अभ्यास लेख ४९
गीत ४४ दीन माणसाची प्रार्थना
इतरांना सल्ला देताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते
“ईयोब, आता माझे शब्द लक्ष देऊन ऐक.”—ईयो. ३३:१.
या लेखात:
इतरांना चांगला सल्ला देण्याच्या बाबतीत आपण ईयोबच्या पुस्तकातून काय शिकू शकतो ते पाहू या.
१-२. ईयोबला पाहून त्याच्या तीन मित्रांना आणि अलीहूला कोणता प्रश्न पडला?
ईयोबच्या श्रीमंतीची चर्चा दूरदूरपर्यंत व्हायची. म्हणून त्याच्याकडे असलेलं सगळंकाही गेलं तेव्हा ही बातमी वणव्यासारखी पसरली. त्यामुळे ईयोबचे तीन मित्र अलीफज, बिल्दद आणि सोफर त्याचं सांत्वन करायला लांबचा प्रवास करून ऊस देशात आले. पण तिथे येऊन त्यांनी जे पाहिलं त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
२ त्यांनी काय पाहिलं याचा विचार करा. ईयोबचं होतं-नव्हतं ते सगळं गेलं होतं. त्याचे मेंढरांचे, गाय-बैलांचे, उंटांचे आणि गाढवांचे कळपच्या कळप गेले होते. त्याची मुलं मेली होती. त्याच्या सेवकांपैकी बऱ्याच जणांना मारून टाकण्यात आलं होतं. ज्या घरात त्याची मुलं होती त्या घराचे आता फक्त अवशेष उरले होते. इतकंच काय, तर ईयोबला एक किळसवाणा आजारही झाला होता. त्याचं संपूर्ण शरीर फोडांनी भरून गेलं होतं. त्याचे मित्र त्याला भेटायला आले तेव्हा त्यांनी लांबूनच त्याला उदास होऊन राखेत बसलेलं पाहिलं. मग त्यांनी काय केलं? ईयोबचं भयंकर दुःख पाहून ते सात दिवस त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत. (ईयो. २:१२, १३) काही वेळाने अलीहू नावाचा तरुण त्यांच्यासोबत येऊन बसला. शेवटी, ईयोबने बोलायला सुरुवात केली. ईयोब जन्माला आला त्या दिवसाला शाप देत तो आपल्या मृत्यूची भीक मागू लागला. (ईयो. ३:१-३, ११) खरंच, ईयोबला मदतीची गरज होती. त्याला भेटायला आलेले हे लोक काय बोलतील आणि कसं बोलतील यावरून ठरणार होतं, की ते त्याचे खरे मित्र आहेत की नाहीत. तसंच, त्यांना खरंच त्याच्या भल्याची चिंता आहे की नाही हेसुद्धा कळणार होतं.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ अलीहू आणि ईयोबचे तीन मित्र ईयोबशी जसे वागले-बोलले ते यहोवाने मोशेद्वारे त्याच्या वचनात लिहून ठेवलं. अलीहू यहोवाच्या प्रेरणेने बोलला. पण याच्या अगदी उलट, अलीफज दुष्ट स्वर्गदूताच्या प्रभावाखाली काही गोष्टी बोलला असं दिसतं. (ईयो. ४:१२-१६; ३३:२४, २५) म्हणूनच, ईयोबच्या पुस्तकात आतापर्यंतचा सगळ्यात चांगला सल्ला असला, तरी त्यात एखाद्याला दिलेल्या सगळ्यात वाईट सल्ल्याबद्दलही आपल्याला वाचायला मिळतं याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे आपण ईयोबच्या पुस्तकातून सल्ला देण्याबद्दल बरंच काही शिकू शकतो. म्हणून, सल्ला देण्याच्या बाबतीत ईयोबच्या तीन मित्रांनी मांडलेल्या वाईट उदाहरणाबद्दल आपण सर्वात आधी पाहू या. मग आपण अलीहूच्या चांगल्या उदाहरणावर चर्चा करू या. ही चर्चा करत असताना, इस्राएली लोकांना ईयोबच्या पुस्तकाचा कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही कसा होऊ शकतो हे आपण पाहू या.
ईयोबच्या तीन मित्रांनी त्याला कशा प्रकारे सल्ला दिला
४. ईयोबचे तीन मित्र त्याचं सांत्वन का करू शकले नाहीत? (चित्रसुद्धा पाहा.)
४ बायबल म्हणतं, की ईयोबच्या तीन मित्रांनी जेव्हा ईयोबवर आलेल्या समस्यांबद्दल ऐकलं, तेव्हा ते “त्याला सहानुभूती दाखवण्यासाठी आणि त्याचं सांत्वन करण्यासाठी” आले. (ईयो. २:११) पण ते तसं करू शकले नाही. का बरं? याच्या तीन कारणांवर लक्ष द्या. पहिलं म्हणजे, ते ईयोबचं ऐकून घेण्याआधीच निष्कर्ष काढून मोकळे झाले. उदाहरणार्थ, ईयोब त्याच्या पापांची शिक्षा भोगतोय असा त्यांनी निष्कर्ष काढला.a (ईयो. ४:७; ११:१४) दुसरं म्हणजे, त्यांनी दिलेला सल्ला ईयोबच्या फायद्याचा तर नव्हताच, उलट ईयोबला त्यामुळे खूप वेदना झाल्या. त्या तिघांनी दिलेला सल्ला वरवर चांगला वाटत असला तरी तो काहीच कामाचा नव्हता. (ईयो. १३:१२) बिल्दद तर दोनदा ईयोबला म्हणाला, की ईयोब गरजेपेक्षा जास्त बोलतो. (ईयो. ८:२; १८:२) आणि ईयोब ‘मूर्ख’ आहे असं म्हणून सोफरने त्याचा अपमान केला. (ईयो. ११:१२) तिसरं म्हणजे, ईयोबचे तीन मित्र बोलताना जरी त्याला रागवून बोलले नसले, तरी ते त्याला घालूनपाडून, टोमणे मारून आणि त्याच्यावर खोटे आरोप लावून बोलले. (ईयो. १५:७-११) ते ईयोबला सांत्वन द्यायला किंवा त्याचा विश्वास वाढवायला नाही, तर त्याला चुकीचं ठरवायला तिथे आले होते हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होतं.
एखाद्याला सल्ला देताना कठोरपणे किंवा घालूनपाडून बोलू नका. तुमचा उद्देश त्याला मदत करण्याचा असला पाहिजे (परिच्छेद ४ पाहा)
५. ईयोबच्या तीन मित्रांनी दिलेल्या सल्ल्याचा काय परिणाम झाला?
५ तर मग हे स्पष्टच आहे, की ईयोबच्या तीन मित्रांनी दिलेला सल्ला कोणाच्याही फायद्याचा नव्हता. खरंतर, त्यांच्या बोलण्याने ईयोबच्या दुःखात आणखी भर पडली. (ईयो. १९:२) म्हणून ईयोब स्वतःला नीतिमान ठरवायचा इतका प्रयत्न का करत होता हे आपण समजू शकतो. त्यामुळेच तो कधीकधी अविचारीपणेही बोलला. (ईयो. ६:३, २६) ईयोबच्या तीन मित्रांनी यहोवासारखा विचार केला नाही. तसंच ते ईयोबशी दयाळूपणेही वागले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नकळत त्यांनी सैतानाला साथ दिली. (ईयो. २:४, ६) मग या अहवालाचा इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही कसा होऊ शकतो?
६. इस्राएलचे प्रमुख ईयोबच्या तीन मित्रांच्या उदाहरणातून काय शिकले असतील?
६ इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल? यहोवाने इस्राएल राष्ट्राच्या लोकांचा न्याय करण्यासाठी काही प्रमुखांना नेमलं होतं. (अनु. १:१५-१८; २७:१) या प्रमुखांनी लोकांना सल्ला देण्याआधी किंवा न्याय करण्याआधी त्यांचं ऐकून घेणं खूप गरजेचं होतं. (२ इति. १९:६) आपल्याला सगळं काही माहीत आहे असा विचार करण्याऐवजी त्यांनी प्रश्न विचारून खरं काय ते जाणून घ्यायची गरज होती. (अनु. १९:१८) त्यासोबतच, त्यांच्याकडे मदतीसाठी येणाऱ्या लोकांशी त्यांना कठोरपणे वागायचं नव्हतं. कारण ते जर असं वागले असते तर लोक त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलायला कचरले असते. (निर्ग. २२:२२-२४) खरंच, इस्राएलच्या प्रमुखांना ईयोबच्या अहवालातून शिकण्यासारखं खूप काही होतं.
७. इस्राएलच्या प्रमुखांसोबतच सल्ला देण्याचं काम आणखी कोणाचं होतं आणि ईयोबच्या अहवालातून त्यांना कसा फायदा झाला असेल? (नीतिवचनं २७:९)
७ पण सल्ला देणं हे फक्त इस्राएलच्या प्रमुखांचंच काम नव्हतं. इतरांची यहोवासोबतची मैत्री मजबूत करण्यासाठी किंवा चूक सुधारण्यासाठी लहान-मोठे, स्त्री-पुरुष कोणीही एकमेकांना सल्ला देऊ शकत होते. (स्तो. १४१:५) असं करून ते खरे मित्र असल्याचं दाखवून देऊ शकत होते. (नीतिवचनं २७:९ वाचा.) ईयोबच्या तीन मित्रांच्या वाईट उदाहरणातून इतरांना सल्ला देताना काय बोलू नये आणि काय करू नये हे इस्राएली लोकांना शिकायला मिळालं असेल.
८. सल्ला देताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? (चित्रंसुद्धा पाहा.)
८ आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? आपले भाऊबहीण जेव्हा समस्येत असतात तेव्हा आपल्यालाही त्यांना मदत करावीशी वाटते. पण असं करताना ईयोबच्या तीन मित्रांनी जे केलं ते आपण करू नये. मग आपण काय केलं पाहिजे? पहिलं, आपण एखाद्या गोष्टीविषयी लगेच मत बनवलं नाही पाहिजे. उलट सल्ला देण्याआधी आपण त्या गोष्टीबद्दलची सगळी माहिती गोळा करणं गरजेचंय. दुसरं, अलीफजने जसं बऱ्याचदा त्याच्या अनुभवावर अवलंबून राहून सल्ला दिला, तसा आपण देऊ नये. उलट, आपण सल्ला देताना नेहमी देवाच्या वचनाचा वापर केला पाहिजे. (ईयो. ४:८; ५:३, २७) तिसरं, सल्ला देताना आपण कधीच कठोरपणे बोलू नये. ईयोबचे तीन मित्र सगळंच चुकीचं बोलले असं नाही. कारण त्यांचे काही शब्द प्रेषित पौलने त्याच्या पत्रातसुद्धा वापरले. (ईयोब ५:१३ ची १ करिंथकर ३:१९ सोबत तुलना करा.) पण तरी, ते जे बोलले ते खोटं आहे असं यहोवाने म्हटलं. कारण त्यांनी यहोवाबद्दल बऱ्याच चुकीच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्या बोलण्यामुळे ईयोबला खूप त्रास झाला. (ईयो. ४२:७, ८) यहोवा कठोर आहे आणि आपण त्याच्या प्रेमाच्या लायक नाही असं आपल्या सल्ल्यातून कधीच भासू नये. तरच आपण म्हणू शकतो, की आपला सल्ला चांगला आहे. तर चला, अलीहूच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो ते आता आपण पाहू या.
सल्ला देण्यासाठी, (१) सगळी माहिती गोळा करा, (२) देवाचं वचन वापरा आणि (३) प्रेमाने बोला (परिच्छेद ८ पाहा)
अलीहूने ईयोबला कशा प्रकारे सल्ला दिला?
९. ईयोबच्या मित्रांचं बोलणं संपल्यावरही ईयोबला मदतीची गरज का होती आणि यहोवाने ती कशी पुरवली?
९ ईयोब आणि त्याच्या मित्रांचा वादविवाद संपेपर्यंत वातावरण बरंच तापलं असेल. ते इतकं बोलले की त्यांच्या शब्दांनी बायबलचे २८ अध्याय भरलेत! तसंच ते बऱ्याचशा गोष्टी रागाच्या भरात आणि वैतागून बोलले. म्हणूनच ईयोब इतका निराश का झाला असेल हे आपण समजू शकतो. त्याला अजूनही सांत्वनाची आणि सुधारणुकीची गरज होती. मग यहोवाने त्याला कशी मदत केली? त्याने त्याला सल्ला देण्यासाठी अलीहूचा वापर केला. पण अलीहू इतका वेळ गप्प का होता? कारण तो म्हणाला: “मी लहान आहे आणि तुम्ही वयाने मोठे आहात. तुमच्याबद्दल आदर असल्यामुळे मी गप्प बसलो.” (ईयो. ३२:६, ७) अलीहूला माहीत होतं की वयस्कर लोकांनी जास्त पावसाळे पाहिले असल्यामुळे, त्यांच्याकडे सहसा तरुणांपेक्षा जास्त ज्ञान आणि जीवनाचा अनुभव असतो. पण ईयोब आणि त्याच्या तीन मित्रांचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर तो जास्त वेळ गप्प बसू शकला नाही. तो म्हणाला: “फक्त वयामुळे माणसाला शहाणपण येत नाही, आणि योग्य काय ते फक्त म्हाताऱ्या माणसांनाच समजतं, असं नाही.” (ईयो. ३२:९) मग पुढे अलीहू काय आणि कसं बोलला?
१०. ईयोबला सल्ला देण्याआधी अलीहूने काय केलं? (ईयोब ३३:६, ७)
१० अलीहूने सल्ला देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली. कारण ईयोबने शांतपणे त्याचं ऐकून घ्यावं अशी त्याची इच्छा होती. मग यासाठी त्याने काय केलं? सगळ्यात आधी तर तो स्वतः शांत झाला. कारण ईयोबचं आणि त्याच्या तीन मित्रांचं बोलणं ऐकून त्याला राग आला होता असं बायबल म्हणतं. (ईयो. ३२:२-५) पण तो एकदाही ईयोबला रागाच्या भरात काही बोलला नाही. उलट, त्याला सांत्वन मिळेल असंच तो बोलला. उदाहरणार्थ तो ईयोबला म्हणाला: “बघ! देवापुढे मीही तुझ्यासारखाच आहे.” (ईयोब ३३:६, ७ वाचा.) शिवाय, ईयोब ज्या गोष्टी बोलला त्यांचा पुन्हा उल्लेख करून त्याने दाखवलं की त्याने ईयोबचं बोलणं लक्ष देऊन ऐकलं होतं. (ईयो. ३२:११; ३३:८-११) त्याने ईयोबला दुसऱ्यांदा सल्ला दिला तेव्हाही त्याने असंच काहीसं केलं.—ईयो. ३४:५, ६, ९; ३५:१-४.
११. अलीहूने ईयोबला कसा सल्ला दिला? (ईयो. ३३:१)
११ यहोवाचा एकनिष्ठ सेवक ईयोब याला सल्ला देताना अलीहू त्याच्याशी आदराने वागला. उदाहरणार्थ, अलीहू ईयोबशी त्याचं नाव घेऊन बोलला. पण ईयोबच्या तीन मित्रांनी असं एकदाही केल्याचं दिसून येत नाही. (ईयोब ३३:१ वाचा.) ईयोब आणि त्याच्या तीन मित्रांचा वादविवाद चालू असताना, अलीहूलाही बोलावसं वाटलं असेल. पण त्याला संधी मिळाली नाही. म्हणून ईयोबला सल्ला देताना त्याने त्याला बोलायची संधी दिली. (ईयो. ३२:४; ३३:३२) ईयोबचे काही विचार चुकीचे आहेत हे त्याने त्याला स्पष्टपणे सांगितलं. तसंच, त्याने त्याला यहोवाची बुद्धी, शक्ती, न्याय आणि एकनिष्ठ प्रेम यांसारख्या गुणांचीही आठवण करून दिली. (ईयो. ३६:१८, २१-२६; ३७:२३, २४) अलीहूच्या चांगल्या सल्ल्यामुळे, ईयोबचं मन यहोवाकडून आणखी सल्ला घेण्यासाठी तयार झालं. (ईयो. ३८:१-३) मग अलीहूच्या उदाहरणाचा इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही कसा होऊ शकतो?
१२. यहोवाने त्याच्या लोकांना मदत करायला संदेष्ट्यांचा वापर कसा केला आणि इस्राएली लोकांना अलीहूच्या उदाहरणाचा कसा फायदा झाला असेल?
१२ इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल? सुरुवातीपासूनच यहोवाने इस्राएली लोकांना आपला उद्देश कळवायला संदेष्ट्यांचा वापर केला. उदाहरणार्थ, न्यायाधीशांच्या काळात यहोवाने दबोरा संदेष्टीचा वापर करून आपल्या लोकांचं मार्गदर्शन केलं. तसंच, शमुवेल संदेष्टा लहानपणापासूनच देवाच्या वतीने बोलायचा. (शास्ते ४:४-७; ५:७; १ शमु. ३:१९, २०) मग राजांच्या काळात, आपल्या लोकांचा विश्वास वाढवायला आणि खऱ्या उपासनेपासून भरकटलेल्यांना सल्ला द्यायला यहोवाने एकानंतर एक बऱ्याच संदेष्ट्यांचा वापर केला. (२ शमु. १२:१-४; प्रे. कार्यं ३:२४) ईयोबच्या पुस्तकात असलेल्या अलीहूच्या उदाहरणामुळे सल्ला देताना काय बोलावं आणि कसं बोलावं हे समजायला विश्वासू इस्राएली लोकांना मदत झाली असेल.
१३. आपण आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन कसं देऊ शकतो?
१३ आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? आज आपणही इतरांना देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्यायला बायबलमधून मदत करतो. तसंच, आपण आपल्या भाऊबहिणींशी त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा विश्वास वाढेल अशा प्रकारे बोलतो. (१ करिंथ. १४:३) शिवाय, वडिलांनी नेहमी इतरांशी प्रेमळपणे आणि सांत्वन मिळेल अशा प्रकारे बोलणं गरजेचं आहे. खासकरून तणावात असलेल्यांशी किंवा समस्यांमुळे ‘वेड्या माणसासारखं बडबडणाऱ्यांशी’ बोलतानाही त्यांनी प्रेमळपणेच बोललं पाहिजे.—१ थेस्सलनी. ५:१४; ईयो. ६:३.
१४-१५. सल्ला देताना वडील अलीहूचं अनुकरण कसं करू शकतात याचं उदाहरण द्या.
१४ पुढे दिलेल्या परिस्थितीचा विचार करा. एका वडिलांना समजतं की मंडळीतली एक बहीण खूप निराश झाली आहे. म्हणून ते आणखी एका भावाला घेऊन त्या बहिणीला भेटायला जायचं ठरवतात. ते तिला प्रोत्साहन द्यायला जातात तेव्हा ती त्यांना सांगते, की ती जरी सभेला आणि प्रचाराला येत असली तरी तिला त्यातून आनंद मिळत नाही. मग अशा वेळी ते भाऊ काय करतील?
१५ सगळ्यात आधी, त्या बहिणीला असं का वाटतंय हे जाणून घ्यायचा ते प्रयत्न करतील. यासाठी ते तिचं धीराने ऐकून घेतील. आपण देवाच्या प्रेमाच्या लायक नाही असं तिला वाटतंय का? किंवा ‘जीवनाच्या चिंतांच्या’ ओझ्याखाली ती दबून गेली आहे का? हे जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतील. (लूक २१:३४) ती बहीण इतकी निराश असूनही सभेला आणि प्रचाराला येते, म्हणून ते तिची प्रशंसासुद्धा करतील. वडिलांना तिची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजल्यावर आणि तिच्या निराशेमागचं कारण कळल्यावर, देवाचं तिच्यावर आताही प्रेम आहे याची ते तिला बायबलमधून खातरी पटवून देतील.—गलती. २:२०.
ईयोबच्या पुस्तकातून शिकत राहा
१६. ईयोबच्या पुस्तकातून आपण कसं शिकत राहू शकतो?
१६ खरंच, मागच्या आणि या लेखात आपण ईयोबच्या पुस्तकातून खूप काही शिकलो! आधीच्या लेखात आपण पाहिलं, की देव आपल्यावर दुःख का येऊ देतो आणि आपण त्याचा धीराने सामना कसा करू शकतो. तसंच, या लेखात आपण शिकलो, की इतरांना सल्ला देताना आपण ईयोबच्या तीन मित्रांचं नाही तर अलीहूचं अनुकरण केलं पाहिजे. तुम्हाला कधी इतरांना सल्ला द्यावा लागला तर तुम्ही ईयोबच्या पुस्तकातून शिकलेल्या गोष्टींचा विचार करू शकता. आणि जर तुम्हाला ईयोबचं पुस्तक वाचून काही काळ झाला असेल तर तुम्ही ते पुन्हा वाचायचं ध्येय ठेवू शकता. जर तुम्ही असं केलं तर ईयोबचं पुस्तक जुन्या काळात जितकं फायद्याचं होतं तितकंच आजही असल्याचं तुम्हाला जाणवेल.
गीत १२५ जे दयाळू ते सुखी
a यहोवा कोणत्याच माणसाला नीतिमान समजत नाही आणि कोणीच त्याला खूश करू शकत नाही असा दुष्ट स्वर्गदूताने अलीफजला विचार करायला लावला. अलीफजनेही या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवला. म्हणून ईयोबशी बोलताना प्रत्येक वेळी त्याने या गोष्टीचा उल्लेख केला.—ईयो. ४:१७; १५:१५, १६; २२:२.