समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा
ईयोबाला ज्या सर्व समस्यांचा सामना करावा लागला तशाच समस्यांचा सामना फारच कमी लोकांना करावा लागला असेल. अल्पावधीतच त्याची संपत्ती आणि गुरेढोरे गमावल्यामुळे, त्याच्या सर्व मुलांच्या दुःखद मृत्यूमुळे आणि शेवटी भयंकर वेदनादायक आजाराने पीडित झाल्यामुळे त्याची हानी झाली. मित्र आणि नातेवाईकांनी त्याला समाजबहिष्कृत केल्यामुळे, त्याच्या पत्नीने त्याला ‘देवाला शाप देऊन मरून जाण्याची’ गळ घातली!—ईयोब २:९; १९:१३, १४.
परंतु अशाप्रकारच्या परीक्षांचा अनुभव घेणाऱ्या सर्वांसाठी ईयोब उत्तेजनाचा असामान्य स्रोत आहे. त्याच्यावरील परीक्षेचा सकारात्मक परिणाम हेच दर्शवतो, की विपत्तीच्या वेळी सहनशीलता दाखवल्याने यहोवाचे अंतःकरण आनंदित होते; कारण तेव्हा आपण स्वार्थी आकांक्षेऐवजी खऱ्या ईश्वरी उपासनेने प्रवृत्त होतो.—ईयोब १, २ अध्याय; ४२:१०-१७; नीतीसूत्रे २७:११.
ह्या बायबलच्या अहवालात समस्या कशा हाताळाव्यात त्याबद्दलचे अमूल्य धडे आहेत. परीक्षांचा सामना करत असलेल्यांना कसा सल्ला द्यावा—व कसा देऊ नये—याची विस्मयजनक उदाहरणे ते पुरवते. शिवाय, स्वतः ईयोबाचे उदाहरण, आपण जेव्हा प्रतिकूल परिस्थितींमध्ये सापडतो तेव्हा समतोल मार्गाने प्रतिक्रिया दाखवण्यास मदत करू शकते.
नकारात्मक सल्ला देण्याबाबत धडा
“ईयोबाचे सांत्वनकर्ते” ही संज्ञा, संकटात असलेल्या व्यक्तिला सहानुभूती दाखवण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या व्यक्तिच्या समानार्थात आहे. परंतु ईयोबाच्या तीन साथीदारांना यथायोग्यपणे जे नाव मिळवले त्यावरून आपण असे गृहीत धरू नये की त्यांचे हेतू पूर्णपणे दुष्ट होते. काही प्रमाणात त्यांनी आपल्या चुकीच्या समजूतीच्या अनुषंगाने ईयोबाची मदत करण्यास इच्छिले असावे. ते अपयशी का ठरले? ईयोबाची सत्वनिष्ठा तोडण्याचा ठामनिश्चय केलेल्या सैतानाचे ते साधन कसे बनले?
पाप करणाऱ्यांवरच पीडा येतात या चुकीच्या कल्पनेवर त्यांनी त्यांचा सर्व सल्ला वस्तुतः आधारला होता. अलीफजने त्याच्या पहिल्या भाष्यात म्हटले: “कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? धार्मिक कधी विलयास गेले आहेत काय? याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आहे की जे अधर्माची नांगरणी करितात व दुःखाची पेरणी करितात, ते तशीच कापणी करितात.” (ईयोब ४:७, ८) प्रामाणिक लोकांवर संकटे येत नाही असा अलीफजचा चुकीचा ग्रह होता. त्याने असा तर्क केला, की ईयोबाने देवाविरूद्ध पाप केल्यामुळेच त्याला इतक्या कडक परीक्षांचा सामना करावा लागला.a बिल्दद आणि सोफर या दोघांनीही ईयोबाला त्याच्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची गळ घातली.—ईयोब ८:५, ६; ११:१३-१५.
त्याच्या तीन साथीदारांनी, ईश्वरी बुद्धिचा वापर करण्याऐवजी व्यक्तिगत कल्पना व्यक्त करून ईयोबाला नाउमेद केले. अलीफजने तर असेही म्हटले, की ‘देवाला आपल्या सेवकांवर भरवसा नाही’ व यहोवाला ईयोब धार्मिक होता की नव्हता याचे महत्त्व नव्हते. (ईयोब ४:१८; २२:२, ३) याहूनही अधिक निरूत्साहित करणाऱ्या—किंवा अधिक असत्य—शेऱ्यांविषयीची कल्पना देखील करवत नाही! यहोवाने नंतर अलीफज आणि त्याच्या साथीदारांना या दुर्भाषणाबद्दल धमकावले यात काही आश्चर्य नाही. तो म्हणाला: ‘मजविषयी तुम्ही यथार्थ बोलला नाहीत.’ (ईयोब ४२:७) परंतु सर्वात हानीकारक विधान कालांतराने यायचे होते.
अलीफज शेवटी सर्वात निखालस दोषारोप लावण्यापर्यंत पोहंचला. तो, ईयोब दोषी असल्याचे त्याच्याकडून कबूल करून घेऊ न शकल्यामुळे, ईयोबाने काही पाप केले असावे असे गृहीत धरून त्याने बनावट गोष्ट बनवली. अलीफजने विचारले, “तुझी दुष्टाई मोठी आहे; तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना? तू विनाकारण आपल्या बंधूंचे गहाण अडकवून ठेविले; उघड्यानागड्याची वस्त्रे तू हिरावून घेतली. थकल्याभागलेल्यास तू पाणी दिले नाही, भूकेलेल्यास अन्न घातले नाही.” (ईयोब २२:५-७) हे दोषारोप पूर्णपणे खोटे होते. यहोवाने स्वतः ईयोबाचे वर्णन, “सात्विक आणि सरळ” मनुष्य असे केले होते.—ईयोब १:८.
ईयोबाने त्याच्या व्यक्तिगत सत्वनिष्ठेवर होणाऱ्या हल्ल्याला कशी प्रतिक्रिया दाखवली? त्या हल्ल्यांनी त्याला काहीसे कटू आणि खिन्न केले परंतु हे दोषारोप असत्य होते हे शाबीत करण्यास त्याला आणखी दृढनिश्चयी बनवले हे समजण्याजोगे आहे. वास्तविक पाहता तो स्वतःचे गौरव करण्यात इतका मग्न झाला, की एक प्रकारे तो त्याच्या ह्या बिकट परिस्थितीसाठी यहोवाला दोष देऊ लागला. (ईयोब ६:४; ९:१६-१८; १६:११, १२) समाविष्ट असलेल्या खऱ्या वादविषयांकडे दुर्लक्ष झाले आणि ईयोब एक धार्मिक मनुष्य होता की नव्हता याबद्दलचा संवाद निरर्थक वादविषय बनला. या अनर्थकारक सल्ला देण्याच्या बैठकीतून ख्रिस्तीजन कोणते धडे शिकू शकतात?
१. एक प्रेमळ ख्रिस्ती सुरवातीलाच असे गृहीत धरणार नाही की एखाद्या बांधवाच्या समस्या त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे उद्भवल्या. मागील चुकांबद्दल कठोर टिका—मग त्या खऱ्या असोत किंवा कल्पित—धैर्य न खचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिला पूर्णपणे निरूत्साहित करू शकतात. खिन्न झालेल्या व्यक्तिची खरडपट्टी काढण्याऐवजी त्याला “धीर” देणे आवश्यक आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) अलीफज, बिल्दद आणि सोफर यांच्याप्रमाणे पर्यवेक्षकांनी “भिकार सांत्वनकर्ते” नसून “वाऱ्यापासून आसरा” असावे असे यहोवा इच्छितो.—यशया ३२:२; ईयोब १६:२.
२. स्पष्ट पुराव्याविना आपण दोषारोप करू नये. अलीफजप्रमाणे अफवा किंवा कल्पित तर्क वाग्दंड देण्यासाठी ठोस आधार नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या वडिलांनी खोटा दोषारोप केला तर त्यामुळे ते कदाचित त्यांची विश्वसनीयता गमावू शकतात व त्यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. ईयोबाला अशा दिशाभूल करणाऱ्या मसलती ऐकताना कसे वाटले? त्याने त्याच्या क्रोधाच्या उद्रेकाला उपरोधिकपणे असे म्हणून वाट दिली, की “तू निर्बळास केवढेसे साहाय्य केले!” (ईयोब २६:२) काळजी वाहणारे पर्यवेक्षक समस्या आणखीनच बिकट करण्यापेक्षा ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करतील.’—इब्रीयांस १२:१२.
३. सल्ला देवाच्या वचनावर आधारित असला पाहिजे, व्यक्तिगत कल्पनांवर नव्हे. ईयोबाच्या सोबत्यांनी त्याचे मन वळवण्यास केलेले प्रयत्न, चुकीचे आणि हानीकारक होते. ईयोबाला यहोवाच्या आणखी जवळ आणण्याऐवजी त्यांनी त्याला असा विचार करण्याकडे निरवले, की त्याला आपल्या स्वर्गीय पित्यापासून विभक्त करणारी एक आडकाठी होती. (ईयोब १९:२, ६, ८) दुसऱ्या बाजूला पाहता, बायबलचा कुशलतेने केलेला वापर सुधारणूक, इतरांना उत्तेजनपर बळ व खरे सांत्वन देऊ शकतो.—लूक २४:३२; रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६; ४:२.
ईयोबाचे पुस्तक ख्रिश्चनांना विशिष्ट अनपेक्षित संकटांना ओळखण्यास मदत करत असले तरी, परिणामकारी सल्ला कसा द्यावा याबद्दलही मदतदायी धडा पुरवते.
सल्ला कसा द्यावा
अलीहूचा सल्ला, ईयोबाच्या तीन सोबत्यांनी दिलेल्या सल्ल्यापासून म्हणजे, त्याचे बोलणे आणि ईयोबासोबत त्याने जो व्यवहार केला या दोन्ही गोष्टींमध्ये पूर्णपणे वेगळा होता. त्याने ईयोबाला नावाने हाक मारली आणि त्याच्यासोबत बोलताना त्याचा न्यायाधीश या नात्याने नव्हे तर एक मित्र या नात्याने तो बोलला. “तर आता हे ईयोबा, माझे भाषण श्रवण कर. माझे सगळे बोलणे ऐकून घे. पाहा, देवापुढे मी तुजसारखाच आहे; मीहि मातीच्या गोळ्याचा घडलेला आहे.” (ईयोब ३३:१, ६) ईयोबाच्या धार्मिक मार्गाची प्रशंसा करण्यास अलीहूने विलंब लावला नाही. त्याने ईयोबाला खात्री दिली, “तुझ्या धार्मिकतेची मी आवड बाळगली आहे.” (ईयोब ३३:३२) सल्ला देण्याच्या या दयाशील पद्धतीव्यतिरिक्त अलीहू इतर कारणांमुळे यशस्वी ठरला.
इतरांचे बोलून होईपर्यंत सहनशीलतेने थांबून राहिल्यामुळे, अलीहू सल्ला देण्याआधी ज्या गोष्टीबद्दल इतका वितंडवाद चालला होता त्या वादाला समजू शकला. ईयोब एक धार्मिक व्यक्ती होता असे गृहीत धरल्यास यहोवा त्याला शिक्षा देईल का? अलीहूने म्हटले: “देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा ही कल्पनाहि करावयाला नको! . . . तो धार्मिकांवरील आपली दृष्टी काढीत नाही.”—ईयोब ३४:१०; ३६:७.
ईयोबाची धार्मिकता हा मुख्य वादविषय होता का? अलीहूने ईयोबाचे लक्ष एका असमतोल दृष्टिकोनाकडे आकर्षित केले. त्याने स्पष्टीकरण दिले, “देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे असे तू म्हणतोस काय? . . . आकाशाकडे दृष्टि देऊन पाहा; नभोमंडळ पाहा, हे तुजहून उंच आहे.” (ईयोब ३५:२, ५) नभोमंडळ ज्याप्रमाणे आपल्यापेक्षा उंच आहे त्याचप्रमाणे यहोवाचे मार्ग आपल्या मार्गांहून उच्च आहेत. तो ज्याप्रमाणे गोष्टी करतो त्याचा न्याय करण्याच्या पात्रतेचे आपण नाही. अलीहूने असे म्हणून समारोप केला: “म्हणून मनुष्ये त्याचे भय धरितात; जे शहाणपणाचा अभिमान वाहतात त्यांजकडे तो लक्ष देत नाही.”—ईयोब ३७:२४; यशया ५५:९.
अलीहूच्या विश्वसनीय सल्ल्यामुळे ईयोबाची मनःस्थिती स्वतः यहोवाकडून आणखी बोध घेण्यास तयार झाली. वास्तविक पाहता, ३७ अध्यायात “देवाच्या अद्भुत कृत्यांचे” अलीहूने केलेले पुनरावलोकन आणि ३८ ते ४१ अध्यायांमध्ये ईयोबाला उद्देशून म्हटलेले यहोवाचे स्वतःचे शब्द यामध्ये उल्लेखनीय साम्यता आहे. वस्तुतः, अलीहूने गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिले. (ईयोब ३७:१४) ख्रिस्तीजन अलीहूचे उत्तम उदाहरण कसे अनुसरू शकतात?
अलीहूप्रमाणेच विशेषकरून पर्यवेक्षकांनी परिणामकारी आणि दयाशील असले पाहिजे. त्यांनी हे लक्षात ठेवावे की तेही अपरिपूर्णच आहेत. सल्ला देण्याआधी त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घ्यावे जेणेकरून त्यांना सर्व विषय कळेल व ज्यावर वादविवाद चालला आहे तो समजेल. (नीतीसूत्रे १८:१३) शिवाय, बायबल आणि शास्त्रवचनीय प्रकाशनांचा उपयोग करून, यहोवाचाच दृष्टिकोन सर्व बाबतीत असेल याची त्यांनी खात्री करून घ्यावी.—रोमकर ३:४.
वडिलांसाठी असलेल्या ह्या व्यावहारिक धड्यांव्यतिरिक्त ईयोबाचे पुस्तक आपल्याला समस्यांचा सामना एका समतोल मार्गाने कसा करावा ते शिकवते.
प्रतिकूल परिस्थितींमध्ये कशी प्रतिक्रिया दाखवू नये
ईयोब त्याच्या दुःखाने भारावून व त्याच्या खोट्या सांत्वनदात्यांमुळे चिडचिडा झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये द्वेष भावना उत्पन्न झाल्या व तो खिन्न झाला. त्याने दुःखाने म्हटले, “मी जन्मलो तो दिवस जळो! . . . माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे.” (ईयोब ३:३; १०:१) सैतान अपराधी असल्याची थोडी देखील जाणीव नसल्यामुळे, देवच त्याच्यावर हे संकट आणत होता असे त्याने गृहीत धरले. त्याला हा अन्याय वाटला कारण त्याला—एक धार्मिक मनुष्य या नात्याने—या सर्व गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. (ईयोब २३:१०, ११; २७:२; ३०:२०, २१) या मनोवृत्तीने इतर गोष्टी पाहण्यास ईयोबाचे मन आंधळे केले व देव मानवजातीसोबत जसा व्यवहार करतो त्याची टिका करण्यास निरवले. यहोवाने त्याला विचारले: “तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय?”—ईयोब ४०:८.
ईयोबाप्रमाणेच आपणही, संकटात पडतो तेव्हा आपल्याला फसवले गेले ही लगेचच प्रतिक्रिया दाखवतो हे स्पष्टच आहे. त्वरित आपण असे विचारू लागतो, ‘मीच का बळी पडावे? माझ्यापेक्षाही वाईट असलेल्या लोकांनी समस्यांपासून सापेक्षरीतीने जीवनाचा आनंद का घ्यावा?’ देवाच्या वचनावर मनन केल्याने आपण अशा नकारात्मक विचारांना विफल करू शकतो.
सर्वात मोठे वादविषय समजण्याच्या ईयोबापेक्षा एका वेगळ्या परिस्थितीत आपण आहोत. आपल्याला ठाऊक आहे, की सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) ईयोबाचे पुस्तक प्रकट करते त्याप्रमाणे, आमच्यावर समस्या आणून दियाबलाला आमची सत्वनिष्ठा तोडण्यात आनंद मिळेल. आपण विपत्काली सोडून जाणारे यहोवाचे साक्षीदार आहोत हे तो ठामपणे शाबीत करू पाहत आहे. (ईयोब १:९-११; २:३-५) यहोवाच्या सार्वभौमत्वाला उंचावून दियाबलास खोटे ठरवण्याचे धाडस आमच्यामध्ये आहे का?
येशू आणि यहोवाच्या इतर अगणित विश्वासू सेवकांची उदाहरणे दाखवतात, की या व्यवस्थीकरणात कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख बहुधा अटळ आहे. येशूने म्हटले, की त्याच्या शिष्यांना त्याचे अनुकरण करावयाचे आहे तर त्यांनी त्यांचा ‘वधस्तंभ उचलण्यास’ तयार असले पाहिजे. (लूक ९:२३) ईयोबाने सहन केलेल्या संकटातील एक किंवा त्याहूनही अधिक संकटे आमचा व्यक्तिगत “वधस्तंभ” म्हणजेच—आजारपण, प्रियजनांचा मृत्यू, खिन्नता, आर्थिक अडचणी किंवा ख्रिस्ती विश्वासात नसलेल्यांकडून विरोध असू शकतो. आपण कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करीत असलो तरी त्या परिस्थितीचा सकारात्मक पैलू असतो. आपण ज्या परिस्थितीत असू ती परिस्थिती, आमची सहनशीलता आणि यहोवाला अढळ निष्ठा दाखवण्याची एक संधी आहे या दृष्टिकोनातून आपण तिच्याकडे पाहू शकतो.—याकोब १:२, ३.
त्याचप्रकारे तर येशूच्या शिष्यांनी प्रतिक्रिया दाखवली. पेंटेकॉस्टनंतर लगेचच येशूविषयी प्रचार केल्यामुळे त्यांना मारहाण केली होती. निरूत्साहीत होण्याऐवजी, ते “आनंद करीत” निघून गेले. ते केवळ दुःखामुळे आनंदी नव्हते तर त्यांना ‘[ख्रिस्ताच्या] नावासाठी अपमानास पात्र ठरविण्यात आले म्हणून ते आनंदी’ होते.—प्रेषितांची कृत्ये ५:४०, ४१.
सर्वच समस्या यहोवाची सेवा केल्यामुळे आमच्यावर येत नाहीत हे निश्चित. काही प्रमाणात तरी आमच्या समस्या—स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात. किंवा कदाचित, आमच्या चुकीमुळे नाही पण काही समस्यांचा आमच्या आध्यात्मिक समतोलावर परिणाम झाला असेल. ते काहीही असो, ईयोबासारखी नम्र मनोवृत्ती आपल्याला चुका कोठे झाल्या आहेत ते समजण्यास मदत करते. ईयोबाने यहोवाजवळ कबूल केले: “मला समजत नाही ते मी बोललो.” (ईयोब ४२:३) अशाप्रकारे स्वतःच्या चुका ओळखणारा भवितव्यातील तशाच प्रकारच्या समस्या टाळू शकतो. नीतीसूत्रे म्हणते त्याप्रमाणे, “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो.”—नीतीसूत्रे २२:३.
सर्वात अधिक महत्त्वाचे म्हणजे, ईयोबाचे पुस्तक आपल्याला आपल्या समस्या जास्त काळ राहणार नाहीत याची आठवण करून देते. बायबल म्हणते: “ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो; तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतु होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) आजही यहोवा त्याच्या सेवकांच्या विश्वासूपणाबद्दल त्यांना प्रतिफळ देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.
शिवाय, सर्व प्रकारच्या समस्या—“पहिल्या गोष्टी”—गेलेल्या असतील त्या समयाकडे आपण आतुरतेने वाट पाहून आहोत. (प्रकटीकरण २१:४) तो दिवस उगवेपर्यंत ईयोबाचे पुस्तक आपल्याला, सुज्ञता आणि धैर्याने समस्या कशा हाताळाव्यात त्याचे अमूल्य मार्गदर्शन करीत राहते.
[तळटीपा]
a “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल” असे बायबल म्हणते तेव्हा एखाद्या व्यक्तीवर कोसळलेले अरिष्ट ईश्वरी मोबदला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. (गलतीकर ६:७) सैतानाचे वर्चस्व असलेल्या या जगात, दुष्टांपेक्षा धार्मिकांना अधिक समस्यांचा सामना करावा लागतो. (१ योहान ५:१९) येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले: “माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करितील.” (मत्तय १०:२२) आजारपण किंवा इतर प्रकारची संकटे देवाच्या कोणत्याही विश्वासू सेवकांवर येऊ शकतात.—स्तोत्र ४१:३; ७३:३-५; फिलिप्पैकर २:२५-२७.
[२८ पानांवरील चित्रं]
“नभोमंडळ पाहा, हे तुजहून उंच आहे” असे ईयोबाला सांगून अलिहूने देवाचे मार्ग मनुष्याच्या मार्गांपेक्षा उच्च आहेत हे समजण्यास त्याची मदत केली