मी गाडी चालवणं सोडून द्यावं का?
कदाचित तुम्ही बऱ्याच वर्षांपासून गाडी चालवत असाल. स्वतःची गाडी असल्यामुळे तुम्ही कधीही कुठेही जाऊ शकता. पण अलिकडे तुमच्या घरच्यांना आणि मित्रांना तुमची चिंता वाटते आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गाडी चालवणं सोडून द्यावं. पण तुम्हाला कदाचित वाटेल की ते उगाच चिंता करत आहेत.
तुमच्यासोबतही असंच काहीसं घडतंय का? असं असेल, तर तुम्ही गाडी चालवावी की नाही हे ठरवायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?
काही देशांमध्ये, ठरावीक वय झाल्यावर गाडी चालवण्यासाठी लायसन्स पुन्हा बनवायला डॉक्टरांची संमती घ्यावी लागते. अशा देशांमध्ये राहणारे ख्रिस्ती तिथल्या कायद्यांचं पालन करतात. (रोम. १३:१) पण आपण कुठेही राहत असलो, तरी आपण सुरक्षितपणे गाडी चालवायला योग्य आहोत की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे.
तपासून पाहा
अमेरिकेत वृद्ध लोकांसाठी असलेल्या एका संघटनेच्या वेबसाईटवर असं म्हटलंय, की तुम्ही स्वतःचं परिक्षण करण्यासाठी स्वतःला हे प्रश्न विचारू शकता:
मला रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसतं का? गाडी चालवताना रस्त्यावरच्या पाट्या आणि बोर्ड पाहणं मला कठीण जातं का?
गाडी चालवताना आरसा पाहण्यासाठी मान वळवणं आणि चारही बाजूला नजर ठेवणं मला कठीण जातं का?
हालचाल करण्याची माझी क्षमता आता कमी झाली आहे का? उदाहरणार्थ, ॲक्सीलरेटरवरून ब्रेकवर पटकन पाय ठेवायला मला जमतं का?
मी गाडी इतकी हळू चालवतो का, की माझ्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते?
बऱ्याच वेळा माझा अपघात होताहोता राहिलाय का? काही ठिकाणी गाडी धडकल्यामुळे गाडीवर ओरखडे पडलेत का किंवा ती चेपली आहे का?
माझ्या गाडी चालवण्यामुळे मला पोलिसांनी कधी थांबवलंय का?
मला गाडी चालवताना डुलकी लागते का?
मी जी औषधं घेतो त्यामुळे मला गाडी चालवणं कठीण जातं का?
माझ्या घरच्यांनी किंवा मित्रांनी माझ्या गाडी चालवण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे का?
वर दिलेल्या एक किंवा दोन प्रश्नांची उत्तरं तुम्ही ‘हो’ म्हणून दिली असतील, तर तुम्ही काही फेरबदल करायचा विचार करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही किती वेळ गाडी चालवाल हे तुम्ही ठरवू शकता; खासकरून रात्रीच्या वेळी. तसंच, तुम्ही कशा प्रकारे गाडी चालवता हे तुम्ही वेळोवेळी तपासून पाहू शकता. शिवाय, याबद्दल तुम्ही घरातल्यांना किंवा मित्रांनाही विचारू शकता. काही देशांमध्ये गाडी चालवणाऱ्यांना रस्त्यावरचे धोके टाळता यावेत आणि गाडी सुरक्षितपणे चालवता यावी, म्हणून सेफ्टी ड्रायव्हींग कोर्स असतो. तुमच्या इथे जर असा कोर्स असेल तर तुम्ही तो करायचा विचार करू शकता. पण जर तुम्ही वर दिलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ‘हो’ म्हणून दिली असतील, तर गाडी न चालवणंच योग्य राहील.a
बायबल तत्त्वांचा वापर करून निर्णय घ्या
आपल्याला आता चांगल्या प्रकारे गाडी चालवता येत नाही, हे मान्य करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. मग याबद्दल योग्य निर्णय घ्यायला कोणती बायबल तत्त्वं आपल्याला मदत करू शकतात? दोन तत्त्वांचा विचार करा.
मर्यादांची जाणीव ठेवा. (नीति. ११:२) जसजसं आपलं वय वाढत जातं तसतशी आपली नजर कमजोर होत जाते, आपल्याला कमी ऐकू येतं, आपले स्नायू कमजोर होतात आणि आपल्याला पटकन हालचाल करता येत नाही. म्हणून काही लोक विशिष्ट वयानंतर काही खेळ खेळायचं सोडून देतात. कारण अशा प्रकारच्या खेळांमुळे आपल्याला इजा होऊ शकते, हे त्यांना माहीत असतं. गाडी चालवण्याच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. मर्यादांची जाणीव असलेल्या व्यक्तीला जेव्हा जाणवतं की गाडी चालवणं तिच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं, तेव्हा ती गाडी चालवायचं सोडून द्यायचा निर्णय घेऊ शकते. (नीति. २२:३) तसंच, जेव्हा इतर लोक तिच्या गाडी चालवण्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तेव्हा ती नम्रपणे त्यांचं ऐकते.—२ शमुवेल २१:१५-१७ सोबत तुलना करा.
रक्तदोष टाळा. (अनु. २२:८) गाडी चांगल्या प्रकारे न चालवल्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. वय झाल्यामुळे चांगल्या प्रकारे गाडी चालवता येत नसूनही जी व्यक्ती गाडी चालवते, ती स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालते. तिच्या हातून जर एखादा मोठा अपघात झाला तर तिच्यावर रक्तदोषही येऊ शकतो.
हे खरंय की गाडी चालवणं सोडून द्यायचा निर्णय घेणं सोपं नाही. या निर्णयामुळे इतर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण तुम्हाला तुमच्या मर्यादांची जाणीव असल्यामुळे, तुम्ही नम्र असल्यामुळे आणि तुम्हाला इतरांची काळजी असल्यामुळे यहोवा तुमच्यावर खूप प्रेम करतो हे कधीच विसरू नका. तसंच, यहोवा तुम्हाला सांभाळेल याचीही खातरी बाळगा. (यश. ४६:४) तो तुम्हाला कधीच सोडून देणार नाही. म्हणून गाडी चालवण्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी यहोवाने तुम्हाला बुद्धी आणि समंजसपणा द्यावा यासाठी त्याला प्रार्थना करा.
a आणखी माहितीसाठी ८ ऑक्टोबर २००२ च्या सावध राहा! मधला, “मोटार अपघात तुम्ही सुरक्षित आहात का?” हा लेख पाहा.