वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 डिसेंबर पृ. २-७
  • समस्येत असताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समस्येत असताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देव ईयोबची परीक्षा होऊ देतो
  • ईयोबच्या अहवालातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
  • इतरांना मदत करण्यासाठी ईयोबच्या पुस्तकाचा वापर करा
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ईयोब पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • इयोबाची सचोटी—एवढी अप्रतिम का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 डिसेंबर पृ. २-७

अभ्यास लेख ४८

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

समस्येत असताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते

“देव दुष्टपणे वागत नाही . . . हे निश्‍चित!”—ईयो. ३४:१२.

या लेखात:

यहोवा दुःख का राहू देतो आणि आपण ते धीराने कसं सहन करू शकतो याबद्दल आपल्याला ईयोबच्या पुस्तकातून काय समजतं ते पाहा.

१-२. ईयोबचं पुस्तक वाचण्याची आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

तुम्ही अलिकडे ईयोबचं पुस्तक वाचलंय का? हे पुस्तक ३,५०० वर्षं जुनं असलं, तरी बरेच लोक याला आजपर्यंत लिहिण्यात आलेल्या जगातल्या सगळ्यात चांगल्या पुस्तकांपैकी एक मानतात. या पुस्तकाची रूपरेषा खूप सोपी आहे. तसंच, हे पुस्तक खूप सुरेख पद्धतीने लिहिण्यात आलंय. इतकंच काय, तर या पुस्तकात साध्या सोप्या गोष्टीही खूप चांगल्या प्रकारे व्यक्‍त करण्यात आल्या आहेत. या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे ईयोब पुस्तकाच्या लेखकाला एका पुस्तकात “उत्कृष्ट साहित्यिक” म्हटलंय. हे पुस्तक जरी मोशेने लिहिलं असलं तरी याचा खरा लेखक तर यहोवा देवच आहे.—२ तीम. ३:१६.

२ ईयोबचं पुस्तक बायबलमधलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकात आपल्याला जगातल्या सगळ्यात मोठ्या वादविषयाबद्दल, म्हणजे यहोवाचं नाव पवित्र करण्याबद्दल वाचायला मिळतं. तसंच प्रेम, बुद्धी, न्याय आणि शक्‍ती यांसारख्या यहोवाच्या अद्‌भुत गुणांबद्दलही आपल्याला यातून शिकायला मिळतं. बायबलच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत या पुस्तकात यहोवाला सगळ्यात जास्त वेळा ‘सर्वशक्‍तिमान देव’ असं म्हटलंय. शिवाय, या पुस्तकात जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरंही देण्यात आली आहेत. अजूनपर्यंत देवाने दुःख का काढलं नाही, या महत्त्वाच्या प्रश्‍नाचं उत्तरही आपल्याला या पुस्तकातून मिळतं.

३. आपल्याला ईयोबच्या पुस्तकाचा कसा फायदा होऊ शकतो?

३ जसं एका उंच डोंगरावरून आपल्याला आजूबाजूचा परिसर एकदम स्पष्ट दिसतो, तसंच ईयोबच्या पुस्तकामुळे आपल्याला जीवनातल्या समस्यांचं कारण स्पष्टपणे दिसतं. त्यांकडे आपल्याला यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहायला मदत मिळते. आपल्यावर समस्या येतात तेव्हा ईयोबच्या पुस्तकातून आपल्याला कशी मदत होऊ शकते हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणाचा कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही त्यातून कसा फायदा होऊ शकतो, हेसुद्धा आपण पाहू या. शिवाय, या पुस्तकाच्या अहवालांचा वापर आपण इतरांना मदत करण्यासाठी कसा करू शकतो, हेही आपण पाहणार आहोत.

देव ईयोबची परीक्षा होऊ देतो

४. इजिप्तच्या गुलामगिरीत राहणाऱ्‍या इस्राएली लोकांमध्ये आणि ईयोबमध्ये काय फरक होता?

४ ईयोब ऊस नावाच्या देशात राहायचा. हा देश अरबच्या आसपास असावा. ईयोबच्या जीवनकाळात इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामगिरीत होते. इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोक खोट्या देवांची उपासना करू लागले होते. पण ईयोब मात्र विश्‍वासूपणे यहोवाची उपासना करत होता. (यहो. २४:१४; यहे. २०:८) म्हणूनच यहोवाने त्याच्याबद्दल म्हटलं, की “पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही.”a (ईयो. १:८) ईयोब अतिशय श्रीमंत होता आणि लोक त्याचा खूप आदर करायचे, मानसन्मान करायचे. (ईयो. १:३) विचार करा इतका मोठा माणूस यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करतोय हे पाहून सैतानाला किती राग आला असेल!

५. यहोवाने सैतानाला ईयोबची परीक्षा का घेऊ दिली? (ईयोब १:२०-२२; २:९, १०)

५ ईयोबवर समस्या आल्या तर तो यहोवाची उपासना करायचं सोडून देईल, असा आरोप सैतानाने ईयोबवर लावला. (ईयो. १:७-११; २:२-५) सैतानाच्या या आरोपामुळे बरेच वादविषय उभे राहिले. म्हणूनच ईयोबवर मनापासून प्रेम असूनही यहोवाने सैतानाला त्याची परीक्षा घेऊ दिली. यामुळे सैतानाला आपला आरोप सिद्ध करायची संधी मिळाली. (ईयो. १:१२-१९; २:६-८) सैतानाने ईयोबची गुरंढोरं हिरावून घेतली, त्याच्या दहा मुलांना मारून टाकलं आणि त्याला वेदनादायक आजाराने पिडलं. पण इतकं करूनही सैतान ईयोबला यहोवापासून दूर करू शकला नाही. (ईयोब १:२०-२२; २:९, १० वाचा.) ईयोब एकनिष्ठ राहिल्यामुळे यहोवाने त्याला पुन्हा चांगलं आरोग्य, धनसंपत्ती आणि मानसन्मान मिळवून दिला. यहोवाने त्याला आणखी दहा मुलं दिली आणि त्याचं आयुष्य १४० वर्षं वाढवलं. ईयोबने आपल्या चार पिढ्या पाहिल्या. (ईयो. ४२:१०-१३, १६) इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणाचा कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही कसा होऊ शकतो, हे आता आपण पाहू या.

६. देव आपल्यावर समस्या का येऊ देतो हे जर इस्राएली लोकांना माहीत असेल तर त्यांना कसा फायदा झाला असावा? (चित्रसुद्धा पाहा.)

६ इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल? इजिप्तमध्ये असताना इस्राएली लोकांचं जीवन फार खडतर होतं. जसं की, यहोशवा आणि कालेबने आपलं संपूर्ण तरुणपण गुलामगिरीत घालवलं. त्यांची काहीच चूक नसताना त्यांना ४० वर्षं ओसाड रानात भटकावं लागलं. जर इस्राएली लोकांना ईयोबवर आलेल्या समस्यांबद्दल आणि त्याला मिळालेल्या आशीर्वादांबद्दल माहीत असेल, तर त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना हे नक्कीच समजलं असेल, की आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांमागे नेमकं कोण आहे. देव आपल्यावर समस्या का येऊ देतो आणि आपल्या विश्‍वासूपणाची आणि एकनिष्ठतेची त्याला किती कदर आहे हेही त्यांना कळलं असेल.

एक इस्राएली व्यक्‍ती एकावर एक विटा रचत असताना विचार करतोय. आणि शेजारी मेहनतीचं काम करणाऱ्‍या इस्राएली लोकांना इजिप्तचे लोक काठीने मारत आहेत.

बऱ्‍याच काळापासून इजिप्तच्या गुलामगिरीत असलेल्या इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणाचा फायदा होणार होता (परिच्छेद ६ पाहा)


७-८. दुःखाचा सामना करणाऱ्‍यांना ईयोबच्या पुस्तकातून सांत्वन कसं मिळतं? एक उदाहरण द्या.

७ आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? दुःखाची गोष्ट म्हणजे आज बऱ्‍याच लोकांचा देवावरचा विश्‍वास उडलाय. कारण चांगल्या लोकांसोबतच वाईट का घडतं हे त्यांना माहीत नाही. रवांडामध्ये राहणाऱ्‍या हेजलचाb विचार करा. ती लहानपणापासून देवाला मानायची. पण नंतर परिस्थिती बदलली. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. मग तिच्या आईने दुसरं लग्न केलं. पण हेजलचे सावत्र वडील हेजलशी वाईट वागायचे. तरुण असताना एका माणसाने तिचा बलात्कार केला. हेजल ज्या ठिकाणी उपासनेसाठी जायची तिथून तिला काहीच सांत्वन मिळालं नाही. म्हणून ती देवाला म्हणाली: “देवा, मी तुला किती प्रार्थना केली. मी किती चांगली वागले, तरी तू माझ्या पदरी दुःखच दिलं. म्हणून मी तुला सोडून चाललीए. आता इथून पुढे मी माझ्या मनासारखंच वागणार आहे.” हेजलसारखं बऱ्‍याच लोकांना असं वाटतं, की त्यांच्या दुःखांसाठी देवच जबाबदार आहे. अशा सगळ्या लोकांबद्दल आपल्याला कळवळा येतो. म्हणून त्यांना मदत करायची आपली मनापासून इच्छा आहे.

८ आपल्या दुःखांसाठी देव नाही तर सैतान जबाबदार आहे हे आपण ईयोबच्या पुस्तकातून शिकलोय. तसंच, जेव्हा इतरांवर दुःख येतं तेव्हा त्यांनी काहीतरी वाईट केलंय असं आपण समजू नये हेसुद्धा आपण शिकलोय. बायबल म्हणतं, “वेळ आणि अनपेक्षित घटना” कोणासोबतही आणि कधीही घडू शकतात. (उप. ९:११; ईयो. ४:१, ८) आपण हेसुद्धा शिकलोय, की परीक्षा आल्यावर आपण विश्‍वासू राहिलो तर आपण यहोवाला सैतान खोटा असल्याचं सिद्ध करायची संधी देत असतो. (ईयो. २:३; नीति. २७:११) ही सगळी सत्यं आपण हलक्यात घेत नाही. खरंतर यांमुळे आपल्यावर आणि आपल्या जवळच्या लोकांवर समस्या का येतात, हे आपल्याला स्पष्टपणे समजतं. हेजलने नंतर यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला. देव तिच्या दुःखांसाठी जबाबदार नाही ही गोष्ट तिला समजली. ती म्हणते: “मी देवाला परत एकदा अगदी मनापासून प्रार्थना केली. मी त्याला सांगितलं की मी तुला सोडून चाललीए असं जेव्हा मी म्हटलं, तेव्हा खरंतर मला तसं करायचं नव्हतं. कारण मला तुझी ओळखच नव्हती.” ती पुढे म्हणते: “मला कळलंय की यहोवाचं माझ्यावर किती प्रेम आहे. आता मी खूप आनंदी आणि समाधानी आहे.” खरंच, देव आपल्यावर समस्या का येऊ देतो हे माहीत असल्यामुळे आपल्याला किती बरं वाटतं! आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपल्याला ईयोबच्या अहवालातून कसा फायदा होऊ शकतो हे आता आपण पाहू या.

ईयोबच्या अहवालातून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

९. ईयोबची अवस्था कशी झाली होती? (याकोब ५:११)

९ कल्पना करा, ईयोब एकटाच राखेत बसलाय. त्याचं शरीर फोडांनी भरून गेलंय. त्याला भयंकर वेदना होत आहेत. रोगामुळे त्याची त्वचा काळवंडून गेलीए. त्याच्या जखमांवरून खपल्या निघत आहेत. तो पार गळून गेलाय आणि खापरीने आपलं अंग खाजवण्याशिवाय तो दुसरं काहीच करू शकत नाही. पण इतक्या त्रासात असूनही तो फक्‍त एकएक दिवस काढत नव्हता तर धीराने सहन करत होता. (याकोब ५:११ वाचा.) मग कोणत्या गोष्टीमुळे ईयोबला धीर धरायला मदत झाली?

१०. ईयोबचं यहोवासोबत कसं नातं होतं? समजावून सांगा.

१० ईयोबने देवासमोर त्याच्या भावना व्यक्‍त केल्या. (ईयो. १०:१, २; १६:२०) उदाहरणार्थ, तिसऱ्‍या अध्यायात ईयोब आपल्यावर आलेल्या समस्यांबद्दल कुरकुर करतो असं सांगण्यात आलंय. यहोवाच त्याच्यावर समस्या आणतोय असं त्याला वाटलं. भरीत भर म्हणजे देव ईयोबला त्याच्या पापांची शिक्षा देतोय असं त्याचे तीन मित्र त्याला वारंवार सांगत होते. पण ईयोब त्यांना म्हणत होता की तो निर्दोष आहे. आपल्या मित्रांशी बोलताना त्याने बऱ्‍याचदा आपण निर्दोष असल्याचं यहोवालाही सांगितलं. त्याच्या शब्दांवरून हे कळतं, की तो काही काळासाठी स्वतःला देवापेक्षा जास्त नीतिमान समजत होता. (ईयो. १०:१-३; ३२:१, २; ३५:१, २) पण स्वतःला निर्दोष ठरवताना तो ‘वेड्या माणसासारखा बडबडला’ हे त्याने कबूल केलं. (ईयो. ६:३, २६) एकतिसाव्या अध्यायात ईयोब देवाला म्हणतो की त्याने त्याला उत्तर द्यावं आणि निर्दोष ठरवावं. (ईयो. ३१:३५) ईयोबचं असं करणं चुकीचं होतं, कारण त्याच्या दुःखामागचं मूळ कारण सांगायला देव काही त्याला बांधील नव्हता.

११. ईयोबने स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा यहोवा त्याच्याशी कसा वागला?

११ ईयोबची यहोवासोबत घट्ट मैत्री होती आणि यहोवा त्याचा अगदी योग्य न्याय करेल असा त्याला भरवसा होता. म्हणून तो यहोवाशी अगदी मनमोकळेपणे बोलला. काही काळाने यहोवा ईयोबशी वादळातून बोलला. पण त्याने त्याला त्याच्या दुःखामागचं कारण सांगितलं नाही. तसंच, ईयोबने कुरकुर केल्यामुळे किंवा स्वतःला निर्दोष ठरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे यहोवाने त्याला शिक्षाही केली नाही. उलट, ईयोबला मदत करायला यहोवाने सगळ्यात चांगली पद्धत वापरली. तो त्याच्याशी एका प्रेमळ पित्यासारखा वागला आणि त्याला योग्य विचार करायला मदत केली. त्यामुळे ईयोबने नम्रपणे मान्य केलं की त्याला सगळं काही माहीत नाही आणि तो ज्या चुकीच्या गोष्टी बोलला होता त्यासाठी त्याने पश्‍चात्तापसुद्धा केला. (ईयो. ३१:६; ४०:४, ५; ४२:१-६) मग इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणाचा कसा फायदा झाला असेल आणि आज आपल्यालाही कसा होऊ शकतो?

१२. इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणातून कसा फायदा झाला असेल?

१२ इस्राएली लोकांना कसा फायदा झाला असेल? इस्राएली लोकांना ईयोबच्या उदाहरणाचा नक्कीच फायदा झाला असेल. मोशेचं उदाहरण घ्या. तो इस्राएलचं नेतृत्व करू लागला तेव्हा त्याला बऱ्‍याच समस्यांचा, निराशेचा आणि दुःखाचा सामना करावा लागला. इस्राएली लोकांवर जेव्हा समस्या यायच्या, तेव्हा ते यहोवाविरुद्ध कुरकुर करायचे. पण मोशे मात्र त्याच्या समस्यांबद्दल यहोवाशी बोलायचा. (निर्ग. १६:६-८; गण. ११:१०-१४; १४:१-४, ११; १६:४१, ४९; १७:५) मोशेची चूक सुधारण्यात आली तेव्हासुद्धा त्याला ईयोबच्या उदाहरणातून मदत झाली असेल. इस्राएली लोकांना ओसाड रानात भटकून जवळजवळ ४० वर्षं झाली होती आणि ते कादेशमध्ये होते, तेव्हा मोशे “अविचारीपणे बोलला” आणि यहोवाच्या नावाचा महिमा करायला चुकला. (स्तो. १०६:३२, ३३) त्यामुळे यहोवाने त्याला वचन दिलेल्या देशात जाऊ दिलं नाही. (अनु. ३२:५०-५२) मोशेची चूक सुधारण्यात आल्यामुळे त्याला साहजिकच वाईट वाटलं असेल. पण तरी त्याने नम्रपणे सुधारणूक स्वीकारली. ईयोबच्या उदाहरणातून इस्राएली लोकांच्या पुढच्या पिढ्यांनाही समस्यांचा सामना करायला मदत झाली असेल. त्याच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे विश्‍वासू लोकांना यहोवासमोर आपल्या भावना कशा व्यक्‍त कराव्यात हे शिकायला मिळालं असेल. तसंच, आपण यहोवासमोर स्वतःला निर्दोष ठरवायचा प्रयत्न करू नये हे त्यांना शिकायला मिळालं असेल. शिवाय, यहोवा आपली चूक सुधारतो तेव्हा आपण त्याचं नम्रपणे कसं ऐकू शकतो हेही ते शिकले असतील.

१३. ईयोबच्या उदाहरणातून आपल्याला धीर धरायला कशी मदत होऊ शकते? (इब्री लोकांना १०:३६)

१३ आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? आज आपल्यालासुद्धा ईयोबसारखंच धीर धरण्याची गरज आहे. (इब्री लोकांना १०:३६ वाचा.) कारण आपल्यापैकी काहींना शारीरिक, भावनिक किंवा कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागतो, काहींनी आपल्या जवळच्या लोकांना मृत्यूमध्ये गमावलंय, तर इतर काहींना आणखी काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय, इतर जण जेव्हा आपल्या मनाला लागेल असं काहीतरी बोलतात तेव्हा धीर धरणं कधीकधी आणखी कठीण जातं. (नीति. १२:१८) पण ईयोबच्या उदाहरणातून आपल्याला समजतं, की आपण आपल्या सगळ्या भावना यहोवासमोर व्यक्‍त करू शकतो आणि तो आपलं ऐकेल अशी खातरी ठेवू शकतो. (१ योहा. ५:१४) कधीकधी परिस्थिती इतकी बिकट होऊ शकते की आपणही प्रार्थनेत ‘वेड्या माणसासारखं बडबडू.’ पण लक्षात ठेवा, यामुळे यहोवा आपल्याला चुकीचं ठरवणार नाही. उलट, तो आपल्याला धीर धरण्यासाठी लागणारी ताकद आणि बुद्धी देईल. (२ इति. १६:९; याको. १:५) काही वेळा यहोवा आपल्याला ईयोबसारखं सुधारूही शकतो. पण ईयोबच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळतं की बायबलमधून, संघटनेकडून किंवा जवळच्या मित्रांकडून जेव्हा आपल्याला सल्ला मिळतो किंवा सुधारलं जातं तेव्हा आपण धीर कसा धरू शकतो. (इब्री १२:५-७) ईयोबसारखं आपणही नम्रपणे सुधारणूक स्वीकारली तर आपलाही फायदा होऊ शकतो. (२ करिंथ. १३:११) खरंच, ईयोबच्या उदाहरणातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे! आता आपण पाहू की इतरांना मदत करण्यासाठी आपण ईयोबच्या उदाहरणाचा कसा वापर करू शकतो.

इतरांना मदत करण्यासाठी ईयोबच्या पुस्तकाचा वापर करा

१४. ‘आज जगात इतकं दुःख का आहे?’ या प्रश्‍नाचं उत्तर तुम्ही कसं द्याल?

१४ तुम्हाला प्रचारात कोणी असा प्रश्‍न विचारला आहे का: ‘आज जगात इतकं दुःख का आहे?’ मग तुम्ही त्या प्रश्‍नाचं उत्तर कसं दिलं? तुम्ही कदाचित एदेनच्या बागेत जे घडलं त्याबद्दल त्यांना बायबलमधून दाखवलं असेल. तुम्ही कदाचित सांगितलं असेल की एका दुष्ट स्वर्गदूताने, सैतानाने पहिल्या मानवी जोडप्याला, म्हणजे आदाम-हव्वाला खोटं सांगितलं आणि देवाविरुद्ध बंड करायला लावलं. (उत्प. ३:१-६) आदाम आणि हव्वाने केलेल्या बंडाळीमुळेच आज आपल्यावर दुःख आणि मृत्यू ओढावतो असं कदाचित तुम्ही त्यांना सांगितलं असेल. (रोम. ५:१२) आणि मग तुम्ही त्यांना समजावलं असेल, की सैतान खोटा असल्याचं सिद्ध व्हावं आणि भविष्यात मानवांना पुन्हा परिपूर्ण जीवन मिळण्याची आनंदाची बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून देवाने इतका वेळ जाऊ दिलाय. (प्रकटी. २१:३, ४) आज जगात इतकं दुःख का आहे, या प्रश्‍नाचं उत्तर द्यायची ही चांगली पद्धत आहे. ही पद्धत वापरल्यामुळे तुम्हालाही चांगले परिणाम दिसून आले असतील.

१५. ‘आज जगात इतकं दुःख का आहे?’ या प्रश्‍नाचं उत्तर द्यायला तुम्ही ईयोबच्या पुस्तकाचा वापर कसा करू शकता? (चित्रंसुद्धा पाहा.)

१५ तुम्ही ईयोबच्या अहवालाचा वापर करूनसुद्धा या प्रश्‍नाचं उत्तर देऊ शकता. सुरुवातीला तुम्ही हा प्रश्‍न विचारल्याबद्दल त्या व्यक्‍तीची प्रशंसा करू शकता. मग तुम्ही त्यांना सांगू शकता, की त्यांच्यासारखंच आणखी एका व्यक्‍तीलासुद्धा हाच प्रश्‍न पडला होता. त्याचं नाव ईयोब होतं. त्याला बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. त्याच्यावर आलेल्या दुःखांसाठी देव जबाबदार आहे असं त्याला वाटलं. (ईयो. ७:१७-२१) हे ऐकून कदाचित त्या व्यक्‍तीला जाणवेल, की असा विचार करणारे आपण एकटेच नाही. मग तुम्ही त्यांना हे समजावून सांगू शकता की खरंतर देवाने नाही तर सैतानाने ईयोबर दुःखं आणली होती. माणसं फक्‍त स्वार्थासाठी देवाची उपासना करतात हे सिद्ध करण्यासाठी त्याने असं केलं होतं. पुढे तुम्ही त्यांना सांगू शकता, की देव जरी आपल्यावर दुःख येऊ देत असला, तरी आपण त्याला विश्‍वासू राहून सैतानाला खोटं ठरवू याची त्याला खातरी आहे. अशा प्रकारे, आपल्यावर कोणतंही दुःख आलं तरी देव ते कधीच आणत नाही हे आपण त्यांना पटवून देऊ शकतो.

कोलाज: १. वणवा पेटल्यामुळे एका स्त्रीचं सगळंकाही उध्वस्त झालंय. राखेच्या ढिगाऱ्‍यात सापडलेली एक फोटो फ्रेम तिच्या हातात आहे. त्याकडे बघून ती ढसाढसा रडत आहे. २. नंतर ती स्त्री विपत्ती मदतकार्य शिबिराजवळ लावलेल्या एका ट्रॉलीजवळ येते आणि एक बहीण तिला बायबलमधून वचन वाचून दाखवते.

“देव कधीच दुष्टपणे वागू शकत नाही” हे इतरांना समजावून सांगायला तुम्ही ईयोबच्या पुस्तकाचा वापर कसा करू शकता? (परिच्छेद १५ पाहा)


१६. दुःखात असलेल्या एखाद्या व्यक्‍तीला ईयोबच्या पुस्तकाचा कसा फायदा होऊ शकतो याबद्दल एक उदाहरण सांगा.

१६ ईयोबच्या पुस्तकाचा मारीयो नावाच्या एका व्यक्‍तीला कसा फायदा झाला याचा विचार करा. २०२१ मध्ये आपली एक बहीण टेलिफोन साक्षकार्य करत होती. तिचा पहिला फोन मारीयोला लागला. तिने त्याला एक वचन वाचून दाखवलं आणि सांगितलं, की देव फक्‍त आपल्या प्रार्थनाच ऐकत नाही तर आपल्याला एक चांगलं भविष्य आणि आशाही देतो. याबद्दल मारीयोला काय वाटतं असं विचारल्यावर तो म्हणाला, की बहिणीने फोन केला तेव्हा तो आत्महत्या करणार होता आणि त्याबद्दल एक चिठ्ठी लिहीत बसला होता. तो म्हणाला: “माझा देवावर विश्‍वास आहे. पण आज सकाळीच मी असा विचार करत होतो की कदाचित देवाला माझी काळजी नाहीए.” त्या बहिणीने त्याला दुसऱ्‍यांदा फोन केला, तेव्हा तिने ईयोबवर आलेल्या दुःखांबद्दल त्याच्यासोबत चर्चा केली. मग मारीयोने ईयोबचं संपूर्ण पुस्तक वाचून काढायचं ठरवलं. म्हणून बहिणीने त्याला पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर या बायबलची लिंक पाठवली. याचा काय परिणाम झाला? मारीयोने बायबल अभ्यास सुरू केला. देवाला आपली काळजी आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे हे समजल्यामुळे त्याच्याबद्दल आणखी शिकून घ्यायची मारीयोची इच्छा वाढली.

१७. देवाने ईयोबचा अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवल्याबद्दल आपण त्याचे आभारी का आहोत? (ईयोब ३४:१२)

१७ देवाच्या वचनात लोकांचं जीवन बदलायची आणि दुःखांचा सामना करणाऱ्‍यांचं सांत्वन करायची जबरदस्त ताकद आहे. (इब्री ४:१२) यहोवाने ईयोबचा अहवाल बायबलमध्ये लिहून ठेवला याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! (ईयो. १९:२३, २४) ईयोबच्या पुस्तकातून आपल्याला याची खातरी मिळते, की निश्‍चितच “देव दुष्टपणे वागत नाही.” (ईयोब ३४:१२ वाचा.) देव आपल्यावर दुःख का येऊ देतो आणि आपण त्याचा धीराने सामना कसा करू शकतो, हेसुद्धा आपल्याला ईयोबच्या पुस्तकातून कळतं. तसंच, दुःखात असलेल्यांना सांत्वन द्यायलाही ते आपल्याला मदत करतं. पुढच्या लेखात आपण पाहू, की इतरांना चांगला सल्ला देण्याच्या बाबतीत आपण ईयोबच्या पुस्तकातून काय शिकू शकतो.

तुमचं उत्तर काय असेल?

  • देवाने ईयोबवर दुःख का येऊ दिलं हे समजल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

  • समस्यांचा सामना करताना ईयोबच्या उदाहरणातून आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  • इतरांना मदत करण्यासाठी आपण ईयोबच्या पुस्तकाचा वापर कसा करू शकतो?

गीत १५६ विश्‍वासाने ताकदवान!

a विश्‍वासू सेवक योसेफचा मृत्यू झाला (इ.स.पू. १६५७) आणि मोशेची इस्राएलचा प्रमुख म्हणून नियुक्‍ती झाली (सुमारे इ.स.पू. १५१४) त्या काळादरम्यान ईयोब जगला असावा. याच काळादरम्यान यहोवा आणि सैतानामध्ये वाद झाला असावा आणि ईयोबवर परीक्षा आल्या असाव्यात.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा