वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 नोव्हेंबर पृ. १०-१५
  • वृद्ध आणि आजाऱ्‍यांची काळजी घेताना आनंद टिकवून ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वृद्ध आणि आजाऱ्‍यांची काळजी घेताना आनंद टिकवून ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंदी राहणं कठीण का जाऊ शकतं?
  • आनंदी कसं राहता येईल?
  • इतर जण कशी मदत करू शकतात?
  • म्हातारपणातही आनंद टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • वृद्धजनांची काळजी घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • यहोवा आपला “सर्वात मोठा आनंद” आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ विभागीय पर्यवेक्षकांसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 नोव्हेंबर पृ. १०-१५

अभ्यास लेख ४५

गीत १११ आपल्या आनंदाची कारणं!

वृद्ध आणि आजाऱ्‍यांची काळजी घेताना आनंद टिकवून ठेवा

“जे अश्रू गाळत पेरणी करतात ते आनंदाने कापणी करतील.”—स्तो. १२६:५.

या लेखात:

वृद्धांचा आणि आजारी लोकांचा सांभाळ करणाऱ्‍यांना कोणत्या समस्या येतात आणि त्यांतही ते आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतात ते पाहू या.

१-२. वृद्धांची किंवा आजारी व्यक्‍तीची काळजी घेणाऱ्‍यांबद्दल यहोवाला कसं वाटतं? (नीतिवचनं १९:१७) (चित्रंसुद्धा पाहा.)

“आमच्या लग्नाला ३२ वर्षं झाली आहेत आणि मागच्या पाच वर्षांपासून मी माझ्या आजारी बायकोची काळजी घेतोय,” असं कोरियामध्ये राहणारा जीन-येल म्हणतो. तो पुढे म्हणतो: “तिच्या आजारामुळे तिला हालचाल करणं शक्य नाही. माझं माझ्या बायकोवर मनापासून प्रेम आहे आणि मी आनंदाने तिची काळजी घेतो. तिला झोपायला आमच्या घरात हॉस्पिटलमधला एक खास बेड आहे. मी रोज रात्री तिच्या शेजारी झोपतो आणि झोपताना तिचा हात माझ्या हातात घेतो.”

२ तुम्हीही तुमच्या वृद्ध आईवडिलांची, किंवा आजारी जोडीदाराची, मुलाची किंवा मित्राची काळजी घेताय का? तुम्ही आनंदाने त्यांची सेवा करत आहात यात काही शंका नाही. कारण तुमचं त्यांच्यावर जिवापाड प्रेम आहे. इतकंच काय, तर त्यांची सेवा करून तुम्ही दाखवता की तुमचं यहोवावरही किती प्रेम आहे. (१ तीम. ५:४, ८; याको. १:२७) पण असं असलं तरी, तुम्हाला काही आव्हानंही येत असतील. कदाचित दुसऱ्‍यांना ते माहीत नसतील. कदाचित तुम्ही विचार कराल, ‘मी कोणत्या परिस्थितीतून जातोय, हे माझं मलाच माहीत.’ कदाचित तुम्ही इतरांसमोर वरवर आनंदी असल्याचं दाखवाल. पण एकटे असताना तुमचे अश्रू तुम्हाला अनावर होत असतील. (स्तो. ६:६) इतरांना तुमच्या परिस्थितीची जाणीव असो वा नसो, यहोवाच्या नजरेतून काहीच सुटत नाही याची खातरी बाळगा. (निर्गम ३:७ सोबत तुलना करा.) तुम्ही केलेला प्रत्येक त्याग, तुम्ही गाळलेला प्रत्येक अश्रू त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. (स्तो. ५६:८; १२६:५) तुमच्या जवळच्या व्यक्‍तीसाठी तुम्ही केलेल्या एकूण एक गोष्टीची यहोवा दखल घेतो. तुम्ही त्यांची सेवा करता, तेव्हा जणू काय तुम्ही यहोवाला उसणं देता असं तो समजतो. आणि याबद्दल तो तुमची नक्की परतफेड करेल!—नीतिवचनं १९:१७ वाचा.

कोलाज: इतरांची काळजी घेणारे त्यांच्या जवळच्या लोकांची काळजी घेत आहेत. १. एक बहीण तिच्या बिछान्याला खिळलेल्या वयस्कर आईला भरवत आहे. २. एक बहीण व्हिलचेअरवर असलेल्या तिच्या नवऱ्‍याला बुट घालायला मदत करते. ३. एक लहान मुलगा त्याच्या पप्पांसोबत फुटबॉल खेळायला जात आहे. त्याआधी त्याची आई त्याला हेलमेट घालते. ४. एक भाऊ एका वयस्कर भावाला भेटायला त्याच्या घरी गेला आहे आणि त्याच्यासोबत प्रार्थना करत आहे.

तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्‍तीची काळजी घेताय का? (परिच्छेद २ पाहा)


३. अब्राहाम आणि साराला तेरहची काळजी घेताना कोणत्या समस्या आल्या असतील?

३ बायबलमध्ये इतरांची काळजी घेणाऱ्‍या बऱ्‍याच स्त्री-पुरुषांची उदाहरणं दिली आहेत. सारा आणि अब्राहामचंच उदाहरण घ्या. त्यांनी ऊर देश सोडला, तेव्हा त्यांचे वडील तेरहसुद्धा त्यांच्यासोबत गेला. त्या वेळी तो सुमारे २०० वर्षांचा होता. ऊरपासून हारानपर्यंतचा त्यांचा प्रवास जवळपास ९६० किलोमीटरचा होता. (उत्प. ११:३१, ३२) यात काही शंका नाही, की अब्राहाम आणि साराचं तेरहवर खूप प्रेम होतं. पण त्यांना तेरहची काळजी घेताना बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला असेल यात काही शंका नाही. त्या काळी लोक सहसा उंटावर आणि गाढवावर प्रवास करायचे. पण तेरहच्या वयामुळे त्याच्यासाठी असा प्रवास करणं कठीण असेल. अब्राहाम आणि सारालासुद्धा त्याची काळजी घेऊन पार गळून गेल्यासारखं वाटत असेल. पण यात काही शंका नाही की यहोवाने त्यांना ताकद दिली असेल. त्यांच्यासारखीच यहोवा तुम्हालाही नक्की ताकद देईल.—स्तो. ५५:२२.

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

४ आनंदी राहिल्यामुळे इतरांची काळजी घेणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. (नीति. १५:१३) परिस्थिती कितीही कठीण असली तरी आनंदी राहणं शक्य आहे. (याको. १:२, ३) पण हे कसं करता येईल? एक मार्ग म्हणजे, आपल्या परिस्थितीबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवायला मदत मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करणं. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना आनंद टिकवून ठेवायला आणखी कशामुळे मदत होऊ शकते, हे या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच, इतर जण त्यांना कशी मदत करू शकतात हेही आपण पाहणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण पाहू या, की इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना आपला आनंद टिकवून ठेवणं का गरजेचं आहे आणि असं करणं त्यांना कठीण का जाऊ शकतं.

आनंदी राहणं कठीण का जाऊ शकतं?

५. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांनी आपला आनंद टिकवून ठेवणं का गरजेचं आहे?

५ जर इतरांची काळजी घेणारे आपला आनंद गमावून बसले, तर त्यांना थकून गेल्यासारखं वाटू शकतं. (नीति. २४:१०) असं झालं तर ज्यांची ते काळजी घेतात त्यांची प्रेमाने काळजी घेणं त्यांना कठीण जाईल. मग इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना कोणत्या गोष्टीमुळे त्यांचा आनंद टिकवून ठेवणं कठीण जाऊ शकतं?

६. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना थकून गेल्यासारखं का वाटू शकतं?

६ त्राणच उरत नसेल. लिया नावाची बहीण म्हणते: “एखादा दिवस चांगला गेला असला तरी, दिवसाच्या शेवटी मला थकून गेल्यासारखं वाटतं. असं वाटतं की माझ्यात काही त्राणच उरला नाही. साधं मेसेजचं उत्तर द्यायचीही माझ्यात शक्‍ती उरत नाही.” काहींना पुरेशी झोप घेणं आणि स्वतःसाठी वेळ काढणंही कठीण जातं. आपली बहीण इनिस हिच्यासोबत असंच काहीसं घडतं. ती म्हणते: “रोज रात्री दर दोन तासांनी माझ्या सासूला काय हवंय ते पाहायला मला उठावं लागतं. यामुळे माझी झोपच होत नाही. कित्येक वर्षांपासून मी आणि माझ्या पतीने सुट्टी घेऊन कुठे फिरायला गेल्याचंही मला आठवत नाही.” तसंच, काहींना कार्यक्रमांना जाता येत नाही किंवा संघटनेच्या काही जबाबदाऱ्‍यांनासुद्धा नाही म्हणावं लागतं. याचा परिणाम म्हणजे, त्यांना एकटं किंवा परिस्थितीमुळे अडकल्यासारखं वाटू शकतं.

७. काहींच्या मनात दुःखाची किंवा दोषीपणाची भावना का येऊ शकते?

७ मनात दुःखाची किंवा दोषीपणाची भावना येत असेल. जेसीका नावाची बहीण म्हणते: “कधीकधी मला वाटतं की मी माझ्या पप्पांसाठी जेवढं केलं पाहिजे तेवढं करत नाही. मी जेव्हा आराम करायला थोडा वेळ काढते तेव्हा मला स्वार्थी असल्यासारखं वाटतं.” जेसीकासारखंच इतरांची काळजी घेणाऱ्‍या काहींना, आपण आपल्या जवळच्या व्यक्‍तीसाठी हवं तितकं करत नाही असं वाटू शकतं. काहींना वाटू शकतं की त्यांच्याकडून हे काम यापुढे होणार नाही. किंवा खूप थकून गेल्यामुळे ते आजारी असलेल्यांनाच कधीकधी वाईट-साईट बोलून जातात. या सगळ्या गोष्टींची त्यांना खंत वाटते. (याको. ३:२) शिवाय, आपली जवळची व्यक्‍ती पूर्वी कशी होती आणि आता तिचे काय हाल होत आहेत हे पाहून त्यांना खूप वाईट वाटतं. याबद्दल बारबरा म्हणते: “माझ्या जवळच्या व्यक्‍तीची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे हे पाहून मला खूप त्रास होतो.”

८. प्रेमाने बोलल्यामुळे किती बरं वाटू शकतं याचं एक उदाहरण द्या.

८ कोणालाच आपली कदर नाही असं वाटत असेल. असं का वाटू शकतं? इतरांची काळजी घेणारे खूप मेहनत घेतात आणि बरेच त्याग करतात. पण खूप कमी लोक त्यांच्या कामाबद्दल कदर व्यक्‍त करतात. पण प्रेमाने दोन शब्द बोलल्यामुळे त्यांना खूप बरं वाटू शकतं. (१ थेस्सलनी. ५:१८) याबद्दलच मेलिस्सा म्हणते: “कधीकधी माझी इतकी दगदग होते की मला रडूच येतं. पण मी ज्यांची काळजी घेते, ते माझ्या कामाबद्दल कदर व्यक्‍त करतात तेव्हा माझ्यात नवीन उत्साह येतो. त्यामुळे त्यांची सेवा करायची माझी इच्छा आणखी वाढते.” इतर जण कदर व्यक्‍त करतात तेव्हा खूप बरं वाटतं असं आमादू नावाचा भाऊ म्हणतो. तो आणि त्याची बायको त्यांच्या आजारी भाचीची काळजी घेतात. तिला फीट येते. तो म्हणतो: “आम्हाला तिची काळजी घेण्यासाठी जे त्याग करावे लागतात ते तिला पूर्णपणे समजत नसले, तरी ती जेव्हा आमच्याबद्दल कदर व्यक्‍त करते किंवा तिचं आमच्यावर प्रेम असल्याचं कागदावर लिहून ठेवते तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो.”

आनंदी कसं राहता येईल?

९. इतरांची काळजी घेणारे मर्यादांची जाणीव कशी ठेवू शकतात?

९ आपल्या मर्यादा ओळखा. (नीति. ११:२) आपल्याकडे नेहमीच हवं ते करायला वेळ आणि ताकद नसते. म्हणून आपण काय करू शकतो आणि काय नाही हे ठरवणं गरजेचंय. त्यामुळे कधीकधी काही गोष्टींना नाहीसुद्धा म्हणावं लागू शकतं, आणि त्यात काही गैर नाही. तसंच, जर एखाद्याला तुमची मदत करायची इच्छा असेल तर त्याची मदत घ्यायला मागेपुढे पाहू नका. याबद्दल आपला भाऊ जय असं म्हणतो: “आपल्याकडे जितका वेळ आणि ताकद आहे त्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखल्या आणि आपल्याला शक्य आहे तितकं करायचा प्रयत्न केला तर आपण आनंदी राहू शकतो.”

१०. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांनी समंजस असणं का गरजेचंय? (नीतिवचनं १९:११)

१० समंजसपणा दाखवा. (नीतिवचनं १९:११ वाचा.) तुम्हाला राग येतो तेव्हा समंजसपणामुळे तुम्हाला शांत राहायला मदत होईल. तसंच, एखादी व्यक्‍ती अमूक एका प्रकारे का वागत आहे हे समजून घ्यायलाही समंजसपणामुळे मदत होते. कधीकधी एक व्यक्‍ती गंभीर आजारामुळे तिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागू शकते. (उप. ७:७) जसं की, आजारपणामुळे एखादी प्रेमळ व्यक्‍तीसुद्धा फटकळपणे बोलू शकते, विनाकारण वाद घालू शकते किंवा कुरकुर करू शकते. जर तुम्ही गंभीर आजार असलेल्या एखाद्या व्यक्‍तीचा सांभाळ करत असाल तर तिच्या आजारपणाबद्दल जाणून घेतल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही जितकी जास्त तिच्या आजारपणाबद्दल माहिती घ्याल, तितकंच तुम्हाला हे जाणवेल की ती तिच्या स्वभावामुळे नाही तर आजारपणामुळे तशी वागते.—नीति. १४:२९.

११. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ काढणं गरजेचंय? (स्तोत्र १३२:४, ५)

११ यहोवासोबतचं नातं मजबूत करायला वेळ काढा. कधीकधी “जास्त महत्त्वाच्या” गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी बाजूला सारणं गरजेचंय. (फिलिप्पै. १:१०) या जास्त महत्त्वाच्या गोष्टींमध्ये यहोवासोबतचं आपलं नातं सामील आहे. दावीद राजानेही यहोवाच्या सेवेला सर्वात जास्त महत्त्व दिलं. (स्तोत्र १३२:४, ५ वाचा.) त्याच प्रकारे आपणसुद्धा रोज बायबल वाचायला आणि प्रार्थना करायला वेळ काढणं गरजेचंय. एलिशा नावाची एक बहीण असं म्हणते: “प्रार्थना केल्यामुळे आणि बायबलमधल्या दिलासा देणाऱ्‍या स्तोत्रांवर मनन केल्यामुळे मला आनंदी राहता येतं. प्रार्थनेपेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची नाही. माझं मन शांत ठेवण्यासाठी मी दिवसातून बऱ्‍याचदा यहोवाला प्रार्थना करते.”

१२. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला वेळ काढणं का गरजेचंय?

१२ स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला वेळ काढा. इतरांची काळजी घेणारे खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना कधीकधी ताज्या भाज्या आणायला आणि पौष्टिक जेवण बनवायला वेळ मिळत नाही. म्हणून त्यांना संतुलित आहार घेता येत नाही. शारीरिक आणि मानसिक रित्या निरोगी राहण्यासाठी नियमितपणे संतुलित आहार घेण्यासोबतच व्यायाम करणंही गरजेचंय. म्हणून आपल्याकडे जितका वेळ असतो त्याचा वापर आपण संतुलित आहार घेण्यासाठी आणि नियमितपणे व्यायाम करण्यासाठी केला पाहिजे. (इफिस. ५:१५, १६) त्यासोबतच, दररोज पुरेशी झोप घेणंसुद्धा गरजेचंय. (उप. ४:६) मेंदूचा अभ्यास करणाऱ्‍या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की पुरेशी झोप घेतल्यामुळे मेंदूला फायदा होतो. तसंच वैद्यकीय माहिती देणाऱ्‍या एका लेखात असं सांगितलंय, की पुरेशी झोप घेतल्यामुळे तणाव कमी होतो आणि कठीण परिस्थितीतही शांत राहायला मदत होते. पण या गोष्टी करण्यासोबतच, करमणुकीसाठी वेळ काढणंही गरजेचंय. (उप. ८:१५) इतरांची काळजी घेणाऱ्‍या एका बहिणीला आनंदी राहायला कशामुळे मदत होते, याबद्दल ती म्हणते: “जेव्हा वातावरण चांगलं असतं तेव्हा मी बाहेर जाते. तसंच, महिन्यातून निदान एकदा तरी मी माझ्या मैत्रिणींसोबत फिरायला जाते.”

१३. हसत-खेळत राहणं आरोग्यासाठी चांगलं का असतं? (नीतिवचनं १७:२२)

१३ नेहमीच गंभीर राहू नका. (नीतिवचनं १७:२२ वाचा; उप. ३:१, ४) हसल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. तुम्ही इतरांची काळजी घेता तेव्हा क्वचितच सगळ्या गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे घडतील. पण तणावात असतानाही तुम्ही हसत-खेळत राहता तेव्हा तुम्हाला ती परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळता येते. तुम्ही ज्या व्यक्‍तीची काळजी घेता त्यांच्यासोबत हसत-खेळत राहिल्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल.

१४. एखाद्या जवळच्या मित्राशी बोलल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

१४ जवळच्या मित्राशी बोला. कधीकधी आनंदी राहायचा होताहोईल तितका प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला चिंता सतावू शकतात. अशा वेळेस जवळच्या मित्रासमोर मन मोकळं केल्यामुळे बरं वाटतं; असा एक मित्र जो तुम्हाला लगेच चुकीचं ठरवणार नाही. (नीति. १७:१७) आनंद टिकवून ठेवण्यासाठी कधीकधी आपल्याला फक्‍त कोणीतरी ऐकून घेणारं आणि प्रेमाने दोन शब्द बोलणारं हवं असतं.—नीति. १२:२५.

१५. आशेमुळे आनंदी राहायला कशी मदत होईल?

१५ नवीन जगाची कल्पना करा. यहोवाने माणसांना आजारी आणि म्हातारं होण्यासाठी बनवलं नव्हतं. त्यामुळे त्यांची काळजी घेण्याचं काम तात्पुरतं आहे हे लक्षात असू द्या. (२ करिंथ. ४:१६-१८) “खरं जीवन” तर पुढे येणार आहे. (१ तीम. ६:१९) तुम्ही काळजी घेत असलेल्या व्यक्‍तीसोबत नवीन जगात कायकाय कराल याबद्दल तिच्याशी बोला. (यश. ३३:२४; ६५:२१) आपली बहीण हेदर याबद्दल असं म्हणते: “मी ज्यांची काळजी घेते त्यांना मी सांगते की नवीन जगात आपण सोबत मिळून शिवणकाम करू, धावू, सायकल चालवू. पुनरुत्थान झालेल्या जवळच्या लोकांसाठी जेवण बनवू. यहोवाने आपल्याला एक चांगली आशा दिल्यामुळे आम्ही सोबत मिळून त्याचे आभार मानतो.”

इतर जण कशी मदत करू शकतात?

१६. इतरांची काळजी घेणाऱ्‍या भाऊबहिणींची आपण कशा प्रकारे मदत करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून त्यांना मदत करा. मंडळीतले भाऊबहीण इतरांची काळजी घेणाऱ्‍यांसाठी मदतीचा हात पुढे करू शकतात. यामुळे त्यांना थोडा आराम मिळेल आणि स्वतःची कामं उरकता येतील. (गलती. ६:२) काही भाऊबहिणींनी तर यासाठी आठवड्याचा आराखडासुद्धा बनवलाय. नतालिया तिच्या लकवा मारलेल्या पतीची काळजी घेते. ती म्हणते: “आमच्या मंडळीतला एक भाऊ आठवड्यातून एक-दोन दिवस माझ्या पतीसोबत वेळ घालवायला आमच्या घरी येतो. ते दोघं सोबत मिळून प्रचार करतात, गप्पा मारतात आणि पिक्चरही बघतात. यामुळे माझ्या पतीला खूप बरं वाटतं. तसंच, मलासुद्धा माझी इतर काही कामं करता येतात आणि घराबाहेर पडता येतं.” शक्य असेल तर, तुम्ही रात्रीच्या वेळी आजारी व्यक्‍तीची काळजी घेण्यासाठीही थांबू शकता. म्हणजे त्यांची काळजी घेणाऱ्‍यांना रात्रीची चांगली झोप घेता येईल.

दोन बहिणी एका वयस्कर बहिणीला भेटायला आल्या आहेत. त्यांची काळजी घेणारी बहीण बाहेर जाताना आनंदाने त्यांचा निरोप घेते.

इतरांची काळजी घेणाऱ्‍या भाऊबहिणींची तुम्ही कशी मदत करू शकता? (परिच्छेद १६ पाहा)a


१७. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना आपण सभा चालू असताना कशी मदत करू शकतो?

१७ सभा चालू असताना मदत करा. काही भाऊबहीण आपल्या जवळच्या व्यक्‍तीची काळजी घेण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना कधीकधी सभेमध्ये, संमेलनामध्ये आणि अधिवेशनामध्ये पूर्ण लक्ष देता येत नाही. म्हणून अशा वेळी मंडळीतले भाऊबहीण अधूनमधून किंवा शक्य असेल तर पूर्ण वेळ आजारी किंवा वयस्कर व्यक्‍तीसोबत बसू शकतात. यामुळे काळजी घेणाऱ्‍या व्यक्‍तीला मदत होऊ शकते. जर आजारी किंवा वयस्कर व्यक्‍ती घराबाहेर पडू शकत नसेल, तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत झूमवर सभेसाठी उपस्थित राहू शकता. यामुळे त्यांची काळजी घेणाऱ्‍याला सभेला प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहता येईल.

१८. इतरांची काळजी घेणाऱ्‍यांसाठी आपण आणखी काय करू शकतो?

१८ इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. मंडळीतल्या वडिलांनी अशा भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी वेळोवेळी भेटलं पाहिजे. (नीति. २७:२३) खरंतर आपली परिस्थिती कशीही असली, तरी आपण सर्वांनीच इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपल्याला त्यांची किती कदर आहे हे सांगितलं पाहिजे. त्यांना ताकद मिळावी आणि त्यांना आनंदी राहता यावं यासाठीही आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो.—२ करिंथ. १:११.

१९. आपल्याला लवकरच कोणते आशीर्वाद मिळणार आहेत?

१९ लवकरच यहोवा आपले सगळे अश्रू पुसून टाकेल. त्यावेळी कोणीही आजारी पडणार नाही आणि मरणार नाही. (प्रकटी. २१:३, ४) “लंगडा हरणासारखा उड्या मारेल.” (यश. ३५:५, ६) म्हातारपण आणि आजारपण नसेल. त्यामुळे इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना वृद्ध आणि आजारी जणांची अवस्था पाहून आज जे दुःख होतंय तेही राहणार नाही. कारण बायबल म्हणतं: “जुन्या गोष्टी कोणालाही आठवणार नाहीत.” (यश. ६५:१७) पण आजही आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की नवीन जग येईपर्यंत यहोवा आपल्याला एकटं सोडणार नाही. आणि आपण जर ताकद मिळवायला यहोवावर विसंबून राहिलो, तर तो आपल्याला “सहनशक्‍ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा” म्हणून नक्की मदत करेल.—कलस्सै. १:११.

तुमचं उत्तर काय असेल?

  • इतरांची काळजी घेणाऱ्‍यांना आनंदी राहणं कठीण का जाऊ शकतं?

  • ते आनंदी कसं राहू शकतात?

  • तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता?

गीत १५५ सदासर्वदाचा आनंद

a चित्राचं वर्णन: दोन बहिणी एका वयस्कर बहिणीला भेटायला आल्यामुळे तिची काळजी घेणाऱ्‍या बहिणीला बाहेर जाण्यासाठी थोडा वेळ मिळाला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा