणारी लिआ म्हणते: “मी आणि माझा नवरा सोबत मिळून बऱ्याच गोष्टी करतो. मी क्वचितच त्याला सोडून कुठे एकटी गेल्याचं मला आठवतं.” अमेरिकेतली रॉक्सेन म्हणते: “आम्ही दोघं खूप व्यस्त असतो. तरी आम्ही इतर महत्त्वाच्या गोष्टींसारखंच ऐकमेकांसाठी वेळ बाजूला काढतो.” (आमोस ३:३ सोबत तुलना करा.) फ्रान्समध्ये राहणारा डेमियन म्हणतो: “आम्ही एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो.” (मत्त. ७:१२) तसंच, अमेरिकेतली केटी म्हणते: “आम्ही सोबत असताना कधीकधी आमचे फोन बाजूला ठेवतो.”
१३ या सगळ्या गोष्टी करण्यासोबतच, यहोवाच्या सेवेत एकत्र वेळ घालवणंही महत्त्वाचंय. फ्रान्समध्ये राहणारी मिरियाम म्हणते: “आम्ही रोज सकाळी बायबल वाचतो आणि आम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या आणि त्या कशा लागू करता येतील याबद्दल एकमेकांशी बोलतो. हे सगळं मला खूप आवडतं.” मिरियाम पुढे म्हणते: “आम्ही सोबत मिळून प्रार्थना करतो, तेव्हा माझ्या नवऱ्याचं यहोवावर किती प्रेम आहे हे मला समजतं.” आधी उल्लेख केलेली केटी म्हणते: “आम्हाला सोबत मिळून प्रचार करायला खूप आवडतं. एकमेकांना प्रचारात बोलताना पाहून आमचं नातं आणखी घट्ट होतं. आणि आम्हाला एकमेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात.”—नीति. २७:१७.
नियमितपणे सोबत वेळ घालवून एकमेकांसोबतचं नातं घट्ट करा (परिच्छेद १२-१३ पाहा)
समस्येत असताना एकमेकांची साथ सोडू नका
१४-१५. लग्नात समस्या येतात तेव्हा जोडप्यांनी सोबत मिळून त्यांचा सामना करणं का गरजेचंय? उदाहरण द्या.
१४ अपरिपूर्ण असल्यामुळे लग्न झालेल्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच बायबल म्हणतं: “जे लग्न करतील त्यांना शारीरिक दुःखं सहन करावी लागतील.” (१ करिंथ. ७:२८) या वचनात सांगितलेली “शारीरिक दुःखं” म्हणजे अशी दुःखं, ज्यांचा सहसा सगळ्याच जोडप्यांना सामना करावा लागतो. मग अशी परिस्थिती येते तेव्हा सोबत मिळून तिचा सामना करणं आणि एकमेकांना जडून राहणं का गरजेचंय?
१५ एका उदाहरणाचा विचार करा. एखादी सुप्रसिद्ध इमारत जर खराब झाली, तर तिचे मालक तिच्याकडे असंच दुर्लक्ष करत नाहीत. उलट, तिची डागडुजी करण्यासाठी ते बरेच पैसे खर्च करतात आणि बऱ्याच साधनांचा वापर करतात. आणि या कामात काही वर्षंही लागू शकतात. पण ते इतकी मेहनत का घेतात? कारण त्यांच्यासाठी ती इमारत खूप मौल्यवान असते. अगदी तसंच, सगळ्याच पती-पत्नींचं नातं खूप मौल्यवान असतं. हे खरंय, की एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या पती-पत्नींमध्येही समस्या येऊ शकतात. पण जशी खराब झालेली इमारत दुरुस्त केली जाऊ शकते, तसंच पती-पत्नींचं नातंही पुन्हा मजबूत केलं जाऊ शकतं. पण यासाठी बराच वेळ द्यावा लागू शकतो आणि मेहनत घ्यावी लागू शकते. जेव्हा जोडपी असं करायला तयार असतात, तेव्हा ते यहोवाला खूप खूश करतात. (मला. २:१६) आणि असं करून ते फक्त एकमेकांवरच नाही, तर लग्नाची व्यवस्था करणाऱ्या यहोवावरही प्रेम करत असल्याचं आणि त्याचा आदर करत असल्याचं दाखवतात.
१६. १ करिंथकर १३:४-८क प्रमाणे, विवाहात समस्या असतात तेव्हा पती-पत्नीला कशामुळे मदत होऊ शकते? (चित्र आणि “मैत्री घट्ट कशी करता येईल?” ही चौकटसुद्धा पाहा.)
१६ लग्नात समस्या आल्या तर वेगळं व्हायची घाई करू नका. (१ करिंथ. ७:१०, ११) त्याऐवजी, तुमचं नातं मजबूत ठेवायला तुम्हाला आणखी काय करता येईल याचा विचार करा. प्रेम करण्याबद्दल बायबल काय सांगतं याचा विचार करा. तसंच, १ करिंथकर १३:४-८क (वाचा.) मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या जोडीदारावर प्रेम असल्याचं कसं दाखवता येईल याचा विचार करा. एकमेकांपासून वेगळं होण्याची कारणं शोधण्याऐवजी, एकमेकांसोबत राहण्याची कारणं शोधा. शिवाय, तुमचं नातं मजबूत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. आपल्या प्रकाशनांचा आणि व्हिडिओचाही तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. तसंच, मंडळीतले वडील आणि प्रौढ भाऊबहीणसुद्धा तुम्हाला मदत करू शकतात. तुमच्या लग्नातल्या तिसऱ्या आणि सगळ्यात मजबूत धाग्यावर, म्हणजे यहोवावर अवलंबून राहिल्यामुळे तुमचा विवाह ‘सहजासहजी तुटणार नाही.’—उप. ४:१२.
लग्नात समस्या येतात तेव्हा एकमेकांना जडून राहा (परिच्छेद १६ पाहा)
१७. लग्नाचा विचार करणारे आणि लग्न झालेले खरा आनंद कसा मिळवू शकतात?
१७ यहोवाची इच्छा आहे, की त्याच्या सगळ्याच सेवकांनी खूश राहावं; मग त्यांचं लग्न झालेलं असलं किंवा ते लग्नाचा विचार करत असले तरी. म्हणून जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल, तर असा जोडीदार निवडा जो आयुष्यभर तुमचा चांगला मित्र बनून राहिल. आणि जर तुमचं लग्न झालं असेल, तर तुमच्या जोडीदारासोबतची तुमची मैत्री घट्ट करायला मेहनत घेत राहा. लग्नात समस्या येतात तेव्हा त्यांवर मात करण्यासाठी यहोवावर अवलंबून राहा. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत “जीवनाचा आनंद” घेता येईल!—उप. ९:९.
गीत १३२ तू आणि मी, एक आता!
a हे प्रश्न लग्न करणाऱ्या स्त्रीयांना आणि पुरुषांना दोघांनाही लागू होतात.
b एकमेकांना आणखी चांगल्या प्रकारे कसं जाणून घेता येईल हे पाहायला, मे २०२४ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या “डेटींग करताना योग्य निर्णय कसा घेता येईल?” या लेखातलं “एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्या” हे उपशीर्षक पाहा.